सरतेशेवटी: भाग तीन (अंतिम)

Submitted by चैतन्य रासकर on 28 December, 2016 - 03:47

सरतेशेवटी (भाग एक): http://www.maayboli.com/node/61163

सरतेशेवटी (भाग दोन): http://www.maayboli.com/node/61187

सरतेशेवटी: भाग तीन (अंतिम)-

"माझे थोरले काका तीन वर्षापूर्वी वारले, पण ते अजूनही मला फोन करतात"

गिरीश एवढे बोलून थांबला, पण त्याचे हे बोलणे कोणाला काही झेपले नाही, कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, बाहेर पाऊस आता कमी झाला होता.

एखाद सेकंदानंतर, रिक्तमांना तो काय बोलतोय हे कळले, रिक्तम एकदम हसायला लागले, संजय ही त्यांच्या हसण्यात सहभागी झाला, गिरीश त्यांच्या हसण्याने दचकला, संपादकाने त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केले, परत नजर गिरीशकडे वळवली.

"अरे पण मेल्यानंतर कसे कोणी फोन करेल?" संपादकाने शाळेतल्या एका लहान मुलाला विचारतात तसे विचारले.
"कस होत, आमच्या काकाला मोबाईलचा भारी नाद, चोवीस तास मोबाईल वर असायचा, फोन करणार, गाणी ऐकणार, गेम्स खेळणार, सेल्फीचा तर इतका नाद होता, सेल्फी काढायला, एक्सप्रेस हायवेच्या बोगद्यावर गेला"
"बोगद्यावर..?" डॉक्टरांनी हसत विचारले, आधी गंभीर असलेले वातावरण एकदम बदलून गेले, संपादक आणि संजयलाही हसू आवरत नव्हते.

"हां..बोगद्यावर चढून गेले, पण पाय घसरला.." गिरीश चुकचुकत म्हणाला.

डॉक्टर परत मोठ्याने हसले, संपादकाने विचारले, "त्या अपघातात गेले का?"

गिरीशने "हो" म्हणून मान डोलावली, "सेल्फी काढताना गेले, त्यामुळे त्यांचा जीव मोबाईल मध्ये अडकला" गिरीशने स्पष्टीकरण दिले.

"आता तू सेल्फी काढताना, काकांचा फोन येतो का?" डॉक्टर म्हणाले आणि खदाखदा हसायला लागले, त्यांच्या या विनोदावर संजय आणि संपादक हसायला लागले.

हसणं चालूच राहिले, गिरीशचा चेहरा पडला, तो कसतरी, थोडा, अवघडून हसला, पण त्याला आता काय बोलावे ते कळेना, हसणं थांबवत, डॉक्टर "यु मेड माय डे" असे गिरीशला म्हणाले, संपादकाने विचारले, "शेवटचा फोन कधी आला होता?"

"एक महिना झाला, मी झोपलो होतो, रात्री बरोबर बारा वाजता काकांचा फोन आला.."

"मिसकॉल का व्हाट्सएप मेसेज?" संजय म्हणाला, परत सगळे हसले.

"इथे तुझ्या काकाला रेंज कशी काय मिळते?"

"त्यांच्या फोन नेहमी डेड असेल ना?"

"त्यांना लाईफ टाईम व्हॅलिडिटी मिळाली असेल ना"

असे बरेच विनोद संजय आणि डॉक्टरांनी केले, गिरीश अगदी रडकुंडीला आला, संपादकाने सगळ्यांना थांबवले.
"अरे कोणीतरी, दुसरा तो नंबर वापरत असेल, तुझा चुलत भाऊ वगैरे, तुझी कोणीतरी मस्करी करतंय"
"फोन करून काय म्हणतात?" संजयने विचारले

"जास्त काही बोलत नाहीत, खुशाली वगैरे.." गिरीश काही बोलत असताना,
"रिचार्ज करायला सांगतात का?" संजयने परत विनोद केला.

"बास रे" संपादक संजयला थांबवत म्हणाले.

अशी बरीच थट्टा मस्करी झाली, गिरीशसाठी ही सत्यकथा होती, बाकीच्यांनी त्याला वेड्यातच काढले गिरीशला या कल्पनेवर, कथा लिहित होता, त्याला योग्य तो शेवट सुचत नव्हता, अजून थोड्या गप्पा झाल्यावर, सगळ्यांनी गिरीशला जाण्यासाठी भाग पाडले, गिरीशला अजून काही वेळ थांबायचं होत, पण असे काही झाले नाही, गिरीशने "परत भेटायला येऊ का?" असे डॉक्टरांना विचारल्यावर, डॉक्टरांनी सरळ "नाही" म्हणून सांगितले, जाताना त्याचा पडलेला चेहरा बघितल्यावर, "समुद्रकिनारी कधीतरी भेटूच ना" असे डॉक्टर म्हणाले.

गिरीश गेल्यावर, संपादकाने रिक्तमांना विचारले, "तुम्हाला हा भेटला होता?"

"बहुतेक, आठवत तर नाही, समुद्रकिनारी कोण ना कोण भेटत असतोच" डॉक्टर सोफ्यावर रेलून बसत म्हणाले.

"मला वाटत, तो तुम्हाला भेटला होता, त्याने नाव सांगितले, तेवढे तुमच्या लक्षात राहिले, कथेसाठी तुम्ही नकळत ते नाव वापरले" संपादक म्हणाले,

"चला कोणीतरी आहे, जो माझ्या कथा वाचतोय, माझ्यामुळे लिहिण्याचा प्रयत्न करतोय" रिक्तम हसत म्हणाले, बरेच आनंदी झाले होते.

"डॉक्टर, एक नाहीत असे असंख्य फॅन्स आहेत" संपादक म्हणाले, संजयने यावर मान डोलावली.

"मला तर वाटलं, डॉक्टरांच्या लेखणीतून एक पात्र जिवंत झाले, कथेचा शेवट सांगायला आलं" संजय 'जिवंत' शब्दावर भर देत म्हणाला.

डॉक्टरांना संजयचे हे बोलण आवडल, काही का होईना, गिरीश मुळे त्यांच्यातली दरी थोडा वेळ का होईना, कमी झाली होती, डॉक्टरांचा राग शांत झाला, ते अगदी प्रसन्न झाले, आज बऱ्याच दिवसांनी ते खळखळून हसले होते, संपादकाने त्यांना प्रथमच हसताना बघितले.

डॉक्टर परत एकदा, हसले, पूर्वीसारखे, मनापासून, स्वतः साठी, त्यांना जाणीव झाली की आपले लिखाण अजून मेलेल नाही, जिवंत आहे, इतके जिवंत आहे की एखादा, कुठेतरी, कोणीतरी ते वाचतो, भारून जातो आणि पुन्हा नव्या उर्मीने जगायला मोकळा होता, "आपले लिखाण जगण्याची उर्मी देत" या विचाराने डॉक्टरांना नव्याने लिहिण्याची उमेद मिळाली, त्यांनी आपल्या थर थरथरण्या हातांकडे बघितले, हात जरी थरथरत असले तरी डोकं अजून शाबीत होत.

मग थोडा वेळ अजून कोणी काही म्हटले नाही, जे काही घडले, ते खूप चमत्कारिक, काल्पनिक, अकल्पित होते.
"सरतेशेवटी कथेचा शेवट तर राहिलाच" संपादकाने विचारले.

"मी तर माझ्या कथेबद्दल विसरून गेलो होतो, हे जे काही घडले ते एवढे.." असे म्हणून रिक्तम एकदम गप्प झाले, कोणी काही बोलले नाही, रिक्तम यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली होती, हा आनंद त्यांच्यासाठी फार मोठा होता, त्या आनंदात ते गढून गेले होते.

रात्र झाली होती, संपादकांनी त्यांचा निरोप घेतला, संपादकाला निरोप देण्यासाठी संजय घराबाहेर आला,

संपादक थोडे थांबले, त्यांना कसे बोलावे ते कळत नव्हते,

"ती कल्पना.." संपादक एवढे बोलून थांबले.

"कोणती?" संजय ने विचारले,

"अरे मघाशी तू म्हटलास ना, कथेतले एक पात्र जिवंत होते आणि कथेच्या लेखकाला शेवट सांगतो" संपादक शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाले.

"अरे हो"

"त्यावर एक चांगली कथा होऊ.." संपादक अजून काही म्हणणार,

"मी लगेच लिहून पाठवतो.." संजयने त्यांच्या मनातील इच्छा ओळखली, त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी होती.
आणि संजय ने तसे केले ही, या कल्पनेवर एक चांगली, धक्कादायक, रहस्यकथा लिहिली, संपादकला पाठवली, संपादकाला ही ती कथा आवडली, त्यांनी ती कथा "अगम्य" च्या दिवाळी अंकात छापण्याचे ठरवले.

डॉक्टर रिक्तामांनी कथेचा एक नवीन शेवट लिहिला, कथेच्या नायकाचे नाव "गिरीश" च ठेवले, नवीन कथा नेहमीसारखी "अगम्य" मासिकामध्ये प्रकाशित झाली, सर्वाना खूप आवडली, डॉक्टर रिक्तम यांना अभिनंदनाचे खूप फोन, मेसेज आले, रिक्तम बरेच सुखावले, त्यांनी नंतर अजून बऱ्याच उत्तम कथा लिहिल्या.

गिरीशने ती कथा वाचली, त्याला खूप आवडली, गिरीश आणि रिक्तम परत समुद्रकिनारी भेटले, या वेळी रिक्तामांनी त्याला ओळखले, ते आता त्याला कधी विसरणार नव्हते, त्यांनी गिरीशला त्याची पहिली कथा लिहिण्यात बरीच मदत केली, गिरीश भयकथा लिहिणार होता पण, डॉक्टरांनी गिरीशला विनोदी कथा लिहिण्यास भाग पाडले, गिरीशला आधी रुचले नाही, पण डॉक्टरांनी त्याला एक विनोदी शेवट ही सुचवला, त्यामुळे गिरीश त्याची पहिली कथा लिहू शकला.

गिरीशची विनोदी कथा थोडक्यात अशी होती,

"बोगद्यावर जाऊन मोबाईल वर सेल्फी काढताना, पाय घसरून, नायकाच्या काकाचा अकस्मात, अपघाती मृत्यू होतो, त्यामुळे त्यांच्या जीव मोबाईल मध्ये अडकतो, मेल्यानंतर नायकाला काकांचे फोन येऊ लागतात, काकांना मुक्ती मिळावी म्हणून नायक, त्याच बोगद्यावर जाऊन सेल्फी काढतो!! त्यांची शेवटची सेल्फी आणि इच्छा पूर्ण करतो, काकांना मुक्ती मिळते, त्यांचे फोन येणे थांबते"

डॉक्टरांचा संजयवरचा राग निवळला, संजय अजूनही रिक्तामांनी सांगितल्या प्रमाणे कथा लिहून, टाइप करून संपादकाकडे पाठवतो, संपादक मग रिक्तमांना फोन करतात, शेवट वाचून दाखवतात, रिक्तामांनीच लिहला आहे याची खात्री करून घेतात आणि मगच प्रकाशित करतात.

डॉक्टर रिक्तमांनी लिहिलेल्या कथेचा शेवट, जो प्रकाशित झाला, सगळ्यांना आवडला तो असा होता,
"गिरीश समुद्रकिनारी आत्महत्या करण्यासाठी जातो, रात्र असते, भरतीची वेळ असते, तिथे कोणी नसते, तो रडत, पळत जाऊन समुद्रात जातो, पण तो जलसमाधी घेणार, मरणार तेवढयात,

त्याच्या मोबाईल वर एका अनोळखी नंबर वरून फोन येतो..."

डॉक्टरांच्या या कथेच्या पहिल्या भागाचा हा शेवट होता, सर्व वाचक आतुरतेने दुसऱ्या भागाची वाट बघत होते.

समाप्त.

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@कावेरि, @anilchembur, @सस्मित

कथा आवडीने वाचल्याबद्दल धन्यवाद Happy

'सरतेशेवटी' कथा लिहिताना, आधी फक्त एक भाग होता, पण पात्रांचा पसारा वाढत गेला आणि कथेचे तीन भाग झाले. या पुढे ही कथा वाढू शकते पण पुढचे भाग तेवढे दर्जेदार, मजेशीर होऊ शकत नाही, त्यामुळे इथे थांबणे कदाचित योग्य असेल.

मला मान्य आहे की डॉक्टर रिक्तमांच्या कथेचा शेवट हा अपूर्ण आहे, पण कथेतील बाकीच्या घटनांचा, पात्रांचा एक सुंदर शेवट झालेला आहे, त्यामुळे नवीन विषयावर कथा लिहिण्यासाठी मी मोकळा झालो आहे Happy

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद Happy पूर्ण कथा गोंधळात टाकणारी आहे का, फक्त शेवटचा, तिसरा भाग कमकुवत आहे?
कोणता मुद्दा कळला नाही, हे जर नमूद केले तर मला कथेत योग्य ते बदल करता येतील आणि मला पुढच्या वेळी सुधारणा करता येईल Happy

"मला तर वाटलं, डॉक्टरांच्या लेखणीतून एक पात्र जिवंत झाले, कथेचा शेवट सांगायला आलं" संजय 'जिवंत' शब्दावर भर देत म्हणाला. >>> इथेच संपली असती तर मस्त झाली असती.

(शेवट सुचवला म्हणून घाबरू नकोस रे माझ्या आयडीच्या नावाचे पात्र तुझ्या कथेत नाहीये Wink )

@ सिम्बा
ही कथा नाही जमली..
पण लवकरच ही कथा परत लिहून, योग्य तो बदल करून, एकाच भागात पूर्ण कथा, पोस्ट करतो

तिसऱ्या भागाने निराशा केली पार....
मला वाटत होत, डॉक्टर ते पात्र जगत होते, म्हणजे त्यांनी आत्महत्या करूनही त्यांच्या संकल्पनेतील जीवन त्यांना लिहिता यावा या साठी ते त्या कथेचा शेवट होईतोवर संजय आणि संपादक यांना तेथे भेटत होते. आणि त्याचवेळेस गिरीश नामक व्यक्तीसुद्धा अवतरला आणि त्याने डॉक्टरांचा शेवट कसा झाला हे सांगितले आणि कथेबरोबरच डॉक्टरांचाही शेवट झाला...

असा काहीसा शेवट असेल वगैरे ...