आईची सर

Submitted by टोच्या on 10 May, 2020 - 04:39

काथवटीत थपथपा थापून
भानोशातील कडक आहारावर
खरपूस, कुरकुरीत भाजलेली
जाडजूड बाजरीची भाकर

नादावर किणकिणणाऱ्या
बांगड्या कळकट लालसर
कुंकवातून ओघळणारा
घाम पुसणारा फिक्कट पदर

आवलावरचं दूध सायीसह
ताटात ओतणारा हात सैलसर
बांधावरच्या गिलक्या दोडक्याचं
कालवण तर्रीबाज लालसर

हिरव्यागार लवंग्या, लसूण
त्यावर जरासं मीठ जाडसर...
पाट्यावर वाटलेल्या खर्ड्याची
सांगा येईल कशाला सर

आता रोजच बनताहेत
रेसिप्या घरोघरी
सांगा कुठला पदार्थ करील
आईच्या हाताची बरोबरी

मातृदिनाच्या शुभेच्छा!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...
एक अस्सल ग्रामीण दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं..