Present Day...
आपला पहिला विमान प्रवास यावर लिहावे की नाही, हा मला गहन प्रश्न पडलाय, कारण त्याला आता पंचवीस वर्षे झाली. अनेक डिटेल्स आठवत नाहीत. तपशिलात चुका रहायची शक्यता आहे, काही आठवणी धूसर आहेत. तरीही म्हणले लिहावेच, माबो कर आपलेच आहेत. काही चुकले असेल तर सांगतीलच आपुलकीने....
तर Flash back
सकाळी सकाळी फोन वाजल्यावर सोळा वर्षाच्या मी ने धावत जाउन फोन उचलून हैलो म्हणल्यावर, हैलो वगैरे न म्हणता गजा काका तिकडून फोन वर गरजला "मन्या, बाबाला फोन दे"
" बाबा बाहेर गेलेत."
" अरे, तुझ्या बाबाला काही डोकं नावाचा प्रकार आहे की नाही, हे असे ऐन वेळी ट्रिप ठरवून वेटींग लिस्ट ला नावं असताना पुढची सगळी बुकिंग कोण करतं?"
असे म्हणून पुढची पाच मिनिटे तो बोलत (read : ओरडत) राहिला.
शाळेत मी केलेल्या चुकांची बोलणी खायला वडिलांना बोलवून घेत, इथे वडिलांनी केलेल्या चुकीची मी विनाकारण बोलणी खात होतो.
flash back मधे अजून एक flash back
तर झाले असे की, आम्ही सगळे कैक वर्षांपुर्वी काश्मिर सहल केली होती. तेव्हा मी होतो नऊ वर्षांचा, आणि भाऊ तेरा, सोबत असलेल्या कुटुंबातली मुले पण साधारण अशाच वयोगटातली. काश्मिर ट्रिप मधे वैष्णवदेवी ला पण जायचे होते. तर तिकडे गेल्यावर आम्ही रात्री चढायला सुरुवात केली. तेव्हा आता सारख्या सोयी नव्हत्याच. मधेच मुले सगळी ढेपाळली, आई बाबा आम्हाला गोड बोलत, लाच देत देत चढवत होते. एक तर रात्रीची वेळ, त्यात भयानक थंडी, काही वेळाने मुले हटूनच बसली की, बास आता आम्ही इथून पुढे जाणारच नाही. मग बाबा आम्हा सगळ्या मुलांसोबत एका ढाब्यावर थांबले, तिथे आम्ही सगळे मिळेल त्या ठिकाणी, बाजेवर वगैरे पसरलो. मला अजून तो ढाबा, त्यात शाल, कानटोप्या, स्वेटर मधे झोपलेले, आम्ही सगळे व एका बाजूला पेंगत बसलेले बाबा लख्ख आठवतात. त्या वेळेस आम्हा मुलांमुळे बाबांचे वैष्णवदेवीचे दर्शन राहूनच गेले.....
back to flash back,
तर आता मी व भाऊ कॉलेजला होतो, बाबांना परत अचानक वाटले की आता आपण वैष्णवदेवी ला जायला हवे. तेव्हा दर्शन राहून गेले आणि परत काही योग आला नाही. आता ते रिल्स येतात ना की कोणत्याही गृपमधे कसे दोन प्रकारचे लोक असतात, एक जण सगळी ट्रिप नीट प्लॅन करणारा, तर दुसरा अचानक फार काही प्लॅन न करता निघणारा वगैरे. तर आमचे बाबा दुसऱ्या कॅटेगिरीत मोडतात. त्यांच्या मनात आले की वैष्णवदेवीला जायचे. मी, आई, दादा, बाबांच्या मित्राच्या दोन मुली, त्यातल्या मोठ्या मुलीची मैत्रिण असे सगळे निघायचे ठरले. बाबांनी जाऊन ट्रेन ची तिकिटे काढली (असे आम्हाला सांगितले) व फोनाफोनी करुन हॉटेलची बुकिंग करुन टाकली. पण यात छोटासा प्रॉब्लेम असा होता की आमची नावे वेटिंग लिस्ट मधे होती, हे काही आम्हाला माहिती नव्हते. ती कन्फर्म होतील असा बाबांना दुर्द्म्य आशावाद होता. ती काही कन्फर्म व्हायचे लक्षण दिसत नव्हते. आता जायचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तशी ही खबर आमच्या बाबांच्या एका मित्राला कळली. हाच तो गजा काका, एकदम सगळे सिस्टिमॅटीक कामे करणारा. त्याला हे कळले आणि त्याने जेव्हा बाबांना झापायला कॉल केला तेव्हा त्याच्या तावडीत नेमका मी सापडलो. पुण्यातून जायची व परत यायची तिकिटे वेटींग लिस्ट मधे, आणि कटऱ्यातल्या एका हॉटेलचे फोन वरुन केलेले बुकिंग, या जिवावर आम्ही एवढे जण त्यात तीन टिनेज मुली एवढ्या लांब निघालो आहोत हे त्याच्या पचनीच पडत नव्हते. हा काका सरकारी नोकरीत फार मोठ्या पदावर होता. ज्याकाळी लोक मॅट्रिक झाले किंवा बीए झाले तर लग्न पत्रिकेत लिहित, तो तेव्हा अभियंता झाला होता. त्याने आता सगळी सुत्रे हाती घेतली. आधी कटऱ्यामधे ओळख काढुन एक माणूस त्या हॉटेल वर पाठवून advance देऊन बुकिंग कन्फर्म करवले. नंतर रेल्वे मधे एकाला कामाला लावून, कोट्यातून आमची तत्काल मधे तिकिटे कन्फर्म केली. त्याच्या ओळखींमुळे आम्ही सगळे मस्तपैकी ३ टिअर एसी मधे पुण्यातून मार्गस्थ झालो.
पुढची ट्रिप पण छान पार पडली. अगदी छान दर्शन झाले, थोडे फार site seeing पण झाले.
हे सगळे आम्ही सगळे मस्त एंजॉय करत होतो, पण एका माणसाची झोप उडालेलीच होती. कारण आमचे श्रीनगर वरून पुण्याला परतायचे कोणतेच बुकिंग कन्फर्म नव्हते. काळजी करणारे सोबत असलेले पिताश्री नव्हते, ते तर आमच्या सोबत पत्ते व गाण्यांच्या भेंड्या खेळण्यात मग्न होते.... काळजी त्या गजाननाला उर्फ गजा काकाला !
आमची तिकिटे काही केल्या कन्फर्म होत नव्हती, त्याने फार प्रयत्न केला तरी काहीच झाले नाही. आम्ही अजून काय करावे कसे जावे वगैरे विचार करत होतो. तर परत एकदा सकाळी सकाळी रूम मधला फोन वाजला. गजा काका फोन वर होता. या वेळेस बरोबर बाबा तोफेच्या तोंडी सापडले. ट्रंक कॉल असून सुद्धा त्याने आधी बाबांना झापले आणि मग सांगितले की एक आनंदाची बातमी आहे, कन्फर्म तिकिटे मिळाली, पण यावेळेस त्यात एक दु:खाची बातमी पण होती. तिकिटे एसी ची नव्हती, बरं म्हणलं ठिक आहे. स्लिपर क्लास मधे जाऊ. दुसरी दु:खाची बातमी, तिकिटे दिल्ली वरुन होती, बरं म्हणलं जाउ कसे तरी दिल्ली ला, करू काही तरी....
इथपर्यंत ठिक होते.... पण त्यानंतर तिसरा धमाका... तिकिटे त्याच दिवशी रात्रीची मिळाली होती. आता आमचे हे सगळे लटांबर एवढ्या कमी वेळात श्रीनगर वरून दिल्लीला कसे पोचायचे???? फोन ठेवल्यावर त्याच्यावर शोधाशोध चालू झाली. तिथे असलेल्या कोणत्याच पर्यायाने ट्रेनच्या वेळेत दिल्लीला पोचणे शक्य नव्हते. हा सगळा विचार विनिमय करता करता आम्ही आंघोळ करणे, कपडे वगैरे बॅग मधे भरणे चालू होते. काही पर्याय सुचत नव्हता. अचानक बाबांना हुक्की आली, त्यांनी रिसेप्शनला जाऊन एअर इंडिआ च्या ऑफिस मधे कॉल केला. तीन की साडेतीन तासांनी दिल्लीला जायला विमान होते.....आम्हाला पुढे काय करायचे काही माहित नसताना आम्ही सगळ्या बॅग्स घेऊन विमानतळावर पोचलो. यापुढचे डिटेल्स मला जास्त आठवत नाहीत.. तिकिटाचे पैसे कमी पडत होते. तेव्हा फिरताना बहुदा एक तर कॅश जवळ बाळगत असत किंवा मग traveller's cheque. बाबांनी आजूबाजूला नजर फिरवली, समोर कोणती तरी राष्ट्रीयकृत बॅंक होती त्यात अंतर्धान पावले. आम्ही सगळे तसेच येडचाप सारखे त्या विमानतळाच्या तिकिटखिडकी समोर बसून राह्यलो होतो... विमान सुटायची वेळ जवळ येत चालली होती. अचानक अर्धा की पाऊण तास बाकी असताना बाबा प्लॅस्टिकच्या पिशवीत कॅश घेऊन आले. त्यांचा कोणतातरी मित्र त्या बॅंकेत पुण्यातल्या शाखेत कामाला होता. बाबांनी त्याला कॉल केला, त्याने फोनाफोनी करुन तिथल्या शाखेतून बाबांना पैसे द्यायची व्यवस्था केली होती, ना कसला चेक ना दुसरे काही! तिकिट खिडकी वर गेल्यावर त्या बाईने आत फोनाफोनी केली की आता एवढे पॅसेंजर आले आहेत, तिकिटे देऊ का? आत मधले सगळे सोपस्कार पार पडून विमान वेळेवर सुटेल का?
तिला तिकडुन ग्रीन सिग्नल मिळाल्यावर तिने पटापट आमची सात तिकिटे फाडली, आम्ही तिकिटे घेऊन काउंटरला पोचे पर्यंत एअर ईंडियाचा एक माणूस आमचीच वाट पहात होता. तिथून पुढे आम्हाला एकदम व्हिव्हिआयपी वागणूक मिळाली, त्याच माणसाने सगळे केले, आम्ही त्या सगळ्या अचानक व पटापट घडत असलेल्या गोष्टीने एवढे भेदरलेलो होतो की तो अनुभव पण असा नीटसा लक्षात नाही. विमानाचे बोर्डिंग पुर्ण झाले होते, आम्हीच फक्त राहिलो होतो, तो एअर ईंडिआचा माणूस सगळीकडे घाई करत होता. मला शेवटचे आठवते ते सिक्युरिटी मला चेक करत होते ते, मग आईची पर्स तिथल्या स्कॅनर मधे स्कॅन होत होती ते मशिन, आणि ते झाल्या झाल्या विमानाकडे पळत पळत चाललेले आम्ही. विमानात कोणालाच एकमेकांशेजारी बसायला मिळाले नाही. सगळी सीट्स लांब लांब होती. थोड्या वेळाने मी जरा स्थिर स्थावर झालो. हे सगळे पचवायलाच थोडे जड गेले. तेव्हा विमान प्रवास ही फार श्रीमंत लोकांसाठी असलेली सोय होती. विमानाचे किस्से फक्त ऐकून व वाचून महिती होते. आणि आम्ही काही ध्यानीमनी नसताना, mentally prepared नसताना, अचानक आयुष्यातल्या ह्या पहिल्या अनुभवाला सामोरे जात होते. सगळ्याचेच एक दडपण आले होते. ह्या सगळ्या धावपळीत मला प्रचंड तहान लागली होती, पण पाणी मागायचे कसे हे माहिती नसल्याने, तसाच बसून राहिलो. शेजारी बघितले तर एक परदेशी मध्यम वयीन जोडपे बसलेले होते. मी aisle seat वर होतो. मला खिडकीत बसायचे होते. कारण उड्डाण घेताना व वर ढगात बाहेरचे कसे दिसेल याची उत्सुकता होती. विमान रन वे वर आले होते तेव्हा न राहवून मी त्या काकांना सरळ विचारलं "मी खिडकीत बसू का?" कसलाही परिचय नाही, आधी थोड्या फार गप्पा मारुन मग विचारणे नाही. सरळ मुद्द्यालाच हात. सिधी बात नो बकवास. काकू खिडकी पाशी बसल्या होत्या, काकांनी त्यांना विचारल्यावर त्या काकू नाही म्हणाल्या आणि काकांनी फक्त माझ्या कडे बघून खांदे उडवले. कसल्या खडूस काकू होत्या! काय करावे न कळल्याने, मी माझ्या सिट वरून मान वर करुन खिडकीतून बाहेर दिसेल तेवढे पहात बसलो. आता काका माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होते आणि मी माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्यांना उत्तरे देत होतो. काही वेळाने लहान मुलांना ज्या गोष्टीचे सर्वात जास्त आकर्षण असते ते झाले. air hostess चॉकलेट व गोळ्यांचा ट्रे घेऊन आली. मी मनावर फार संयम ठेवून, हावरटपणा वाटायला नको म्हणून त्यातली फक्त दोन वेगवेगळी दिसणारी चॉकलेट घेतली. शेजारच्या काकांनी व्यवस्थित चार की पाच घेतली. ती air hostess येऊन गेली तरी मी पाणी मागितलेच नाही. तसाच बसून राहिलो. बहुदा दिड की पावनेदोन तासाने आम्ही दिल्लीत उतरलो.
तिकडून सरळ रेल्वे स्टेशन गाठले, एवढा वेळ असलेले दडपण गेले आणि आम्ही सगळेच खो खो हसत सुटलो. कोणाला काय काय वाटले, कोणी किती चॉकलेट्स घेतली हेच मुख्य विषय! ते पण कुठे? तर दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही पेपर टाकून बसलो होतो, स्लिपर क्लास ने प्रवास करायला... विमानातून डायरेक्ट प्लॅटफॉर्म वर..... आमच्या कडे त्या वेळेस कॅमेरा होता, पण विमन प्रवासातला कोणताही फोटो काढला नाही, पण त्या प्लॅटफॉर्म वर पेपर टाकुन आम्ही बसलो होतो तेव्हाचा फोटो मात्र त्या अल्बम मधे आहे. ते विमान तिकिट पण मी किती तरी वर्षे जपून ठेवले होते... कधीतरी हरवले.
back to present...
आयुष्यात त्या नंतर अनेकदा विमान प्रवास घडला, अनेक प्रकारच्या विमानातून, business class मधून पण प्रवास करायची संधी मिळाली. पण त्या पहिल्या वहिल्या अचानक घडलेल्या गमतीशीर प्रवासाच्या आठवणी ह्या अशा आहेत 
हाहाहा! खूप भारी अनुभव आहे
हाहाहा! खूप भारी अनुभव आहे आणि लिहिलाय पण मस्त.
काही वेळाने लहान मुलांना ज्या गोष्टीचे सर्वात जास्त आकर्षण असते ते झाले. air hostess चॉकलेट व गोळ्यांचा ट्रे घेऊन आली. >> ह्यात मोठ्या मुलांना ज्या गोष्टीचे आकर्षण असते ती पण आली
मस्त लिहिलं आहे. जसं त्या तसं
मस्त लिहिलं आहे. जसं त्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं वाचताना.
हा प्रवास पण id सारखा आहे,
हा प्रवास पण id सारखा आहे, अतरंगी

मस्त लिहिले आहे .
मस्त लिहिले आहे .
त्या सगळ्या अचानक व पटापट घडत असलेल्या गोष्टीने एवढे भेदरलेलो होतो की तो अनुभव पण असा नीटसा लक्षात नाही.>>> माझे पण असेच काहीसे झाले... पहिला... दुसरा.... विमानप्रवास हा पटापट घडत गेला आणि इथे तर पहिला विमानप्रवास लिहायचा होता म्हणून mg काहीच लिहिले नाही.
मस्त
मस्त
सही झालाय, अतरंगी झालाय
सही झालाय, अतरंगी झालाय पहिला विमान प्रवास. मस्त लिहीलं आहेस.
फक्त प्रेझेंट लिहीताना पटकन संपवलंय.
मस्त लिहीलेय
मस्त लिहीलेय
आमच्या गृपमधला गजाकाका मी आणि विश्वेश आहे
आणि माझे बाबा तुझ्या बाबांचे भाऊ आहेत या बाबतीत
(बहुतेक म्हणूनच मी गजाकाका झाले असावे)
मस्त थरारक पहिला विमान प्रवास
मस्त थरारक पहिला विमान प्रवास....
अगदी तुमच्या आयडीला साजेसा
अगदी तुमच्या आयडीला साजेसा आहे विमानप्रवास!
मजा आली वाचायला.
अगदी लक्षात राहण्यासारखा आहे
अगदी लक्षात राहण्यासारखा आहे पहिल्या प्रवासाचा अनुभव. लिहिलाय ही छान.
हर्पा ...:हाहा:
हर्पा ...:हाहा:
त्यातल्या त्यात अजून एक जोक मारायची भारी सवय आहे.....!!
हर्पा ...:हाहा:
हर्पा ...
त्यातल्या त्यात अजून एक जोक मारायची भारी सवय आहे.....!!
भारी लिहिलय
भारी लिहिलय
भारी झाला असा अचानक प्रवास
भारी झाला असा अचानक प्रवास
प्रवास पण id सारखा आहे,
प्रवास पण id सारखा आहे, अतरंगी..... +१.
लिहिलंय छान!
प्रवास पण id सारखा आहे,
प्रवास पण id सारखा आहे, अतरंगी..... +१.
लिहिलंय छान!
धमाल किस्सा आहे
धमाल किस्सा आहे
हा प्रवास पण id सारखा आहे,
हा प्रवास पण id सारखा आहे, अतरंगी >>
पटलं
छान लिहिलंय. मजा आली वाचायला.
छान लिहिलंय. मजा आली वाचायला.
वाह! एक नंबर!! वाचकांच्या
वाह! एक नंबर!! वाचकांच्या सुध्दा लक्षात राहील असा लेख आहे हा. तो काळ, तेंव्हाचे एकंदर वातावरण, तेंव्हाचे लोक हे सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. खुमासदार नर्मविनोदी लेखनशैलीमुळे अजूनच वाचनीय झालाय लेख. ध्यानीमनी नसताना आकस्मिक झालेला विमानप्रवास
क्या बात!
हे अफलातून आहे! आणि या
हर्पा
विनोदाची दखल 
वाह, पहिलया विमानप्रवासाचा
वाह, पहिलया विमानप्रवासाचा कसला सुरेख योगायोग. तुमच्या प्लॅनिंग न करणाऱ्या बाबांमुळे अचानक घडला. ग्रेट बाबा.
मी ट्रे मधल्या तीन वस्तूतले काय उचललं आठवत नाही, तीन एकत्र आलेल्या. एकच घ्यायची वाटलं मला, चॉकलेट लहान मुलांसाठी असेल असं वाटलेलं, ते नव्हतं घेतलं, एक काहीतरी घेतलं तीनपैकी.
अचानक घबाड लागेल असे भविष्य
अचानक घबाड लागेल असे भविष्य असते तसे अचानक विमान प्रवास झाला.
विमान म्हणजे दूर आकाशात उडताना दिसायचे फक्त, तेव्हा विमान प्रवास करायला मिळणे म्हणजे भाग्यवान