श्री. विजय तेंडुलकर - मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे लेखक - यांचा प्रथम स्मृतिदिन १९ मे २००९ ला झाला. त्या दरम्यान चिन्मय दामले (चिनूक्स) यांनी त्यांचा नाटकांवर/व्यक्तिमत्वावर आधारित एक लेखमाला चालू करण्यासंबंधी विचारणा केली. हे का करावंसं वाटलं यासंदर्भात त्यांनी शेवटच्या लेखात ( श्रीमती विजया मेहता) लिहिलं आहे. मायबोली नेहेमीच अश्या नवीन उपक्रमांना पाठींबा देत आली आहे त्यामुळे नकाराचा प्रश्नच नव्हता.
तेंडुलकर एका साप्ताहिकात कार्यकारी संपादक होते तेव्हाची गोष्ट. पुलं त्याच साप्ताहिकात एक सदर लिहीत असत. एकदा ते आपल्या एका मित्राला घेऊन तेंडुलकरांच्या कचेरीत गेले. मित्राची ओळख करून दिली - हा वसंता सबनीस. कविता करतो. पण मर्ढेकरांसारखा कवडा नव्हे, कवी आहे. तेंडुलकरांना मर्ढेकरांबद्दलचे हे अपशब्द खटकले नाहीत. पुढे पुलं आणि सुनीताबाईंनी मर्ढेकरांच्या कवितांचं जाहीर वाचन केलं. काव्यवाचनाचा हा कार्यक्रम बराच गाजला. तेंडुलकरांनीही पुलंच्या या कार्यक्रमाबद्दल लिहिलं. मर्ढेकरांच्या कवितांबद्दल लिहिलं. तेंडुलकर लिहितात - मर्ढेकर तेच होते. त्यांच्या कविताही त्याच होत्या.
घाशीराम कोतवाल १६ डिसेंबर १९७२ रोजी रंगमंचावर आलं आणि अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरलं. रंगमंचावर आल्यावर काही काळातच वादग्रस्तही ठरलं!
"...मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे...जीवनाला फाशी दिलं पाहिजे! या जीवनात फक्त एकच गोष्ट सर्वमान्य आहे...शरीर! तुम्ही नाही म्हटलंत तरी ते सर्वमान्य!
हे विसाव्या शतकातल्या सुसंस्कृत माणसाचे अवशेष. पाहा कसे एकेकाचे चेहरे रानटी दिसत आहेत ते. त्यांच्या ओठांवर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत." इति लीला बेणारे.
श्री. विजय धोंडोपंत तेंडुलकर. जन्म - ६ जानेवारी, १९२८. मृत्यू - १९ मे, २००८. या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच.
डॉ. श्रीराम लागू हे तेंडुलकरांचे मित्र व त्यांच्या नाटकांतील अभिनेते. डॉ. लागूंनी नाटकात पदार्पण केलं ते तेंडुलकरांच्या नाटकातूनच. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, सेन्सॉरशिप या मुद्द्यांवरून जेव्हा शासनाशी भांडण्याची वेळ आली, तेव्हा डॉ. लागू, तेंडुलकर, दुर्गाबाई, कमलाकर सारंग अग्रस्थानी होते. तेंडुलकरांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या नाटकांबद्दल बोलत आहेत डॉ. श्रीराम लागू..