तुझ्या नजरेचा न्यूट्रॉन,
जेव्हा माझ्या युरेनियमी हृदयावर,
अचानक येऊन आदळला
हृदयभरून उठलेल्या ऊर्जेने,
रोमारोमाची काहिली होत राहिली..
तुझ्या नजरेचा न्यूट्रॉन
एवढ्यावरच न थांबता
रूपं प्रतिरूपं धारण करत,
हृदयाची शकलं करत गेला
एखाद्या अनियंत्रित अभिक्रियेसारखा..
राहिले फक्त हृदयाचे भग्न अवशेष,
बेरियम आणि क्रिप्टॉनच्या रूपात
आणि शरीरभर पसरलेल्या वणव्यात,
जळत राहिलेलं सर्वांग..
तुझ्या देव्हार्यातली सांजवात
काल अचानक फडफडत राहिली
माझ्या काळजाचा ठोका चुकवत..
रित्या हातांचा लगबग आडोसा
निमीषार्धात तिला सावरायला
निष्ठूर वाऱ्यापुढे हतबल होण्याआधी..
पण तुझी सांजवात केव्हाच विझली होती.
उरला होता फक्त भयाण काळामिट्ट अंधार,
चुटपुटणारं मन,
आणि जळकट तेलाचा असह्य दर्प..
खरंय..
अपशकुनच तर झाला होता..
तुझ्या देव्हार्यात माझा पाय जो पडला होता..
त्याचे मित्र त्याला विचित्र समजतात. अजून वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेलेली नाहीए. त्याला मात्र त्याचं काही वाटत नाही. विचित्र म्हणा वेडा म्हणा की आणखी काही म्हणा.