अव्यक्त (कथा)
"पाच जुनला लग्न आहे.."
केतनचा मेसेज होता, मी तेवढेच वाचू शकले, पुढचा मजकूर मला वाचायचा नव्हता.
मेसेज जरी बऱ्याच दिवसांनी आला असला तरी केतनची आठवण रोज येत असे, आठवण नाही, त्याची सवय लागली होती, माझ्यासारख्या सत्तावीस वर्षाच्या मुलीची, केतन एक चांगली, वाईट कशी का असेना, एक सवय होता, तुमचं नात संपत पण सवय नाही ना संपत!
रोजची एक सवय, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना आणि मग कामाच्या मधूनच, त्याचा व्हाट्सअँप डीपी, स्टेटस बघायचा, त्याचा नंबर डिलिट करायचा, परत सेव्ह करायचा, ब्लॉक करायचा, अनब्लॉक करायचा, नंबर पाठ असला तरी!!