मी मुक्ता

समर्थन...

Submitted by मी मुक्ता.. on 9 September, 2014 - 01:41

किती किती हिरीरीने समर्थन केलं मी माझ्या लहान सहान दु:खांचं..
त्यांची बाजू मांडली.. त्यांच्यासाठी भांडले..
स्वीकार केला तरी आवाज उठवणं सोडलं नाही..
खुलेपणाने मान्य केलं त्यांचं अस्तित्व
आणि कुरवाळत राहिले त्यांना..
एकटेपणी..
सर्वांसमक्षही..
.
पण आता श्वासाश्वासात अलगद वाहत रहावं,
आयुष्यभर तळहातावर जपावं असं दु:ख समोर आलं असताना,
रात्रीच्या नीरव एकांतात
हुंदकाही न फुटू देता गाळलेल्या मूक अश्रुंशिवाय,
त्याच्या समर्थनार्थ माझ्याकडे काहीच नाही..
काहीच नाही..

शब्दखुणा: 

अपवाद...

Submitted by मी मुक्ता.. on 25 May, 2014 - 02:39

मला खात्री होती,
शरीरावरुन नाहीसे होतात स्पर्शांचे ठसे..
त्वचा कात टाकेल तसतसे...
सगळ्या नियमांना अपवाद करुन
मन जसं धरुन बसलय
तुझ्या प्रतिमा..
भरु देत नाहीये जुन्या जखमा..
तसं शरीर नाही करणार..
सृष्टीच्या नियमाप्रमाणे
ते टाकत राहिल कात..
आणि मग माझ्या नव्या त्वचेला नवा वाटेल
तुझ्या कातडीचा पोत..
तुझ्या स्पर्शातली आसोशी..
मला खात्री होती..
या काळात कितीदा कात टाकली असेल,
तुझ्या माझ्या शरीराने..
मोठ्या उत्सुकतेने हात पुढे केला मी,
तुझा अनोळखी स्पर्श अनुभवायला..
तेव्हा जाणवलं..
यावेळी शरीरानेही अपवाद केलाय नियमाला..
इतक्या काळानंतरही,
तुझे ठसे जिवंतच..

शब्दखुणा: 

वेदनेचा सोहळा...सतरंगी रे...

Submitted by मी मुक्ता.. on 13 March, 2014 - 14:20

मी चाललेय आपल्याच तंद्रीत..आपल्याच विचारात गुंग होऊन.. जग वाहतय आपल्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे.. मी ही वाहतेय.. माझ्याही नकळत.. अचानक कोणीतरी मागून येऊन खांद्यावर हात ठेवतं.. स्पर्श ओळखीचा असतो.. खूप जुना.. माझ्याशी कधीकाळी एकरुप झालेला.. एक क्षण थबकल्याशिवाय मागे वळलं पाहिजे हे ही लक्षात येत नाही. आणि मागे वळून पाहताक्षणी झप्पकन चेहर्‍यावर रंग कोसळतात.. नाका डोळ्यात जातात.. संवेदना बधीर होईपर्यंत.. स्थळाकाळाचं भान नाहीसं होईपर्यंत.. ठसका लावुन गुदमरुन टाकतात तुझी आठवण येईपर्यंत..

तू ही तू.. तू ही तू.. सतरंगी रे...
तू ही तू.. तू ही तू मनरंगी रे....

गवसत नाहीयेस तू मला अजूनही..

शब्दखुणा: 

सावध...

Submitted by मी मुक्ता.. on 24 February, 2014 - 00:56

इतरांच्या मनाचा विचारच न करणारी
तू नसशील आत्ममग्न स्वार्थी...
आणि तू आताही नाहीयेस,
त्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..
तुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..
पण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..?
विदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,
सावरायची सवडही न देता..
म्हणून म्हणतेय,
सावध हो...
कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ ..
काहीही हो, पण नको होऊ,
कोण्या लेखकाची कल्पना..
कोण्या कवीची कविता..

शब्दखुणा: 

सहज..

Submitted by मी मुक्ता.. on 25 January, 2014 - 03:09

कसं सहज जमतं तुला?

नेटक्या विणलेल्या वस्त्रासारख्या
तुझ्या आयुष्याकडे बघतेय मी,
हजारदा उसवूनही पुन्हा गुंतलेल्या अस्तित्वाला सावरत..

अट्टहासाने मी काढलेल्या शब्दांच्या रांगोळ्या,
विश्लेषणांची चित्रं..
फिकीच पडतात तुझ्या स्मितहास्यासमोर..

तर्कांचं जाळं पसरुन बसते मी,
तुला नेमकेपणे पकडण्यासाठी..
पण मुठीतून निसटावा सुगंध तसा,
दरवळत राहतोस तू, जाळ्यात बिलकुल न अडकता..

झाडाचं पानही गळताना पाहून
तुटत जातं माझ्यातलं सगळं..
आणि नातं पेलून नेतोस त्याच स्थितप्रज्ञतेनं,
सोसतोस तू सगळी वादळं..

मला जितकं सहज मरताही येत नाही,
तितकं सोपं, सरळ तुला जगता येतं..

शब्दखुणा: 

Gracias...

Submitted by मी मुक्ता.. on 7 December, 2013 - 01:58

बघता बघता ३ वर्षे झाली पण.. ७ डिसेंबर २०१०.. पहिली ब्लॉग पोस्ट.. आणि तेव्हापासून जवळपास ३०,००० pageviews, ३३०+ comments, ५९ followers आणि ७७ पोस्टस् चा हा प्रवास.. Feeling overwhelmed, blessed and loved.. No other words..
लिखाण चांगलं की वाईट, त्याचं साहित्यिक मूल्य या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या प्रवासात कोणती गोष्ट भिडली असेल, लक्षात राहिली असेल तर ती म्हणजे अनेकानेक वाचकांचे मिळालेले उत्कट प्रतिसाद. "उत्कट" हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे ज्या तीव्रतेतून एखादी गोष्ट लिहिली जाते तिला त्याच तोडीचा प्रतिसाद मिळणं कसं असतं हे पुरेपूर अनुभवलं मी या काळात.

शब्दखुणा: 

खंत...

Submitted by मी मुक्ता.. on 11 October, 2013 - 14:56

वळणावळणावर चकवा देत चाललेल्या वाटेला,
भास होत रहातात..
तू सोबत असल्याचे..
आणि मला जाणिव, ते भासच असल्याची..
पण अपेक्षा नाही त्याचीही..

फुलून दरवळणार्‍या समजूतदारपणाच्या,
मुळाशी गाडलेले असतात...
न पुरवले गेलेले हट्ट..
अर्धवट सोडलेली स्वप्नं..
पण दु:ख नाही त्याचेही...

एका पारड्यात चूका
आणि एकात स्वप्न घेऊन
चालत रहाते..
आताशा बर्‍याच तटस्थपणे..

कुठल्याच दु:खाने आजकाल,
डोळे भरुन येत नाहीत..
आणि विनाकारण वहायला लागले तर,
थांबायचं नाव घेत नाहीत..
जी काही खंत आहे, ती याचीच...
------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 

सांगता..

Submitted by मी मुक्ता.. on 13 August, 2013 - 03:14

आता खरं नातं संपेल..
आता खरी सांगता होईल..

सहवास संपला,
सोबत सुटली,
गर्दीत दिसेनासेही झाले चेहरे..
तरी धुमसत राहिलोच आपण,
एकमेकांच्या मनात..
रंगवत राहिलो एकमेकांना,
आपापल्या शब्दांतून..
आपापल्या परिने..
किंवा रंगवत राहिलो
आपलेच समज गैरसमज..
(हे म्हणणं जास्त योग्य आहे ना?)

क्षणांच्या, स्वप्नांच्या, भावनांच्या आहुत्या स्विकारत,
प्रगल्भ होत गेलेला हा प्रवास,
येऊन ठेपलाय अश्या टप्प्यावर..
दुसर्‍याच्या शोधाचा हट्ट सोडून,
स्वतःला शोधू पहाणार्‍या रस्त्यावर..

आता माझ्या कवितेतून
तू उतरशील याची शक्यता कमीच..
मी ही जवळपास नाहीशीच झालेली,
तुझ्या गझलेतून..

शब्दखुणा: 

विडंबन

Submitted by मी मुक्ता.. on 26 July, 2013 - 10:33

हल्ली फेसबुक वर एक कविता फार फेमस होतेय... It was like every 5th person in my friend list was sharing this. Got irritated with this oversimplified romanticism in patriarchy..त्याचा हा परिपाक.. Lol

खाली मूळ कविता पण देतेय...

अवास्तववादी आणि gender biased कविता वाचून वैतागलेल्या सर्वांना सप्रेम...

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली, "पोळ्या लाटतेय, तू पटपट भाजून घे"

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?”
ती म्हणाली "मला चालेल बाहेरुन आणणार असशील तर"

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
"मुलांना शाळेतून कोण आणेल, त्यानुसार ठरवू वेळ"

शब्दखुणा: 

त्या वळणावर...

Submitted by मी मुक्ता.. on 20 June, 2013 - 10:11

सरगम अडली, त्या वळणावर..
वीणा रुसली, त्या वळणावर..

ओढ कशाची, ओढुन नेते?
स्वप्ने फुलली, त्या वळणावर..

मोहवणारी विषवेलींची
नक्षी सजली, त्या वळणावर..

तू ही गर्दीमधला झाला,
मैत्री हरली, त्या वळणावर..

तार्‍यांवाचुन कोरी रजनी,
हिरमुसलेली, त्या वळणावर..

तू जाताना वळला नाही,
वळणे चुकली, त्या वळणावर..

http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मी मुक्ता