तो..

Submitted by निवडुंग on 5 April, 2011 - 15:40

त्याचे मित्र त्याला विचित्र समजतात. अजून वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेलेली नाहीए. त्याला मात्र त्याचं काही वाटत नाही. विचित्र म्हणा वेडा म्हणा की आणखी काही म्हणा.

त्याच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस सारखाच आहे. तो सकाळी उठतो. आरश्यात पाहिलं की तो नेहेमीप्रमाणे खरं बोलायला चुकत नाही. अरेच्या दाढीचे खुंट कितीतरी वाढलेत. डोळ्याखाली पण काळी वर्तुळं जमायला लागलीत. कपाळावर आठ्यांची गर्दी वाढतच चाललीये. ओठ काळे पडत चाललेत. सिगरेटी कमी फुंकल्या पाहिजेत लेका. त्वचा पण कशी सुरकुतल्यासारखी झालीये. ह्म्म्म्म.. जाऊदे मरूदे सालं. गेलं उडत. तसाच घाईघाईत आवरतो तो ऑफीसला जाण्यासाठी. कपड्यांनी तर धोबी कधी पाहीलेलाच नसतो. त्यातल्या त्यात कमी मळलेले आणि कमी सुरकुतलेले कपडे तो डकवतो. चपलेचा अंगठा पण तुटलाय साला. काय फरक पडतो तसाही? कोण बघणार आहे आपल्याला? पळत पळत बस पकडत तो ऑफीसला जातो. ऑफीसमधल्या पोरी आज पण कसला अवतार करून आलंय बावळट ध्यान म्हणत फिदफिदत असतात. त्याला कशाचं काही वाटत नाही. हसायचं आहे तर हसा लोकहो. मला कसली तमा नाही. दिवसभर डोकं बुडवून काम करायचा प्रयत्न करतो तो. गडद अंधार पडल्यावर घरी येतो. काहीबाही पोटात ढकलतो. झोपायचा प्रयत्न करतो. रात्री त्याला कितीही काही केलं तरी झोप लागत नाही. रात्री त्याच्याशी जीवाभावाचं बोलायला ही कोणी नसतं. मग पहाटे २-३ वाजेपर्यंत तो नुसता झोपेची वाट पाहतो. सिगरेट वर सिगरेट फुंकत आयुष्यावर विचार करत बसतो तो.

आजकाल त्याला कशाचं सुख वाटत नाही, आणि दु:ख ही वाटत नाही. एखादी मनासारखी गोष्ट घडली, तर त्याला कडकडून आनंद होत नाही. कधी गालभरून हसू त्याच्या चेहर्यावर उमटत नाही. मनाविरुद्ध काही घडलं तर वाईटही वाटत नाही. जे चाललंय ते चालू दे. मला काही घेणंदेणं नाही अशी अवस्था झालीय त्याची. कधी कधी तर त्याला असं वाटतं की तो सर्व भाव-भावना गमावून बसलाय. बधीर झालाय त्याचा मेंदू. खरंच काहीतरी तर वाटायलाच पाहिजे ना कसल्याही परिस्थितीत. सुख, दु:ख, राग, लोभ, मत्सर. काही तरी नक्कीच. दगड झालाय की काय आपला? अमानुष झालोय आपण? हा प्रश्न पडल्यावर मग त्याला एकदम भीती वाटते. खरंच जर असं काही झालं असलं तर? भावनाच जर नसतील तर मी माणूस तरी आहे का? आणि तसं जर असेल तर आपल्यात आणि यंत्रमानवात काय फरक राहीला मग? जर मी माणूसच्या व्याख्येतच बसत नसेल तर माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? जे काही चालू आहे ते तसंच यांत्रिकपणे सगळं चालू द्यायचं का?

असं काही वाटायला लागलं की तो एकदम तात्विक आणि शास्त्रीय पातळीवर जाऊन पोचतो. खरंच माणसाच्या मनात निर्माण होणार्‍या भावना म्हणजे तरी काय असतं नक्की? मेंदू मध्ये त्या त्या वेळी स्त्रवणारी रसायनंच ठरवतात ना सगळं? आनंद आणि दु:ख आणि इतर भावना म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या मेंदूने दिलेली प्रतिक्रियाच नाही का? आवडणारी गोष्ट घडली की आनंद, नाही आवडलं की वाईट वाटणं हे सगळं त्या रसायनांवरच तर अवलंबून आहे की? त्याला एकदम Human Anatomy आठवायला लागते. सेरोटोनीन, डोपामीन आणि काय काय.. शेवटी यांच्याच तर हातात सगळं काही आहे. आणि नॉर्मल माणूस म्हणजे तरी नक्की काय असतं? वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मेंदूची कन्वेन्षन नुसार येणारी प्रतिक्रिया म्हणजे नॉर्मल माणसाचं लक्षण. तसं जर नाही झालं तर तो माणूस अबनॉर्मल. उद्या कोणी मेलं तर वाईट नाही वाटलं म्हणजे अबनॉर्मल, आणि परमोच्च गोष्ट घडली, तर छान नाही वाटलं म्हणजे पण अबनॉर्मलच? मग आपलं घोडं कुठं शेण खातंय नक्की? कसल्याही परिस्थितीत जर आपल्याला कधीच काही वाटत नसेल, जर आपला मेंदूच हे काम नीट करत नसेल, तर मग प्रॉब्लेम आपल्यातच नाहीये का? असा आपला मेंदू दगा देत असेल, तर आपण वेडे होत चाललोय की काय? खरंच शहाणा आणि वेडा यात फरक तरी कसा करतो आपण? जो नॉर्मल सिचुयेशन मधे नॉर्मल वागत नाही तो वेडा असंच तर परिमाण आहे. आणि शहाणी माणसं पण वेडी झालेली किती तरी उदाहरणं आहेतच की. त्यांच्यात नक्की कसा बदल घडत जात असेल? कदाचित आपण पण त्याच मार्गावर तर नाही ना लागलो? असले अभद्र विचार डोक्यात आले की तो अस्वस्थ होवून जातो. आपल्या डॉक्टर मित्रांना विचारतो, खरंच नॉर्मल माणूस आणि तोच माणूस जेव्हा वेडा होतो, तेव्हा काहीतरी तर बदल जाणवत असतील ना? काय लक्षणं असतात नक्की अश्या वेळी? कसं ठरवलं जातं की एखादा वेडा होत चालला आहे ते? असे गंभीर प्रश्न विचारले की त्याच्या मित्रांना आयतं कोलीतच मिळतं. त्याचीच उलटतपासणी सुरु होते. तुला असं वाटतंय काय खरंच? वेडा आहेस का तू? असं म्हणून सर्व काही हसण्यावारी उडून जातं..

घरी जाण्याचंही टाळतो तो आजकाल. घरी जाऊनही काही बरं वाटत नसेल तर न गेलेलंच बरं. परवा असाच घरच्यांच्या आग्रहाखातर घरी गेलेला तो. आई प्रेमाने त्याची विचारपूस करत होती. केस फार रूक्ष झालेत म्हणे तुझे. तेल लावून मसाज करते. केसाला हात लावताक्षणीच म्हणाली ती, अरे तुला तर टाळूवर टक्कल पडायला लागलंय. फार विरळ झालेत केस. आणि पिकायला पण लागलेत कितीतरी. फार त्रास होतोय का नोकरीचा? नसलं झेपत तर सोडून दे सरळ. तो एकदम गप्प. मनात काय चाललंय हे काय सांगणार तिला. काहीतरी थातूरमातूर सांगून वेळ निभावून नेली त्याने. आता तर घरी जाण्याचं ही टाळायला लागला तो, काहीबाही कारणं सांगून. कश्याला उगाचंच घरच्यांच्या जीवाला घोर.

सगळ्याच गोष्टीतून मन उडालंय त्याचं. अगदी माणसाची प्राथमिक गरज भूक, ती पण त्याला लागत नाही. चुकून कधी काही खावंसं वाटलं तर सिगरेट फुंकतो तो. मग भूक ही कशी मरून जाते. अधूनमधून मित्रांकडे जातो तो अगदीच नाही करमलं तर. मित्रही त्याचे चरसी. अरे तुला फार बोअर होतंय का लाईफ मधे? गांजा मारलायेस का मग कधी तू? गजानन महाराज पण मारायचेच की? लई भारी वाटेल तुला.. तो ही मग म्हणतो, चला हे ही करून पाहूया. मस्त मित्रांसोबत दारू पिऊन गांजा मारतो तो. कधी नव्हे ते थोडंफार बरं वाटत असतं. अगदी हवेत गेल्या सारखं. तरंगल्यासारखं. महाराज गांजा मारायचे ते उगाचंच नाही बहुतेक? अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते की.. गांजा मारल्यावर मग त्याला कडाडून भूक लागते. अधाश्यासारखं तो २-४ दिवसांचं एकदाच खाऊन घेतो. पोट तडेला लागेपर्यंत. मग मित्राच्या दहाव्या मजल्याच्या गॅलरीत जाऊन उभा राहतो. आठवणींचं मंद वारं वाहत असतं. तो खाली पाहतो. भरून वाहणारा रस्ता आता एकदम शांत झालेला असतो. त्याच्या मनात विचार येतो, जर मी आत्ता खाली उडी मारली तर काय होईल? हात मोडेल? पाय मोडेल? की कपाळमोक्ष होईल? कदाचित मरून पण जाईन मी? खरंच नक्की काय होईल बरं? तसंही मरून जरी गेलो तरी कुणाला काय त्याचं? थोडं वाईट वाटेल सर्वांना. चार दिवस सगळे अश्रू ढाळतील, आणि नंतर पहिले पाढे पंचावन्नच नाही का? खरंच एकदा करून पाहायला काय हरकत आहे? अगदी कठड्यापाशी जाऊन उभा राहतो तो, पण खाली उडी मारायचं धाडस होत नाही. च्यायला, आपण पण नेभळट आहोत अगदी, आत्महत्या करायची पण आपली कुवत आणि लायकी नाही. तसाच पराभूत आत येवून तो अजून गांजा मारतो. आता मात्र तो पुर्णपणे चंद्रावर गेलेला असतो. काय चाललंय हे ही त्याला कळत नाही. तसाच फरशीवर लोळत तो गाढ झोपी जातो.

मित्रांना कधी काही सांगायचं म्हटलं तर त्यांना ह्याचे मौलिक विचार झेपतच नाहीत. चुकून एखाद्याला थोडंफार कळालं तर तो quarter-life crisis असं निदान करून मोकळा होतो. तू एकटा आहेस म्हणून असं बरळतोस, लग्न कर म्हणजे सगळं ठीक होईल वगैरे. घरचेही आता त्याच्या पाठीमागे लागलेले असतात लग्नासाठी. कितीही डोकं गंजलं असलं तरी त्याला एक माहिती असतं. त्याचं स्वता:वरंच प्रेम नाहिये. आणि जो माणूस स्वता:वर प्रेम करू शकत नाही, तो दुसर्या व्यक्तीवर तर कधीच करू शकणार नाही. असं जर असेल, जर भविष्यात जी कोणी त्याची सहचारिणी बनेल आणि तो तिच्यावर प्रेमच करू शकणार नसेल तर लग्न तरी का करायचं? कशाला त्या बिचारीच्या आयुष्याशी खेळायचं? हे लग्न म्हणजे तडजोडच नाही का एक प्रकारची? असले क्रांतिकारी विचार तो कुणाला सांगू शकत नाही. कारण त्याला माहीत आहे की कुणाला समजणारंच नाही हे. यावर सोपा उपाय म्हणून जी कोणी मुलगी त्याला घरचे दाखवतात, ती कितीही चांगली असली तरी तो काहीतरी उणं शोधून काढतो. आजचं मरण उद्यावर ढकलत राहतो.

कितीही माथेफोड केली आणि कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यात बदल होतंच नाही. सगळं असह्य झाल्यावर तो ही हात टेकतो. शेवटचा पर्याय निवडतो. Psychiatrist. कुठूनतरी एक प्रख्यात Psychiatrist शोधून काढतो. डॉक्टरांना भेटायची वेळ ठरते. त्याच्या आधी कितीतरी पेशंट्स हजेरी लावून असतात.. किमान तीस एक तरी. डॉक्टर फारंच हुशार असले पाहिजेत असा सहज विचार चमकून जातो त्याच्या डोक्यात. आपला नंबर येण्यापर्यंत बराच फावला वेळ असतो त्याच्याकडे. सगळीकडे तो नजर फिरवतो. सर्व स्तराची माणसं त्याला दिसायला लागतात. खरंच काय त्रास होत असेल ह्यांना नक्की? आपल्याला जसं काही वाटतंय तसंच त्यांना ही होत असेल का? की आपल्या पेक्षाही काही पटीने अधिक? देवच जाणे.

अचानक त्याची नजर तिच्यावर स्थिरावते. स्कर्ट आणि टॉप घातलेली ती. दिसायला अतिशय देखणी. आत्ताच बाहेर पडली तर चार माना नक्कीच परत वळतील अशी. बहुतेक तिच्या बाजूला तिची आई बसलेली असते, आणि शेजारच्या खुर्चीवर स्कूल-बॅग.. स्कूल-बॅग?? म्हणजे १५-१६ च्या पुढे नक्कीच वय नाही तिचं. आणि या वयात Psychiatrist?? काय झालं काय असेल तिच्या आयुष्यात की तिला जीवनाच्या ह्या वळणावर Psychiatrist ची गरज पडावी? हसण्याखेळण्याचं, बागडण्याचं, गोड गुलाबी स्वप्नं रंगवण्याचं वय हे! आणि या वयात ही पायरी चढावी लागतेय तिला? तिच्या आयुष्यात काय घडलं असेल याची कल्पनाच करवत नाही त्याला. डोकं एकदम गरगरायला होतं त्याचं. तेवढ्यात तिला आत बोलावलं जातं. थोड्या वेळाने shock-treatment साठी दुसर्या रूम मध्ये नेलं जातं. दहा मिनीटं शांतता. आणि मग ती बाहेर येते, झोलकावे खात. आई कशीबशी तिला सावरत असते आता. डोळे एकदम लालभडक झालेले असतात तिचे, सगळी चमक हरवून बसलेले. दिशाहीन. अर्थहीन. आई कसंबसं तिला सांभाळत चालू लागते. त्याचं डोकं एकदम सुन्न होवून जातं. बधीर. गलितगात्र. अचानक त्याचं नाव पुकारलं जातं. तो गडबडून आत कॅबिन मध्ये शिरतो. डॉक्टर काहीतरी प्रश्न विचारत असतात. त्याचं तिकडे लक्षंच नसतं. जमेल तशी उत्तरं देतं असतो तो फक्त.

"मेजर डिप्रेशन" चा शिक्का त्याच्या माथी मारला जातो. रंगीबेरंगी गोळ्यांचं पुडकं त्याच्या हाती थोपवण्यात येतं. त्याला कशाचंच काही भान राहिलेलं नसतं. अजूनही डोळ्यापुढची ती आणि तिची स्कूल-बॅग हटत नसते.

त्याचे मित्र त्याला विचित्र समजतात. अजून वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेलेली नसते त्यांची.

आपण मात्र वेडे झालेलो आहोत ही खात्री पटलेली असते आता त्याला..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लेख उत्तम व सध्याच्या काळात अती प्राधान्य देण्या योग्य .
हल्ली डिप्रेशनची समस्या अनेक जणाना सतावत असते .त्यामुळे आयुष्याचा आनंद लुटता येत नाहीच व
घरातील इतरानासुद्धा डिप्रेशनची बाधा होते .त्यामुळे आयुष्यावर प्रेम करणे ,आपल्या माणसावर प्रेम करणे
लोकामधील चांगल्या गोष्टींची प्रशंसा करणे .स्वत:मधील चांगल्या गुणांची जोपासना करणे ,सामाजीक
कार्यात सक्रीय भाग घेणे ,समाजातील दुर्लक्षीत घटकांची मदत करणे ,आपल्या योग्य ऊर्जेचा योग्य ठिकाणी उपयोग होण्यासाठी सतत जागृत व तत्पर असणे ,सतत इश्वर चिंतनात तल्लीन असणे ,''तो माझा
मी त्याचा'' हा भाव सतत जागृत ठेवणे .बरे वाईट कुणी कसेही असो सर्वावर प्रेम करणे .,दुसर्‍याच्या चुका
लक्षात आल्यावर त्याला सलणार नाही अशा रीतीने अतीशय प्रेमाने वेळ काळ पाहून दाखवून देणे अथवा दुर्लक्ष करणे अथवा क्षमा करणे ,नियमीत व्यायाम करणे ,मोकळ्या हवेत फिरून निसर्गाचा आनंद घेणे,मला
काही करून डिप्रेशनमधून बाहेर पडायचच आहे असा हट्ट मनाकडे सतत करत रहाणे व तो स्वत:च
पुरवणे ,वास्तवात जगणे ,नीटनेटके ,स्वच्छ रहाणे (लुक गुड ,फील गुड) ,एखाद्या छंदाला वेळ देणे.आपल्या कामावर प्रेम करणे,हसतमुख असणे या गोष्टी आवर्जून करायला हव्या .
आवर्जून न करण्याच्या गोष्टी म्हणजे ,मद्द ,गांजा सिगारेट ,चहा कॉफी यांच अती सेवन खोट बोलणे ,अंधविश्वास अनियमीत आहार ,आपल्याशी घडत असलेल्या अप्रीय गोष्टीबद्दल दुसर्‍याला दोश देणे ,स्वतःच दुबळेपण ,शल्य ,कमतरता याबद्दल लाजणे .
अहंकारी माजलेल्या लोकांच्या दुर्गुणांची बाधा न
होउ देणे आपल्या शरीराच चेकअप करत रहाणे त्यानुसार आहार विहार मर्यादीत करत रहाणे हेही गरजेच .हे सगळ व्रतस्थपणे करत रहाणे .कारण शेवटी आपणच आपले शत्रू व आपणच आपले मित्र .आपण आपले शत्रू होणार नाही याबद्दल सतर्क आपल्यालाच असायला हव .
जगात कुठलाही भाउ ,बहीण ,डीप्रेशनमध्ये न जावो ही शुभेच्छा .
इथे लहान मुलांच्या पण डिप्रेशनच्या समस्या पहाण्यात येतात .या मुलाना सेल्फ कॉन्फीडन्स नसतो,
ती दुसर्‍यात मिक्स होत नाहीत ,सगळ्यापासून वेगळी दूर बसतात ,स्वत:च दफ्तरसुद्धा आवरू शकत
नाहीत ,सर्वाप्रमाणे बोलू शकत नाहीत व दुर्लक्ष झाल तर वर्गाच्या फार फार मागे रहातात .
जगाच्या पाठशाळेत आपण मागे रहात नाही याकडे आपणच लक्ष द्यायला हव .एकट रहाण जमत नसेल
तर योग्य जोडीदार मिळाल्यास लग्न जरूर करणे कारण विवाह ही केवळ शारीरीकच नव्हे तर मानसीक
सुद्धा गरज असू शकते .आपल्या शारीरीक ,मानसीक वैगुण्याची भावी जोडीदाराला कल्पना द्यावी .डिप्रेशन
मधल्या प्रत्येकाला म्हणाव ''चियर उप यार ,बी हँपी ''व त्यानुसार जागृत राहून सक्रीय असाव .

छाया जी,

धन्यवाद, आणि एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल अनेक आभार ! Happy

कथेतला "तो" आणि बरेचसे प्रसंग काल्पनिक आहेत, पण अश्या व्यक्ती, असे प्रसंग पाहिलेले आहेत आणि प्रत्येक जण कधी ना कधी अनुभवतोच हे जीवनात. दुर्देवाची बाब म्हणजे, बरेच जण डिप्रेशन हा मानसिक आजार आहे, हे प्रथम मान्य करायलाच तयार नसतात, कारण Psychiatrist कडे फक्त वेड लागलेली माणसं जातात असा अजूनही (गैर)समज आहे.

खरंच छान सल्ले दिले आहेत आपण. मनापासून धन्यवाद. Happy

OMG !!

खरंय, किती अवघड आहे अशा लोकांना समजून घ्यायला !
धन्यवाद निवडुंग अशा विषयावर लिखाण केल्याबद्दल.
चांगली मांडणी.
छाया देसाई - खूप आभार -वेगवेगळ्या उपाय योजना सुचविल्याबद्दल.

थेरीपी घेणे किंवा psychiatrist कडे जाणे कमीपणाचे किंवा नोकरी, लग्नाच्या दृष्टीने घातक समजले जाते...आता काही प्रमाणात मुंबईत तरी परिस्थिती बदलतेय...थोडाफार केमिकल balance कमी झाला असेल तर इतर शारीरिक व्याधीप्रमानेच याकडेही बघायला हवे आणि काळजी / उपचार घ्यायला हवेत...आपल्याच भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे ते. धकाधकीच्या काळात थोडेफार depression येणे सहज शक्य आहे.

गणू,
धन्यवाद.. Happy

खरंय, किती अवघड आहे अशा लोकांना समजून घ्यायला ! >>>>
शशांकजी,
खरंच फार अवघड आहे. आणि कुणी हे बोलून नाही दाखवलं तर अजूनच अवघड. मनाचा कोंडमारा होत राहतो फक्त त्यांच्या.
प्रतिसादाबद्दल खूप आभार.. Happy

शिल्पाजी,
सहमत आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. Happy