
लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास - रूपाली विशे- पाटील
मानवी मेंदूला सुखावणाऱ्या , मनात आनंद निर्माण करणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती होऊ शकेल अश्या घटना पहिल्यांदा जेव्हा आयुष्यात घडतात तेव्हा त्या पहिल्या घडणाऱ्या घटनांचे अमाप कौतुक प्रत्येकालाच असतं.. आणि ते का असू नये..??
.. जसा पहिला पाऊस, पहिली नोकरी, पहिला पगार, पहिलं प्रेम, पहिलं बाळं... तसाच आयुष्यात घडणारा पहिला विमानप्रवास ...पहिल्याचा मान तसा थाटाचा आणि कौतुकाचा...!
हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा घडतात त्यावेळी मनात ज्या भावना उमटतात त्या व्यक्त करताना शब्दांवर भाषेचे , व्याकरणाचे कितीही अलंकार चढवले तरी त्या क्षणीच्या भावना जशाच्या तशा इतरांबरोबर वाटून घेता येणं अशक्य आहे... खरंतर त्या भावना , ते क्षण प्रत्येकाला स्वतः च जगावे लागतात...!
हे जरी खरं असलं तरी आपल्या आयुष्यातले आनंदी क्षण, त्या क्षणीच्या मनातल्या भावना दुसऱ्या जवळ व्यक्त केल्याने त्या अविस्मरणीय क्षणांचे स्मरणरंजन तर होतेच पण मेंदूला सुखावणाऱ्या रसायनाची निर्मिती होऊन मेंदूला होणारा आनंद द्विगुणित होतो.
लहानपणी आकाशात उडणारं विमान दिसलं रे दिसलं की अंगणात खेळणारी आम्ही लहान पोरं - पोरी आनंदाने उड्या मारायचो. जमिनीवरून हात उंचावत विमानाला 'टाटा ' करायचो .. जमिनीवरील माणसं विमानात बसलेल्या लोकांना दिसत असणार हा गोड - गैरसमज त्यावेळी होता. मोठे झाल्यावर आपण सुद्धा विमानात बसू अशी भाबडी आशा होती.
__ आणि ती भाबडी आशा पूर्ण झाली ९ ऑगस्ट २००८ रोजी... ईशान्य भारत वारीच्या निमित्ताने.. !
दार्जिलिंग, शिलाँग, चेरापुंजी, गोहाटी अशी सहल करायचं ठरलं होतं. सहलीचा विमान प्रवास हा मुंबई व्हाया कलकत्ता व्हाया गोहाटी असा होता. हा माझ्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होता... त्यासाठी मी उत्सुक तर होतेच मात्र माझ्यापेक्षा नवराच जास्त उत्साही होता त्याचा पहिला विमान प्रवास नसताना सुद्धा..!

गोहाटी विमान तळावरचा फोटो
ऑगस्ट महिन्यात भर पावसात आम्ही ईशान्य भारताची सहल आखली होती.. त्याचं कारण म्हणजे चेरापुंजीचा पाऊस , तिथलं वातावरण आम्हांला अनुभवायचं होतं.
तर प्रवासाच्या दिवशी उगाच फ्लाइट चुकायला नको म्हणून आम्ही पालघरहून रात्रीची ट्रेन पकडून रात्री १२ वाजताच मुंबई विमानतळावर पोहचलो होतो.. बाहेर पाऊस सुरू होता आणि विमानतळाच्या आत A.C. मला तर खूप थंडी वाजायला लागली. मी बॅगेतून सरळ स्वेटर काढलं आणि ते घालून बसले. स्वेटर घातलेला तो फोटो आहे माझ्याकडे .. आता तो फोटो पाहून खूप हसू येते.
आमचा विमान प्रवास हा मुंबई - कलकत्ता - गोहाटी असा होता. आम्ही हा प्रवास 'स्पाईस जेट' ह्या विमानाने करणार होतो.

विमानातला एक फोटो..!
ह्या सहलीत आमच्या परिवारासोबत परिचयातले चार- पाच परिवार देखील होते. त्यातल्या एक काकू शुद्ध शाकाहारी होत्या.. हवाई सुंदरीने त्यांना चुकून मांसाहारी जेवण दिलं.. आयुष्यात कधीच मांसाहार न केलेल्या काकूंचा मांसाहारी जेवण उघडून पाहताच कसानुसा झालेला चेहरा आणि त्यांचा झालेला वैताग आजही मला आठवतो.
सहलीच्या परतीच्या विमान प्रवासात एक ह्दयस्पर्शी प्रसंग माझ्याबाबतीत घडला.
तर झालं असं....
दार्जिलिग, शिलाँग, गुवाहाटी फिरून कलकत्ता मार्गे मुंबई असा परतीचा प्रवास सुरु असताना कलकत्ता - मुंबई फ्लाइटला तीन तास उशीर झाला होता. आमच्या सोबत असणारे प्रवासी विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर फिरायला निघून गेले. .!
मी आणि माझा नवरा आम्ही दोघे विमानतळावरच थांबलो. आम्ही जिथे बसलो होतो तिथेच बाजूला एक शीख दांपत्य बसलेले होते. त्यांचा गोड चिमुकला त्यांच्यासोबत होता. त्यांची लखनौची फ्लाइट होती. बाजूलाच बसलो होतो त्यामुळे त्या परिवाराशी जुजबी ओळख झाली. त्यादिवशी नेमके रक्षाबंधन होते..
थोड्या वेळाने त्या शीख बांधवाची पत्नी माझ्याजवळ येत म्हणाली,
" प्लीज आप इनको आज राखी बांधोगी क्या ?? इनकी बहन अमेरिका में रहती है.. उन्होंने राखी भेजी है अपने भाई के लिए...!!"
मी आनंदाने राखी बांधायला तयार झाले.. खरंतर मी त्या वेळी खूप भावूक झाले ..सख्खा भाऊ नसलेल्या मला देवाने त्या दिवशी रक्षाबंधन साजरा करायला भाऊच पाठवला .. तो पण थेट विमानतळावर..!

रक्षाबंधन सारखा पवित्र सण मी ध्यानीमनी नसताना कलकत्त्याच्या विमानतळावर एका अनोळखी कुटुंबासोबत साजरा केला.. तो क्षण आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यात साठवलेला आहे.
मला आता त्या परिवाराचं नाव पण लक्षात नाही.. पंधरा वर्षापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी कलकत्ता विमानतळावर भेटलेला हा शीख बंधू आणि त्याचा परिवार जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे .. ही माझी
गणरायाकडे प्रार्थना..!
खरंतर तो सगळाच प्रवास खूप रमणीय , अविस्मरणीय झालेला.. नवऱ्याला फोटो काढायची खूप हौस असल्याने त्याने माझ्या पहिल्या विमान प्रवासात काढलेले ते फोटो पाहताना आजही ते क्षण , त्या भावना मी जगू पाहते .. आणि मेंदूला सुखावणारं रसायन निर्माण करून घेते.
अठरा वर्षे झाली माझ्या पहिल्या विमान प्रवासाला... मात्र त्या प्रवासाचे फोटो पाहताना सगळं कसं अगदी कालच घडून गेल्यासारखं वाटतं .. आणि डोळ्यांसमोर सगळा प्रवास तरळून जातो.
माझा हा पहिला विमान प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नव्हता, तर तो नवीन अनुभवांचा, आकाशाला स्पर्श करण्याचा आणि आयुष्यात एका नवीन आनंदाच्या क्षणांची भर घालणारा असा एक सुंदर प्रवास होता, जो आजही माझ्या मनावर आनंदाचे हलकेसे तुषार उडवतो.
मायबोलीवरील २०२३ च्या गणेशोत्सवाच्या वेळी 'चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - माझा पहिला विमानप्रवास ( विमानतळ परिसर)' या धाग्यावर मी माझ्या पहिल्या विमान प्रवासातील काही फोटो दिले होते आणि लेखातला ह्रदयस्पर्शी किस्सा देखील लिहिला होता... त्यावर काही मायबोलीकरiनी भावूक प्रतिक्रिया दिल्या होत्या.. तीन वर्षापूर्वी मायबोलीच्या गणेशोत्सवात लिहिलेला आणि १८ वर्षापूर्वी माझ्या पहिल्या विमान प्रवासात घडलेला अविस्मणीय प्रसंग पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या कृपेने लिहिण्याचा योग जुळून आला.. .. त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार..!
धन्यवाद..!
वाह!! काय सुरेख किस्सा आहे
वाह!! काय सुरेख किस्सा आहे रुपाली. यु आर लकी. ते शीख दादाही भाग्यवानच की.
रुपाली तुम्ही दिलेला किस्सा
रुपाली तुम्ही दिलेला किस्सा आधीही वाचला आहे असे लिहिणारच होतो ते कुठे हे तुम्हीच सांगितले
किती छान! फोटो ही छान.
किती छान!
फोटो ही छान.
छान लिहीले आहे. आवडले. राखीचा
छान लिहीले आहे. आवडले. राखीचा किस्साही छान.
विमानात स्वेटर/जॅकेट घालायला लागणे हे खूप कॉमन आहे. भारतात तर जेथे एसी असतो तेथे तो वापरायची सक्ती असल्यासारखे करतात.
आवडला लेख.
आवडला लेख.
लहानपणी एकदा बैलगाडीतून जात असताना माझ्या हातात विमान होते, त्यामुळं तोच माझा पहिला विमानप्रवास. ते विमान ढकललं कि त्याच्या लाईटस लागायच्या आणि थोडंसं हवेत उडायचं. ते पडून फुटू नये म्हणून मग आम्ही ते झेलायचो.
छान अनुभव. तुला लिहिताना ही
छान अनुभव. तुला लिहिताना ही भावुक झाले असेल
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय रुपाली.
खूप छान लिहिलंय रुपाली.
फोटो पण सुंदर!
फारच सुंदर लिहिलं आहे. आवडल.
फारच सुंदर लिहिलं आहे. आवडल.
शेवटचा राखी चा किस्सा तर फारच हृद्य.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
विमानतळावर राखी बांधण्याचा फोटो आधी पाहिला आहे, हे मला आठवलं.
छान लिहिलंय. राखीचा किस्साही
छान लिहिलंय. राखीचा किस्साही छान.
सामो,. मी विचार करते, तुला
सामो,. मी विचार करते, तुला पटकन कसं काय सुचतं छान प्रतिसाद द्यायला..?
ऋन्मेष, आधी फोटो आणि किस्सा लिहिला असल्यामुळे लिहू का नको लेख असा विचार करत होते पण म्हटलं गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही लिहिलं तरी जाईल.
राज , लहानपणीच्या काही आठवणी भाबड्या असल्या तरी गोड असतात.
शर्मिला, मी स्वच्छंदी , धन्यवाद..!
विमानाला बराच वेळ उशीर झाल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर थकवा आहे.
फारएण्ड थन्यवाद, त्यावेळी गृपमध्ये मी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनीच स्वेटर घातलेलं.. तेव्हा काही वाटलं नाही आता हसायला येते..
उ बो, भरत, सिमरन, ऋतुराज धन्यवाद..!
आशु, हो .. मला आज हि प्रत्येक रक्षाबंधनाला तो प्रसंग आठवतो.
मस्त किस्सा.
मस्त किस्सा.
रक्षाबंधनाच आधी ही वाचलं होतं
रक्षाबंधनाच आधी ही वाचलं होतं पण इथे पुन्हा वेगळ्या संदर्भात वाचताना ही तेवढीच मजा आली.
छान लिहिलं आहे.
हे आधी वाचलंय असं वाटू
हे आधी वाचलंय असं वाटू लागलेलं इतक्यात त्याचा खुलासाही आला.
खूपच सुंदर अनुभव.
राखीचा अनुभव हृद्य ! त्या सरदारजींसाठी सुद्धा कायमची आठवण झाली.
छान लिहिले आहे. राखीचा किस्सा
छान लिहिले आहे. राखीचा किस्सा वाचलेला आठवत होता, परत वाचायला छान वाटले.
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
फोटोही छान.
तुम्ही दोघेही किती कोवळे तरुण दिसत आहात
शेवटी लिहिलेला किस्सा फार हृद्य.
आधीही वाचलेला, परत वाचतानाही तितकेच छान वाटले.
अनु, ममोताई , रानभुली, आबा ..
अनु, ममोताई , रानभुली, आबा ... धन्यवाद..!
अस्मिता धन्यवाद , तुझा पहिला प्रतिसाद होता तेव्हा..
झकासराव धन्यवाद .. !
तुम्ही दोघेही किती कोवळे तरुण दिसत आहात Happy>>> तसे दोघेपण पंचविशीत होतो लग्नाच्या वेळी.. दोघांमध्ये वयाचं अंतर फार कमी आहे .. नवरा आठ महिने मोठा आहे माझ्यापेक्षा.. दोघांची दहावी बॅच एकच आहे ... बऱ्याच जणांना लव्हमॅरेज वाटते आमचं.. लहानपणीच लग्न केलं होतं का ..? असं गंमतीत विचारतात मित्र - मैत्रिणी... पण नाहीये तसं.. आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना...भारत मॅट्रोमनी व्हाया ऑकुर्ट व्हाया याहू मेल व्हाया फोन आणि मग प्रत्यक्ष भेट असं जमलंय लग्न...!
सुरेख लिहिले आहेस. किस्सा
सुरेख लिहिले आहेस. किस्सा वाचून छान वाटले
जाई धन्यवाद..!
जाई धन्यवाद..!
नवरा आठ महिने मोठा आहे
नवरा आठ महिने मोठा आहे माझ्यापेक्षा >> दोघे सारखेच दिसता. आठ महीन्यांचं अंतर असल्याने तेव्हढा फरक वाटतो. हल्ली काही तासांचा किंवा मिनिटांचाच असतो.
हल्ली काही तासांचा किंवा
हल्ली काही तासांचा किंवा मिनिटांचाच असतो.>> हो.. राज, माझ्या परिचयातल्या काही मुली तर काही महिने मोठ्या ही आहेत नवऱ्यापेक्षा..!
लग्न करताना कमीत कमी नवरा दोन ते तीन वर्षे मोठा असावा हि माझी अपेक्षा होती.. तेव्हा पहिल्यांदा मॅट्रोमनीवर praposal स्विकारताना मला पचायला जड गेलं होतं..!
रक्षाबंधन, फार हृदयस्पर्शी
छान लिहिलंय.
रक्षाबंधन, फार हृदयस्पर्शी अनुभव. मी वाचलेला आधी, तरी परत वाचताना डोळ्यातून पाणी आलं.
तुम्ही दोघे नवराबायको, किती लहान अगदी कॉलेजगोइंग वाटताय.
छान
छान