विजय तेंडुलकर स्मृतिदिन

Submitted by चिनूक्स on 19 May, 2009 - 15:29

श्री. विजय धोंडोपंत तेंडुलकर. जन्म - ६ जानेवारी, १९२८. मृत्यू - १९ मे, २००८. या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच. २७ नाटकं, २५ एकांकिका, अनेक पटकथा, अनुवाद, ललित लेख, कथा आणि दोन कादंबर्‍या एवढं लिखाण. 'तें' असा शिक्का उमटलेलं हे लिखाण बरेचदा गाजलं ते स्फोटक विषय आणि हाताळणीमुळे. पण हे लिखाण इतकं अस्सल की त्यामुळे हादरलेला समाज स्वतःलाच अनेक प्रश्न विचारता झाला.

ten1.jpg

माणसाचा, जगण्याचा आरपार वेध घेण्याची अद्भुत शक्ती तेंडुलकरांकडे होती. जीवनाविषयीचं कुतूहलही होतं. त्यामुळे काय चूक, काय बरोबर या भानगडीत न पडता त्यांनी माणसांचे सारे शरीरधर्म, व्यवहारधर्म जसेच्या तसे कागदावर उतरवले. हिंसा, लैंगिकता या माणसात दडलेल्या मूल प्रवृत्ती तेंडुलकरांच्या नाटकांत बाहेर आल्या. स्वतःच्याच कोषात राहणारा, बराचसा दांभिक असलेला समाज आपलंच हे स्वरूप पाहून भांबावला, आणि मग चिडला. आपलं खरं रूप आरशात पाहण्याची सवयच नव्हती या समाजाला.

आजही हा समाज फारसा बदललेला नाही. पण या समाजाला आरसा दाखवायला, चार शब्द सुनवायला तेंडुलकर नाहीत.

तेंडुलकर गेले त्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. येते काही दिवस डॉ. श्रीराम लागू, श्री. श्याम बेनेगल, श्री. गोविन्द निहलानी, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती लालन सारंग, डॉ. शिरीष प्रयाग हे तेंडुलकरांचे सुहृद, सहकारी आपल्याशी संवाद साधणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर तेंडुलकरांना श्रद्धांजली वाहण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम. Happy
डॉ. लागू, बेनेगल, निहलानी, सुलभा देशपांडे, लालन सारंग, डॉ. प्रयाग अशा दिग्गजांचे 'तें' विषयीचे विचार!
इतका अनमोल ठेवा सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल चिन्मय आणि मायबोली यांचे आभार!

पुढच्या भागांची आतुरतेने प्रतीक्षा आहे! Happy

वा! खरोखरच स्तुत्य उपक्रम. चिनूक्स आणि मायबोलीचे आभार. Happy
यात काही मदत होण्यासारखी असेल तर जरूर सांगा.

चिन्मय, तुझे आणि मायबोलीचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. फार महत्त्वाचे आणि मोठे काम करत आहेस.

    ***
    Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.