लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास

Submitted by संयोजक on 13 September, 2026 - 21:24

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

विमानप्रवास!

लहानपणापासून आपल्याला का कोण जाणे, ज्या गोष्टींचे आकर्षण असते, त्यांत बहुतांश लोकांच्या यादीत विमान व विमानप्रवास असतील. आताच्या पिढीला कदाचित त्याचे फारसे अप्रूप नसावे, पण आपण जेव्हा लहानाचे मोठे झालो तेव्हा विमानप्रवासाला एक वलय होते.

विमानाची ती पुस्तकासारखी तिकिटे, आकर्षक पायलट व हवाई सुंदर्‍या, विमानात भरपूर चॉकलेट्स खायला मिळतात याचे कौतुक! विमान उड्डाण करताना व उतरताना आकाशातून दिसणारी शहरे व गावे डोळे भरून बघायला मिळावीत, म्हणून खिडकीच्या काचेवर नाक दाबून खालचं विहंगम दृष्य नजरेत साठवण्याची कोण ती धडपड!

विमानप्रवास ही आता अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेली, पण कोणे एके काळी अगदी खास लोकांच्या आवाक्यात असलेली एक गोष्ट. आपल्यापैकी अनेकांनी काही ना काही निमित्ताने अनेकदा विमानप्रवास केला असेल, कोणे एके काळी केलेल्या पहिल्या विमानप्रवासात काही गमतीजमती घडल्या असतील, फजिती झाली असेल, प्रवासाशी जुळलेल्या भल्याबुर्‍या आठवणी असतील; ज्यांमुळे तो प्रवास मनात घर करून राहिला असेल.

आपला तो अनुभव आणि त्या आठवणी शब्दबद्ध करू.

तुम्हांला हवे असल्यास वेगळा धागा काढून तुमचे असे क्षण लिहू शकता किंवा याच धाग्यावर प्रतिसादात लिहू शकता.

हा उपक्रम आहे; ही स्पर्धा नाही.
नियम

१. प्रवेशिका पाठवण्याकरिता मायबोली गणेशोत्सव २०२६ या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल. हा ग्रुप सदस्यनोंदणीकरता सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल.
२. या ग्रुपचे सदस्यत्व घेतल्यावर लेखनाचा धागा हा पर्याय निवडून लेखन करा.
३. प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - 'माझा पहिला विमानप्रवास- (तुमचे मायबोली सदस्यनाम)'
४. शब्दखुणांमध्ये मायबोली गणेशोत्सव २०२६ असे लिहा.
५. प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६, अमेरिकेतील पॅसिफिक टाइम झोननुसार रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
६. हा लेखन उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
७. लेखन कुठेही पूर्वप्रकाशित नसावे.

गणपती बाप्पा मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users