
माझा पहिला विमान प्रवास - ऋतुराज.
लहानपणी प्रत्येकाकडे खेळण्यातलं एक तरी विमान असतंच. तसं ते माझ्याकडेही होतं. माझं आवडतं खेळणं. हळूहळू मोठा झाल्यावर मग प्रत्यक्षातल्या विमानाची ओढ लागली. आकाशात विमान दिसलं की त्याकडे मान वर करून अगदी दिसेनासे होईपर्यंत पाहत राहायचं हा एक आवडता छंद होता. हळूहळू वय वाढल्यावर आता त्यात बसायला कधी मिळेल? याची उत्सुकता लागलेली असे. मुंबईत वेस्टर्न हायवेने सांताक्रुज विमानतळाजवळून गेले की बरेचदा आकाशात उडणारी विमाने आणखीन जवळून पाहता येत आणि मग पुन्हा एकदा "आपण यात कधी बसणार?" याचे स्वप्नरंजन मनात चालू होई. विमान प्रवास हा तेव्हा काही अवाक्यात नव्हता त्यामुळे फक्त स्वप्नरंजन करणे हा एकच पर्याय होता. कालांतराने मी शिक्षणानंतर केईएम रुग्णालयात कामाला लागलो. तिथे मी "Clinical Pharmacology चिकित्सालयीन औषधशास्त्र" या विभागात कामाला लागलो. त्याच विभागाच्या विभाग प्रमुख या केईएम रुग्णालयाच्या डीन होत्या त्यामुळे बरेचदा त्यांचा आंतरदेशीय आणि बाहेरच्या देशात प्रवास होत असे. त्यांची विमानाची तिकिटे त्यांची सेक्रेटरी बुक करत असे. ती तिकिटे कशी बुक करतात? किती पैसे लागतात? याची सुद्धा उत्सुकता असायची तेव्हा.
त्यावेळी केईएम रुग्णालयात सुद्धा अनेक परिषदा, कार्यक्रम व्हायचे. त्यासाठी आम्ही पडेल ती कामे करायचो. त्यातील एक काम म्हणजे. विमानाने आलेल्या पाहुण्यांना विमानतळावरून आणणे, त्यांना हॉटेलवर सोडणे, तिथून परत कार्यक्रमाच्या स्थळी आणणे हे पण असे. मला हे काम करायला भारी आवडायचं. कारण त्यानिमित्ताने मला विमानतळावर आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायला मिळायचं. परदेशी पाहुण्यांना आणायला तर मला फार आवडायचं कारण त्यांच्याशी ओळख व्हायची आणि विमानतळ ते हॉटेल त्यांच्यासोबत बऱ्याच गप्पा व्हायच्या. किंबहुना त्याचसाठी मॅडम आम्हा विद्यार्थ्यांना त्यांना आणायला पाठवायच्या. विमानतळावर त्यांच्या नावाचे "प्लाकार्ड" घेऊन उभे राहायचे आणि तो पाहुणा आला कि त्याला घेऊन यायचे. त्यावेळी त्या सेक्युरिटी दरवाज्यापर्यंत जायला मिळायचे. वेगवेगळ्या एरलाईन्स, त्यांची नावे, फ्लाईट लेट आहे की वेळेवर, याची बरीच माहिती मिळायची.
नंतर २००७ मध्ये एकदा एका परिषदेसाठी मॅडमना निमंत्रण आले. बरेचदा डीन मॅडम काही परिषदांना त्यांच्या एका विद्यार्थ्याला त्यांच्यासोबत घेऊन जात असत. एके दिवशी त्यांनी मला बोलावून सांगितले की आपल्याला एका कॉन्फरन्स साठी ओडिसाला - जगन्नाथपुरीला जायचे आहे. त्यासाठी आपल्या दोघांची विमानाची तिकिटे सेक्रेटरीला बुक करायला सांग. ते ऐकून मी लगेचच त्यांना म्हणालो "मॅडम, मी विमानाने आलो असतो पण माझ्याकडे मी पासपोर्ट नाही." ते ऐकून त्यांनी चमकून माझ्याकडे बघितले आणि हसत हसत म्हणाल्या "ये नंतर". तो किस्सा मी ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितल्यावर सगळे खो-खो हसायला लागले. मला काहीच कळेना. मग त्यांनी मला सांगितले अरे पासपोर्ट कशाला हवा तू काय परदेशात जाणार आहेस का? आता मला काय माहित ? मला वाटलं जो विमानाने प्रवास करतो त्याच्याकडे पासपोर्ट असतो. तोपर्यंत मला भारतात विमान प्रवास करायला पासपोर्ट लागत नाही हे माहीतच नव्हतं.
असो. तर एवढे अज्ञान पाजळल्यावर देखील आपण विमानाने प्रवास करणार या कल्पनेनेच मी हरखून गेलो. सेक्रेटरीला सांगून तिकिटं बुकझाली. त्यावेळी मॅडमना तिकिटाची प्रिंट आऊट काढून, त्यातील विमानाचा नंबर, टर्मिनल, विमानाच्या वेळा हायलायटर ने हायलाईट करून द्यायची पद्धत होती. मी उगाचच चार प्रिंटआऊट घेऊन त्यावर रंगकाम केले. ती तिकिटे प्लास्टिक फोल्डर मध्ये नीट ठेऊन प्रवास होण्याआधी रोज दहा वेळा ती तिकिटे मी न्याहाळून बघायचो.
प्रवासाच्या आदल्या दिवशी एक बॅकपॅक आणि एक सुटकेस न्यायची असे ठरले. डीन मॅडम बरोबर जायचे म्हणजे ती तशी चांगली बॅग हवी. मग एका मित्राकडून ती उसनी मागून आणली. बाबा म्हणाले की, बॅगा विमानतळावर हरवतात. त्यांच्या बॉसची हरवली होती. मग आम्ही लगेच त्यावर नाव पत्ता असलेला लेबल लावला. लहान मुलांना जशी सहलीला जायच्या आदल्या रात्री झोप येत नाही, माझी अवस्था अगदी तशी झाली होती. अखेर प्रवासाचा तो "सोनियाचा दिनु" उजाडला. मी लवकर उठून, तयारी करून बराच वेळेआधी पोचलो. आतापर्यंत मी बरेच वेळा विमानतळावर गेलो होतो परंतु विमानात मात्र मी आज पहिल्यांदा बसणार होतो. आज अगदी मोठ्या दिमाखात तिथल्या सुरक्षारक्षकाला तिकीट दाखवल, माझा फोटो आयडी दाखवला आणि आत शिरलो. काय भारी वाटलं आजपर्यंत फक्त त्या दरवाज्याच्या बाहेर उभे राहून येणाऱ्या पाहुण्यांची वाट बघत असणारा मी, आज ते दार ओलांडून गेलो. त्यासाठी बराच काळ जावा लागला. आत तर आलो, आता पुढे काय करायचे हे माहीत नव्हते पुढची चार माणसं काय करतात ते बघून आपणही तसेच करायचे असे ठरवले. मी बसून पाहू लागलो. माणसं तिकिटं दाखवत होती, त्यांचे आयडी कार्ड दाखवत होती. त्यांचे सामान देत होती. त्यानंतर त्यांचे सामान त्या पट्ट्यावरून पुढे आत जात होते. त्यानंतर त्यांना स्टॅम्प मारून बोर्डिंग पास देत होते. चार-पाच जण तेच करतायेत हे पाहून मग मी सुद्धा रांगेत उभा राहिलो माझ्याकडची मोठी बॅग लगेज मध्ये दिली आणि हातात तो पहिलावहिला बोर्डिंग पास घेतला. त्यावेळी मोबाईल कॅमेरा नव्हता नाहीतर बोर्डिंग पास सोबत सेल्फी काढून ठेवला असता. असो, तो सांभाळून ठेवलाच आहे. फोटोत पहा.
बोर्डिंग पास वरील शाई आता उडून गेली आहे.
आता मी डीन मॅडम यायची वाट बघू लागलो. जश्या त्या आल्या तसं त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या " तू बॅग नाही आणलीस?" मी म्हणालो "आणली. ती मी दिली लगेजमध्ये" तशा त्या एकदम रागाने लालबुंद झाल्या आणि म्हणाल्या "का दिलीस बॅग?" मला कळेच ना की बॅग द्यायची नसते का? मी म्हणालो "बाकीच्या माणसांनी दिली म्हणून मी पण दिली" मग त्या म्हणाल्या "तुझा पहिला विमान प्रवास आहे ना?" मग मी "हो" म्हणून हलवली मग त्या मला म्हणाल्या "अरे आपण हिंदुस्थानात प्रवास करतो, तेव्हा तीन-चार दिवसाची कपडे ज्या बॅगेत घेतो ती बॅग आपण स्वतः बरोबर आत घेऊन जाऊ शकतो. आता तुझी बॅग इथे दिलीस आपण तिकडे उतरल्यावर ही बॅग घेण्यासाठी वेळ लागणार, तेवढा वेळ आपल्याला थांबावे लागणार, मग किती वेळ वाया जाईल?". आता मी मनातल्या मनात म्हटलं, मला काय माहित हा असला सगळा सोपस्कार असतो, नाहीतर कशाला दिली असती बॅग.
नंतर मॅडम मला अगदी सगळ्या गोष्टी नीट समजावून या सांगू लागल्या. त्यांनी माझ्या हातातून तिकीट घेतलं आणि मग त्याच्यावरती सीट नंबर, गेट नंबर, वेळ हे सगळं समजावून सांगू लागल्या. मग त्यांनी त्यांची बॅग त्यांच्याजवळच ठेवली आणि त्यांचा बोर्डिंग पास घेतला आता आम्ही दोघे आमच्या गेटकडे गेलो. सुरक्षा तपासणी झाल्यावर आम्ही वाट पाहत बसलो. मग थोड्या वेळाने मॅडम म्हणाल्या "चल आता बस येईल" मला क्षणभर कळेच ना की आपण विमानाने जाणार आहोत की बसने? मग कळलं की विमानापर्यंत जायला सुद्धा एक बस असते. मॅडम तर प्रत्येक गोष्टीकडे बोट दाखवून "हे बघ हे गेट" "हा इथे लिहिलेला गेट नंबर" अगदी चार वर्षाच्या पोराला सांगावं असं सांगत होत्या. त्यामुळे आजूबाजूची जनता माझ्याकडे चमकून बघत होती. नंतर आम्ही बशीत बसून विमानात चढलो. त्या पायऱ्या चढताना भारी वाटलं. आतापर्यंत अश्या विमानाच्या पायऱ्या लोकांना चढ़ताउतारताना फक्त टीव्हीतच पाहिलं होतं. हवाईसुंदरीने कमरेत लावून नमस्कार केला. पण एवढं करूनही मला काही खिडकी जवळची सीट मिळाली नाही. मी मध्ये बसलो आणि मॅडम आईल सीट वरती बसल्या खरंतर डीन मॅडम बरोबर प्रवास करण हे जरा अवघडल्यासारखं होतं. कारण त्या कधी काय विचारतील आणि त्याचे उत्तर आपल्याला येईल की नाही याची धास्ती आणि दुसरा म्हणजे विमान प्रवासातले आपल्याला काहीच माहित नाही त्यामुळे आपलं अज्ञान त्यांच्यासमोर उघडउघड प्रकट होणार होते. विमानात बसल्यावर आता हवाई सुंदरीने सूचना द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदाच तो सीट बेल्ट शंभर वेळा चाचपून पाहिला. मग त्या काय सूचना देत आहेत अगदी मान वर करून, त्यांच्याकडे बघून, कान देऊन ऐकू लागलो. मॅडम माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागल्या. मग नंतर हळूहळू विमान धावपट्टीवर आले आणि जोरात पळू लागले आणि अचानक त्याने आकाशात झेप घेतली. मी मान लांब करून खिडकीतून बाहेर कसे दिसते ते पाहू लागलो. पण खिडकीतला खडूस माणूस कुत्सित नजरेने माझ्याकडे पाहू लागला. एखादा म्हणाला असता "ये. बस ह्या सीटवर. पहिल्यांदा प्रवास करतोयस ना मुला?" पण नाही. तो माणूस ढिम्म हलला नाही जागेवरून. थोड्यावेळाने विमान स्थिरस्थावर झाल्यावर मॅडम एक पुस्तक काढून वाचू लागल्या. ते पुस्तक बघून मला आणखीन टेन्शन आपले. कारण कॉन्फरन्स मध्ये जो विषय होता त्यासंबंधीचे ते पुस्तक होते. त्या पुस्तकाची प्रत माझ्याकडेही होती त्यामुळे ह्यातला एखादा प्रश्न वाचला आणि त्याचे उत्तर आपल्याला विचारलं तर? ह्या धास्तीने मी सुद्धा माझ्याकडचे ते पुस्तक काढून त्या ज्या पानांवरचा मजकूर वाचायच्या त्याच पानावरचे मी माझ्या पुस्तकात बघून वाचायचो. त्यामुळे अर्धधिक लक्ष माझ पुस्तकातच होतं बाकी विमानात "इकडे तिकडे" पाहता येत नव्हत. बरेचदा टुंगटुंग असा आवाज यायचा तो नक्की कुठून ते मला कळायचं नाही. काही वेळाने तो आवाज म्हणजे वर असलेले बटन दाबल्यावर येणारा आवाज होता आणि हवाई सुंदरीला बोलवायचं असेल तर ते बटन दाबायचे असे कळले. थोड्या वेळाने हवाई सुंदरी आमच्या जवळ येऊन म्हणाली "स्स, मॅम, व्हेज ओर नॉनव्हेज" मॅडमनी माझ्याकडे न बघताच सांगितले "टू व्हेज" मी असंही वेजच खाणार होतो पण उत्तर तर मी दिले असते ना. जाऊदे, काय बोलणार. मग ती दोन व्हेज लंच घेऊन आली. मग मॅडमनी पुन्हा मला ते सीटचं फळकुट खाली घेऊन कसं जेवायचं ते सांगितलं. आमचं विमान मुंबई - रायपूर- भुवनेश्वर असे होते. ते रायपूरला मध्ये उतरले. तेव्हा पटकन आठवलं. "अरे आपण विमानातील टॉयलेट तर पहिलेच नाही " आता टॉयलेट ही काही पाहायची जागा नाही पण विमानात ते कसे असते याची उत्सुकता होतीच ना. मग ते देखील पाहून घेतले. काही कारणामुळे विमानाला रायपूर उड्डाण घ्यायला उशीर होत होता, त्यामुळे बरेच लोक त्रस्त झाले होते. पण मी एकटाच मात्र खूप खुश होतो. कारण त्या निमित्ताने मला अधिक काळ विमानात बसायला मिळत होते. त्यानंतर आम्ही भुवनेश्वरला उतरलो आणि ऍज युजुअल माझी बॅग त्या पट्ट्यावर सगळ्यात शेवटी आली आणि मला पुन्हा तेच ते मॅडमच लेक्चर ऐकावं लागलं. अश्या पद्धतीने माझा पहिलावहिला विमान प्रवास सुफळ संपूर्ण झाला.
आतापर्यंत बरेच विमानप्रवास केले. देशात, परदेशात. पण अजूनही मला विमानात खिडकीजवळची सीट मिळावी असेच वाटते. आजही जेव्हा विमान धावपट्टीवरून धावते आणि उड्डाण घेते तो क्षण अजूनही तितकाच आवडतो. विमानतळ, विमान तिथली माणसं, वातावरण मला अजूनही आवडत. आजही प्रत्येक विमानप्रवास मला काहीतरी नवी अनुभूती देऊन जातोच.
फारच विस्कळीत आणि घाईत लिहिलं आहे पण पहिल्या विमान प्रवासाबद्दल अनेकदा लिहायचंच होत. ते जसं आठवलं तसं ते लिहून काढलं.
ऋतुराज.
किती मस्त लिहीलय ऋतुराज.
किती मस्त लिहीलय ऋतुराज. बेस्ट सो फार. खूप आठवतय तुम्हाला.
मधे मधे म्हणजे बर्याच ठिकाणी मलाही खुदुखुदु हसू येत होतं. हाहाहा ..... पहीला विमानप्रवास आणि होणारी तारांबळ एकदम मस्त रंगवलीये.
हाहा, मजेशीर आहे.
हाहा, मजेशीर आहे.
मस्त.. मजा आली वाचताना...
मस्त.. मजा आली वाचताना...
मस्त लिहिला आहे अनुभव
मस्त लिहिला आहे अनुभव
मजा आली वाचायला. यावर
मजा आली वाचायला. यावर आपल्याला पुढे लेख लिहायचा आहे, अशा रीतीने सगळं लक्षात राहिलं.
विमानतळावर लोकांना आणायला जायचा अनुभव पण छान मांडला आहेस.
डीन मॅडम छान होत्या की.
अरे भारीच!! तिकिटं जपून ठेवली
अरे भारीच!! तिकिटं जपून ठेवली आहेस
खूप छान लिहिले आहे.
खूप छान लिहिले आहे.
शेवटून दुसरा परिच्छेद तर एकदम माझ्या मनातला लिहिला आहे. मला पण टेक ऑफ फार आवडते. आणि लँडिंग मात्र नाही आवडत. अगदी २२ तासांची फ्लाईट संपत आली तरी वाईट वाटते. उतरायची अजिबात घाई नसते. लोकं मात्र ढकलून बाहेर काढतात नाही तर मी अजून तासभर बसले असते तिथे
मस्त लिहिलाय अनुभव. मजा आली
मस्त लिहिलाय अनुभव. मजा आली वाचताना.
मस्त लिहिले आहे. मजा आली
मस्त लिहिले आहे. मजा आली वाचायला
मजा आली वाचायला
मजा आली वाचायला
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
खूप छान लिहिलंय ऋतुराज! मजा
खूप छान लिहिलंय ऋतुराज! मजा आली तुमचा अनुभव वाचताना.
छान लिहिलंय:)
छान लिहिलंय:)
डीन मॅडम चांगल्या होत्या.

चेक इन बॅग मुळे त्यांचा झालेला सात्विक संताप/ चिडचिड जाणवली.
सगळ्यात बेस्ट लेख. सगळे चित्र
सगळ्यात बेस्ट लेख. सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. BTW, माझ्या पहिल्या विमान प्रवासात माझ्या सीटचा नंबर A-1 होता. मी बरेच दिवस तो बोर्डिंग पास ठेवला होता, मग कचरा नको म्हणून टाकून दिला. त्याचा फोटो काढून ठेवायला हवा होता, असे वाटले आता हा लेख वाचून.
मजेशीर लिहिलं आहे पहिल्या
मजेशीर लिहिलं आहे पहिल्या विमानप्रवासाबद्दल!
मस्त ऋतुराज!
मस्त ऋतुराज!
भारीच ऋतूराज.तुझा पहिला
भारीच ऋतूराज.तुझा पहिला विमान प्रवास वाचताना तुझ्या बरोबर प्रवास झाला. किती छान जसं घडलं तसं लिहीलंयस. तुझ्या नोंदवहीचा पुरेपूर वापर केलेला दिसतोय.
पहिला आंतरराष्ट्रीय विमानप्रवास पण आठवत असेल ना? त्याच्या आठवणी पण लिही ना.
मस्त लिहिला आहे अनुभव.
मस्त लिहिला आहे अनुभव.
अतिशय चित्रदर्शी लिखाण. सगळे
अतिशय चित्रदर्शी लिखाण. सगळे डोळ्यासमोर आले.
छान लिहीलंय मजा आली वाचायला.
छान लिहीलंय मजा आली वाचायला.
भारीच.विमान आणि बस वाला गोंधळ
भारीच.विमान आणि बस वाला गोंधळ मजेशीर वाटला.
मला तुमचा पहिल्या विमान
मला तुमचा पहिल्या विमान प्रवासाचा लेख खूप आवडला. मजेशीर लिहिलं आहे.
मजेदार, रंजक लिहिलेय अगदी
मजेदार, रंजक लिहिलेय अगदी
मस्त लिहिलंयस !
मस्त लिहिलंयस !
आतापर्यंत वाचलेल्या
आतापर्यंत वाचलेल्या विमानप्रवासाच्या अनुभवातलं बेस्ट.
शैली पण मजेशीर, आणि वेगळाच अनुभव.