सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !

पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !

उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.

मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.

पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.

तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्‍या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<नी, अतिरिक्त स्वच्छतेच्या हव्यासापायी जी केमिकल्स इत्यादी अवाजवी प्रमाणात वापरली जातात, नैसर्गिक स्रोतांचा अपव्यय होतो, आरोग्याला हानी होते व प्रतिकारशक्ती खालावते त्याला पूर्ण अनुमोदन. याच संदर्भात एक आठवले, सकाळ संस्थेने इ. एम. सोल्यूशन नावाचे रसायनविरहित क्लिनिंग लिक्विड सोल्यूशन मागे त्यांच्या पुणे हापिसात विक्रीसाठी ठेवले होते. (सध्या आहे/ नाही माहित नाही.) ज्यांना रसायनमुक्त स्वच्छता हवी असेल त्यांसाठी तो उत्तम पर्याय आहे.>
अकु.... E M हे bacterial solution आहे....
http://www.mapleorgtech.com/... या साइट वर माहीती मिळेल....त्याचे इतर बरेच उपयोग आहेत....

सुशान्त, धन्यवाद इ. एम. द्रावणाच्या लिंकबद्दल. आम्ही दोनेक वर्षं वापरले ते. सकाळच्या ऑफिसात विक्रीला असायचे. सकाळचे ऑफिस घराजवळच असल्यामुळे सोयीचेही होते. इ. एम.चे बरेच उपयोग आहेत. लादी पुसणे, ओटा-टाईल्सची स्वच्छता, बाथरूम -टॉयलेट्स स्वच्छ करणे इत्यादी तर आहेतच, शिवाय गटारांच्या, पाईप्सच्या स्वच्छतेसाठीही ते खूप उपयोगी आहे. दुर्गंधी घालविण्यासाठीही उपयुक्त. दुर्दैवाने त्याचा हवा तितका प्रसार व प्रचार झालेला नाही.
ज्यांना अशा रसायनमुक्त द्रावणाने स्वच्छता करण्यास पसंती असेल त्यांनी जरूर ते वापरावे. त्याचे उपयोग वरच्या साईटवर दिलेले आहेतच. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही बेष्ट आहे!
http://www.mapleorgtech.com/products.php?id=MTE=

डिशवॉशरची गरज भारतात नाही हे अगदी खर आहे. भारतात असताना माझा घरकामात सहभाग खरचं नगण्य होता. मी एकटी राहताना नेहमीच कामवाल्या काकूंवर depend होते.
पण जर पाण्याचे Usage Compare केले नक्कीच डिशवॉशर economical आहे हाताने भांडी घासण्यापेक्षा.... कामवाल्या काकूंनी दांडी मारली की त्रास होतो..परत एक वेळा येणार का दोन वेळा त्याप्रमाणे घरात थांबा आणी भांडी नीट नाही घासली तर 'भांडा' नाहीतर घासून घ्या...
त्यापेक्षा मला वाटल की वॉशिंग मशीन सारखा त्याचा पण उपयोग व्हायला हरकत नसावी .
पण वीजबिलाचा मुद्दा मात्र बरोबर.ते जर फ़ार येत नसेल तर काय हरकत आहे?.

डिशवॉशर संदर्भात नी ला अनुमोदन. तसेच आपल्याकडे सहसा ड्रायरची गरज लागत नाही. एकतर लाँड्री रोज किंवा एका दिवसाआड होतेच. वर्षातून जवळजवळ ८ महिने उन भरपूर. त्यामुळे वार्‍यावर कपडे सुकतात.

माझ्या घरी इन्-सिंक इरेटर लावलेले आहे. माझं भांडी घासण्याकरता वेगळं सिंक आहे तिथे लावून घेतलय. खुपच फायदा होतो. अर्थात सगळं उरलेलं खरंकटं मी त्याच्या घशात ओतत नाही. ते ओल्या कचर्‍यात जातं पण निदान यामुळे सिंकला वास येत नाही. पाणी सोडून अर्धा मिनिट फिरवलं की साफ.

@ मामी .. इन्-सिंक इरेटर अपार्ट्मेट मधे नंतर बसवता येत का?... का building बांधतानाच सोय करावी लागते काही माहित आहे का?..

डिशवॉशरमधे भांडी टाकताना अर्धीअधिक साफ करूनच टाकावी लागतात की. मला तरी एक दिवस बाई आली नाही तर घासून टाकणं परवडेल. कष्ट लेव्हलला फार काही फरक नाही. अनेकदा डिशवॉशरमधे खूप तेलकट असेल काही तर निघत नाही. म्हणजे प्रत्येक भांडं वेगळं वॉशिंग आपणच करा... ना रे बाबा...
जोवर कामाला माणसं मिळतायत आणि परवडतायत तोवर डिशवॉशर नो वे.
बादवे माझी कामवाली बाई भांडी घासून वाळत घालते आणि मग इतर कामं होईतो ती निथळतात मग ती भांडी पुसून जागच्याजागी लावून ठेवते. हे डिशवॉशर करू शकत नाही. Happy

डिशवॉशरला वीज आणि पाणी खूप लागते. आपल्या देशात वीजेचा आणि पाण्याचा एवढा तुटवडा असताना कशाला ते खुळ ?

>>पण जर पाण्याचे Usage Compare केले नक्कीच डिशवॉशर economical आहे हाताने भांडी घासण्यापेक्षा.... <<
हे कसं काय?

डिशवॉशरने पाणी वाचते की वाया जाते हा आमच्या घरातला नेहमीचा वादाचा मुद्दा आहे. माझ्या मते वाचते. जालावर डिशवॉशर सेव्ज वॉटर शोधले तर बरीच माहिती सापडेल.

भारतात कामाला माणसे मिळत असली तरी ती येतात तेव्हा घरी असणे कसे जमवता? बंगलोरात फ्लॅट बघताना एका ठिकाणी घराला एक वेगळे दार आणि एक छोटी खोलीच दिलेली होती युटिलिटी म्हणून.

बाकी पसारा आवरायच्या माझ्या युक्त्या इतरांप्रमाणेच. आठवड्याची स्पेशल सफाई आणि बाकी बारिकसारीक रोजच्या रोज. स्वयपाकघरात कट्ट्यावर कुठलीही वस्तू शिल्लक नाही हे दरवेळी निघताना बघायचे. कट्ट्यावर एक ब्रेड बिन ठेवली आहे त्यात केक, बिस्किटे, खाऊची पाकीटे ठेवते.

कपड्यांची कपाटं आवरायला अर्धा-एक तास फक्त? Uhoh
नीधप, बहुतेक तुम्ही फार पसारा होण्याआधीच आवरत असाल Happy (खरं म्हणजे तसंच करायला पाहिजे)
काही वर्षांपुर्वीपर्यंत मी कपडे रंगानुसार स्टॅक करायचे..म्हणजे एका रंगाचे/छटेचे एकत्र, त्यावर दुसरा, असे Happy आजकाल ते बंदच झालंय. या विकेण्डला करीन म्हणते..पुढचा विकेण्ड पुन्हा मी घरी नसणार Sad

नताशा,
मी शक्यतो संपूर्ण कपाट कधीच आवरायला काढत नाही. ज्या कप्प्यात अतिशय क्लटर निर्माण झालेला असतो तो वेळ झाला की आवरायचा. यामुळे कंटाळा येत नाही. कपड्यांचा, पुस्तकांचा कप्पा असेल तर जास्तीत जास्त अर्धा तासात आवरून होतो.

हे परत वाचा.
बाकी रंगांनुसार कपडे लावण्याएवढी मोठी कपडे ठेवण्याची सोय माझ्याकडे नाही. एकेका रंगाचे तेवढे कपडेही नाहीत.. Happy

बेकिंग सोडा व विनेगर उत्तम आहेत व पुरेशी आहेत अक्ख घर साफ ठेवायला.

मी लादी , टब विनेगर ओतून पुसते. जरा घासाघासी होते(हे भारतात असताना), आता सिंगापुरात हॉटेलात कसली आलीय स्वच्छता.

(आधीचे किंमत प्रकरण झेपले नाही, इतक्यासाठीच की आपल्या घरच्या अस्वच्छताने आपण किंमत कशी करतो कळले नाही खरच.)

डिशवॉशरला वीज आणि पाणी खूप लागते. आपल्या देशात वीजेचा आणि पाण्याचा एवढा तुटवडा असताना कशाला ते खुळ ?>>>>>
सिंडरेला नाही . भारतात डिश वॉशर वापरण योग्य कि अयोग्य याबद्दल मला काही म्हणायच नाही आहे. पण हँड वॉशिंगपेक्षा डिश वॉशर मध्ये (esp Energy Saver ) मध्ये पाणी कमी लागते.
इथे US मध्ये तर डिश वॉशर मध्येच भांडी धुवायला रिकमेंड करतात. कारण बरेचदा आपण हॉट किंवा वार्म वॉटर मध्ये भांडी धुतो. त्यामुळे वीज/गॅस पण जास्त जाळतो.
गुगल केलस तर तुला अगदी सायंटीफिकली कंपॅरिझन केलेली माहिती मिळेल बघ.
आमच्या इले. कंपनीच्या साईटवर पण ही माहिती आहे. मिळाली कि टाकते.

>>>बादवे माझी कामवाली बाई भांडी घासून वाळत घालते आणि मग इतर कामं होईतो ती निथळतात मग ती भांडी पुसून जागच्याजागी लावून ठेवते. हे डिशवॉशर करू शकत नाही. <<
भारतात हि एक मजा असते.

इथे डिशवॉशरची भांडी मला आवडत नसल्याने मी तेव्हाची तेव्हा घासून मोकळे. भरपूर मित्र्-मैत्रीणी आल्या की use n throw. बाकी एकटे माणसाची काय म्हणा भांडी. use n throw बरे पडते.

सीमा, माझा डिश वॉशर तरी बॉइलिंग हॉट पाण्यात भांडी धुतो. आणि पाण्याचं टेंप बदलायचा पर्याय नाहीये.

हो गं. सगळ्यांचाच. Happy मी ते हाताने गरम पाण्याने भांडी धुण्याशी कंपेअर केलेल ते लिहिलेल.

>>>माझा डिश वॉशर तरी बॉइलिंग हॉट पाण्यात भांडी धुतो. आणि पाण्याचं टेंप बदलायचा पर्याय नाहीये.<<<

अय्या, टेंप बदलायचा डिश वॉशर आहे कि काय? मग मला हि सांगा, लगेच घेवून टाकेन. Wink

Heemangi | 4 March, 2011 - 22:56 नवीन
@ मामी .. इन्-सिंक इरेटर अपार्ट्मेट मधे नंतर बसवता येत का?... का building बांधतानाच सोय करावी लागते काही माहित आहे का?..

>>>>> हीमांगी, बांधकाम करत असताना लावून घेतलेला चांगलाच. पण नंतरही लावता येत असेलच. त्यांचीच लोकं येऊन पहाणी करून सुचना आणि सल्ले देतात.>>>>

भांडी घासताना कामवाल्या सतत नळ सुरू ठेवतात आणि त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो हे खरं आहे. त्याकरता हल्ली ते वेगळ्या प्रकारचे नळही मिळतात. ज्यात पाणी + हवा असे मिश्रण होऊन बाहेर येते. त्यामुळे निम्मे पाणी वाचते.

भारतात डिशवॉशर वापरायचा तर वेगळे गरम पाण्याचे कनेक्शन घेणे वगैरे सोपस्कार करावे लागतील. आपली भांडी तेलकट असतात त्यामुळे साध्या पाण्याने डिशवॉशरमधून कितपत साफ निघतील याबद्दल मी साशंक आहे. आणि ती वरवर साफ करून पुन्हा डिशवॉशरमध्ये घालण्यापेक्षा हातासरशी साफ करून टाकलेली बरी. पण अर्थातच हा पूर्णपणे वैयक्तीक मुद्दा आहे.

डिशवॉशरमध्ये खरकटी भांडी टाकून स्वच्छ निघतच नाहीत. आणि आपली चहाची, भाताची,आमटीची पातेली तर व्यवस्थित स्वच्छ करुनच डिशवॉशरला टाकावी लागतात. (मग ती त्यात टाकायचीच का? हा वेगळा मुद्दा आहे. इथे बाय डिफॉल्ट डिवॉ असतोच म्हणून निम्मं काम करुनही त्यात टाकली जातात)

मामी, इथे फॉसेट एअरेटर मिळतात ते आपल्या नळालाच लावता येतात. नळ बदलावा लागत नाही. पाच मिनिटात लावता येतात. तसेच लो फ्लो शॉवरहेडही मिळतात. दोन्हीच्या वापराने पाण्याची बचत होते.

हे सर्व वाचून मी आता घराची स्वच्छता लेव्हल अप्ग्रेड करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जिथे पाणी वर बसविलेल्या टाकीतून येते ती टाकी देखील मधून मधून साफ करून घ्यायला हवी. मी मध्ये पुण्यात एका घरी राहायला गेले होते त्यांचे घर खरेच सुरेख स्वच्छ होते. किचन तर अगदी डॉल हाउस सारखे. मुलींनाही शावर झाल्यावर बाथरूम मध्ये खराटा फिरवून बाथरूम साफ करण्याचे ट्रेनिग दिलेले. कुठेही डाग / लिव्हिन्ग क्लटर नाही. कौतुकास्पद.

मला भान्डी धुवायला खुप खुप आवडता..... (लक्शन? अवलक्शन?)
सासरी एकदा सुरवातिला मी आणी साबा एकत्र कीचन मधे काम करत असताना मी त्या भाजीसाठी वापरत असलेले चमचे सुद्धा घासुन पुसुन ठेवले......
तेव्हा पासुन त्या मला "सबकुछ धो डाला॑" असा चिडवतात.....

(अवान्तर - टिम्ब आणी क्श कसा लिहायचा???)

धूळ फार आहे. कपाटांवर तर म्हणजे कपाटाच्या वर तर खूपच. सारखीच धूळ येते घरात. कितीही झटकली तरी. त्याला काय करावे. काही जणांकडे पाहिले धूळ नाहीच.

thank you so much Swapna......
मी खुप R & D करुनही मला टिंब काही जमत नव्हता.... आणी स्वतःच नाव पण नीट लीहीता येत नव्हत.....
आता येता.... Happy

टीप्सबद्दल धन्यवाद!

स्वाती२, विनीगर आणि मीठ किती प्रमाणात वापरावे? कोणते विनीगर (मला या प्रकाराबद्दल माहीती नाहीये, विनीगर स्वयंपाकात वापरतात येवढेच माहीतीये) वापरावे?

कपड्यांसाठी मी कोणतेही सॉफ्टनर वापरत नाही. विनीगर कसे आणि कोणते वापरावे?

लाजो, फॉसेट एअरेटर आपल्याकडे मिळतात का?

ध्वनी, बेकिंग सोडा व विनेगर उत्तम आहेत व पुरेशी आहेत अक्ख घर साफ ठेवायला.>>> याबद्दल जरा सविस्तर सांगु शकाल का?

वत्सला, कपबशावरचे चहाचे डाग काढायला आणि कास्ट आयर्न पॅन साफ करायला नुसते मीठ वापरते. तांब्या पितळेच्या भांड्याना आधी स्प्रे बॉटलने व्हिनेगर मारुन घेते आणि मग स्पंजवर मीठ टाकून घासते. भांडे करपले असेल तर त्यावर मीठ किंवा बेकिंग सोडा घालून ठेवले तर साफ करायला सोपे जाते. कार्पेटवर रेड वाईन सांडली तर लगेच मीठ टाकायचे. बरेच मीठ लागते. पण गुलाबी झालेले मीठ व्हॅक्युम करता येते.
साधे व्हाइट व्हिनेगर वापरायचे. १/२ कप व्हिनेगर सॉफ्टनरसाठीच्या कंपार्ट्मेंटमधे घालायचे किंवा रिन्स सायकलच्या वेळी घालायचे.
इथे लॅमिनेटेड काउंटर टॉप्स आहेत त्यामुळे मी स्वच्छतेसाठी व्हिनेगर वापरते. देशात बरेच जणांकडे मार्बल असतो त्यावर मात्र चुकूनही व्हिनेगर वापरु नका.

Pages