सर

आनंद सिंचन

Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 July, 2022 - 21:59

आनंद सिंचन

झिरमिर झिरमिर पानांमधूनी
थेंब कोवळे करती दंगा
धूवून जाता मलीन सारे
रस्तोरस्ती लाल गंगा

ओशाळ मनाचे धुवून गेले
आनंदी अंतरंग ओले
आत बाहेर इथे तिथे
ताथै ताथै सर बोले

ही थेंबाची जुनीच किमया
अभ्र मनाचे पोक्त फेकूया
रुजुन येऊ नव्याने दरवेळी
नवे कोंब नवी नव्हाळी

भिजली झाडे, भिजले वाडे
जुनाट भिंतीवर हरीत सडे
सृजनाचे सिंचन होता
रंग कळकट आपसूक झडे
© दत्तात्रय साळुंके
१-०७-२०२२

शब्दखुणा: 

आईची सर

Submitted by टोच्या on 10 May, 2020 - 04:39

काथवटीत थपथपा थापून
भानोशातील कडक आहारावर
खरपूस, कुरकुरीत भाजलेली
जाडजूड बाजरीची भाकर

नादावर किणकिणणाऱ्या
बांगड्या कळकट लालसर
कुंकवातून ओघळणारा
घाम पुसणारा फिक्कट पदर

आवलावरचं दूध सायीसह
ताटात ओतणारा हात सैलसर
बांधावरच्या गिलक्या दोडक्याचं
कालवण तर्रीबाज लालसर

हिरव्यागार लवंग्या, लसूण
त्यावर जरासं मीठ जाडसर...
पाट्यावर वाटलेल्या खर्ड्याची
सांगा येईल कशाला सर

आता रोजच बनताहेत
रेसिप्या घरोघरी
सांगा कुठला पदार्थ करील
आईच्या हाताची बरोबरी

मातृदिनाच्या शुभेच्छा!!!

शब्दखुणा: 

खुशाल राख व्हावे...

Submitted by मुकुंद भालेराव on 26 April, 2012 - 04:16

मी बघतो रोज तिला, असा जगण्यासाठी ।
नि जगतो रोज असा, तिला बघण्यासाठी ॥

लावून आग गेला तो पाऊस आठवांचा ।
सर एक पुरे डोळ्यांना सुलगण्यासाठी ॥

बघते मला अशी ती बघण्याचसाठी आता ।
अन माझ्याचपासूनी मी विलगण्यासाठी ॥

शापीत या जिण्याला उःशाप हाच व्हावा ।
अंती तिने असावे, मला बिलगण्यासाठी ॥

मिठीत विद्युल्लतेच्या लाभे काय वटाला ।
खुशाल राख व्हावे कुणी उमगण्यासाठी ॥

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सर