हिरवे स्वप्न
पांघरुन घेतो चादर काळी काळी
भय दाटे का ते मायेच्या पदराखाली
निजताना डोळे उघडे ठेवून पाही
स्वप्नातच हिरव्या रमून काही बाही
संपून स्वप्न ते कोंबातून फुलताना
मी दिगंतराला पुरते कवळू पाही
तेजात न्हाऊनी घेई ऊंच भरारी
मातीतून मिळता अमृत होत प्रवाही
बंद झाल्या सर्व वाटा डंख काळाचे विषारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
टाक मागे व्यर्थ भीती टाक मागे जीर्ण नाती
वादळा ये म्हण निघालो आज मी काढून छाती
सोस तू आघात सारे ठेव कष्टांची तयारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
गाठ तू ध्येयास ऐसे साधका आदर्श व्हावे
व्हायचे ज्याला यशस्वी हेच त्याने आचरावे
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही रात्र सारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२० जानेवारी २०१२, ०६:००