तिने काय करावं?
कोणे एके काळी ती त्याला गाडीत भेटली. तो त्याच्या गावी गेला होता. ती मैत्रिणीबरोबर परत येत होती. तिच्या हातात डायरी. दोघी कविता वाचनात मग्न. तो अधुनमधुन डोकावत असला डायरीत, तरी तिला त्याची कल्पना नव्हती. त्या दोघींचं जगच निराळं होतं. एकदम त्याने डायरीच मागितली वाचायला. नाही कसं म्हणणार?
"डायरी आहे."
"हो, तीच मागतोय." त्याने धीटपणे म्हटलं.
"कविता आहेत. बाकी विशेष काही नाही."
"त्याच वाचायच्या आहेत."
"आवडतात?" असं म्हणत तिने त्याच्या हातात डायरी सुपूर्द केली. तो वाचत राहिला. त्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.