आगळी वेदना
उत्स्फूर्त होत्या कधी, आता मूक ज्या संवेदना
जागतात सवयीनेच रे, आता साऱ्या चेतना!
ठेच लागता “अजून एक!”, म्हणून गेलो मी पुढे
दैवाच्या कट-काव्यांची, कैसीच ही अवहेलना!
वाटेत खेळताना दिसली, पोरे भिकारी मला
फाटक्यातही हसणे त्यांचे, वाटे मज खरेच ना!
वेचलेले कधीकाळी एक, मोगऱ्याचे फूल मी
मुरझले; पण गंध त्याचे, हृदयी कधी भिनलेच ना!
ना उडताना हासलो, ना अडखळताना त्रासलो
वेदनाच नसण्याची माझी ही आगळी वेदना!
नको करु तू पर्वा, माझ्या दाटून राहण्याची
झालंच तर होईल काय, बरसेन मी; इतकेच ना?