लेख खूप विस्कळीत आणि सुरुवात सर्वसामान्यांप्रमाणेच आहे. लहान असताना विमानाचा आवाज आला की आम्ही चाळीतली सर्व मुले घरातून बाहेर यायचो आकाशाकडे बघत विमान विमान ओरडायचो. हेलिकॉप्टर असलं की त्यातून कुणी मोठे मंत्री किंवा हिरो प्रवास करत असतात अशी माहिती चाळीतल्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांनी दिली होती. पहिलीत असताना आम्हाला परिसर हा विषय होता. एकदा आमच्या बाई आम्हाला त्यातला दळणवळणाची साधने हा धडा शिकवत होत्या. शिकवता शिकवता मध्येच त्यांनी आम्हाला रिक्षातून कुणी प्रवास केलाय, बसमधून कुणी प्रवास केलाय असं विचारायला सुरुवात केली. बाईंनी विचारलं की आम्ही मुलं हात वर करायचो. बस, रिक्षेतून सर्वांनीच प्रवास केला होता. पण भांडुपच्या त्या कामगारवस्तीतल्या शाळेतल्या मुलांमध्ये रेल्वेनेसुद्धा कधीच प्रवास न केलेले पण होते त्यामुळे विमान तर आमच्यासाठी फारच दूरची गोष्ट होती. जहाजातून कुणी प्रवास केलाय असं बाईंनी विचारल्यावर गेट वे ऑफ इंडियाच्या फेरीबोटीतून, गावी होडीतून प्रवास केलेल्यांनी हात वर केला. विमानातून कुणी प्रवास केलाय का असं विचारल्यावर एक हात वर झाला आणि बाईंबरोबर आम्ही सर्व शॉकमध्ये. एवढं कोण श्रीमंत आहे ह्या वर्गात? पण बिचार्याने उगाचच लक्ष वेधून घेण्यासाठी हात वर केला होता.
नंतर तिसरीत असताना आम्ही चाळीतले सर्वजण घाटकोपरला एका लग्नाला गेलो असताना त्या लग्नाच्या हॉलच्या खिडकीतून आकाशात झेप घेणारी विमानं नेहमीपेक्षा खूप मोठी दिसत होती. हे आमच्यासाठी नवीनच होतं मग लग्नाचा कार्यक्रम सोडून आम्ही सर्व लहान मुलं हॉलच्या खिडकीतुन विमानच पाहत बसलो होतो.
विमानातून प्रवास करायला आता झेपणार नाही पण मोठेपणी नक्कीच करणार आहोत याची खात्री होतीच. माझी एक चुलतआत्या लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर विमानाने बंगलोर का दिल्लीला गेली होती त्यावेळी माझे चुलत आजोबा खूप खुश झाले होते. ( आईच्या भाषेत म्हणायचं चेडू इमानातून गेला तर हेंचो चुलतो नाचाकच लागलो ) तर ही आत्या सोडली तर आमच्या घराण्यात कुणी विमानप्रवास केला नव्हता.
नंतर ज्या कंपनीत कामाला लागले तिथे विमानप्रवासाची खूप संधी होती पण मला काही तो योग पहिली तीन वर्षे आला नाही. मग एकदा हैदराबादला एका कॉन्फरन्ससाठी कंपनीकडून निवड झाली. माझ्यासोबत परफॉर्मन्स विभागाचे प्रमुख आणि सिव्हिल विभागाचे विजय नावाचे इंजिनिअर असणार होते. त्यांच्यासाठी विमानप्रवास नेहमीचाच होता. मीही विमानातून बराच वेळा नाही पण एखाद दुसऱ्या वेळेस तर प्रवास केलाच असेल अशी त्यांची समजूत होती. पण मी अजून विमानात बसलेच नाहीये हे सांगितल्यावर तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं.
"काय सांगताय मॅडम तुम्ही खरंच विमानातून गेला नाहीत का कधी?"
"नाही हो. आम्ही गणपतीला गावी जातानासुद्धा स्लीपर कोचने जातो. त्यापूर्वी तर जनरलने जायचो."
असो. तर माझ्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासासाठी माझ्यापेक्षा जास्त विभागप्रमुखच एक्ससाईटेड झाले आणि त्यांना तसंही ही डोकं खाण्यासाठी, त्यांची बडबड ऐकवण्यासाठी कुणी ना कुणीतरी लागायचंच. त्यांनी मला विमानात असं करायचं, तस करायचं अशी यादीच सांगायला सुरुवात केली.
घरी आल्यावर घरच्यांना जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा तेही भरपूर खुश झाले. गे बाय. माझा पोरग्या इमानान जाताला. कॉन्फरन्स तीन दिवसांचीच होती म्हणून सामानही जास्त नसणार होतं. त्यावेळी माझा प्रवास फक्त गावी जाताना, ट्रेकिंग आणि जंगलात फिरायला जाताना व्हायचा म्हणून माझ्याकडे प्रवासाच्या बॅग्स अगदी जुन्या होत्या. विमानतळावर अगदीच लाज वाटू नये म्हणून एक नवीन बॅग घेतली. विमान सकाळी सात का साडेसातचं होतं त्यामुळे भल्या पहाटे घरातून निघावं लागणार होतं. ताई विमानातून जाणार म्हणून धाकटीचा उत्साह ओसंडून वाहत होता. सकाळी मला निघायला उशीर होऊ नये म्हणून तिने घरात असतील नसतील तेवढे सगळ्यांचे मोबाइल आणि अलार्मची घड्याळं माझ्या पलंगाच्या आजुबाजुला पहाटे ३ चा अलार्म लावून ठेवून दिले होते. पाच मोबाइल आणि दोन घड्याळं एकदम जेव्हा वाजायला लागली तेव्हा उठण्याशिवाय पर्याय नव्हता. मी त्यावेळी मुलुंडला राहत होते. विभागप्रमुख आणि विजय दोघेही ठाण्याला राहणारे. ते मला पहाटे चार वाजता कॅबने न्यायला आले होते. आमचं विमान टर्मिनल २ वरून उडणार होतं. मला वाटतं त्यावर्षीच त्याचं उदघाटन झालं होतं. त्यामुळे या दोघांचाही टर्मिनल २ वरून पहिल्यांदाच प्रवास होता आणि ते तर मला सारखे लकी आहेस हं पहिलाच विमानप्रवास तोही टर्मिनल २ वरून असं म्हणत होते. मी आपली मान डोलावत होते.
विमानतळावर पोहोचलो. आयडी दाखवून आत प्रवेश केला. जेट एअरवेजचं काउंटर पाहून तिथे लगेज चेक इन केलं. म्हणजे हे दोघे काय करताहेत ते बघून मी करत होते. नंतर त्या दोघांचं बघून सेक्युरिटी चेक इन करून घेतलं. धाकटीला दाखवायला विमानतळावर काही फोटो काढून घेतले. तिला वॉट्सअँपवर पाठवून दिले. बोर्डिंगला फार वेळ नव्हता. बोर्डिंग लगेच सुरु झालं मग एका बसने विमानापर्यंत आलो. पिक्चरमध्ये असतात तशा शिड्या दिसत नाहीत अशी मनात एक नोंद केली. हैदराबादपर्यंतचा प्रवास एकूण पाऊण तासाचा होता. मला मधली सीट मिळाली होती. विजय सर आईल सीटवर बसले होते आणि विभागप्रमुख पलीकडच्या रांगेत. ते एक बरं झालं होतं नाहीतर इथेपण लॅपटॉप काढून कॉन्फरन्सच्या प्रेझेंटेशनच्या स्लाईड्स दाखवून आमचं डोकं चावत बसले असते. इथे सीट्समोर पाय ठेवायला अजिबात जागा नव्हती. गुडघे समोरच्या सीटला टेकत होते. हा माझा जेट एरवेजचा पहिला आणि शेवटचा प्रवास. मग ती कंपनीचं बंद पडली. हवाईसुंदऱ्यांचा सेफ्टी सूचनांचा डेमो अगदी मन लावून पाहिला. नंतर विमानाने आकाशात झेप घेतली त्यावेळी फारशी भीती वगैरे काही वाटली नाही. आता वाटते. थोड्या वेळात हवाईसुंदरी जेवण घेऊन आली. आवडलं मला ते. त्यात एवढुसा पुलाव, पराठ्याचे इवलुशे तुकडे, पनीर मटारची भाजी आणि दही आणि अजून काहीतरी होतं. मला सकाळच्या नाश्त्यासाठी पुरेसं होतं. मी खायला सुरुवात केली आणि विजय सर माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले. हे असं का बघताहेत असा विचार करतेच आहे तर त्यांनी विचारलं.
"मॅडम तुम्ही चक्क खाताय?"
" म्हणजे खायचं नसतं का विमानात ?" असं म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर बरेचजण खात होतेच.
"नाही म्हणजे तुम्हाला त्रास नाही होतं का? मला विमानात काहीही खाल्लं की पोटात ढवळतं." अच्छा असं पण असतं तर पण मला काही तस त्रास झाला नसल्याने मी व्यवस्थित जेवून घेतलं. माझ्या बाजूचा खिडकीजवळ बसलेला मनुष्य नियमित प्रवास करणारा असल्याने बहुतेक मागे रेलून बसला होता. त्यामुळे मला खिडकीबाहेरचं दृश्य सहज दिसत होतं. ते ढग वरून कसे दिसतात त्याची उत्सुकता होती. तेवढं पाहून घेतलं आणि विमान खाली उतरणार असल्याची घोषणा झाली.
असा माझा पहिला विमान प्रवास अगदी भरर्कन संपला. उतरल्यावर धाकटीचा मेसेज आला. "ताई मजा आली का विमानात आणि ते ढग वरून कसे दिसतात गं? नुसते फोटो पाहूनसुद्धा त्यावेळी ती खूप खुश झाली होती. त्यानंतर बऱ्याच वेळा कंपनीच्या कामानिमित्त विमानाने प्रवास झाला. पहिल्यांदाच एकटीने परतीचा प्रवास करताना दिल्लीत रात्रीचं विमान चुकलं. त्यावेळी कलिगच्या मदतीने रात्री साडेबारा वाजता दिल्ली रेल्वे स्टेशनवरून एकटीने मुंबईला येणारी ट्रेन पकडली होती. मग परदेश प्रवाससुद्धा झाला.पण हा पहिला विमानप्रवास काही खास आठवणी नसल्या तरी पहिला म्हणून लक्षात आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय. बऱ्याचश्या
छान लिहिलंय. बऱ्याचश्या गोष्टी रिलेट झाल्या.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.