निवडुंग

वाट..

Submitted by निवडुंग on 29 June, 2011 - 15:56

आठवतंय तुला?

घनगर्द काळ्याकुट्ट अंधारात,
तुझा हात हातात घेऊन,
मोजून पावलं टाकताना,
हरवून गेलेलो आपण.

कुठुनसा असंख्य काजव्यांचा थवा,
क्षणार्धात सर्वकाही उजळवत,
घेऊन गेलेला आपल्याला,
रेतीभरल्या त्या अज्ञात वाटेवर.

समिंदरावर सांडलेल्या पार्‍याची,
पखरण करणार्‍या अल्लड लाटांचा,
अव्याहत गुंजणारा खळखळाट,
मनभर मुरवत पहुडलेलो आपण,
पौर्णिमेच्या चंद्राच्या उबदार कुशीत.
कधीही न विलगण्यासाठी..

आताशा ती वाट,
काटयांमध्ये कुठेतरी हरवलीय म्हणे..

आजही एखादा चुकार काजवा,
आपलं सर्वांग पेटवत,
शोधत असतो तिच्या खुणा.
रात्रभर.

मागत असतो शेवटचं देणं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निद्रिस्त..

Submitted by निवडुंग on 24 June, 2011 - 13:02

आठवणी.

मनाच्या एका खोलवरशा कप्प्यात,
अलवार सांभाळून,
अपरिहार्यतेचं कुलूप लावलं की,
साचत राहतात फक्त,
एकावर एक.
थरावर थर.
निद्रिस्तशा ज्वालामुखीसारख्या..

उष्मा वाढतच राहतो,
तडजोडीचा.
कमजोरीचा.
असहायतेचा.
कायमच परीक्षा घेत राहतो,
सहनशीलतेचा.

एका असह्य क्षणी,
गळून पडतं सगळं काही..

वर्षानुवर्षे धुमसलेली फुकी तडजोड,
निद्रेतून जागवते हा ज्वालामुखी,
आपलं अक्राळविक्राळ रौद्ररूप दाखवत,
सगळं काही क्षणात विध्वंस करत,
मागत असते हिशेब,
आजवरच्या तगमगलेल्या क्षणांचा..

सोड,
माहिती आहे ना तुला सगळं?
मग राहू दे ना..

इतरांच्या दु:खावर,
स्वत:चे स्वार्थी इमले बांधणं,

गुलमोहर: 

सडणं..

Submitted by निवडुंग on 19 June, 2011 - 14:37

एखादं अंग सडलं की,
कापून टाकण्यातच 'शहाणपण' असतं.
इतरांच्या लेखी.

स्वत:चाच अविभाज्य भाग,
इतक्या सहजासहजी तोडला जातो,
तेव्हा शरीराच्या वेदना बधीर होवून जातात.
हृदय मात्र करवतलं जात असतं आतमध्येच.

कापून कचर्‍यात फेकून दिलं की,
समाधान असतं सर्वांच्या मनी,
एक जीव वाचवल्याचं.
क्षुल्लक सडलेल्या अंगाच्या बदल्यात.

एके काळी जे आपलं होतं,
ते मरेपर्यंत कधीच आता असणार नाही,
ही जाणीवच थिटी करून टाकते मात्र,
त्याच्या जगण्याची उमेद.

फरक काय पडतो?
शेवटी सडलेलंच होतं ना सगळं काही?
नाकं मुठीत धरून दुर्गंधी सोसण्याशिवाय,
तुझ्यासाठी हा पर्याय बराच नाही का?

ठेच तर तुलाच लागली होती..

शब्दखुणा: 

स्वप्न..

Submitted by निवडुंग on 14 June, 2011 - 13:13

धुक्याची दुलई पांघरून,
साखरझोपेत पहूडलेल्या शिखरांना,
हळूच स्पर्शत जाणारा,
शिरशिरी भरवणारा वारा,
अन् सोबतीला पर्जन्यधारा.

अर्धोन्मिलीत पहाटेच्या,
किलकिल्या डोळ्यातून,
टपटप पडणार्‍या गारा वेचण्याची,
तुझी अल्लड कसरत.

ओंजळभर गारा जमवून दमल्यावर,
दूरवर दिसलेला तुला एकटाच तो,
अन् तिथेच जायचंय मला,
म्हणून अडून बसलेली तू.

तू असा लडिवाळ हट्ट केला की,
नाही हा शब्दच नाहीसा होतो बघ.
त्या शुभ्र ढगाच्या,
पिंजलेल्या मखमलीवर,
अलगद झेपावून,
मनमुराद हुंदडतो आपण,
त्याचा सगळा पाऊस संपवेपर्यंत.

तुझा एकुलता एक ढग,
बिचारा बरसून थकून गेला की,
हळूच त्याच्या एका सरीला धरून,

गुलमोहर: 

रात्र..

Submitted by निवडुंग on 11 June, 2011 - 12:45

रात्र.
रोज नवं कोडं घेऊन आलेली.

रात्र.
मोहरलेली.
कण कण एकवटलेली.
गाढ मिठीत सुखावून,
तृप्त सुखात ओथंबलेली.

रात्र.
नशावलेली.
मैफिल सुरांची मढवलेली.
आर्त सूर लागून,
हळूच हातातून निसटलेली.

रात्र.
तळमळलेली.
आठवांचे क्षण ल्यालेली.
पहिल्या पावसात भिजून,
स्वत: मृदगंध हरवलेली.

रात्र.
मळभलेली.
झोंबणार्‍या वार्‍यात भरकटलेली.
खूप काही साचून,
आतल्या आतच गढलेली.

रात्र.
बावरलेली.
कसलाच अर्थ न लागलेली.
आसवांचे कढ पचवून,
तुझ्यासाठी हुंकारलेली.

रात्र.
विस्कटलेली.
परीसस्पर्शाच्या शोधात आसुसलेली.
तुझा स्पर्श होऊन,
सुवर्ण होण्यात स्वप्नाळलेली.

रात्र.
नाकारलेली.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वेध..

Submitted by निवडुंग on 5 June, 2011 - 15:10

आजही स्पष्ट आठवतेय,
मनाच्या कोपर्‍यात कायमची कोरलेली,
ती पौर्णिमेची दुधाळ रात.

तुझ्या चहूबाजूला चांदणं सांडलेलं,
अन तुझ्या सख्या चंद्राने,
लख्ख उजळवलेला तुझा सावळा चेहरा.
फक्त माझ्याचसाठी.

तुझ्या प्रेमळ कुशीत पहूडून,
काळ्याभोर डोळ्यांतल्या चांदण्या पाहत,
विचारला होता एक साधाचसा प्रश्न,
तुझ्याच चंद्राच्या साक्षीनं.

खरं सांग,
मला कधीच कधीच विसरणार नाहीस ना?

खळखळून हसलेलीस तू तेव्हा,
अन् वास्तवाच्या दाहकतेचा चटका बसताच,
क्षणात अंतर्मुख झालेलीस.

वेडा आहेस तू म्हणे,
कितीही काही झालं तरी,
मी तुला कध्धी कध्धी विसरणार नाही.

आपल्या वाटा वेगळ्या झाल्या जरी,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझी रेषा..

Submitted by निवडुंग on 1 June, 2011 - 15:06

आज परत एकदा,
तळहातावरच्या रेषा,
पुन्हा पुन्हा तपासल्या.
तुझी रेषा मात्र,
पुसट दिसेनाशी झाली होती.

ह्मम्म्म..
त्याचं काय जातंय?
हातावर रेघोट्या ओरबडायला?
आणि दुसर्‍यांची नशीबं लिहायला?

सळसळत्या पात्यानं तुझी रेषा,
छेदून गेली कधीच माझ्या हृदयाला.
रक्तरंजीत हाताकडे पाहत,
मी ही त्याला आव्हान दिलं.

बेटा,
तू लाख कलाकुसर करशील,
माझं भविष्य लिहिण्यात.
पण एक गोष्ट विसरलास,
शेवटी हात तर माझाच आहे ना?

गुलमोहर: 

हसू..

Submitted by निवडुंग on 29 May, 2011 - 09:40

दुपारी सैरभैर रस्ता तुडवत आपल्याच तंद्रीत भऱकटताना, त्याला एक लहान गोंडस पोरगी खेळताना दिसली. या आधी आपण कधी हसलो होतो का हेच त्याला आठवेना, आणि मग असंच तिच्याकडे पाहून हसावसं वाटलं. नेहमीचं कृत्रिम हसू त्याच्या चेहर्‍यावरून सांडलं. उत्तरादाखल ती इतकी गोड, निरागस हसली की सणसणीत थोबाडीत मारल्यासारखं झालं त्याला. मनापासून हसण्यात एक वेगळंच चैतन्य असतं, आणि ते हसू इतकं नैसर्गिक असतं, सहज, सुंदर, निर्मळ आणि शुद्ध असतं की त्याचा कधीच आव आणता येत नाही. हसायचं आहे तर निर्भेळ हसायला शिक असंच म्हणून गेली ती. मुकाट्याने मान खाली घालून तो रस्ता तुडवत राहिला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

राम नाही..

Submitted by निवडुंग on 29 May, 2011 - 02:48

सुकून गेलेल्या कळ्यांत
फुलं शोधण्यात राम नाही.

नापीक जमिनीत बीजं अंकुरायाची
स्वप्नं पाहण्यात राम नाही.

दोन ध्रुवं सांधायाच्या
तुटेपर्यंतच्या प्रयत्नात राम नाही.

मधुशालाच सुखदुखात साथी तर,
मधुबालाच्या आसेत राम नाही.

या जिंदगीतून तूच वजा झाली
आता या जिंदगीत काही राम नाही.

रामालाच अवतरायला जागा सापडेना,
त्याचं नाव घेण्यात ही राम उरला नाही.

गुलमोहर: 

मी..

Submitted by निवडुंग on 27 May, 2011 - 04:40

मी मी म्हणत,
मी ला पोसत,
धुडकावलं सगळंच,
हृदयाच्या जवळचं,
अन् दूर कुंपणावरचं.

सावपणाचे धडे शिकवत,
लुटला सर्वांचा मी,
जो नाही बधला,
त्याचा झिडकारला मी.

माझ्याहूनही प्रचंड मोठा,
झाला कधीच मी,
छद्मी हसत आयुष्याची बाजी हरवून गेला,
मजला माझाच मी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निवडुंग