गुजराथी

कैरीचे गुजराथी लोणचे

लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

एक किलो कैरीच्या फ़ोडी, हळद आणि मीठ लावून ठेवाव्यात. त्याला पाणी सुटेल
ते निथळून, फ़ोडी सूकवून घ्याव्यात.

पाव वाटी मोहरिची डाळ, पाव वाटी धण्याची डाळ, दोन टेबलस्पून मेथीचा रवा,
एक टेबलस्पून बडीशेप (थोडी पुड करुन), दोन तीन लवंगा आणि एक इंच दालचिनी
यांचे बारिक तूकडे, दोन टिस्पून हळद, पाव वाटी लाल तिखट, अर्धी वाटी मीठ, अर्धा
चमचा मोहरी. लागेल तसे तेल.

क्रमवार पाककृती: 

तेल तापवून त्यात मोहरी व हिंग घालावा. मग मेथीची पूड घालून जरा परतावे, मग मोहरी
डाळ घालावी. बाकिचे जिन्नस घालून आच बंद करावी. हे सगळे थंड झाले कि त्यात कैरीच्या
सुकवलेल्या फ़ोडी मिसळून घ्याव्यात. मग हे बरणीत भरावे. फ़ोडी बूडतील इतके तेल गरम
करून घ्यावे, आणि ते पूर्ण थंड झाले कि बरणीत ओतावे. सतत फ़ोडींवरती तेल राहील असे पहावे.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याचे काय प्रमाण ?
अधिक टिपा: 

या मसाल्याचे प्रमाण,आणि घटकही बेन आणि भाभी प्रमाणे बदलत राहतात.
पण मला यापेक्षा बंगाली पद्धतीचे, ओमेर कासुंदी हे लोणचे जास्त आवडते. बहुतेक मी लिहिले
आहे.

डाळ/तांदूळ ढोकळा

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, ३-४ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, मीठ, पाव चमचा हळद. फोडणीसाठी तेल, मोहोरी, जिरं, हिंग. सजावटीसाठी खोबरं, कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

तांदुळ आणि दोन्ही डाळी ५-६ तास एकत्र भिजवावे. पाणी उपसून टाकुन इडली/डोशासाठी वाटतो तसे वाटुन घ्यावे. थोडे मीठ घालुन ७-८तास आंबवुन घ्यावे. पीठ छान फसफसले पाहिजे.

ह्या पीठात १ टे स्पून तेल, हळद, बारीक वाटलेले- हिरव्या मिरच्या + आल्याचा तुकडा + लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व नीट मिसळुन घ्यावे. एका थाळ्याला (किंवा ढोकळे करायचे काही उपकरण असल्यास त्यात) तेलाचा हात लावुन पीठाचा हव्या त्या जाडीचा थर द्यावा. ढोकळा छान फुलतो. थाळा नीट बसेल अशा पातेल्यात अथवा कढईत घट्ट घाकण लावुन २० मिन वाफवुन घ्यावे. चांगली आंच लागली पाहिजे. ढोकळा झाला की पांढरी वाफ यायला लागते. पहिल्यांदाच करत असाल तर "नाइफ टेस्ट" करुन बघायला हरकत नाही.

गुजराथी पद्धतीने थोडा गोडसर ढोकळा करायचा असेल तर चमचाभर साखर घालावी. ताटात अगदी पातळ थर द्यावा. साधारण एक सेमिचा थर पुरेल. मिरची,लसणाची पाकळी एखादी कमी घालावी तसेच हळद घालु नये.

दोन्ही प्रकारात हिंग, मोहोरी, जिर्‍याची फोडणी आणि खोबरं/कोथिंबीर घालुन सजवावे.

dhokaLa.JPG

प्रकाशचित्रात पहिले चित्र आहे आईने केलेल्या ढोकळ्याचे. दुसरे आहे ते मी गुजराथी पद्धतीने केलेल्या गोडसर ढोकळ्याचे. आईने केलेला अर्थातच जास्त छान लागतो स्मित

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांना पोटभर नाष्टा होतो.
अधिक टिपा: 

१. पीठ उन्हाळ्यात ५-६ तासांत छान फसफसते. एरवी मी रात्री ओवनमधे ठेवुन देते ढोकळे सकाळी करायचे असतील तर. अवन प्री-हीट करायची गरज नाही.
२. पीठ छान फसफसले नसेल तर मिश्रण ताटात घालण्याआधी अगदी एक मिनिट चिमुटभर सोडा घालावा.

माहितीचा स्रोत: 
आई :)

झटपट ढोकळा

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गिट्स खट्टा ढोकळा १ पाकीट
दही, पाणी, तेल (पाकीटावर सांगीतल्याप्रमाणे) + पाव वाटी पाणी
मुठभर मक्याचे दाणे
चमचाभर आलं-हिरवी मिरची वाटण (ऐच्छीक)
चमचाभर साखर
फोडणीला तेल, मोहरी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग
पाव वाटी पाणी, त्यात चमचाभर साखर विरघळवून
चिरलेली कोथिंबीर
किसलेलं गाजर. चमचाभर.

क्रमवार पाककृती: 

*पाकीटाच्या कॄतीप्रमाणे पीठ भिजवून घ्यावं. वर आणखी पाव वाटी पाणी घालावं.
*पीठात वाटण, साखर आणि मक्याचे दाणे घालावे.
*तेलाचा हात लावलेल्या ढोकळे पात्रात पीठ घालून वाफवावं. (पहीले ७-८ मिनिटं प्रखर आचेवर आणि नंतरचे १० मिनिटं मंद आचेवर)
*वाफवलेल्या भांड्यातून लागलीच ढोकळे बाहेर काढावे. (पात्रातून नव्हे.)
* ढोकळे-पात्रात ढोकळे थंड झाल्यावर कापून ताटलीत काढावे.
* वरून फोडणी आणि साखरपाणी एकत्र करून ओतावं.
* कोथिंबीर, गाजरकीस घालून सजवावं.

मस्त ढोकळे होतात.

वाढणी/प्रमाण: 
३-४ माणसांना पुरे होतात.
अधिक टिपा: 

हिरवी चटणी लावून एकावर एक रचले तर सँडविच ढोकळा. स्मित
चटणी ऐवजी खिम्याचा थर दिला तर चांगले लागतात.

माहितीचा स्रोत: 
गिट्स

सुरती उंधियो

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

वांगी (छोटी - भरल्या वांग्यांना घेतो ती) ३-४
छोटे बटाटे २-३
रताळी, सुरण, कंद (प्रत्येकी साधारण कपभर फोडी)
घेवडा
तूर, सुरती पापडी, दाणा (वाल) पापडी - यांचे दाणे. (हे सगळे frozen मिळतात इथे. काही कॅनमधेही मिळतात. मी frozen वापरते.) - प्रत्येकी वाटीभर
ओले हरभरे वाटीभर. (मी frozen आणले होते.)
ओलं खोबरं २ वाट्या (मी frozen वापरलं.)
मेथी, शेपू - एकेक जुडी. थोडा पालकही घालायला हरकत नाही.
डाळीचं पीठ - अंदाजाने
आलं, लसूण, मिरचीची पेस्ट - अंदाजाने
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा
गरम मसाला (मी ही भाजी करताना बादशहाचा 'रजवाडी गरम मसाला' म्हणून मिळतो तो वापरते.)
लिंबू, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. वरून घालण्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं वगळून ठेवून बाकी खोबर्‍यात तिखट मीठ मिसळून ते वांगी आणि बटाट्यांना चिरा देऊन त्यांत (भरल्या वांग्यांमधे मसाला भरतो तसं) भरायचं.
२. सगळे दाणे, निवडून चिरलेला घेवडा, रताळं,सुरण,कंद यांच्या फोडी हे कुकरला एक शिट्टी होईपर्यंत वाफवून घ्यायचे. पार मेण होवू द्यायचं नाही.
३. मेथी, शेपू, पालक निवडून धुवून चिरून त्यात तिखट मीठ हिंग हळद आणि मावेल इतकं डाळीचं पीठ घालून त्याची भजी (मुकटे वळून - मुठिया) तळून घ्यायची. यात पाणी घालायचं नाही. भाजी धुवून निथळून लगेच चिरली असेल तर त्यात असतं तितकं पाणी पुरतं गोळा व्हायला.
४. मी मुठिया तळलेल्या तेलातच भाजी करते. (तेव्हा मुळात तळायलाच फार तेल घ्यायचं नाही.)
५. तर या तेलात हिंग, हळद, ओवा यांची फोडणी करायची.
६. त्यावर आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून घ्यायची. मग गरम मसाला घालायचा.
७. त्यात भरलेली वांगी, बटाटे आणि उरलेलं खोबर्‍याचं सारण परतायचं. पातेल्यावर झाकण ठेवून आधणाची एक चांगली वाफ येऊ द्यायची.
८. वांगी आणि बटाटे बर्‍यापैकी शिजले (अगदी मेण नाही!) की मग बाकी वाफवून घेतलेल्या भाज्या आणि दाणे घालायचे.
९. चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबू पिळायचं
१०. सगळं छान एकत्र परतून पुन्हा झाकण ठेवून एक चांगली दमदमून वाफ येऊ द्यायची.
११. शेवटी मुठिया पण त्यात मिसळायच्या.
१२. वाढताना वरून खोबरं कोथिंबीर घालून सोबत लिंबाची फोड द्यायची.
१३. मला नुसती वाटीत घेऊन खायलाही आवडते. जोडीला गरम फुलके केले तर ताटात स्वर्ग इ.इ. स्मित

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणाने ४ जणांना भरपूर व्हायला हवी.
अधिक टिपा: 

भारतात आई यात दोन कच्ची केळी सालासकट प्रत्येकी ४-५ चकत्या कापून घालते. इथे मला प्लँटेन घालायचा काही धीर झाला नाही.
तसंच काही लोक थोडी साखरही घालतात चवीला. मी घालत नाही.

माहितीचा स्रोत: 
आई. तिच्या माहितीचा स्त्रोत तिची गुजराथी मैत्रिण. :)