माझी गझल..
रोज काही गूज गोष्टी सांगते माझी गझल
आणि माझ्या अंतरीचे जाणते माझी गझल
काय मी लपवू तिच्या पासून, मजला ना कळे!
ना कधीही बोलले जे, ऐकते माझी गझल
वागते मी नेहमी ,ती सांगते मजला जसे
पण तरी माझ्यावरी रागावते माझी गझल!
ती अशी बेधुंद होते, झिंगते मदिरेपरी
अन नशा चढता खरेही बोलते माझी गझल..
ती कधी होते सखी, आई कधी, तर शिक्षिका
खेळते, जोजावते, सांभाळते माझी गझल..!
लाजते, नटते कधी, तर भांडते रडते सुद्धा
वार माझ्या लेखणीचे सोसते माझी गझल
काढता मी खरवडूनी वाळल्या जखमा कधी
आसवांसह भळभळूनी वाहते माझी गझल
खेळता मी काफ़ियांशी संशयाने पाहते
बांधता शब्दांत तिजला हासते माझी गझल