सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !

पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !

उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.

मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.

पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.

तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्‍या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रीत, हे बघ हे ऑर्गनायझर - http://www.bedbathandbeyond.com/product.asp?SKU=16492612&RN=205&

यात सगळे समान नीट बसते. झारे, पळ्या, भाजी वाढायचे चमचे, ब्रश, व्हिस्क, रवी असे सगळे. माझ्याकडे अजुन एक लहान पण ऑर्गनायझर आहे त्यात सुर्‍या, बांबूचे झारे, चमचे, गाळणी वगैरे ठेवते.
अ‍ॅपल कटर घेण्यापेक्षा अ‍ॅपल कोअरर घेतलास तर? सामानात नीट बसेल Happy

इन्सिनरेटर म्हणजे अति उच्च तापमानावर जळणारी फर्नेस.
a furnace or apparatus for burning trash, garbage, etc., to ashes

इन्सिंकरेटर हे ब्रॅंड नेम आहे - त्यात वर्ड प्ले आहे - सिंकमधले गारबेज डिस्पोजल - इन्सिंकरेटर Happy

इथले बरेच लोक त्याला(च) इन्सिनरेटर म्हणतात !

असं आहे तर.. आणि हे कुठे सिंकलाच जोडलेले असते का? माझ्या या घरात असे काही नाहिये. Sad

अंजली, सगळ्यांकडे असतंच असं नाही. पण इथे बर्‍यापैकी कॉमन आहे हा गार्बेज डिस्पोजल प्रकार. सिंकलाच जिथे खरकटं जातं तिथे हे बसवलेलं असतं. आणि सिंकजवळच एक बटन असतं. खरकटं जेव्हा घालवायचं असेल तेव्हा पाणी सोडून ते बटन ऑन करायचं की खरकटं श्रेड होऊन निघून जातं. चुकून चमचे वगैरे आत पडले तर चमचे वाया गेलेच पण हे डिस्पोजलही बिघडण्याची शक्यता.

इन्सिनरेटर म्हणजे अति उच्च तापमानावर जळणारी फर्नेस.
a furnace or apparatus for burning trash, garbage, etc., to ashes<<< इन्सिनरेटर्स मोठ्या हॉस्पिटल्स मधे मेडिकल वेस्ट डिस्ट्रॉय करायला वापरतात. हॉस्पिटल्स डिझाईन करतानाच या इन्सिनरेटर्स साठी वेगळी जागा राखुन ठेवावी लागते.

इथे ऑस्ट्रेलियामधे बर्‍याच स्टेट्स मधे सिंकइरेटर वापरायला परवानगी नाही. काही कारणांमुळे इथे पुर्णतः बंदी आहे सिंक इरेटर्स वापरायला. आता दुकानात पण मिळत नाहीत. तरी काही जुन्या घरात ज्यांनी बंदी येण्या पूर्वी हे लावलेले आहेत त्या घरात अजुन बघायला मिळतात.

@प्रित, मिनोती ने लिंक दिलीये तसे प्लॅस्टिक ट्रेज पण मिळतात. काही डबल लेयर असतात. वरचा ट्रे अर्धा असतो आणि तो स्लाइड होतो. मी फोटो टाकेन.

हिवाळ्यात सिंकमधुन वास यायचे मला लक्षात आलेले कारण -
हिवाळ्यात घरं शक्यतो बंद असतात आणि आपण एस्झॉस्ट फॅन लावतो. तेव्हा जर घराचे दरवाजे एअर टाईट असतील (जे बर्‍याच वेळा असतात) तर घरातले एअर प्रेशर कमी होते आणि सिंक च्या पाईपमधे जर काही गॅस असेल तर तो वर येतो आणि घाण वास येतो. दिवसातून थोडावेळ दरवाजा/ खिडकी उघ्डून ठेवली किंवा व्हेंटीलेशन साठी काहितरी केले तर वास येत नाही. इथल्या नविन घरात आता बेलो टाईपचे व्हेंटीलेटर असतात. त्याने घरातलं प्रेशर कमी झालं की आपोआप व्हेंटीलेटर उघडून प्रेशर अ‍ॅडस्ट होतं. नाहीतर दरवाजे आणि बाल्कनी वगरे उघडता उघडत नाही.

Happy मितान छान धागा.. सर्व प्रतिसाद वाचले.. Happy
लाजो..माझ्याकडेही तू वर फोटो टाकलेत तसे आणी इतर ही भरपूर ऑर्गनाईझर्स आहेत ज्यामुळे किचन मधे,खोल्यांमधून,बाथरूम्स मधून पसारा होत नाही.. शिवाय प्रत्येक वस्तू न शोधता सापडते Happy
आईवडिल या बाबतीत खूप्पच काटेकोर होते..त्यामुळे लहानपणी कधीकधी राग ही येई मला.. पण लहानपणी लागलेल्या चांगल्या सवयी आता नक्कीच कामी येतात. आईकडे दुधा ची,चहाची आणी इतर स्वैपाकासाठी वेगवेगळ्या सांडश्या ही होत्या... आता इतकं नाही तरी जे काही आहे ते व्यवस्थित आणी स्वच्छ आहे ही काळजी घेतली जाते.

आमच्या एका ओळखीच्या फॅमिलीत आम्ही एकदा वॉशिंग मशीन मध्ये आपल्या रेग्युलर कपड्यांबरोबर कळकट्ट झालेली पायपुसणी धुवायला टाकलेली पाहिली. Angry

खुप छान लिहिलयस मितान...
तुझा पहिला किस्सा वाचुन मला हेमलकसाची आठवण आली. तिथल्या आदिवासी पाड्यात जेंव्हा आम्ही फिरलो तेंव्हा ते पाडे इतके प्रचंड स्वच्छ आणि नीटनेटके होते की बघायला मस्तच वाटत होतं . आणि हेच जेंव्हा आम्ही भामरागडाला गेलो जे त्यांचं तालुक्याचं ठिकाण आहे तिथे पुर्ण गावात घाण तर होतीच पण अतीप्रचंड प्रमाणावर गुटख्याची पाकिटं होती..

बाकीच्यांचे रिप्लाय सविस्तर वाचेन. interesting धागा आहे..

गावातली स्वच्छता आणि घरोघरीची स्वच्छता बघायची असेल, अनुभवायची असेल तर पुण्याजवळच्या गावडेवाडीला अवश्य भेट द्या. आजवरच्या दोन्ही भेटींत त्या गावातली टापटीप, स्वच्छता पाहून मन इतके प्रसन्न झाले...!!! गावच्या सरपंचीण बाई, समस्त गावकरी आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने लख्ख गाव ठेवलंय ते!

का नाही करता येणार? पाहुणे यायच्या आधीसुध्दा घर नीटनेटक केलं नसेल तर येणार्‍या पाहुण्यांची केवढी कदर केली जाते त्यावरून सहज करता येते किंमत.<<<
तुम्हाला हवं तसं त्यांनी त्यांचं घर ठेवलंय की नाही यावरून तुम्ही माणसांची किंमत करता????
मीच किंमत करते असल्यांची. असले पाहुणे माझ्याकडे कधीही आले नाही तरी चालतील.

बाकी आपल्या स्वच्छतेच्या हॉस्पिटल क्लीन कल्पना अनेक पातळ्यांवर अंगाशी येऊ शकतात.
१. सतत लायसॉल किंवा तत्सम क्लिनिंग/ सुगंधी लिक्विड्स चा वापर हा प्रदुषणाला कारणीभूत ठरतो. लहान मूल घरात आहे म्हणून असल्या गोष्टींचा अति वापर हा मुलावर परिणाम करू शकतो.
२. आपण अति प्रमाणावर रोज वापरत असतो तो डिटर्जंट हा पाण्याच्या प्रदूषणातला खूप मोठा घटक आहे.
३. बाकी स्वच्छतेच्या हव्यासापायी पाण्याचा, टिश्यू पेपर्सचा माजुरडा वापर आणि त्यामुळे होणारी निसर्गाची हानी याबद्दल माझ्यामते प्रत्येकालाच माहीत आहे.
४. सतत तथाकथि स्वच्छतेचा अतिरेक करत राह्यल्याने माणसाची इम्युनिटी खालावतेच.
५. बाहेर कुठे गेल्यावर असा अतिरेक नसेल तिथे माणसांनाच पाण्यात पहायची सवय लागते. अनेक आनंदांना, अनेक चांगल्या माणसांना हे लोक मुकतातच पण लोकांनाही आनंद घेऊ देत नाहीत कशाचा. मग पुढे जाऊन यांना स्वच्छतेचे ओसीडी होतात.

माझे शब्द अतिरेकी वाटतील कदाचित पण दुसर्‍यांच्या घरातली तुम्हाला वाटलेली अस्वच्छता काढून बघण्यापेक्षा आपल्या घरापुरतंच बोलायला काय हरकत आहे? मितान ने दोन उदाहरणे घेतलीयेत केवळ मुद्द्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच लोकांची घरं कशी घाण असतात चा जप करायची गरज नाहीये.

ह्म्म्म्म मागे रैनानी पण लिहिलं होतं, स्वच्छता असावी, नीटनेटकेपणा असावा पण त्याचा अतिरेक नक्कीच नसावा.
मुंबईसारख्या ठिकाणी टिचभर जागेत पसारा हा होणारच. भारतात सगळीकडेच भरपूर धुळीमुळे दिवसातून २-३ वेळा डस्टिंग नाही केली तर धुळीचे थर दिसतात अशी परिस्थिती आहे. हल्ली बहुतांशी मोठ्या शहरांमध्ये घरातले सगळेच मेंबर १०-११ तास घराबाहेर असतात. अश्यावेळी अगदी काटेकोर स्वच्छता पाळणं कदाचित नाही जमणार एखाद्याला. त्यातनं प्रत्येकाचे स्वच्छतेचे दंडक निराळे.

उगिचच दुसर्‍यांच्या घरातल्या अस्वच्छतेबाबत बोलण्यापेक्षा मिताननी लिहिलंय तसं आपण वापरत स्वच्छतेच्या टीप्स वैगरे लिहिलेलं जास्त चांगलं.

अजून काही पटकन आठवलेली उदाहरणे म्हणून.
१. उसगावात शिकायला जायची तयारी सुरू झाली तेव्हा मिळालेल्या सूचनांपैकी एक होती ती म्हणजे आठवड्याभराचे कपडे असायला हवेत. तिथे विकेंडलाच कपडे धुतले जातात.
पहिल्यांदा कळल्यावर ई काय घाणेरडेपणा आहे असंच आलं एकदम मनात. पण तिथे असं करतात म्हणल्यावर आपण पण तसेच करायचे आहे हे कळलं होतं.
तिथे पोचल्यावर लक्षात आलं की रोजचे रोज कपडे धुवायला वेळ मिळणंही शक्य नाहीये आणि जॉर्जियासारख्या तश्या तुलनेने कमी थंडीच्या राज्यातही जिथे तिथे एसी असल्याने म्हणा किंवा घाम कमी येत असल्याने म्हणा सोमवारपासून कपडे पडले तरी इतके खराब होत नव्हते.
ग्रॅड स्टुडंट असताना महिन्यातून ४ वेळापेक्षा जास्त लॉण्ड्री परवडण्यासारखी पण नव्हती ते वेगळेच.

२. मधे WHO ने जागतिक पातळीवर काही पोटाचे, दातांचे संसर्गजन्य आजार आटोक्यात येण्यासाठी गाइडलाइन्स काढल्या. जगभर पसरवल्या. ज्यातून भारताला वगळले कारण त्याची गरज नव्हती. त्या गाइडलाइन्स सामान्य भारतीय माणसे पिढ्यानपिढ्या पाळत होते. गाइडलाइन्स अश्या
अ. जेवायच्या आधी व जेवण झाल्यावर साबणाने वा मातीने वा राखेने स्वच्छ हात धुणे. आणि पाण्याने साबण/ माती/ राख ही काढून टाकणे. आणि मग पुसणे.
ब. जेवण झाल्यावर किमान पाच चुळा खळखळून भरणे.
हे ऐकल्यावर मला खूप गंमत वाटली. (खूप मोठ्या माणसाकडून हे ऐकलंय त्यामुळे सत्यतेची शंका घेऊ नका)

थोडक्यात काय तर स्वच्छतेच्या कल्पना वेगळ्या ठिकाणी वेगळ्या असू शकतात. त्याला आजूबाजूचे हवामान व इतर परिस्थितीही अवलंबून असते. आणि स्वच्छतेच्या कल्पना म्हणजे माणूस नव्हे.

तटि.: मी अस्वच्छतेचे समर्थन करत नाहीये. अतिरेकी स्वच्छतेला आणि त्यावरून माणसाची किंमत करण्याला माझा विरोध आहे.

अरे वा ! खूप टिप्स मिळतायत.

भारतात गेल्यावर पुन्हा एकदा घर लावताना खूप उपयोग होणार आहे या टिप्स चा ! Happy

धन्यवाद मैत्रिणिंनो. ( मित्रांचा पत्ताच नाय अजूनही ! )

नीरजा धन्यवाद. प्रदुषणाचा मुद्दा लिहीणार होते, पण वैतागले. वाटपहात होते की कोणीतरी काढेल हा मुद्दा.
स्वच्छ्तेचे निकष भौगोलीक कारणांचेही मोहताज आहेत हे कसे काय विसरणार आपण ?

अल्पना- अगदी अगदी.

मी घराची स्वच्छता आणि निटनेटकेपणावरून माणसाची किंमत म्हटलं आहे. घर निर्जंतुक, म्युझीयमसारखं असलं पाहिजे असं म्हटल नाही. अर्थात काढणार्‍याने काहीही अर्थ काढावेत. ती काढायची काहींना सवय असतेच आणि आहेच हे सर्वांनाच माहीत आहे.

देशाच्या सार्वजनीक स्वच्छतेवरून देशाची प्रतिमा तयार होते तसच घराच्या निटनेटकेपणावरून आणि स्वच्छतेवरून घराच्या मालक्/मालकाची प्रतिमा तयार होतेच.

दोन्ही टोकं गाठण्याची गरज नाही. थोड्याफार गोष्टी इकडेतिकडे झाल्या तर चालतात. अचानक कोणी आलं तर तेवढं समजून घेतात. पण पाहुणे येणार हे आधी माहीत असेल तर आपसूकच थोडी स्वच्छता, आवराआवर केली जाते. आपण चार लोकांत जाताना नीटनेटके कपडे घालून जातो ना? तसंच आहे ते.

बरेचदा ईथे म्हणजे अमेरिकेत अनेकांकडे घर मोठे असेल, नवरा बायको कडे पुरेसा वेळ नसेल तर महिन्यातल्या ठरावीक दिवशी किंवा आपल्या सोईने लोकं मेड सर्वीस बोलवतात. आणी ह्या मेड्स घरं छान लखलखीत करून देतात.
देशात जिथे ज्येष्ठ नागरीक एकटे राहातात. वयोमानाने ज्यांना घराच्या साफसफाई साठी ईतकी अंगमेहेनत घेणं झेपत नाही अशांसाठी मुंबईत मेड सर्वीस सारखं काही उपलब्ध आहे का?कामवाल्या बायका हल्ली सरळ आम्ही बाथरूम,संडास धुणार नाही असं सांगतात. काय काय स्वच्छता करणार नाही ह्याची यादीच मोठी असते. मुंबई सारख्या ठिकाणी धूळ,प्रदूषण ह्यामुळे घरं फार पटकन खराब होतात्.झाडू पोछा जरी करून घेतला बाई कडून तरी त्याची क्वालिटी यथातथाच असते. मग अशावेळी जर रिलायेबल मेड सर्वीस मिळाली तर ते वरदानच ठरेल. कुणाला अशा सर्वीस बद्दल माहिती असेल तर त्यांची माहिती ईथे शेअर करता येईल का?

आरशासारख्या चकचकीत घराची कोणीही अपेक्षा करत नसतंच. पण काही गोष्टी अगदी किळसवाण्या वाटतात ते टाळले गेले तर बरे. स्वच्छतेचे पण टप्पे असतात ना. एक बेसिक हायजिन जे सगळ्यांनाच अनिवार्य असायला हरकत नसावी. आणि पुढचे एक्-दोन टप्पे गाठण्याची गरज असते... त्यापुढे आपापल्या सवयी, हौस, आळशीपणा किंवा हाताशी कामाला असणारी माणसं यावर स्वच्छता ठरते.

मी देखिल, बाई कामावर आली नाही तर काही काही गोष्टी ऑप्शनला टाकते. Happy

पण बेसिनच्या खाली ओलीकिच्च पायपुसणी, टॉयलेटला जाऊन आल्यावर घरातल्या उरलेल्या साबणाचा लाडू (खरंतर इथे लिक्वीड सोप निदानपक्षी नवीन चांगल्यातला साबण असणे गरजेचे असते), गुंतावळ, काळे झालेले टॉयलेट अशा गोष्टींची किळस येते.

( मित्रांचा पत्ताच नाय अजूनही ! )>> आमच्या इकडे हा प्रॉब्लेम नाहीए. आमच तर घर आपोआप स्वच्छच असत . Happy

मात्र कधी कधी आम्हाला आमच्या आम्ही जागेवर ठेवलेल्या वस्तू सापडत नाहीत ही गोष्ट वेगळी, पण त्यावर घर न आवरणे हा रामबाण उपाय आहे हे ही आम्ही संबंधीतांना सांगतोच. :).

आर्च, कोणाचीही कशावरूनही का होईना पण किंमत करायचा तुला अधिकार आहे असं तुला वाटतं ना. यातच आलं सगळं.

बाकी दुसर्‍याचं घर कसं घाण असतं आम्ही कसे स्वच्छ हे गाणं संपलं की मग योग्य चर्चा चालू होईल.

प्रॅडीला अनुमोदन. ज्यांना वयोपरत्वे किंवा तब्येतीमुळे घराची आवश्यक स्वच्छता राखता येत नाही त्यांना स्वच्छतेसाठी नोकरमाणसांवर अवलंबून राहावे लागते. भारतात, पुण्या-मुंबईत अशी सर्व्हिस कोणती कंपनी/ संस्था प्रोफेशनल लेव्हलवर देत असेल तर त्याविषयी इथे कृपया माहिती शेअर करा. खूप उपयोग होईल अशा माहितीचा.

नी, अतिरिक्त स्वच्छतेच्या हव्यासापायी जी केमिकल्स इत्यादी अवाजवी प्रमाणात वापरली जातात, नैसर्गिक स्रोतांचा अपव्यय होतो, आरोग्याला हानी होते व प्रतिकारशक्ती खालावते त्याला पूर्ण अनुमोदन. याच संदर्भात एक आठवले, सकाळ संस्थेने इ. एम. सोल्यूशन नावाचे रसायनविरहित क्लिनिंग लिक्विड सोल्यूशन मागे त्यांच्या पुणे हापिसात विक्रीसाठी ठेवले होते. (सध्या आहे/ नाही माहित नाही.) ज्यांना रसायनमुक्त स्वच्छता हवी असेल त्यांसाठी तो उत्तम पर्याय आहे.

मी आदिवासी वाड्यावस्त्यांवर पण राहून आलीये गेल्या २-४ वर्षात त्यामुळे बहुतेक स्वतःचं घर कितीही चकाचक ठेवलं मी तरी दुसर्‍याचं नसल्यावर आता माझा पापड मोडत नाही.
मातीच्या जमिनीवर घोंगडं पसरून किंवा घोंगड्याशिवायही बसायला काही वाटत नाही.
आमच्या डॉक्यूच्या शूटच्या वेळेला आम्ही सकाळी ९ वाजता बोलायला येणार म्हणून ६० च्या वरची ठाकर आऊ ५ + ५ किमी चालत गेली आणि आली केवळ नाचणी दळून आणायला. वैशुलीताई आणि दुसर्‍या ताई (मी) साठी भाकरी हवी म्हणून. सून आजारी होती पण सासूने दळण आणलंय म्हणल्यावर पटकन गरम भाकर्‍या टाकून दिल्या. मी मच्छी खात नाही म्हणल्यावर करांदं शिजवून दिली. स्वतःच्या हातातल्या दोन बांगड्या माझ्या हातात घातल्या. अश्या बाईला काचेच्या ग्लासात पाणी आणून देणं पासून अनेक आपल्या दृष्टीने स्वच्छ असलेल्या कृती माहितही नाहीत. म्हणून आऊ माझ्यासाठी कमी किमतीची होत नाही.

झारापीत बाबी धनगराच्या बायकोने तिच्याच घरात तिच्या प्रकारची साडी नेसायला शिकवली. बाबी धनगराच्या बायकोचं तोंड तंबाखूने भरलेलं, घरातच शेळ्या पण बांधलेल्या. पण ती तिथे माझी गुरू होती. निरक्षर, अशिक्षित होती पण नक्की कुठे थांबून फोटो काढायला लावायचा म्हणजे साडी नेसायच्या सगळ्या स्टेप्स बरोबर कळतील हे तिला नीट समजत होतं. कसली माणसाची किंमत करणार?

प्रत्येक वाड्यावस्त्यांवर फिरताना अनहायजिनच्या गोष्टी दिसायच्याही पण यात केवळ त्या माणसाचा दोष नसतो खूप सार्‍या गोष्टी असतात हे समजायची अक्कलही आलीच.

असो मला वाकडे अर्थ काढायची सवय आहे असं किंमत क्वीन ने जाहीर केलंच आहे तर तसं....

मिनोती, लाजो धन्स..मिनोती ने सांगितला तसा तर बसणार नाही.. तो खूप मोठा आहे आणि माझे काबिनेत्स छोटे आहेत.. लाजो तू सांगितलेला बघते जरा छोटा मिळाला तर.. Happy
वर्षु नील.. म्हणते आहे ते अगदी खरय . खूप राग येतो सारखं शिस्त, नीट सांगितलं कि पण ते लहान पणी सवय पडलेली बरी असते.. आता स्वतःला शिस्त लावताना इतका त्रास होतो.. माझ्या अजिबात रक्तात नाहीये.. आणि मग बसून विचार केला कि कळत .. ते आधीच नीट ठेवलं असतं तर असं झाला नसतं Sad

प्रित ड्रॉवरमध्ये कमी जागा असेल सगळे मोठेचमचे/व्हिस्कर/डाव/सांडशी ठेवायला तर असं एखादे का कंटेनर का नाही आणत यात रोज नियमित लागणारे साहित्य ठेवून हे ओट्यावर एका कोपर्‍यात ठेवता येईल आणि नेहमी न लगणारे साहित्य ड्रॉवरमधल्या खणात. कंटेनर विकतच आणायला हवा असे नाही घरात एखादा स्टीलचा/अ‍ॅल्युमिनिअमचा वापरात नसलेला डबा असेल तर त्यातही असं ठेवता येतील. फक्त वजनाने सारखा तोल जाऊन पडणारे हलके प्लास्टीकचे डबा/बरणी चालणार नाही काहीतरी जड लागेल.

tools.jpg
रुनी.. ते आहे माझ्या कडे .. पण चुकीचं घेतलं होतं इथे दाखवलं आहे तसं ..त्यातनं चमचे बाहेर यायचे तरी मी ते वापरायचे .. आम्ही घर बदलवलं मागच्या वर्षी तेव्हा मी ते काढलंच नाही ..आता काढते.. !!! Happy

प्रित त्याला जाड रंगीत कागद/ पुठ्ठा कापून रंगवून आतून ठेवता येईल गोलाकार म्हणजे चमचे बाहेर येणार नाहीत. तेवढाच कलाकुसरीला वाव. Happy

Pages