शंकर रामचंद्र भागवत

Submitted by अ. अ. जोशी on 7 August, 2010 - 23:03

शंकर रामचंद्र उर्फ आप्पासाहेब भागवत यांचा जन्म ८ ऑगस्ट १८८२ साली गोकाक येथे झाला. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनिअर होते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाचे ओव्हरसिअर म्हणून आप्पासाहेबांच्या वडिलांनी म्हणजेच रामचंद्रबुआंनी काम पाहिले. आप्पासाहेब १९ वर्षांचे असतानाच १९०१ साली घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांचे वडील रामचंद्रबुआ यांनी घराचा त्याग करून आध्यात्मवासात जीवन व्यतीत करण्याचे ठरविले. आप्पासाहेबांच्या बहिणींचे संसारही चालले नाहीत. दोनही बहिणी व त्यांची मुले या सर्वांना आप्पासाहेबांनी स्वतःच्याच घरी आसरा दिला. आप्पासाहेबांना एकूण ४ मुले आणि ४ मुली. १९०९ साली डेक्कन जिमखाना वसाहत वसविण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार होता. आप्पासाहेब स्वतःसुद्धा सिव्हिल इंजिनिअर होते. त्यांनी बनविलेला आराखडा पुण्यातील एक आदर्श आराखडा मानला गेला. त्यावेळी ते पुणे इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. एके दिवशी त्यांना असे आढळले की आपण मुलांना ड्रेनेजलाईनबद्दल जी काळजी घेण्यास सांगत आहोत तशी काळजी घेऊन ड्रेनेज बांधली जात नाहीत. पुण्यातील लोकांवर रोगराईचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी उघडपणे त्यावेळचा अधिकारी 'मेंडी'साहेब याच्याविरुद्ध आवाज उठविला. मेंडीसाहेबाला स्वतः ड्रेनेजमध्ये उतरून नेमकी काय चूक होते आहे ते दाखवले. त्यावर स्वतःची चूक उघड झाल्यामुळे मेंडीसाहेब रागावला. तरीही, 'आम्ही कॉलेजात जसे शिकवितो तशी काळजी घेतली जाणार नसेल तर मी प्राध्यापकीचा राजीनामा द्यायला तयार आहे.' असे सांगून त्यांनी खरोखरच राजीनामा दिला. मात्र, तत्कालीन शासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्याचे आणि जनसामान्यांना त्याची जाणीव करून देण्याचे काम त्यांनी सोडले नाही. १९२० साली त्यांना पुण्याचे चीफ ऑफिसर बनण्यासाठी सुचविण्यात आले व ते पद जवळजवळ बहालच करण्यात आले. १९२० ते १९३८ अशी अठरा वर्षे आप्पासाहेब पुण्याचे चीफ ऑफिसर होते.
चीफ ऑफिसर असताना आप्पासाहेबांनी अनेक योजना राबविल्या. स्वतः चीफ ऑफिसर असूनही झाडूवाले, भंगी, इतर कामगार वर्ग यांना लिहिता-वाचता यावे यासाठी त्यांनी वर्ग सुरू केले. त्यात स्वतः शिकवले. स्वतःची पद-प्रतिष्ठा यांपलिकडे पाहणारे आप्पासाहेब एकदा एका भंग्याला घरी जेवायला घेऊन आले. त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीचे सोवळे-ओवळे फार कडक. त्यांच्या पत्नीने आप्पासाहेबांचे ताट जेवणघरात तर भंग्याचे माजघरात मांडले. यावर रागावून 'जेवायला येणार नाही' असे आप्पासाहेबांनी सांगितले. आणि ज्यावेळी त्यांच्या बरोबरीने त्याचे ताट मांडले गेले त्याचवेळी पानावर बसले. कोणत्याही चीफ ऑफिसरला प्रयत्न करूनही काही गोष्टी जमणार नाहीत अशा गोष्टी आप्पासाहेबांनी करून दाखवल्या.
त्यावेळी, नगरपालिकेच्या कामगारांचा पगार दर शनिवारी होत असे. या कामगारांनी या ना त्या कारणाने पठाण लोकांकडून कर्जे घेतली होती. मात्र, कितीही दिले तरी ही कर्जे संपत नसत. त्यामुळे दर शनिवारी पालिकेच्या कोपर्‍यावर हे पठाण थांबत. पगार झाला की दमदाटीने पैसे वसूल करीत. हे सर्व आप्पासाहेबांच्या लक्षात आले. ते पठाणांना भेटले. मूळ कागदपत्रे पाहिली. त्यानुसार जे कर्ज या कामगारांच्या डोक्यावर होते ते स्वतः एकरकमी फेडले. पुन्हा येथे येऊन कामगारांना त्रास द्यायचे कारण नाही अशी समज देऊन पठाणांना परत पाठवले.
१९२६-२७ सालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या इन्स्टिट्यूट उभारणीतही त्यांचा मोठा सहभाग होता. त्या आधीपासूनच शासकीय कामगारांनी कसे रहावे या बद्दल ते सांगत असत.
चीफ ऑफिसर म्हणून जेवढा पगार मिळत असे त्यातील निम्मा पगार घरी देऊन इतर सर्व ग्रामसुधारणा व समाजकार्यासाठी देत असत.
स्वतःची धायरीला असलेली ६ एकर जमीन त्यांनी ज्या लोकांना रहायला घरे नव्हती त्यांना बक्षीस म्हणून देऊन टाकली. कितीतरी लोकांचे कर्ज फेडले. अनेक लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी स्वतः जामीन राहिले आणि नेमके इथेच ते कमी पडले. कारण, लोकांनी त्यांचा फक्त उपयोग करून घेतला. कर्जे तर फेडली नाहीतच. मात्र, आप्पासाहेबांवर स्वतःचा वाडा जाण्याची वेळ आली. ज्यांनी कर्जे घेतली होती अशा कोणाचेही नाव न घेता, कोणासही दोष न देता स्वतःच्या वाड्याचा लिलाव करण्यास परवानगी दिली. पूर्वी डेक्कन जिमखाना वसाहत वसवताना त्यांनाही तिथे बंगला बांधता आला असता. एकाने विचारलेही होते. मात्र, मी जिथे राहतो त्याच घरावर माझे आत्यंतिक प्रेम असून ते मी सोडू शकत नाही असे त्यांनी सांगितले होते. आज मात्र तेच घर जाण्याची वेळ आली होती. ती त्यांनी तितक्याच सहजपणे मान्य केली.
आप्पासाहेबांच्या जीवनातील हे काही प्रसंग येथे दिले आहेत. आज त्यांची आठवण होताना मन भरून येत आहे.
धन्यवाद!

गुलमोहर: