काव्यलेखन

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 29 January, 2015 - 23:58

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट

पुढे एक पाऊल मी टाकतो

Submitted by जयदीप. on 29 January, 2015 - 10:49

पुढे एक पाऊल मी टाकतो
किती दूर आलोय ते पाहतो

तुझा रंग बनणार ओळख तुझी..
उजेडात जर वेगळा वाटतो

समुद्रास त्यांनी कुठे पाहिले?
नदीलाच जो तो झरा पाहतो

नको गात जाऊस गाणे तुझे
तुला फार ओला घसा लागतो

नकाशात पाहून पोचू तिथे
विचारून तर नेहमी पोचतो

-जयदीप

तू पण मी पण

Submitted by मिल्या on 29 January, 2015 - 05:10

विरहामध्ये झुरतो कणकण, तू पण मी पण
घेत राहतो श्वास तरी पण, तू पण मी पण

रात्र घेउनी आली अगणित स्पर्श-सुयांना
करायचे का चांदण-गोंदण, तू पण मी पण

सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण

माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण

लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण

सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण

मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण

- मिलिंद छत्रे

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

Submitted by विदेश on 29 January, 2015 - 03:34

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..
.

शब्दखुणा: 

नि:शब्दता

Submitted by भुईकमळ on 29 January, 2015 - 02:59

रात्रंदिन उरी कवटाळुन धरलेले शब्दांचे थवे
डायरीच्या चिटोरयांसारखेच
सांजवा-यावर भिरकावताना
आवंढून येते गळयाशी
जन्मभराची अगतिकता ...

स्वप्नात खोल बुडवणारया रात्रतळाशी
देहातली धुगधूगती तगमग गाडून टाकताना
चुकून सुटलेल्या उच्छवासानेच का
ढळते एखादे चांदणफुल झळ लागून
अनिर्बन्ध पसरलेल्या जलपर्णीच्या पसारयात ...

कुरतडत रहातो मेंदूला रातकिड्यांचा कोरस स्वर
हिवाळाबाधीत झाडांच्या पोकळीतून येणारां
नी बघता बघता
अवेळीच होउन जातात
रक्तातल्या नद्या, संयमीत शुभ्र बर्फवाटा
नि;शब्दतेची धुकाळ दुलई पांघरलेल्या .,

शब्दखुणा: 

☼ सह्याद्रीचा राणा ☼

Submitted by गणेश पावले on 28 January, 2015 - 03:02

☼ सह्याद्रीचा राणा ☼

raje.jpg

देहभाव तुझिया वाहतो चरणी
सह्याद्रीच्या राणा शिवराया।।

जुलमाचे सारे तोडोनिया पाश
रोखिला विनाश तुम्हीच राया।।

कोटी कोटी देव तुम्हाच कारणी
रक्षीली हिंदू भूमी जीवापाड।।

कित्येक संकटे झेलली तळहाती
बेजार बापुडे शत्रूगण ।।

अफजल्या - शाहीस्त्या जन्माची अद्दल
औरंग्या हरला मनातून।।

मराठ्यांचा राजा छत्रपती झाला
आनंदले सारे त्रिभुवन ।।

******************

माझी कविता कुणीतरी असावे

Submitted by princess on 28 January, 2015 - 01:48

माझी कविता कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणार
भरलेच डोळे कधी तर ओल आसवाना पुसणार !
कुणीतरी असावे
चादंन्याच्या बरोबर नेणार
अंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणार !
कुणीतरी असावे
फुलासारख फुलणार
फूलता फूलता सुगंध दरवळणार !
कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणार
पालिकडील किनार्यावरून आपली वाट पहणार !
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

समजून घ्या

Submitted by वैवकु on 28 January, 2015 - 01:34

मी किती समजावतो आहे चला समजून घ्या
शब्द वेडे वाटले तर मामला समजून घ्या

या इथे कोणी न माझे गाव हे माझे कुठे
मी जरी परकाच आहे आपला समजून घ्या

देवभोळ्या भाविकांची ही कुणी दिंडी नव्हे
चालला आहे गझलचा काफला समजून घ्या

मी स्वतःचा रंग आहे विठ्ठलाला लावला
विठ्ठलाचा रंग नाही चोरला समजून घ्या

वाटते आहे मलाही की... नको थांबायला
ओघ माझ्या वेदनांचा थांबला समजून घ्या

मी तुझी कल्पना झालो ..

Submitted by सुशांत खुरसाले on 27 January, 2015 - 22:56

ना भूमिका इथे काही, का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो

तू माझे वास्तव होणे, हे शक्य कधी नसल्याने
मी तुझ्या कल्पना केल्या,मी तुझी कल्पना झालो

जे दुखणे कोणालाही दुनियेत जाहले नव्हते
त्या एका दुखण्यावरचा मी सुन्न उतारा झालो

फुटणारच नव्हत्या केव्हा या एकांताला वाटा
मी केली गर्दी माझी , माझाच घोळका झालो

मी अजूनही फडफडतो तू विस्मरल्या वार्यांनी
मी तुझे शब्द लिहिलेला काळाचा तुकडा झालो

तितक्याला तितके उरले जगण्याचे प्रश्न निरंतर
ती तितकी अवघड झाली,जितका मी सोपा झालो

--सुशांत..

स्पार्टाकस यांना चो़खंदळ वाचकांकडून समर्पित ....

Submitted by स्वस्ति on 27 January, 2015 - 15:44

टीक टीक चालते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
हापिसात जाता धीर नाही
फोन चेक करी प्रवासात ... (१)

आहे जरी काम भारी, माबोवर चक्कर नेमाने
सोचू जो मै पलभरभी बसते वाचत अनुमाने
ईतर कोणतेही धागे नको ,
जीव अडकला "जाळ्यात "

जळी ही तू , स्थळीही तू
उठे तर सकाळी सकाळी ही तू
जितके वाचू तितके गाळात रुतु
दिवसभर मग नुसती हुरहुर तु
रोज नवे भाग तुझे, वाढतो गोंधळ डोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
कोण आहे खरा एजंट
कधी संशय अदित्याचा
कधी वाटती रमाकांत

तटी :काही ओळी र ला ट जोडल्या सारख्या वाटतील ... असूदेत ... पण त्या मागच्या भावना समजल्याशी कारण.

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन