स्मृती काढा (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 2 December, 2016 - 06:04

"आणि तुला तो नंबर आठवला?"

"हो, मी बघितला होता, पण नंतर मी विसरलो, हा काढा पिल्यावर मला नंबर आठवला"

"कसे काय?"

"सोप आहे, पाला पाण्यात टाकायचा, ते पाणी उकळायच, पाणी गाळून घ्या, पिऊन टाका, बस एवढच"

"तुला मग सगळच आठवल असेल?"

"सगळ नाही रे, तुझ्या जवळची आठवण असायला हवी, माझ्या जवळची आठवण, त्या चारचाकीचा नंबर होता"

"पण ही आठवण दुःखद होती"

"फक्त जवळची आठवण, मग ती सुखद असो किंवा दुःखद"

रवींद्रचा मागच्या महिन्यात अपघात झाला होता, रात्री फुटपाथवरून जात असताना, एका चारचाकी गाडीने मागून त्याला धडक मारली, या अपघातात, त्याच्या उजव्या पायाचे, कमरेखालील आणि गुडघ्याखालील हाड मोडले, चारचाकी गाडी थांबली नाही, तशीच भरधाव निघून गेली. रवींद्रने याचा मोठा धसका घेतला, एक माणूस आपले क्षणार्धात आयुष्य उध्वस्त करतो पण आपण काहीच करू शकत नाही, याची खंत सतत त्याच्या डोक्यात भिनत होती, त्याला गाडीचा नंबर बघता आला, पण त्याला नंबर काही नंतर आठवेना, नंबर मिळाल्याशिवाय ती चारचाकी, त्याचा ड्रायव्हर शोधणे अशक्य होते.

अशातच, रवींद्रला कोणीतरी "स्मृती काढा" बद्दल सांगितले. मी नाव ऐकूनच हसलो, पण रवींद्रची अवस्था बिकट होती, त्याला काही करून त्या चारचाकीचा आणि ड्रायव्हरचा शोध लावायचा होता.

स्मृती काढा म्हणजे कुठल्यातरी झाडाची पाने होती, दहा हजार रुपये देऊन त्याने काढ्यासाठी लागणारा पाला मिळवला, ती पाने पाण्यात टाकून, पाणी उकळून, गाळून त्याने तो काढा तयार केला, एका घोटात पिऊन टाकला, थोड्या वेळात त्याला त्या गाडीचा नंबर आठवला!!

या काढ्यामुळे त्याला चारचाकीचे मॉडेल, रंग अशा गोष्टी आठवल्या, तेवढीच आठवण बस्स, बाकी काही नाही. रवींद्रने त्या ड्रायव्हरवर केस केली, केस अजून कोर्टात होती, त्याला न्याय मिळेल अशी पक्की खात्री होती.

मला हा सगळा प्रकार चमत्कारिक वाटत होता, त्यामुळे मी माझ्या प्रश्नांचा पाढा सुरूच ठेवला.

"काढा पिल्यावर काय होते?" मी विचारले.

"थंड करायचा, उग्र वास, कडवट...."

"आणि मग?" माझी उत्सुकता वाढली होती.

"हा काढा शांत करतो, मनातला गोंधळ दूर करतो, विचार निघून जातात, फोकस वाढतो"

शांत होतो, विचार दूर होतात, फोकस वाढतो, हा काय येड्यासारखा बरळतोय. माझ्या मनात आले, पण मी तसे काही चेहऱ्यावर दिसू दिले नाही.

रवींद्र दीर्घ श्वास घेऊन म्हणाला "अगदी अलगद ती गोष्ट आठवते"

"स्वप्नासारखे?" मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.

"नाही रे, स्वप्नात काही दृश्य दिसतात, तसे नाही, स्वप्न वगैरे काही पडत नाही" रवींद्र म्हणाला.

"मग नेमक काय होत?" मला अजून कळले नव्हते.

"कसे सांगू बरे, ओके, हे बघ" रवींद्र मला समजू लागला, नेहमीसारखा.

"तू एखादी गोष्ट बघतो, तुझा मेंदू ती गोष्ट नमूद करतो, ती गोष्ट कुठेतरी मनात जाऊन बसते, परत ती गोष्ट आठवणे अवघड होऊन जाते..."

माझ्यासाठी हे सगळे ऐकून घेणे अवघड होते, पण रवींद्रचे बोलणे अजून संपले नव्हते.

"...आणि बऱ्याच वेळा मेंदू त्या गोष्टीपर्यंत पोहचू शकत नाही, हा काढा ती गोष्ट, ती आठवण हलकीच बाहेर काढतो, तुला सगळ आठवत"

"तू किती वेळा घेतलास?" मी साशंकपणे विचारले.

"एकदाच, सारखा घेतला तर सवय लागते" रवींद्र पटकन म्हणाला.
मला त्याचे खरे वाटले नाही, तसे मला काहीच खरे वाटत नव्हते, पण मी काही बोललो नाही.

"कसा मिळेल?" मी विचारले.

"पाने ऑनलाईन विकत घेता येतात, सेलरचे नाव माहित नाही, त्याची एक वेबसाईट आहे "डार्क वेब" वर.."
"डिप वेब" वर? मी ठामपणे म्हणालो.
"डार्क वेब इज द पार्ट ऑफ डिप वेब अँड..." रवींद्र परत मला समजावू लागला.
"ते जाऊ दे, वेबसाईटचे नाव सांग" मी तो विषयच टाळला.

"पण तुला कशाला हवाय?" रवींद्र माझ्याकडे न बघत म्हणाला.
"अरे सांगतो नंतर" मला आताच त्याला काही सांगावेसे वाटत नव्हते.

मी घरी जाऊन याबद्दल इंटरनेट वर सर्च केले, जगभरातून या काढ्याला बरीच नाव मिळाली होती, स्मृती काढा, स्मृती शर्बत, लिक्विड मेमरी, फ्लॅशबॅक शॉट...

स्मुर्ती काढ्याबद्दल बरेच काही लिहले गेले होते, दोन वर्ग होते, काही जण स्मुर्ती काढ्याला वरदान मानत होते आणि हा काढा बाकीच्यांसाठी शाप होता, बऱ्याच वृद्ध लोंकाना, या काढ्याचा फायदा झाला होता, वृद्धापकाळी, काही साध्या गोष्टी आठवत नाहीत, पैसे कुठले ठेवले आहेत? औषधे कुठे ठेवली होती? पण हा काढा घेतल्यावर बऱ्याच वृद्धांना या गोष्टी आठवल्या, त्याच्यांसाठी हे एक औषधच होते.

काहीजणांसाठी हा एक भूतकाळात डोकवण्याचा मार्ग होता, अगदी छोट्यात छोटी गोष्ट आठवत असे, एकाला लग्नाच्या वेळी बायकोने कुठल्या रंगाची साडी घातली होती हे आठवत नव्हते, या काढ्यामुळे त्याला ते आठवले!!

वर्तमान त्रासदायक असल्याने, या काढ्यामुळे थोडा वेळ का होईना भूतकाळाची सैर करता येत असे आणि आवडीचे क्षण परत एकदा आठवण्याची, जगण्याची संधी कोणाला नाही आवडणार?

पण काही लोंकाच्या मते, हे एक व्यसन होते, निरूपयोगी, कधी न सुटणारे, "भूतकाळ कितीही चांगला असला तरी, त्याला वर्तमान करू नका" असे ते सगळ्यांना सांगत होते. हो, ते बरोबर होते, मला त्या लोकांचे म्हणणे पटले.

मी काढ्याची पाने ऑनलाईन मागवली, दहा हजार रुपये देऊन, कुरिअर आले त्यात एक मेमरी फोमची चौकोनी उशी होती, रवींद्रने सांगितल्याप्रमाणे, उशी कात्रीने फाडली, त्यामध्ये एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत मूठभर छोटी, गोल आकाराची, हिरवी पाने होती, पाने टिकावीत म्हणून पानांना काहीतरी चिकट पदार्थ लावला होता, मी सर्व पाने वापरली नाहीत, काही पाने तशीच सांभाळून ठेवली, रवींद्रने सांगितल्याप्रमाणे, पाने धुतली, पाणी गरम केले, त्यात पाने टाकली आणि काढा बनवला.

मी माझ्या तळघरातल्या खुर्चीवर, आरामात बसलो, काढा थंड होत होता, स्वतःला शांत करायचा फुटकळ प्रयत्न केला, काढ्याकडे बघितले आणि एका घोटात काढा घशात ओतला.

चव फारच कडवट होती, ओकारी आल्यासाखे झाले, खोकला आला, काढा पोटात, मनात पोहचला, पोट गरम झाल्यासारखे झाले, जिभेची चव निघून गेली, मी डोळे मिटून घेतले.

काही वेळात, शरीर, मन सैल झाले, डोके हलके झाले, पण ही झोप नव्हती, मला सर्व गोष्टी प्रखर जाणवत होत्या, तळघरातला एकच बल्ब अधिक प्रखर झाला, अंग कापसासारखे हलके झाले, मला वाटले की, मी वाऱ्याच्या झुळुकेने तरंगेल, उडेल, परत खाली पडेल आणि परत....

माझी सर्वात जवळची आठवण, व्यक्ती, माझे सर्वस्व, माझी...ग्रीष्मा, माझी प्रेयसी, बायको, सर्वकाही, तिची शेवटची इच्छा, आखिरी ख्वाईश, शेवटचे वाक्य, मला अजून ही आठवत नव्हते, मी ऐकले होते की नाही? हो मी ऐकल होते, पण ते काय होत?

माझी ग्रीष्मा, माझ्यापासून दूर गेली, कारण फक्त डेंगू तापाचे ठरले, तिला ताप आल्यानंतर मी लगेच दवाखान्यात ऍडमिट केले, ताप वाढत होता, रक्तातल्या प्लेटलेट्स कमी होत होत्या, डॉक्टर बरेच प्रयत्न करत होते, मी तिच्या बाजूला बसून होतो, तिला जेव्हा जाग आली, तेव्हा ती मला बघून थोडीशी हसली, एखाद सेकंद, मी तिचा हात हातात घेतला, तिच्या डोळ्यातून एक अश्रू असाच निमित्त असल्यासारखा बाहेर आला, तिला जाग आली बघून डॉक्टर परत आले, परत तिचा बीपी, बाकी गोष्टी बघू लागले, तिचा त्रास वाढला, डॉक्टरांचा गोंधळ वाढला, मी माझा हुंदका आवरला.

तिला काहीतरी म्हणायचे होते, का तिचे म्हणून झाले होते? का ती काहीतरी म्हणत होती?

मी माझा उजवा कान तिच्या ओठापाशी आणला, ग्रीष्मा बोल ना, परत एकदा, शेवटच, बोल, काय हवे आहे....

ती काहीतरी म्हणाली, हो नक्कीच म्हणाली, पण काय?

मला जगाचय, नाही? मला मरायचय? ती असे का म्हणेल? माझ्यावर प्रेम आहे? नाही नाही नाही.. ग्रीष्मा, सांग ना, फक्त एकदा, शेवटचे, जाण्याआधी, तू काय म्हणत होतीस?

पण मला ते कधी कळणार नव्हते.

काढ्याचा प्रभाव कमी झाला, मला खुर्चीतुन उठता आले नाही, मी तसाच बसून राहिलो, डोळे उघडले, त्या आठवणी परत जाग्या झाल्या.

मी रडलो, परत एकदा, नेहमी सारखा, खुर्चीतून खाली पडून, गुडघे टेकून, मोठ्याने.

मी रवींद्रला सर्व प्रकार सांगण्यासाठी भेटलो.
"तुला काय आठवत नव्हते?" रवींद्रने मला हे बरेच वेळा विचारले होते, पण मला सांगता आले नाही, मी नेहमी हा प्रश्न टाळत असे पण आता काहीतरी सांगणे भाग होते. मला ग्रीष्माबद्दल काही बोलायचे नव्हते. कारण परत एकदा त्याने मला ग्रीष्माबद्दल लेक्चर दिले असते.

पण मग मी काय सांगू? काहीतरी सांगायला हवे, कोणाबद्दल सांगू? कसे सांगू? ग्रीष्मा सोडून मी कोणाचे नाव घेऊ..?

"अरे वडील वारले तेव्हा, तेव्हा ते काहीतरी सांगत..." मी पटकन बोलून गेलो.
"शेवटची इच्छा?" रवींद्रने माझे वाक्य पूर्ण केले, "मग आठवले?" रवींद्रने उत्सुकतेने विचारले.

"अरे तेच, मला नाही आठवले" मी ग्रीष्माऐवजी वडिलांचे नाव घेतले, बहुतेक रवींद्रला खरे वाटेल.

"आठवले नाही? का तू ऐकले नव्हते? तू जर ऐकले नसणार, तर तुला कसे आठवणार?" रवींद्रचा माझ्यावर
विश्वास नव्हता.

"ऐकल होत रे, मला पक्क आठवतेय, ते काहीतरी म्हणत होते" मी विश्वासाने म्हणालो.

"ओके, अर्धवट शब्द आठवले असतील?" रवींद्र सहानुभूतीच्या स्वरात म्हणाला.

मी चेहरा पाडून नाही म्हणून मान डोलावली.

"मग तू इच्छा ऐकली नसशील किंवा शेवटची इच्छा नसेलच" रवींद्र एकदम म्हणाला.

"शेवटची इच्छा नसेलच? म्हणजे?" मला आता काही कळत नव्हते.

"वडील गेल्याचे तू मनावर घेतलस, तुझे मन तुला सतावत असेल, कदाचित अशी काही इच्छा नसेलच, ते काही म्हटले नसतील, तू अस इमॅजिन..." रवींद्र म्हणाला.

"अरे मी का इमॅजिन करेन, अशी काहीतरी शेवटची इच्छा होती ते" मी वैतागत म्हणालो.

रवींद्र मला समजावू लागला,

"अरे कस असत, मी इंटरनेटवर वाचले, कधी कधी एखाद्याचा भूतकाळ इतका त्रासदायक असतो की त्याला सहन करणे अवघड होऊन बसते, मग तो माणूस एक नवीन भूतकाळ तयार करतो, त्याच्या मनासारखा, तो भूतकाळ त्याच्या आवडीचा असतो, पण तो खरा नसतो, तसे काही झालेले नसते, पण यामुळे खऱ्या झालेल्या गोष्टीचा त्रास कमी होतो, तुझे मन त्रास देणाऱ्या आठवणी ब्लॉक करतात आणि त्या जागी तुला नव्या आठवणी देतात"

एवढ्या मोठ्या स्पष्टीकरणानंतर मला परत प्रश्न विचारण्याचे धाडस झाले नाही, मला माझे उत्तर मिळाले होते, ग्रीष्माच्या बाबतीत असेच झाले.

"तूच बघ ना, ग्रीष्माने घटस्फोट दिल्यावर तुला किती त्रास झाला होता" रवींद्र अगदी निर्विकारपणे म्हणाला.

"एक वर्ष झाले असेल ना? आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी होती" रवींद्र माझ्याकडे न बघत म्हणाला.

रवींद्रने माझा सगळा त्रास बघितला होता.

ग्रीष्मा मला सोडून गेली, माहेरी अचानक निघून गेली, फोन नाही, मेसेज नाही, परत आलीच नाही, परत भेटली तेव्हा तिचा वकील बरोबर होता, तिला घटस्फोट हवा होता, मी तिथेच "परत ये, मला सोडून जाऊ नको" अशा खूप विनवण्या केल्या, रडलो, हाता पाया पडणार होतो, ती काहीच बोलली नाही, एक वाक्य पण बोलली नाही, शांत उभी राहिली, माझ्याकडे बघितले पण नाही..

माझा नंबर ब्लॉक केला, तिच्या घरच्यांनी माझ्या बरोबरचे संबंध तोडले, ती कुठे राहते हे ही मला माहित नव्हते.

त्यानंतर ती कधीच काही बोलली नाही, भांडली नाही, रडली नाही, मला काही न सांगता निघून गेली आणि म्हणून मला अशी आठवण हवी होती ज्या आठवणी मध्ये तिने बोलावे, सांगावे, ओरडावे, थोडावेळ का होईना, काहीतरी बोलावे.

मला आशा होती, ती माझ्या नवीन आठवणीत नक्की बोलेल, अशी आठवण जिथे तिला बोलावच लागेल.

"आता तू बाहेर आला आहेस ना?" रवींद्रने काळजी ने मला विचारले.

नको ना, परत विचारूस, मला या प्रश्नाचा कंटाळा आलाय, प्लीज, परत त्याच आठवणी, आधीच खूप त्रास झालाय, होतोय, होत राहील, मला नकोत त्या जुन्या आठवणी..

मला अशी काहीतरी नवीन आठवण हवी आहे, जिथे तिने माझ्याशी बोलावे, सांगावे, काहीतरी म्हणावे, परत एकदा, शेवटचे.

मला काही बोलता आले नाही, डोळ्यात एकदम पाणी आले.

मी फक्त होकारार्थी मान हलवली.

"अरे कालच ग्रीष्मा भेटली होती, तिच्या नवीन नवऱ्याबरोबर..."

पण मी रवींद्र काय बोलतोय हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो, माझ्या लक्षात आले, माझ्याकडे अजून थोडा पाला शिल्लक होता, मला परत काढा हवा होता, ग्रीष्माने परत माझ्याशी बोलायला हवे, शेवटचे.

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कल्पना आहे ....स्मृती काढा!!!!!!!! खरंच हे असं काही असत,विश्वास नाही बसत पण कथा छान लिहिलीयेस ...

पु.ले.शु....

@कावेरि, @मॅगी @जाई.@राया @नानबा

धन्यवाद Happy

@लीला

काढ्याचा प्रभाव काही वेळानंतर निघून जातो.

bhau jra patta dya ki.... aamhipn to pala magvun junya aathvni tajya krto....

छान कल्पना. आवडली.

कधी कधी एखाद्याचा भूतकाळ इतका त्रासदायक असतो की त्याला सहन करणे अवघड होऊन बसते, मग तो माणूस एक नवीन भूतकाळ तयार करतो, त्याच्या मनासारखा, तो भूतकाळ त्याच्या आवडीचा असतो, पण तो खरा नसतो, तसे काही झालेले नसते, पण यामुळे खऱ्या झालेल्या गोष्टीचा त्रास कमी होतो, तुझे मन त्रास देणाऱ्या आठवणी ब्लॉक करतात आणि त्या जागी तुला नव्या आठवणी देतात" >>> हा पॅरेग्राफ लक्षात घेतला तर कळेल कथा.

@अदिति @क्रिश्नन्त @चैत्राली उदेग

धन्यवाद Happy

@raviraj375573
डीप वेब वर मिळतोय ना, बिटकॉईन्स देऊन घ्यावा लागेल, डिस्काउंट पण सुरु आहे Lol

कल्पना आवडली.

पण नायक अजीबातच नाही आवडला - गेलीये ना सोडून ग्रिष्मा मग विसर ना तिला. वासंती, वर्षा, शरदिनी पण असतात त्यांना शोधायचे सोडून काढा कसला पीत बसलाय Happy

@माधव

मला ही नायक अजिबात आवडला नाही, झाले गेले विसरून जावे, पुढे आनंदाने जगावे, पण काही लोंकाना ते जमत नाही, पण कोणी छान 'वर्षा' भेटली की आपोआप सगळे विसरून जाईल Lol

@चैत्रगंध @पिंगू , @स्वीट टॉकर

धन्यवाद : )