पहिला विमानप्रवास -mrsbarve

Submitted by mrsbarve on 25 September, 2026 - 10:29

पहिला विमानप्रवास :
लग्न झालं आणि तीन चार दिवसात व्हिसा च्या कामासाठी मुंबईला जायचं होतं ! इन मिन पाऊण तासाचा विमान प्रवास होता . घरची सगळी मंडळी झाडून ! विमानतळावर आलेली ! दिरांच्या छोट्या चार वर्षाच्या मुलीला विमानतळ जाम आवडलं. तिने त्या गुळगुळीत चकचकीत फरशीवर बैठक मारून पाहिली होती ते आठवत. मग चकचकीत स्वच्छ रेस्टरूम मधला टोयलेट पेपर ची लांब पट्टी तोडून तो बाहेर घेऊन आलेली आणि रिबन सारखी त्या बरोबर खेळत होती. नुसता दंगा चालला होता , तिची आई बिचारी नाकी नऊ आल्याने काय करायचे ते कर अशा पावित्र्यात होती.
इतक्यात विमानाचे बॅगेज आत द्यायची गडबड झाली . मग थोड्या वेळाने सर्वांचे रडणे ,डोळे पुसणे,एक मेकांना सांभाळा वगरे सुरु झाले कारण नंतर मुंबईतूनच थेट NY ला जाणार होतो.
सगळ्यांना टाटा करून विमानात बसलो . हवाईसुंदरी फार सुंदर असतात वगैरे समज फारसा खरा नाही असे वाटून गेले मेकअप आणि साडी मात्र एकदम आवडले होते. मी विंडो सीट घेतली. कुर्सी कि पेटीया बांधून झाली . पाचेक मिनिटात विमानाचे उड्डाण सुरु झाले. मी देवाचे नाव घेत होते. जरा भीती वाटत होती. पण मग गप्पा मारता मारता भीती कडे दुर्लक्ष झाले . मग बाहेर मऊ मऊ ढगांची दुलई वगरे दिसू लागली.
एयर होस्टेस सगळ्यांना चहा पाणी विचारत होत्या . जेवण हि इवलुश्या ट्रे मध्ये आले. बरे होते एव्हढे आठवते. जेवण संपता संपता आपण मुंबई ला पोचलो हे कळले. तेंव्हा अर्रे ! असे वाटले तर नवरा म्हणाला 'डोन्ट वरी ", US ला पोचतात पोचता चिक्कार विमान प्रवास होणार आहे.
आता नको तो विमान प्रवास अशी स्थिती असली तरी पहिला विमान प्रवास छान लक्षात राहिला आहे. खूप ग्लॅमरसं वाटलं होते. चकचकीत,भरपूर स्वच्छ ,भरपूर उजेड हजारो दिवे , इकडून तिकडे जाणारी विविध वयाची, भिन्न रंगाची, एथनिसिटीची माणसे एकत्र कुठे ना कुठं चालली आहेत असे वाटत होते. ड्युटी फ्री मधली महागड्या वस्तूंचे अप्रुप वाटलं होतं .
आणि एखादया आरसे महाल सारखी सुंदर स्वछतागृहे, तिथे मऊ मऊ कागदाने हळू हळू चेहरा पुसून मेकअप करणाऱ्या बायका, आणि आम्ही आपले आ वासून सगळं हे भव्य दिव्य, सुंदर, श्रीमंत जग पाहत होतो. जरा अवघडल्या सारखं झालं होत खरं ! पण मग फरशी पुसावी तसा खसा खसा चेहरा पुसणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना हा असा एलिगंस कि काय म्हणतात त्याच असच वाटतं ना?

डोळ्यात स्वप्न असण्याचे दिवस, डोळे विस्फारले जाण्याचे दिवस मस्त होते. विमानतळ, विमान, त्यातली माणसे, एअर होस्टेस , ड्युटी फ्री शॉपिंग , सगळ्यात किती नवलाई होती.आता मात्र विमान प्रवास म्हणलं कि काटा येतो अंगावर . नको वाटते . भारतात जाताना तरी फारसा कंटाळा येत नाही कारण तिकडे जाण्याची खूप ओढ असते, माणसांची , गावाची, आपल्या जन्म भूमीची.

परत येताना तेच विमानतळ, तोच विमान प्रवास नको नको सा होऊन जातो .

पहिल्या विमान प्रवासात वाटलेली मजा आठवताना खरंच खूप मजा आली पण. विषय छान आहे. आयोजकांना धन्यवाद . लेख विस्कळीत वाटला तर माफ करा. लिहायची सवय गेली आहे. असो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, आटोपशीर पण नेमकेपणाने लिहिले आहे.

>> इकडून तिकडे जाणारी विविध वयाची, भिन्न रंगाची, एथनिसिटीची माणसे
हे अगदी अगदी झालं! आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचा 'फील'च वेगळा असतो.

इकडून तिकडे जाणारी विविध वयाची, भिन्न रंगाची, एथनिसिटीची माणसे >> ह्याला अगदी अगदी झालं.
भारतात येताना आपण सगळे सोपस्कार पार पडले की वेटींग एरिया मध्ये बसलेले असताना जगातली सगळ्या वंशाची, रंगाची, धर्माची माणसे एकत्र असतात. दुकानात वस्तू घेत असतात, तिथल्या रेस्टॉरंट मध्ये खात पीत असतात.
पण आपलं गेट अनाउन्स झालं की गेट पर्यंत जात असताना मात्र भारतीय वंशाची, ब्राऊन त्वचेची माणसे जास्त करून दिसायला लागतात. सलवार कुडता घातलेल्या बायका दिसतात. कधी क्वचित एक वेणी घातलेली, कुंकू मंगळसूत्र आणि साडी नेसलेली बाई ही दिसते.
मग गेट वर पोचून खुर्चीवर बसलो की आजूबाजूला हिंदी ऐकायला मिळत. हल्ली सहप्रवाशांच्या गप्पा दुर्मिळ आहेत पण कधीतरी त्यांच्या गप्पा रंगल्या तर मुलुंड भांडुप चे संदर्भ कानावर पडतात. क्वचित विमानतळावर वारा प्यायलेलं एखादं छोटं मुल आई म्हणत धावत येऊन तिला बिलगत . अश्या तऱ्हेने जग भारत मुंबई त्यातलं उपनगर असं वर्तुळ छोटं छोटं होतं जातं.
हे सगळं observe करायलामला फार आवडतं त्यामुळे मी व्हील चेअर कधी घेत नाही. व्हील चेअर घेतली की कुठल्या तरी निर्जन वाटेने आपण गेट वर पोचतो हे काही दिसत नाही.
प्रतिसाद लांबला म्हणून सॉरी...