वर सुखाचा चेहरा
- महेश मोरे (स्वच्छंदी)
आत दु:खे वर सुखाचा चेहरा
माय म्हणजे कातळामधला झरा
प्रीत म्हणजे रातराणीची जखम
प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा
जन्म झाला शुभ्र चिंधीसारखा
रंग लावा अन् कुणीही वापरा
सावरू मी लागलो आता कुठे
आठवण काढा तिची अन् पोखरा
हे कधी कळलेच नाही ..जिंदगी !
तू खरी की..मी खरा की..तो खरा
असावीत त्यांच्या नशीबात दु:खे
पडावीत माझ्याच प्रेमात दु:खे?
मला भेटणार्या भिकारी सुखांनो
लुटा आज माझी अतोनात दु:खे
कितीवार त्यांची करू चौकशी मी
कथेनात काही खरी बात दु:खे
दिवाळेच काढून रब्बी निघाला
पुन्हा पेरली मी खरीपात दु:खे
उदासीन हा जीवनाचा उकाळा
नि गवती चहाची सुकी पात दु:खे
तुझ्या आणि माझ्या बखेड्यात दु:खे
तुझ्या आणि माझ्या सलोख्यात दु:खे
असा घालती घट्ट् विळखा मनाला
जसे कंबरेवर तुझे हात.. दु:खे