तू पण मी पण

Submitted by मिल्या on 29 January, 2015 - 05:10

विरहामध्ये झुरतो कणकण, तू पण मी पण
घेत राहतो श्वास तरी पण, तू पण मी पण

रात्र घेउनी आली अगणित स्पर्श-सुयांना
करायचे का चांदण-गोंदण, तू पण मी पण

सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण

माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण

लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण

सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण

मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण

- मिलिंद छत्रे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण>>>>>>>सम्पूर्ण गझल आवडली, त्यात हे विशेष.:स्मित:

क्या बात है मिलिंदराव ..... आख्खी गजलच मनाला हिंदोळ्यावर झुलवणारी - "मी पण तू पण" - जियो !! Happy

सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण

मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण

मस्त.
गझल छान झालीये. Happy

माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण

लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण

>> क्या बात है !

लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण

वा. खयालांची मांडणी आकर्षक आहे. पण त्यापुढे जायला हवे कधीतरी.
शुभेच्छा.