चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैं वापस आऊंगा बघितला. अतिशय आवडला. उत्कृष्ट चित्रपट आहे. अभिनय, दिग्दर्शन, संवाद, चित्रीकरण एकदम क्लास वन.
फाळणीची दाहकता फार तीव्रतेने पोचते. थोडं धाडसाचं विधान वाटेल, पण दुसऱ्या महायुद्धावरचे हॉलिवूड चित्रपट ज्या दर्जाचे आहेत, त्या दर्जाला पोचेल असा हा भारतीय संदर्भावरचा चित्रपट आहे असं मला वाटलं.

पती पत्नी और वो दो आला आहे नेटफ्लिक्सवर. अजिबात बघू नका. फारच बंडल आहे. आयुष्मानचं काही खरं नाही! लफडं नाहीच तरी दोन मैत्रिणींशी जवळीक व टुकार सारवासारव आहे. त्यात एक सारा दुसरी राकुल आणि बायको वामिका. काहीच विनोदी वाटला नाही, काहीही जमला नाही. संवाद, गाणी, कथा काहीही धड नाही. कदाचित लफडं असतं तर नावाला तरी जागला असता सिनेमा. हे तर सगळे विनाकारण वाटते. बायको संस्कृतीरक्षक, गर्लफ्रेंड फटाकडी हा नियम सुद्धा पाळला नाही. तिघीही फटाकड्या आहेत पण कुणालाही हिरोचं आकर्षण वाटत नाही, त्यामुळे संस्कृती आपोआपच अबाधित राहते. कथा उरत नाही.

नाही!!! लफड्याचं सोंग करून बळेच नाव देऊन लफडे म्हणून विकू नका. ते सोंगही धड जमलेले नाही. चित्रपट म्हणजे एक विकायला ठेवलेले सोंगच असते, ते वठवता यायला हवं. मग सोंग कसलेही असो.

नाही च्या पुढे तीन उद्गारवाचक चिन्हं असल्याने हिंदी सिनेमात कानावर हात (दोन्ही) ठेवून नही असं ओरडतात तसं ऐकू आलं.

. तिघीही फटाकड्या आहेत पण कुणालाही हिरोचं आकर्षण वाटत नाही>>>

आयुष्मानच्या जागी कुणी फटाका घेतला असता तर काहीतरी वाटले असते. Happy

राज Lol
आयुष्मान फॉरेस्ट ऑफिसर आहे, अधूनमधून कासवांच्या पुनर्वसनाला बनारस का कानपूर येथे जातो. ते मैत्रिणीचे पुनर्वसन असते. शेवटी एक लांडगा यांच्या मागे लागतो, कारण हाच वेडेवाकडे आवाज काढून लांडग्याला बोलावतो. Lol नंतर गाडीत लांडगा मागच्या सीटवर गुरगुरत. त्याला कसेबसे बेशुद्ध करून ( ते ट्रॅंक्विलायजर तर कागदाच्या विमानासारखे कसेही सोडले तरी पोचले) एअरपोर्टवर साराला ड्रॉप करतात. शेवटचं ट्रॅंक्विलायजर होते म्हणतात मग लांडग्याला आधी ड्रॉप करायचं सोडून साराला का करतात? Proud मला काळजी वाटू लागली, वाटेत लांडगा पुन्हा उठला तर !

ते ट्रॅंक्विलायजर तर कागदाच्या विमानासारखे कसेही सोडले तरी पोचले
>>
मला वाटलं होतं की ते आयुष्मान ला लागतं का काय
पण तसला काही चिमतकार बघायला नाही मिळाला

"इक्का" - नेटफ्लिक्स. चांगला लीगल ड्रामा आहे. एंगेजिंग होता शेवटपर्यंत. सनी आणि तिलोत्तमा शोम यांची कामे मस्त आहेत. तिलोत्तमा शोम मी आधी जेव्हा पाहिली तेव्हा तिचे काम इतके खास वाटले नव्हते. पण यात एका दिग्गज वकिलासमोर उभी राहणारी नवखी सरकारी वकील तिने खूप चांगली रंगवली आहे. सनी मायनस स्वॅगर सुद्धा चांगला आहे. अक्षय खन्ना मात्र बोअर झाला यातला.

"ऑब्सेशन" - पीकॉक. चांगला आहे, खिळवून ठेवतो. पण जितकी प्रचंड तारीफ वाचली होती तितका भारी वाटला नाही. पाहताना उत्कंठा शेवटपर्यंत राहते हे नक्की.

नोलनचा बहुचर्चित ऑडिसी थिएटर मधे पाहिला. मॅट डेमन, ॲन हॅथवे, टॉम हॉलंड, झेंडेया, लुपिटा आहेत.

ऑडिसी येथे शाळेत वाचून झालेलं असतं बरेचदा. बऱ्याचशा ग्रीक कथा माहिती असणारे सुद्धा भरपूर आहेत. माझ्या सारखे कोरी पाटी असणारे प्रेक्षक ज्यांना ट्रोजन हॉर्स शिवाय फार काही माहिती नाही असे फार कमी असतील. पण मी पूर्वाभ्यासाशिवाय विहिरीत उडी घेऊ शकते, पिक्चरचे काय एवढं! असा विचार करून तसेच तोंड वर करून गेले. काहीही अडलं नाही, चित्रपट अगदी सहज समजण्यासारखा आहे. तुम्हाला कुतूहल वाटून वाचून जावं वाटत असेल तर जा पण चित्रपट समजणार नाही असे नाही इतका सरळ मांडला आहे.

होमर नावाचा ग्रीक व्यास मुनी ( माझा भाऊ म्हंटला कालिदास म्हण , व्यास जास्त झाले) यांनी जी दोन महाकाव्ये लिहिली, त्यापैकी ओडिसीयस राजाची गोष्ट ही ओडिसी. हे मूळचे ग्रीक महाभारत समजून मधेच अर्जुनाच्या बारा वर्षे वनवास फक्त वेगळा काढून त्याचीच एक स्वतंत्र गोष्ट केली आणि अर्जुनाला समुद्रात ढकलून त्याचा नेहमी एक फळी मिळून वाचणारा सिंदबाद केला तर जे तयार होईल तसेच वाटले. मूळ ग्रीक देवता व त्यांची संतती, शाप- वरदान वगैरे फार खोलवर न जाता केलेला आहे ओडिसी.

तरीही झूस, अथेना, पसायडन व इतर देवता जसे गॉड ऑफ रेन म्हणजे त्यांचे वरूण, अग्नी, इंद्र वगैरे वारंवार येतात गोष्टीत. अतिशय सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. ट्रॉयचा ट्रोजन हॉर्स हा ओडिसीयसच्या प्रतिभेचे, बुद्धीचे फलित असतो. हेलनची मुक्तता करण्यासाठी दहा वर्षे त्यांनी ट्रॉयचा सर्वनाश केलेला असतो, प्रसंगी विश्वासघातही. हेलन काही ठिकाणी पॅरीस नावाच्या राजपुत्रासोबत स्वतःच्या मर्जीने ट्रॉयला पळून गेलेली असते असं म्हंटले आहे. तिचं पहिलं लग्न म्हणजे राजकारणातला डाव असतो व मेनेलॉस सोबत तिचं लग्न लावून दिलेलं असतं. ती झूस देवाची व लेडा नावाच्या अप्सरेची(?) मुलगी. त्यांना दोन जुळी असतात. त्यापैकी हेलेनची जुळी बहीण Clytemnestra. ह्या दोघी अंड्यातून झालेल्या असतात असेही लिहिले आहे. Clytemnestra चे लग्न मेनेलॉसच्या भावाशीच Agamemnon शी झालेलं असतं. त्याने समुद्रातील सफर यशस्वी व्हावी यासाठी आपल्या लेकीचेच बलिदान दिलेले असते. त्यामुळे Clytemnestra ने आपल्या प्रियकराला सोबत घेऊन नवऱ्याला मारून मुलीच्या खुनाचा बदला घेतलेला असतो. त्यामुळे सुद्धा मेनेलॉसला हेलन बद्दल राग असतो. ही ट्रॉयच्या युद्धाची पार्श्वभूमी!

यात नवीन म्हणजे हेलनच्या चेहऱ्यावर एक व्रण करून तिला थोडं विद्रूप केलेलं दाखवलं आहे. आता काही "हजार बोटी नसून पाचशे समजा"( The face that launched a thousand ships, maybe five hundred now! ) असं म्हंटले आहे. हे नोलनचे स्वतःचे आहे. होमरने कुठेही तसं लिहिलं नाही. हेलनला कुरूप करण्याची शिक्षा देण्याची हिंमत मेनेलॉसमधे नव्हतीच. त्या साठीच तर सगळा अट्टाहास होता!

ही ठिणगी किंवा एकुणच आत्यंतिक द्वेष हा अगदी वरवरच्या स्वरूपात दाखवला आहे. खरा भाग ओडिसियसने केलेल्या ट्रॉयच्या युद्धानंतर त्याला आपल्या राज्यात इथिका मधे आपली राणी पेनलपी आणि मुलगा टेलिमॅकस यांना भेटण्याची अनिवार ओढ आणि एखाद्या शापासारखा त्याला सहन करावा लागलेला वीस वर्षांचा विरह यावर आहे. हे सगळे होते त्या ट्रॉयच्या युद्धामुळे.

काहीही होतं ह्या Voyage मधे. अगदी ती बोट, ह्याची माणसं, आणि ओडिसियस कुठेकुठे भटकत अतिशय विचित्र गोष्टींना तोंड देतात. खरेतर पुराण हा नोलनचा हातखंडा नाही, मानवी भावभावना हा आहे. त्या सगळ्यातच असतात त्यामुळे त्या वर भर आहेच. तरीही नोलनचे उत्कृष्ट चित्रपट ऑपनहायमर आणि इंटरस्टेलरच आहेत. हा नाही!! Nolan, you could do anything, why limit yourself to Greek mythology! असं मनात आलंच पाहताना पण then why not mythology as well ? सगळेच तर येतं त्याला. मुख्य म्हणजे गोष्ट सांगता येते. शेवटी हे सगळं स्टोरी टेलिंग असतं.

चित्रपट मला आवडला पण आहे पौराणिक कथा. ओडिसियसच्या पराक्रमाची गाथा, राणी पेनलपीच्या एकनिष्ठतेची गाथा. अक्षरशः पतिव्रता निघाली ती. टेलिमॅकसच्या पित्याच्या शोधाची गाथा. असं सगळं आहे. वीस वर्षं सगळे एकमेकांसाठी विरहाच्या अग्नीत होरपळले. ह्याची सुरवात त्या ट्रॉयच्या युद्धामुळे झाली, तेथून अप्रत्यक्षपणे ओडिसियसमुळे किती जणांचा बळी गेला, त्यांची भुतं ह्याला अपराधबोधाच्या रूपात प्रश्न विचारायची, अथेना देवी याला विवेकाच्या रूपात पश्चात्तापदग्ध अवस्थेत भेटायची. सगळे त्याच्या मनाचे खेळ म्हणता येतील. ह्या सगळ्या तीव्र भावना अनावर होऊन स्मृतीभ्रंश झाला हेही गोष्टी स्वरूपात दाखवलं आहे. वेगवेगळे मांडले तर पुराण काढून ओडिसियचा प्रवास, वैचारिक भूमिका पाहायला मिळते.

चार पाच रंगांच्या छटांमधे सगळा चित्रपट बांधला आहे, समुद्र आणि हेलकावे आपल्याला जाणवतात. प्रत्येक गोष्ट खरी वाटावी, दिसावी अशी आहे. मॅट डेमनचा अभिनय उत्कृष्ट वाटला. हेलन म्हणून लुपिटा मला आवडली. कृष्णवर्णीय हेलन वोक नसून सगळ्या पौराणिक कथा आहेत, त्यामुळे तिचा रंग महत्त्वाचा नव्हताच त्यामुळे नोलनने आपल्या मनासारखे केलं. मला ती ब्लॅक पँथर पासून आवडते, सुंदरच आहे. येथे रोल अगदी छोटा आहे तसा. ॲन हॅथवे सुद्धा नेहमीच आवडते पण तिला नेहमी आधुनिक भूमिकेत बघितले आहे, इथे ती पौराणिक भूमिकेत वेगळीच वाटली. तिच्यासाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या देशोदेशीचे सरदार, राजे पुनर्विवाहाचा घाट घालत असतात. एथिका मिळवून राजा होऊ, ओडिसियस तर मेलाच असेल अशी वदंता असते. तरीही ही एकनिष्ठ राहते. बघणार असाल तर थिएटर मधेच बघा. आयमॅक्सच्या ७० mm कॅमेराने शूट केले आहे म्हणे.

**एक गमतीशीर निरीक्षण या चित्रपटातले - हेलनची जुळी बहीण तिची आयडेंटिकल जुळी आहे. म्हणजे जर तीही तितकीच सुंदर होती तर हेलनच्या हजार बोटी आणि हिच्या हजार बोटी मिळून एकूण दोन हजार व्हायला हव्यात. पण फक्त हेलनसाठीच एवढं महाभारत झालं. ती Clytemnestra बाजूलाच राहिली.

काल आयुष्मान आणि सारा दिसल्यावर तो पति पत्नी लावला. १५-२० मिनिटांनी बंद केला. काहीही चालू होतं.
त्यातलं हिंदी मात्र आवडलं. एकदम शुद्ध हिंदी बोलतात तसं नाही, पण तरी गावातलं शुद्ध आहे, ते ऐकायला मजा आली. त्यासाठी सहन करत होतो, पण अती झालं.

इक्का ही असाच १५-२० मिनिटं बघुन बंद केला. घिसापिटा ड्रामा चालू होणार वाटू लागलं.

ऑडेसी रिव्ह्यू बद्दल धन्यवाद. बघणार!

हो, आला आहे भारतात. ह्या पोस्टीत तसे काही स्पॉयलर्स नाहीत, पण न वाचता, न अभ्यास करता पाहू शकतो असा वाटला. काहीही माहिती नसेल तर सिंदबाद आठवणार हे निश्चित! Happy

हिंदी चांगले आहे पती पत्नी और वो दो मधले. मी पण नोट केले.

क्लॅश ऑफ द टायटन्स कि त्याचा दुसरा भाग गेल्या दशकात मुलांना दाखवण्यासाठी म्हणून पाहिला होता. काहीतरी भव्य असेल म्हणून. काही म्हणजे काही समजलं नाही. टायटन्स कोण, देवता कोण, पोसाईडन कोण हे समजेपर्यंत पिक्चर संपला पण. मुलं झोपली होती.

ओडिसीचा रिव्यू मस्त लिहिला आहेस, अस्मिता. बघायचा आहेच. ट्रॉय पाहून बरीच वर्षे झाली पण आता पुन्हा रिकॅप करता बघायला हवा ओडिसी बघण्याआधी. हा रिव्यू आणि त्यावरून इतर माहिती काढल्यावर आता पाहायची उत्सुकता आणखी वाढली.

हेलन काही ठिकाणी पॅरीस नावाच्या राजपुत्रासोबत स्वतःच्या मर्जीने ट्रॉयला पळून गेलेली असते असं म्हंटले आहे >>> ट्रॉय पिक्चरमधेही तसेच दाखवले आहे असे आठवते. बाय द वे इथे "काही ठिकाणी" हे योग्य ठिकाणी आहे का Happy "...असं काही ठिकाणी म्हंटले आहे" असे हवे ना? ती एकदाच पळून गेली एकाच ठिकाणी Happy

आत्ता कास्ट बघितली तर द वॉकिंग डेड पासून ते बॅन्शी पर्यंत बर्‍याच सिरीज मधले पब्लिक आहे यात. ट्रॉय मधे डायान क्रूगर जबरी दिसली होती हेलन म्हणून. इथे लुपिटा तशी वाटत नाही. मी तिचा इतर कोणता पिक्चर पाहिलेला नाही त्यामुळे एकूण पर्सनॅलिटी कशी आहे माहीत नाही. तेव्हाच्या राजघराण्यांमधे असे मिश्रवंशीय लोक असतील का? माहीत नाही. तेव्हाचे ग्रीक लोक कॉकेशियन गोरे नसतीलही ("पाश्चात्य देशातील सौंदर्याची व्याख्या" ई) . पण तसे असेल तर कास्ट मधले इतर अनेक लोकही तसेच हवेत. ही एकच का. असे कास्टिंग का केले याबद्दल मी बरेच वाचले पण पटण्यासारखे काही दिसले नाही. गंमत म्हणजे ती कृष्णवर्णीय आहे म्हणून या पिक्चर बद्दल ऑब्जेक्शन घेणारे स्टीरीओटाइपिंग करत आहेत हे उघड आहे, पण या कास्टिंगचे समर्थन करताना आम्हाला बाह्य सौंदर्याच्या पेक्षा जास्त काहीतरी दाखवायचे आहे वगैरे सांगणारेही सबकॉण्शसली तेच करत आहेत.

बाय द वे, ऑडिसी हा अमेरिकन उच्चार दिसतोय. राजाचे नाव ओडिसियस असेल तर या काव्याचे नावही बहुधा ओडिसीच असेल. पूर्वी भारतात "ओडिसी" असेच ऐकले आहे.

लुपिटा तेवढ्या वेळ स्क्रीन वर नाहीच फा. त्यामुळे आक्षेप उगाच वाटतो. पाच मिनिटे असेल कदाचित! मॅट डेमन तरी कुठे ग्रीक वाटतो तो संपूर्ण पिक्चर भर आहे की, हाकानाका. जर सगळे काल्पनिक असेल तर एखाद्या दिग्दर्शकाला प्रयोग करावा वाटला आणि बाकी सगळे नेहमीप्रमाणे असेल तर हे लक्षात सुद्धा येत नाही खरेतर. मी तर बिनकामाच्या रीळा बघून अनावश्यक माहिती गोळा करते. तरीही लॉजिकली बघता राजघराण्यातील लोकांचीच लग्न सहसा वेगळ्या, दूरवरच्या वंशातील लोकांशी व्हायची. राजकारणच असायचं ते पण सामान्य माणसापेक्षा राजघराणी जास्त मिश्रवंशीय असायची. उदा. चंद्रगुप्त मौर्य आणि हेलेना.

ती एकदाच पळून गेली एकाच ठिकाणी >>> Lol यावर रामदास आठवलेचे एक वाक्य - जाने दो जिनको जाना हैं क्या करेंगे वो थांबकर! Lol

हेलन स्वतःच पळून गेली होती, त्या पॅरीसला ॲफ्रोडायटी या कामदेवतेचा वर होता, जगातील सगळ्यात सुंदर स्त्री तुझ्यावर भाळेल म्हणून. मग ही गेली पळून. तिची सुटका करण्याची खरेच गरज होती का? पण त्या वर भर नाही सिनेमात. ते फक्त कारण आहे ओडिसीयसच्या जीवनसफरीचे. म्हणजे समुद्री सफर आणि इंग्रजी suffer दोन्ही.

ऑडिसी/ ओडिसी दोन्ही बरोबर आहेत. हो, अमेरिकन आणि ग्रीक.

पती पत्नी ऑर व्हॉटॅव्हर - बकवास वाटलेलाच नावावरून , तसंच झालं.
आयुषमान साठी सुरु केला पण नो पेशन्स .. तद्दन फालतू स्टोरी आणि कास्ट!

तरीही लॉजिकली बघता राजघराण्यातील लोकांचीच लग्न सहसा वेगळ्या, दूरवरच्या वंशातील लोकांशी व्हायची. राजकारणच असायचं ते पण सामान्य माणसापेक्षा राजघराणी जास्त मिश्रवंशीय असायची. उदा. चंद्रगुप्त मौर्य आणि हेलेना. >>> हो मी अशीच उदाहरणे बघत होतो. पटले.

लुपिटाच्या कास्टिंगविषयी काहूर का आहे कारण होमरने ओडिसी आणि इलियाड मधे हेलनचे वर्णन सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची, गौरवर्णीय असे केले आहे. आधीच्या सर्व Troy वरील चित्रपटांमधे तशाच अभिनेत्री घेतल्या आहेत. त्यामुळे ती कृष्णवर्णीय असण्यापेक्षा होमरने जशी सांगितली आहे तशी नाही, accuracy वर आक्षेप आहे असं वाचलं.

असेलही तसे चीकू. मी मात्र वोक अलर्ट टाईप वाचलं होतं. Regardless ती फक्त पाच- सात मिनिटे आहे स्क्रीन वर. होमरच्या वर्णनाशी सुसंगत नाही तरीही ही ऐतिहासिक कथा नसून, पौराणिक कथा आहे म्हणूनही मला व्यक्तिशः त्यात काही गैर वाटले नाही.

हॅरी पॉटर अँड कर्स्ड चाईल्ड मध्ये हर्मायनी ब्लॅक आहे. त्यात बघुन खरी हर्मायनी अशीच असेल, आपण उगाच टाईपकास्ट करत होतो असं मला झालेलं इतकी फिट होती ती. तर थोडक्यात असे प्रयोग तर झालेच पाहिजेत ना?
एमा वॉटसन डोळ्यात बदाम इतकी आवडतेच.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा