सांगता..

Submitted by मी मुक्ता.. on 13 August, 2013 - 03:14

आता खरं नातं संपेल..
आता खरी सांगता होईल..

सहवास संपला,
सोबत सुटली,
गर्दीत दिसेनासेही झाले चेहरे..
तरी धुमसत राहिलोच आपण,
एकमेकांच्या मनात..
रंगवत राहिलो एकमेकांना,
आपापल्या शब्दांतून..
आपापल्या परिने..
किंवा रंगवत राहिलो
आपलेच समज गैरसमज..
(हे म्हणणं जास्त योग्य आहे ना?)

क्षणांच्या, स्वप्नांच्या, भावनांच्या आहुत्या स्विकारत,
प्रगल्भ होत गेलेला हा प्रवास,
येऊन ठेपलाय अश्या टप्प्यावर..
दुसर्‍याच्या शोधाचा हट्ट सोडून,
स्वतःला शोधू पहाणार्‍या रस्त्यावर..

आता माझ्या कवितेतून
तू उतरशील याची शक्यता कमीच..
मी ही जवळपास नाहीशीच झालेली,
तुझ्या गझलेतून..

आता खरं नातं संपलय..
आता खरी सांगता झालीये..

(एक शेवटचं,
याला सल म्हण किंवा साक्षात्कार म्हण..
आपण कितीही उत्कटतेने रंगवली असली,
आपली तात्कालिक दु:खं,
तरी आयुष्यभर पुरेल अशी जखम,
दिलीच नाहीये आपण एकमेकांना...)

--------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users