ठसे..( मजुघोषा )

Submitted by गणक on 14 May, 2021 - 06:16

ठसे....

हुंदके दाटून येता भावनांचे !
केवढे उपकार झाले आसवांचे !

फेडण्या कर्जात विकली माय ज्यांची ,
काय झाले हो पुढे त्या वासरांचे !

दगड असतो तर कदाचित देव असतो ,
घाव इतके सोसले मी आपल्यांचे !

त्या निसर्गाच्या छटा दिपलेत डोळे ,
घातकी ते रंग सारे माणसांचे !

सूर्य गिळले , आगसागर पार केले ,
हाय चटके सोसले मी गारव्यांचे !

घेतले आधीच तुम्ही सर्व तारे ,
छाटले का पंख माझ्या काजव्यांचे ?

ज्या किनाऱ्यावर बुडाली नाव माझी ,
गाव कुठले...बेट होते वादळांचे !

जीव माझा घेतला हे तेच होते ,
लागले तिरडीस माझ्या हात ज्यांचे !

शब्द सुचले काल माझ्या लेखणीला ,
कंठ बसले आज साऱ्या गायकांचे !

थांब तू ही नागमोडी गझल माझी ,
बघ ठसे दिसतील माझ्या अक्षरांचे !

वृत्त - मंजुघोषा
( गालगागा × 3 )

Group content visibility: 
Use group defaults

वा !!