पारसी

पाटिया - पारसी पद्धतीची ग्रेव्ही असलेली भाजी - फोटोसहित

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मटार (ताजे किंवा फ्रोझन ) २ कप,
काजू (ऐच्छिक) अर्धा कप
हिरव्या मिरच्या ४/५
लसूण पाकळ्या २/३
आले अर्धा इंच
कोथिंबीर बारिक चिरुन, अर्धा कप
जिरे २ टिस्पून
मिरिदाणे १०/१२ जरा ठेचून
व्हीनिगर - पाव कप
कांदे बारीक चिरुन - २
टोमॅटो बारिक चिरुन - २
तेल ४ टेबलस्पून
साखर किंवा गूळ - एक टिस्पून
मीठ

क्रमवार पाककृती: 

१) आले, मिरची व लसूण वाटून घ्या
२) तेल तापवून त्यात मिरी, व जिरे टाका
३) त्यात मिरचीचे वाटण टाका व जरा परता (पण लागू देऊ नका) अर्धी कोथिंबीर टाका.
४) त्यात व्हीनिगर टाका व नीट ढवळा (झाकण ठेवू नका), साखर टाका
५) मग त्यात बारिक चिरलेला कांदा टाका व परता
६) त्यात बारिक चिरलेला टोमॅटो टाका, व तेल सूटेपर्यंत परता.
७) मग मटार व काजू टाका, परता.
८) पाणी घाला व मटार शिजवा. चवीनुसार मीठ घाला. उरलेली कोथिंबीर टाका.
१०) वरणभाताबरोबर खा. चपाती पराठ्यापेक्षा, भाताशी याची जोडी जमते.

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

फोटोत दिसतोय तो टोमॅटो नाही तर प्लम (आलू बुखार) आहे. सध्या इथे प्ल्म्स चे भरपूर पिक आलेय. बाजारात ढिगाने विकायला असतात. भरपुर घेतले तर काही कच्चे निघतातच. त्यातलेच काही या पाटियात ढकललेत.
खरा तर हा पारसी माश्यांचा प्रकार आहे. यात कोलंबी, पापलेट सारखे मासे टाकतात. मासे वापरुन करायची तर पाणी टाकून कांदा व टोमॅटो शिजू द्यावेत मग मासे टाकून एका उकळीनंतर गॅस बंद करावा.
यात उकडलेली अंडी पण चांगली लागतील. कांदा टोमॅटो शिजला कि कच्ची अंडी पण फोडून टाकता येतील, पण त्यावेळी पाण्याचे प्रमाण कमी असावे, म्हणजे अंडी पसरणार नाहीत.

आता नेहमीचा प्रश्न, व्हिनीगरला पर्याय ? शक्यतो नकोच. हिरवा मसाला, उकळणे आणि साखर घालणे, यामूळे व्हीनीगरचा वास अजिबात रहात नाही. उलट त्यामूळेच मसाल्यांची चव खुलते.
तरीपण अगदी नकोच असेल तर चिंचेचा कोळ वापरता येईल.
एकंदर ही आंबट तिखट भाजी, उन्हाळ्यात तोंडाला चव आणते, हे मात्र खरं.

पारसी व्हेज धनशाक

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तूरीची डाळ एक वाटी
वालाची डाळ एक टेबलस्पून
मुगाची, मसुरिची वगैरे डाळी मिळून दोन टेबलस्पून
एक छोटे वांगे, एक छोटे रताळे, एखादा लहान लाल भोपळ्याचा तूकडा,
एखादा फ़्लॉवरचा तुरा.
समुद्रि मेथीच्या चार पाच जुड्या ( नसल्यास साध्या मेथीची अर्धी जुडी )
चिंचेचा कोळ दोन टेबलस्पून, चवीला थोडीशी साखर.
तूप, मीठ, हिंग, हळद.

मसाल्यासाठी
धणे एक टेबलस्पून
जिरे एक चहाचा चमचा, एखादी लवंग, दोन चार मिरीदाणे, अर्धा इंच दालचिनी.
दोन हिरव्या वेलच्या. चार पाच लाल मिरच्या. सर्व कोरडे भाजून पूड करावी.
(किंवा तयार पारसी धनशाक मसाला तीन चहाचे चमचे )

भातासाठी :
दोन कप बासमति तांदूळ ( धुवुन अर्धा तास भिजवून निथळून घ्या ), दोन मोठे कांदे (उभे चिरुन), तूप, मीठ, हळद, खडा मसाला ( आवडीप्रमाणॆ )

क्रमवार पाककृती: 

सर्व डाळी एकत्र करुन धुवुन घ्या. त्यातच वर सर्व भाज्या चिरुन घाला. मग हळद हिंग घालून कुकरमधुन शिजवून घ्या. शिजल्यावर भाज्या वर राहतील, त्या बाहेर काढून घोटून घ्या. शक्यतो मिक्सरमधुन काढून घ्या, म्हणजे त्या एकजीव होतील. तूप गरम करुन त्यात वरील मसाला घालून परता. मग त्यावर डाळ, भाज्या, कोळ व साखर घाला.
उकळू द्या.

भातासाठी:
तूप तापवून त्यात उभे चिरलेले कांदे सोनेरी करुन घ्या. ( कांद्यावर थोडेसे मीठ व थोडी साखर पेरा ) कांदा काढून आवडीप्रमाणे खडा मसाला घाला, त्यावर हळद घालून तांदूळ परता. चार कप गरम पाणी घालून उकळी आली कि मीठ घाला. मोकळा भात करुन घ्या.

खायला घेताना भात वाढून वरुन डाळ घ्या.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

व्हेज धनशाक हि खरे तर पळवाट आहे. मटणाशिवाय धनशाक होउ शकत नाही. तरीपण मग माझ्यासारख्या मंडळीनी काय करावे ?

माहितीचा स्रोत: 
हं