तिने काय करावं?

Submitted by मोहना on 26 November, 2011 - 19:06

कोणे एके काळी ती त्याला गाडीत भेटली. तो त्याच्या गावी गेला होता. ती मैत्रिणीबरोबर परत येत होती. तिच्या हातात डायरी. दोघी कविता वाचनात मग्न. तो अधुनमधुन डोकावत असला डायरीत, तरी तिला त्याची कल्पना नव्हती. त्या दोघींचं जगच निराळं होतं. एकदम त्याने डायरीच मागितली वाचायला. नाही कसं म्हणणार?
"डायरी आहे."
"हो, तीच मागतोय." त्याने धीटपणे म्हटलं.
"कविता आहेत. बाकी विशेष काही नाही."
"त्याच वाचायच्या आहेत."
"आवडतात?" असं म्हणत तिने त्याच्या हातात डायरी सुपूर्द केली. तो वाचत राहिला. त्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.
मुक्कामाला डायरी परत घेत तिने निरोप घेतला. तो वळून वळून पाहत राहिला. दोघी हात हलवत निघूनही गेल्या.

आणि एकदम त्याने तिला पत्रच पाठवलं. एक नाही दोन. म्हणजे त्याला माहीत नव्हतं की त्याचं पत्र तिला मिळालं आहे की नाही म्हणून हे दुसरं पाठवलेलं.

’आपली ओळख अगदी निसटती. स्पर्धेच्या गोंधळातली, बक्षीस विजेत्यांच्या गर्दीतली. तुझ्या कविता खूप भावल्या. कवितेनं किती जवळ आणलं आपल्याला. तुझ्या चेहर्‍यावर बक्षिसाचा आनंद ओसंडून वहात होता. मी तुझ्या हास्याच्या सरीत न्हाऊन निघत होतो. तुला त्याची जाणीवही नव्हती. मग गाडीतही भेटलो. म्हणजे मुद्दाम वाकडी वाट करून मी त्या गाडीत शिरलो. किती सहजतेने निरोप घेतलास. मला मात्र, खूप वेळ काहीतरी हरवल्याची जाणीव होत राहिली. घरी आल्यावर अगदी आठवणीने पत्र धाडलं. डायरीत होता तुझा पत्ता. पोचलंच नाही का ते तुला? की एवढं धाडस आगाऊपणाचं वाटलं? पत्रासोबत काव्यंमालेचा अंकही जोडला होता नमुना म्हणून. खूप दिवस उत्तराची वाट पाहिली. मग वाटलं, काहीतरी सापडल्यासारखं वाटत होतं पण चिमटीत येतायेताच निसटून गेलं. जाऊ दे, नशिबातच नाही म्हणायचं, दिवसामागून दिवस लोटले. कधीमधी तुझी आठवण सतावत राहिली. पण पुन्हा लिहायचं धाडस कसं होणार? काल खूप बेचैन होऊन समुद्रावर भटकत राहिलो. कंटाळून परत आलो तर ’काव्यमाला’ दाराच्या फटीतून आत आलेली. जरा वैतागानेच अंक उघडला. तू ’सोबत’ घेऊन आली होतीस. मन चिंब चिंब झालं. पुन्हा एकदा तीच सहजता. तीच निरागसता बरसून गेली. आठवणीतली वीज चमकून गेली. अशीच सरीमागून सरीसारखी धावत ये. चिंब चिंब भिजवत राहा. तुला आवडणार नाही कदाचित, पण मनात अंकुरलं, खूप लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं.’

खरं तर पहिलं पत्र मिळालं होतं. नशीब, घरात कुणी न फोडता ते तिच्या ताब्यात आलं होतं. नमुन्याच्या अंकातला पत्ता पाहून तिने आपली कविता लगेच पाठवूनही दिली होती. समजलं असेल का ते त्याला? पत्राला मात्र उत्तर पाठवलं नव्हतं. चेहराही आठवत नाही त्या मुलाला कशाला लिहायचं पत्र?
तिला आवडलं ते पत्र पण तो कोण हे काही केल्या लक्षात येईना. कविता, काव्यंस्पर्धा हा तर तिचा जीव की प्राण. बक्षिसं, मित्रमैत्रिणींचा सततचा घोळका, स्पर्धांमधल्या ओळखी. कोण असेल हा? काही दिवस ती त्या प्रश्नात रमली आणि नंतर विसरलीही. त्याच्या धाडसाला अनुत्तरित प्रतिक्रियेने पूर्णविराम मिळाला.

वर्ष लोटली. ती सुखासमाधानात न्हाऊन निघालेली. कवितेच्या दुनियेतून संसारात, नोकरीच्या व्यापात रमलेली. फेसबुकचा जमाना आला आणि जुन्या ओळखी शोधण्याचं वेड लागलं. काही नावं आठवली काही कुठून कुठून शोधून काढली. त्यातलाच एक तो. त्याचं अडगळीत पडलेलं पत्र सापडलं आणि तिला वाटलं तेव्हा नाही पण आता तरी त्याचा चेहरा पाहावा. शोधलंच मग तिने त्याला. त्याच्या नावासारखी तीन चार नावं होती. काय लिहिणार प्रत्येकाला? कधीतरी कुठेतरी झालेली आपली ओळख (एकतर्फी) असं तूच म्हणाला होतास, पत्र पाठवली होतीस दोन तो तूच का? त्याने लिहिलेल्या पत्रातल्या काही ओळी पण लिहाव्यात म्हणजे कदाचित आठवेल ते त्यालाही. तिने तसं केलं आणि त्याचं उत्तर आलं. तो तोच होता. त्याला अद्याप आठवत होतं सारं काही. तिच्याकडे आठवण्यासारखं काही नव्हतंच. पण त्याचा चेहरा पाहायची उत्सुकता होती. फोटोच नव्हते पण फेसबुकवर. असं कसं म्हणणार नं की टाक बुवा तुझे फोटो. कोण होता तो माझ्या प्रेमात पडलेला ते पहायचं आहे. ती मग गप्प राहिली. तू कुठे, मी कुठे झालं आणि तो म्हणाला, मी येतो तुझ्या गावात कधीतरी. बापरे, मग आता त्याला काय घरी ये म्हणायचं? नवर्‍याला काय सांगायचं? तिने बरेच दिवस उत्तरच पाठवलं नाही त्याला.

आणि एक दिवस त्याचा फोन आला. ’कुठून शोधला याने नंबर?’ भेटायला येतो म्हणाला. तिने नवर्‍याला थोडंफार सांगितलं, म्हणजे गाडीत ओळख, त्याने कवितेचा पाठवलेला अंक असं वरवरचं. नवरा म्हणाला मग जेवायलाच बोलाव. अनोळखी माणसाला एकदम जेवायला बोलवायचं? काय बोलायचं? पण उत्सुकतेपोटी तिने ते केलं. मनात कुठेतरी प्रश्न होता. तेव्हा उत्तर पाठवलं असतं तर आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं का? स्वत:च्या संसाराची बेरीज वजाबाकी मनातल्या मनात करून झाली. सगळं आलबेल होतं. पण तो काय करतो? त्याचा संसार? तिला स्वत:चीच लाज वाटली. आता इतक्या वर्षांनी असा विचार मनात तरळून जावा. जाऊ दे. त्याला एकदा येऊन तर जाऊ दे, मग नाही संपर्क ठेवायचा.

तो आला आणि तिला तो मुळ्ळीच आवडला नाही. म्हणजे पहिला प्रभाव वगैरे म्हणतात ना तो काही पडला नाही तिच्यावर. त्यावेळेस उत्तर पाठवलं नाही ते किती बरं झालं. येताना कवितांचं बाडच घेऊन आला होता. कवितांवर कविता वाचत राहिला. नवरा कामाचं निमित्त काढून उठलाच तिथून. जाता जाता तिच्याकडे मिश्किलपणे हसून पाहायला तो विसरला नाही. ती ऐकत राहिली. ओढून ताणून छान, मस्त म्हणत राहिली. तीन चार तासांनी तो गेला. पुढच्यावेळेस आणखी कविता आणतो म्हणाला. गेल्यानंतर त्याचा फोन आला, फेसबुकवरून तो पत्र पाठवत राहिला. तिने आता काय करावं? म्हणजे पत्रांना उत्तर नाही पाठवत ती पण तो तिच्या गावात येतो. पुढच्या वेळेस कवितांचं बाड घेऊन आला आणि घरी येतो म्हणाला तर...?
तुम्हाला काय वाटतं? काय करायला हवं तिने?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फेबुचं अकांउंटमध्ये त्याला बॅन करता येईल की. किंवा स्पष्टच सांगावं की बाबारे आता मला कवितांमधला विंट्रेस गेला अन कथेचा नाद लागला आहे. कादंबरी सांगितली तर जास्त गॅप वाढेल, खंडकाव्य, महाकाव्य आदी पर्याय आहेतच.
पण तसे झाले तर त्याच्या हक्काचे ऐकणारे तो गमावून बसेल. बिच्चारा.
रच्याकने, ही सत्यकथा (?) (कुणाची) आहे?

अवांतर: बर्‍याच लेखात कवि, कविता यांना दुर्लक्षीत केले जाते. तसे म्हणण्याची फॅशनच आहे. कथेकरीबुवा कितीका निर्बुद्ध असेना त्याबाबत कानाडोळा केला जातो. असे का?
आंतरजाल कवि संघटनेकडून (नियोजित) असल्या प्रवृत्तींचा या निमित्ताने जाहीर निषेध. (निषेध हा शब्द माझ्या लहाणपणी पाहुण्यांसमोर एखादे वर्तमानपत्र जाहीररित्या वाचतांना निधेष असा वाचायचो. Happy )

पाभे
(संपर्कप्रमुख)
आंतरजाल कवि संघटना (नियोजित)
Happy

पाषाणभेद - कादंबरीचा मार्ग मस्त आहे एकदम Happy
फेसबुकमध्ये डिलीट मारता येतं पण फोनचं काय? घरी येऊनच थडकला तर.....सगळ्या संभाव्य गोष्टीचा विचार करायला हवा नं :-). गोष्ट खरी आहे पण कुणाची आहे ते सांगता येणार नाही. (माझी नाही होऽऽऽऽऽऽ).

अहो असा नका हो निषेध वगैरे करु त्यापेक्षा निधेष ठिक आहे :-), तीही कविता करतेच की पण कवितांचा ओव्हरडोस झाला तर काय करणार बिच्चारी.

कादंबरीचा मार्ग मस्त आहे एकदम >> माझ्यामते स्पष्टपणे सांगितलं तर अजून चांगल आहे... कोणाला माहिती... उद्या तो कादंबरीची प्रकरणे घेऊन यायचा... तिने स्पष्टपणे एकदाच त्याला सांगाव... आता वेळ नाही कविता करायला, फेबुवर पत्र वाचायला, फोनवर बोलायला, कविता ऐकायला...
-- ज्या गोष्टी पटत नाही त्या स्पष्टपणे बोला... नाहीतर समोरचा अजून धुंदीतच राहयचा... Happy

.....सगळ्या संभाव्य गोष्टीचा विचार करायला हवा नं >> हा विचार त्या बाईंनी त्याला फेसबूकवर मेसेज टाकण्या आधी करायला हवा होता Happy
डायरीतील पत्ता नकळत उतरवून घेणारा इसम आपला फोन नंबर पण मिळवू शकतो!

वर सुचवले आहे तसे स्पष्ट सांगणे उत्तम असे मला देखील वाटते. पत्र कोणी लिहिले होते हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी फेसबूकवर मेसेज टाकला होता पण आता कवितां मधे तितका रस वाटत नाही हे स्पष्ट सांगावे.

हे सांगणे जमत नसल्यास मग काही इतर उपाय
फोन करून घरी येतो म्हणाल्यास नसलेली लग्ने बारशांची कारणे काढवीत. दोन तीनदा असे झाल्यावर तो काय ते समजून जाईल.
तरीसुद्धा तो समजा आलाच तर तो घरी आल्यावर कंटाळवाण्या सांसारीक गप्पा मारून बोर करावे. टिव्हीवर एखादी सासबहू सिरियल लावून त्यातल्या पात्रांवर एकतर्फी नॉनस्टॉप बोलावे. (आधीच्या ४००+ एपिसोड्सची माहिती असल्यास ती पूर्ण कथा ऐकवावी.)
किंवा तो घरी आल्या आल्या, "तू बस माझी अथर्वशिर्षाची पारायणे संपवून आलेच." असे सांगून गायब व्हावे जे एकदम अर्ध्या पाऊण तासाने उगवावे. कंटाळून तोवर तो निघून गेला असेल.
काही आंतरजालीय उपाय पण करता येतील जसे की फेसबूकवर I Hate Poems टाईप काही ग्रुप्स असल्यास ते लाईक करावे. कविता पोस्ट करण्यासाठी मराठी वेबसाईटसचे पत्ते द्यावेत ई.

नक्की समस्या काय आहे ते कळाले की मार्ग मिळेल.
१)त्याला टाळायचंय (तो आला आणि तिला तो मुळ्ळीच आवडला नाही- हे वाक्य आहे कथेत...यात अनेक संभावना दडल्या आहेत)
की २)आता एकूणच कवितांमध्ये रस नाही
३)की त्याच्या कविता आवडल्या नाहीत?

त्याने तर फक्त तुझ्या कविता आवडल्या असेच म्हटलेय पहिल्या पत्रात. आतापण येऊन नुसत्याच कविता वाचल्या. बाकी काही बोललेला नाही.
म्हणजे तिला कवितांमध्ये नाही तर 'कोण तो, कसा आहे?' यात इंटरेस्ट आहे तर त्याला फक्त कवितांमध्ये.

मयेकर किती खोलात जाताय? Wink

तर तिने काय करावे.. तो कविता वाचायला आला की त्याला सांगावे "तुम्ही वाचा हं कविता मी जरा एकिकडे ऐकता ऐकता माझी कामं करते."
मग भरपूर काम काढावीत आणि करत बसावीत. फोन घ्यावा, मायबोलीवर टिपी करावा. हे सगळं करताना फारच शिष्ठ वाटू नये म्हणून अधूनमधून हं हं करत रहावे. मधेच एखादी 'वा छान!' ची फोडणी द्यावी. (चुकीच्या वेळी पडली तर अजूनच छान!).
पुढच्या वेळेला शक्यतो गडी येणार नाही. तरी आलाच तर या सगळ्या कृतीमधे काही गोष्टी अ‍ॅड करून तीव्रता वाढवावी. उदाहरणार्थ...
"तुम्ही वाचा हं. मी ऐकतेय. पण माझी ना जेवायची वेळ झाली. मला बै अग्दी वेळेवर जेवाय्चंच असतं. ऋजुता म्हणते ना त्याप्रमाणे. मी जेवते तुम्ही वाचा. ऐकतेय मी." (वाचनकर्त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्याचे ताट अज्जिबात वाढू नये.)
"अय्या चार वाजले. माझी चहाची वेळ झाली. पोहे पण टाकते. ऐकतेय मी. तुम्ही वाचा." (चहापोहे तयार झाल्यावरही वाचनकर्त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्याच्यासाठी चहाचा कप आणि पोह्याची बशी भरू नये.)
"

ह्या गोष्टी मूळच्या कार्यक्रमपत्रिकेत शिरल्यानंतरही येणे बंद झाले नाही तर अजून एक फोडणी द्यावी.
"आज ना वरचा माळा आवरायला काढायचाय. तुम्ही कविता वाचाच पण आधी जरा मला मदत करा बरं." असं म्हणून त्याला मदतीला घ्यावे.
"आज बै पाहुणे यायचेत. बरीच कामं आहेत जरा भाजी/ तांदूळ निवडून/चिरून/धुवून द्या बरं मग वाचा तुमच्या कविता. अगदी काव्यमय स्वैपाक होईल. फक्त आज स्वैपाक झाला की तुम्हाला निघावं लागेल हां. पाहुणे यायचेत ना माझ्याकडे तेव्हा तुम्ही असाल तर अगदीच घोळ होईल."
(केलेल्या स्वैपाकाची चव त्याला मिळणार नाही याची दक्षता घ्यावीच्च!)

तरीही बंद नाही झाला तर मात्र "तुम्हाला काही कळतं की नाही? मला वाटलं एव्हाना येणं बंद कराल तुम्ही. पण नाही. किती लुब्रेपणा कराल? मला कंटाळा येतो हो तुमच्या कवितांचा. आणि तुमचा सुद्धा. दुसरं झाड शोधा. जा. लोचट्ट मेले!"
असं ऐकवावे.

हे ऐकूनही न टळणारा माणूस असेल तर आपण घर बदलावे आणि नवीन पत्ता देऊ नये. (त्याने माग काढलाच तर पोलिसांना सांगावे. ) Proud

पण एवढा उद्योग करण्यापेक्षा मला तुमच्या कवितांचा कंटाळा येतोय आणि तुमच्याशी गप्पा मारण्याचा सुद्धा. मला माझा खूप वेळ वाया जातोय त्यामुळे असं वाटतंय. तर आता यापुढे तुम्ही येऊ नका. असे स्पष्ट सांगणे बरे.