शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धेंड, आढ्य, शिष्ट, महाशय, सर्वगुणसंपन्न इ. सारखे मूळचा सकारात्मक अर्थ असलेले शब्द काल प्रवाहात नकारात्मक का झाले असावेत बरे?

त्यासाठी भाषा संशोधनाचे संदर्भ पाहावे लागतील .

एक निव्वळ शक्यता अशी वाटते :
काही महनीय व्यक्तींना अशी विशेषणे लावली जात असतील परंतु कालांतराने त्या व्यक्तींचे पायही मातीचेच असे दिसून आले असावे किंवा त्यांच्यातील काही अवगुण प्रकर्षाने जाणवले असावेत.
??

शिष्टमंडळ, शिष्टाचार हे चांगल्या अर्थाने अजूनही प्रचारात आहेत.
शिष्ट म्हणजे उरलेले. उष्टे हाही एक अर्थ आहे.
व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्.

उच्छिष्ट सुद्धा उरलेलं शिष्ट Happy
शिष्टमंडळातील बरीच मंडळी निघून गेली आणि काही अजूनही थांबलेली असली तर त्यांना 'उच्छिष्टमंडळ' म्हणता येईल. Happy
महोदय - चर्चा वाचली आवडली.

सगळे एकदाच उठतील … 😀

नाहीच उठले तर मात्र “उत्तिष्ठ“ म्हणावे लागेल 😀

>>>किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलेही असतात त्यांना उपरोधाने वापरणे सुरू झाले असावे.

हं, ही शक्यता अधिक वाटते. म्हणजे एखादेवेळी कुणीतरी ते शब्द उपरोधाने वापरले असावेत, त्याचं पाहून अजून काही जणांनी वापरले असावेत. कालौघात, मूळ सकारात्मक अर्थ मागे पडून हा उपरोधात्मक अर्थच प्राथमिक अर्थ म्हणून स्थापित झाला असावा.

हपा "महोदय - कर्मधारय तत्पुरुष समास वाटतो. महान आहे ज्यांचा उदय, म्हणजे ज्यांचं आगमन किंवा अस्तित्व असा अर्थ असावा असं मला वाटतं." >>> वा, मस्त!

जनाबाईंच्या अभंगात गडणी शब्द आला. ओव्यांमध्ये कायम असतो. अर्थ पहिल्यावर मैत्रीण असा दिसला. गडी चे स्त्रीलिंग गडिण किंवा गडणी हे फार मजेशीर आहे. सवंगडी किंवा गडी ची उत्पत्ती काही कळाली नाही.

* गडी ची उत्पत्ती
>>>> [सं. घट् = जुळणें, एकत्र होणें, घट, घड; तुल॰ का. गंडियु = एकत्र आणणे]
दाते शब्दकोश

बहुतेक ही वाटते आहे. ?

राजाच्या रंगम्हाली या गाण्यात गडनी - सजनी असे शब्द आले आहेत.

गडी या शब्दाचा एक अर्थ मित्र असा आहेच ना. आपण मित्राला गड्या (गड्या आपला गाव बरा) वगैरे म्हणतोच की.

डॉक्टर, तुम्ही दिलेली व्युत्पत्ती योग्य वाटते आहे.

'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या जुन्या मराठी सिनेमातील मंगळागौरीच्या गाण्यात घागरी फुंकतानाच्या ओळीतही 'गडनी' येते.

घुमू दे घागर घुमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
गडनी घागर फुकतीया, मागं नी म्होरं झुकतीया
( https://www.youtube.com/watch?v=yN4Wbiq6HhE इथे २.४० ला )

तसंच, वाट पाहूनी जीव शीणला या साधी माणसं चित्रपटातील गाण्यातही 'सखे, गडनी' असे शब्द येतात.
( https://www.youtube.com/watch?v=PzLbfbFgbvU )

घट् धातूपासून आलेला अजून एक शब्द.
गट्टी
आणि कट् cut म्हणजे चालता हो ह्या इंग्रजी धातूवरून कट्टी!

निस्तुक= तिरस्कारपूर्ण
उदा. खालील काव्यपंक्ती
लाज सोडता खाज भागते
या डोळ्यांच्या निस्तुकपणाची

https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80/word

इथे अजून एक छान अर्थ दिसला. गळ्यात हात घालण्याची क्रिया. नाचताना किंवा खेळताना गळ्यात हात घालतात. मग ते गडी किंवा गडणी.

* निस्तुक >>> वेगळाच आहे; प्रथमच ऐकला.
शब्दकोशात त्याची अनेक रूपे आणि विविध अर्थ दिलेले दिसतात :

निस्तुष, निस्तोष, निस्तुक, निस्तूक [सं.निस्तुष्]
१. तूस, कोंडा नसलेला.
२. काही शेष, अंश नसलेला; पुरा गेलेला (रोग इ.); सर्वस्वी; अगदी; निःशेष; बिलकुल; अजिबात.
३. पूर्णपणे; पुरतेपणी; सर्वथा; व्यंग, न्यून इ.शिवाय; सर्व प्रकारांनी, तऱ्हांनी, अंगांनी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नाबाद 100 !
मराठी भाषेच्या अभ्यासक आणि प्रख्यात व्याकरणपटू यास्मिन शेख यांनी आज वयाची शंभरी पूर्ण केली.
अभिष्टचिंतन !!!

आशीर्वादनुमा आणि शाबासकीनुमा>>>>

हे दोन्ही शब्द जरा विचित्र वाटले. नेहमी हिन्दी/उर्दु बोलायची सवय असलेल्या माणसाने मराठीत बोलायचा प्रयत्न करावा आणि योग्य शब्द न आठवल्यामुळे दोन्ही भाषेतील शब्द जोडुन व्यक्त व्हायचा प्रयत्न करावा असे वाटले Happy

नुमाचा अर्थ वर आलाय का? मला हिंदी/उर्दु/फारसीतला नुमा म्हणजे सारखा असे वाटायचे. फलकनुमा म्हणजे आकाशासारखा असे. अमुक एक सारखा म्हणजे ते अमुक
दर्शवणारा असेही असेल.

(मला हिन्दी/उर्दु/फारसी भेद कळत नाहीत. एक वेळ हिन्दी उर्दु भेद लक्षात येईल पण फारसी आहे हे कळणारच नाही)

मराठी भाषेच्या अभ्यासक आणि प्रख्यात व्याकरणपटू यास्मिन शेख यांनी आज वयाची शंभरी पूर्ण केली.
अभिष्टचिंतन !!!

>>>
खुप खुप शुभेच्छा!!!! खरेच यांच्या बाबतीत जीवेत शरदः शतम खरे झाले. त्यांची सगळी वर्षे शरदाच्या आल्हाददायक महिन्यासारखी गेली असावीत आणि येणारी वर्षेही आल्हादकारक जावोत!!

(आल्हाददायक आणि आल्हादकारक अर्थ सारखेच असावेत ना? आल्हाद देणारा आणि आल्हाद निर्माण करणारा या अर्थे?)

*नुमाचा अर्थ वर आलाय का? >>> होय, त्याच्या दोन्ही अर्थांवर चर्चा झालेली आहे. हे शब्द सई परांजपे यांनी काढल्यामुळे चर्चेचा विषय होऊन बसले Happy
. . .
* दायक = देणारा = That gives, bestows, confers, yields, renders.

कारक
= करणारा; घडवून आणणारा; प्रेरणा देणारा = That does, causes, effects, actuates, produces.
म्हणून,
आल्हाददायक अधिक योग्य वाटते. दुसरा शब्द चूक असेल असे नाही, परंतु अर्थात सूक्ष्मभेद वाटतो आहे.

(पूर्वी यासारख्या मुद्द्यांवर श्रीमती शेख यांनी उपयुक्त लेखन केलेले आहे. त्यांची संपर्क माहिती नसल्यामुळे आता त्यांना विचारता येत नाही ) Happy

धन्यवाद डॉ. आपण योग्य शब्दच वापरले पाहिजेत हेमावैम.

आशिर्वादनुमा म्हटल्याने आकाश कोसळत नाही पण ज्या भाषेत बोलतोय त्यातही ती भावना व्यक्त करणारा उत्तम शब्द असेल, तो वापरला तर बोलण्याचा ओघ अखंडित राहतो असे मला वाटते. श्रोता ऐकत असताना असा अखंडित ओघ महत्वाचा आहे. नाहीतर व्यग्रच्या जागी व्यस्त ऐकावे लागले की दाताखाली खडा आल्यासारखे वाटते तसे होत राहिल.

वर्तमान व भूतकाळासाठी, आल्हाददायक आणि भविष्याकाळासाठी आल्हादकारक असे वापरले आहे का?
आनंद देऊन गेली आहेत म्हणून आल्हाददायक, पुढची वर्षे यायची आहेत अजून, ती सुद्धा आनंद निर्माण करणारी असो म्हणुन आल्हादकारक?

दोन वंशांच्या, दोन धर्मांच्या, दोन जातींच्या व्यक्ती एकत्र येऊन त्यांना झालेल्या संततीला हिणवले जाते. वंशशुद्धी महत्त्वाची मानून इतर अनेक गोष्टी आल्या. तोच प्रकार दोन भाषांच्या संकरातून बनलेल्या शब्दाकडे पाहताना होतोय का? एका भाषेतले नाम / क्रियापद आणि त्याला दुसर्‍या भाषेतला उपसर्ग / प्रत्यय लागून घडलेले बरेच शब्द आता आपल्या अंगवळणी पडले आहेत. त्यांचं मूळ काय हा प्रश्नही क्वचित पडतो.

आल्हादकारक हा शब्द बरोबर आहे कारण तो कोशात आहे : https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%...

त्यांची उदाहरणे अशी आहेत :
आल्हादकारक सुगंध, आल्हादकारक पद्यरचना; आल्हादकारक कलानिधी.

Pages