
“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राणं घेतलं हाती” हे शांता शेळके लिखित मराठी मनाला वर्षानुवर्षे स्फूर्ती देणारे वीररसयुक्त गीत. हे गाणं केवळ सुश्राव्य स्फूर्तिदायी गीत म्हणून ऐकून सोडून न देता, ते प्रत्यक्ष आयुष्यात जगणारा शूर मराठी सरदार म्हणजे इंदूरचा सुपुत्र ‘वैभव भागवत’. देशासाठी सर्वस्व देणाऱ्या ‘शौर्य चक्र’ विजेत्या ‘पायलट ऑफिसर’ वैभवची कहाणी युवा पिढी आणि समस्त नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशीच.
शंकर रामचंद्र उर्फ आप्पासाहेब भागवत यांचा जन्म ८ ऑगस्ट १८८२ साली गोकाक येथे झाला. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनिअर होते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाचे ओव्हरसिअर म्हणून आप्पासाहेबांच्या वडिलांनी म्हणजेच रामचंद्रबुआंनी काम पाहिले. आप्पासाहेब १९ वर्षांचे असतानाच १९०१ साली घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांचे वडील रामचंद्रबुआ यांनी घराचा त्याग करून आध्यात्मवासात जीवन व्यतीत करण्याचे ठरविले. आप्पासाहेबांच्या बहिणींचे संसारही चालले नाहीत. दोनही बहिणी व त्यांची मुले या सर्वांना आप्पासाहेबांनी स्वतःच्याच घरी आसरा दिला. आप्पासाहेबांना एकूण ४ मुले आणि ४ मुली.