हैदराबाद गटग - डॉ. कुमार सोबत- ०१ जून २०२५

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 May, 2025 - 08:58

तर हैदराबादकरहो,

पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.

तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9

भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.

तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.

https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8

कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.

गटगला यायचंच हं!

आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:

वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५

शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…

निवासी गटगचा पहिला फोटोनिवासी गटग चा पहिला फोटो

सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.

मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगतानाएक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…

एका घुमटाखाली माबोकरबरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!

माबोकर गोलकोंडा पाहतानामाबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना

सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.

सात जणांचा फोटोजेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)

दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!

फानुस हॉटेलात काही माबोकर्सफानुस हॉटेलात काही माबोकर्स

प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.

पदार्थांचे फोटोहलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश

रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
रिकाम्या टेबलाचा फोटो

आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.

सूप दोनसूप आलं

त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.

कुमार१ चे अभिवाचनकुमार१ यांचे अभिवाचन

यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.

वेज बुलेट्सवेज बुलेट्स १

चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिशचिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश

नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.

दम की बिर्याणीदम की बिर्याणी

शाही तुकडा आणि खुबानी का मीठाशाही तुकडा आणि खुबानी का मीठा

मिपाकरांचा लॉबीमध्ये फोटोलॉबीमध्ये एक फोटो काढला

पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैद्राबाद गटग वृत्तान्त :
या वर्षाच्या सुरुवातील भायखळ्याला झालेल्या कुमार सरांच्या गटग मध्येच या हैद्राबाद निवासी गटगचे पडघम वाजले होते. मुंबई पुण्याबाहेर एखाद गटग करू अशी अभिनव संकल्पना कुमार सरांनी मांडली आणि आम्ही ती उचलून धरली, इतकच. ठिकाण हैद्राबाद पण लगेच ठरलं कारण मानव पृथ्वीकर या भन्नाट मायबोली आयडीला भेटायची उत्सुकता सगळ्यांना आणि मला अधिक. त्यामुळे त्यांना भेटायला नवाबाच्या शहरातच जायला लागणार. ग्रीष्माचा उष्मा नको म्हणून जूनमध्ये जायचं ठरलं. त्यानंतर अजून पाच महिने आहेत म्हणून नुसता वेळ घालवला. पण अधेमधे आपल्याला जूनमध्ये जायचंय याची आठवण कुमार सर करून देत होते. कामाचे, घरचे सगळे पत्ते फिसून झाले आणि सर्वानुमते ३०-३१ मे- १ जून अशी तारीख ठरली. त्यानुसार सगळ्यांनी प्रवासाची बुकिंग केली. तिकडे नवाबाच्या शहरात मानव बरोबर वामन यांनी संयोजक पद स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने गटगचे बिगुल वाजले. मा-वा संयोजक यांनीं सर्व कार्यक्रम आणि खादाडीच्या जागा, मेनू ठरवला. ते सगळे वाचूनच नवाबी थाट जाणवू लागला.
ट्रेनने दुपारी पोचलो. हॉटेल रेल्वे स्टेशनपासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होते. स्नानादी कर्मे आटोपून जेवायला बसलो तोच मा-वा जोडी स्वागताला हजर. नमस्कार चमत्कार झाल्यावर जेवणावर आडवा हात मारला आणि निघालो गोलकोंडा किल्ला पाहायला. त्याआधी आम्ही तो राजकारणी काढतात तसा तो हात हातात धरून फोटो काढला. "फिरावे परी आधी फोटो काढुनी घ्यावे" या उक्तीचा पुरेपूर अवलंब केला. वामन यांनी खास त्यांचा डिजिकॅम तेवढ्याच साठी आणला होता. भलताच रसिक माणूस. गोलकोंड्याला (मराठीत गोवळकोंडा) पोचल्यावर सर्वानुमते गाईड घ्यायचा ठरला. मग त्याने आम्हाला मस्त किल्ल्यातील रहस्य, इतिहास, याबद्दल माहिती सांगितली. काही विशेष जागा त्याचे स्थापत्य, त्यातील अद्भुत रचना प्रात्यक्षिकासह दाखवल्या. एका भिंतीजवळ केलेली कुजबुज दुसऱ्या भिंतीला कान लावून ऐकल्यास स्पष्ट ऐकू येत होती. तर मुख्य दारात वाजवलेली टाळी वर किल्ल्याच्या टोकावर ऐकू जाईल अशी रचना केली होती. एकात एक कमानी केल्याने आत हवा खेळती राहत होती तसेच सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करून सगळीकडे प्रकाशाची सोय केली होती. अश्या एक ना अनेक गोष्टी दाखवल्या. एका राणीच्या बाथ टबमध्ये एक उत्साही माबोकर फोटो काढायला उतरला. फोटो काढून झाल्यावर त्याला काही वर येत येईना मग बाकी सगळ्यांनी त्याला धरून वर काढला. आता सगळे बऱ्यापैकी दमल्याने आणि सूर्यास्त झाल्यावर वेळ संपत आल्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि रूमवर आलो. फ्रेश झालो. आता गप्पांची मैफिल रंगली. स्वतःबद्दल, काम आणि छंद, मायबोलीवरचे अनुभव अश्या अनेक विषयांवर चर्चा झाली. तेवढ्यात श्रीगणेशांचे आगमन झाले. प्रसन्न, सुहायस्यवदनी व्यक्तिमत्व. बोलणे मृदू आणि लाघवी (हा शब्द वापरायचा होताच पण यांना तो अगदी चपखल बसतोय). नुसते ऐकत राहावे असे. मायबोलीची हीच जादू आहे कुणीही पहिल्यांदा भेटला तरी जणू जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा मारतो. गप्पाना अगदी रंग चढला होता. शेवटी वेळ पाहून पोटोबा साठी जवळच्याच ग्रँड हॉटेलमध्ये गेलो आणि बिर्याणीवर ताव मारला. तिथून परत आलो तरी गप्पा चालूच, शेवटी दीड दोन वाजता निद्रादेवीला शरण गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी कर्मे आवरून मी, कुमार सर, संजय भावे व सतीश अशी चौकडी बाहेर पडलो. आधी हैद्राबादचा आयकॉनिक चारमिनार पहिला. चौथ्या मजल्यापर्यंत जाता येते. तिथून मस्त हवा अनुभवत हैदराबादचा विहंगम नजारा पाहता येतो. चारमिनारच्या खालीच भाग्यलक्ष्मीचे मंदिर आहे. त्यानंतर आम्ही सालारजंग वस्तुसंग्रहालय पाहायला गेलो. अतिशय भव्य आणि आवर्जून पाहावे असे हे संग्रहालय आहे. आत गेल्यावर विविध दालने आहेत. मूर्ती, पेंटिंग्स, कलाकुसरीच्या वस्तू, दागिने, वस्त्र, हस्तलिखिते, खेळणी, संगमरवर, चिनीमाती अशी विविध दालने आहेत तर चीन, जपान, आग्नेय आशिया, युरोप अशी देशनिहाय दीर्घा आहेत. मानवदा सुद्धा आता आले होते. प्रचंड वस्तूंचा संग्रह आहे. पायाचे तुकडे पडतात पण सगळं पाहून होत नाही. फोटो काढून माझ्या मोबाईलची बॅटरी संपली पण सगळं बघून झालं नाही. इथे एका जुन्या घड्याळाचे तासाचे ठोके पाहायला गर्दी जमते. आता सगळे पाहून थकल्यावर इराणी चाय व ओस्मानिया बिस्किटे खाऊन आम्ही रूमवर आलो. बाजूच्या जगदीश मार्केट नावाच्या बाजारात गेलो. साधारणतः मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट किंवा मनीष मार्केट सारखे आहे. काहीही खरेदी न करता एक प्लेट पाणीपुरी खाऊन मुमुक्षु वृत्तीला जागून रूमवर आलो. (मुमुक्षु - मुंबईच्या मुंबईकरांची क्षुधापूर्ती). रात्री फानूस नावाच्या हॉटेलवर नवाबी बेत खायला गेलो. हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल ब्रेड, तलावा गोश, चिकन बिर्याणी असा दमदार मेनू खाल्ला. मायबोली वृतान्तासाठी या मेनूचे फोटो काढताना, बाकीचे आमच्याकडे "काहांसे आते हे ये लोग" असे भाव आणून पाहत होते. बरं फानूस म्हणजे कंदील. तेवढं उर्दूच ज्ञान. नवाबाच्या राज्यात नाही का आपण. अश्या प्रकारे दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.
आता तिसरा दिवस उजाडला. आज मुख्य गटग (अजून बाकी आहेच Lol ). सकाळी हॉटेलवर नाश्ता करून गटग साठी तयार झालो. वामन- मानव आले आणि आम्ही हॉटेलच्याच मागे असणाऱ्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. अत्यंत देखणे आणि अगदी नवाबी थाटाचे हॉटेल. खिडक्यांतून दिसणारे विहंगम दृश्य फारच सुंदर. हॉटेलचे अंतरंग अगदी राजेशाही होते. जागा अगदी अप्रतिम.उत्तम जागा हे सध्याच्या सगळ्या गटगचे वैशिष्ट्य म्हणावयास हवे. जागेचे मनसोक्त फोटो काढले. सूप मागवले. खरं तर व्हेज क्लियर सूप म्हणजे साधे सूप पण हैद्राबादी, नवाबी थाट म्हणजे त्यात भाज्यांचे तुकडे पक्षाच्या आकारात कापून टाकले होते. हाच तो शौक. त्यानंतर कुमारसरांनी “असे देश, अशी नावे” या लेखाचं अभिवाचन केले. अतिशय सुंदर संकल्पना व सादरीकरण. त्यानंतर आले स्टार्टर्स - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश. त्यानंतर बरीच चर्चा करून बिर्याणी मागवली. शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा मागवला. अशी शाही मेजवानी संपवून बाहेर पडलो. पानाचे विडे खाऊन उरली सुरली चर्चा रंगवत रूमवर आलो. त्यानंतर मी निघालो. आणि दुसऱ्या दिवशी कुमार सर व सतीश निघाले. संजय भावे रामोजी सिटी पाहायला निघाले. अश्या पद्धतीने शाही गटगची सांगता झाली.

उपसंहार:
या गटगची अभिनव संकल्पना कुमार सरांची होती. तर संपूर्ण गटगचे नियोजन मानवदा आणि वामन राव यांचे होते. दोघांनीही अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता. जागा, हॉटेल, पदार्थ यांची निवड उ त्त म. तीन ठिकाणच्या तर नुसत्या बिर्याण्या खाल्य्या आम्ही. दोघांचेही खूप खूप आभार. संजय भावे आणि सतीश यांनी सुद्धा खूप छान कंपनी दिली. दोघेही जुने मित्र असल्यासाखे वागत होते. श्रीगणेशा तर फारच प्रसन्न व्यक्तिमत्व. या गटगच्या निमित्ताने खरंच वेगळा नितांतसुंदर अनुभव अनुभवता आला. गटगकरांबरोबर ऋणानुबंध अधिक घट्ट झाले. यासाठी मायबोलीचे आणि मायबोलीकरांचे धन्यवाद. लोभ आहेच तो अधिक वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा.

न भूतपूर्व न कदापि वार्ता, निवासी गटग न कदापि श्रुत्वा।
तथापि इच्छा माबोकरस्य, सर्वे गटगंज भवन्ति।।

इत्यलम्

तुझ्या वृ ची वाटच पाहात होते, ऋतुराज! Happy एकदम मस्त लिहिलंय. डिटेलमधे. वाचायला मजा आली.

मुमुक्षु - मुंबईच्या मुंबईकरांची क्षुधापूर्ती >>> Proud

शेवटचा श्लोक जबरीच.

मुमुक्षू- हे भारी आहे. मायबोलीकर शब्द नुसते कॉईन करत नाहीत, तर आधीच अस्तित्वात असलेल्या शब्दांचा अर्थ, संदर्भ, अ‍ॅप्लिकेशन- सारं बदलून टाकू शकतात. काय पॉवर! Proud

या गटगवर एखाद्या नॉनगटगकरानेच खुसखुशीत ललित किंवा स्फुट लिहावं इतकं हटके आणि हटके पद्धतीने हे गट्ग झालं आहे. मला तर काल्पनिक वृ लिहावा वाटायलाय Proud

मला तर काल्पनिक वृ लिहावा वाटायलाय>>
नेकी और पूछ पूछ
.
Rmd
साजिरा
दोघांच्या पोस्ट ला मम

साजिरा, पूर्णपणे काल्पनिक गटगचा काल्पनिक वृत्तान्त लिहून टाका. धमाल होईल. Happy

ऋतुराज- मस्त मस्त. मीही वाट बघत होते. Happy
लाघवी, मराठीत गोवळकोंडा आणि गटगंज Lol
मुमुक्षु व शेवटचा श्लोक जबरी आहे.

ऋतुराज- मस्त मस्त. +१११ . लढ बाप्पू !

* तो राजकारणी काढतात तसा तो हात हातात धरून फोटो
>>>> त्या फोटोत इंडिया मिंटीया आघाडी झालेली आहे
= महाराष्ट्र अधिक तेलंगणा Happy

अरे काय मस्त वृ लिहीला आहेस! आवडला एकदम!

न भूतपूर्व न कदापि वार्ता, निवासी गटग न कदापि श्रुत्वा।
तथापि इच्छा माबोकरस्य, सर्वे गटगंज भवन्ति।। >>> Lol

ऋतुराजना भेटून तर मला तरुण मुकेश अंबानींना भेटल्यासारखे वाटले!>>>>>>>
ऋतुराज मुकेश अंबानी सारखे नाही तर संजीव कुमार यांच्यासारखे दिसतात >>>
मला तो त्या पायरीवरच्या गॉगल वाल्या फोटोत सुबोध भावेसारखा वाटला. >>>>>>>>
मुकेश अंबानी, संजीव कुमार की सुबोध भावे?.
नक्की काय ते ठरवा लोकहो.
नाहीतर "सही रे सही" मधल्या भरत जाधव सारख्या तीन तीन भूमिकेत वावरावं लागेल मला.

हे आगामी मराठी निर्मात्यांकरता कास्टिंग सजेशन म्हणून वेळीच लिहून ठेवतो. आता बायोपिक निघाले तर अ‍ॅक्टरची निश्चिंती आहे. फक्त बायोपिक निघावे असे काहीतरी करण्याची जबाबदारी ऋतुराजची>>>>>
फा, म्हणजे मी नक्की काय करायचंय? :कोड्यात पडलेल्या चेहऱ्याची बाहुली:

मुकेश अंबानी किंवा संजीव कुमार असेल तर ती भूमिका सुबोध भावेच करतील.

माझी गटग मधील उपस्थिती बद्दल सुरुवातीला बऱ्याच शंका निर्माण झाल्या होत्या Light 1 Lol

>>> हैद्राबाद गटग वृत्तान्त :

अतिशय उत्तम जमलाय, ऋतुराज. एकदा वाचून समाधान झालं नाही, अनेकदा वाचलं. तुझ्या लिखाणाचा पंखा झालोय!

अरे वा! छान वृत्तांत
मला मेनूवरुन तो पदार्थ दिसायला कसा असेल? चव नेमक कोणती हे अजिबात समजत नाही. शिरा, पोहे असे म्हटले की कसे डोळ्यासमोर चित्र उभे राह्ते. त्यामुळे इथे नावे दिली हे फार बरे केले माझे अज्ञान काही अंशी दूर झाले. बाकी तीर्थप्राशन वगैरे काही? त्याशिवाय मजा नाही. का फक्त फोटोत टाकले नाही?

जबरी गटग झालं आहे. सगळे आहेत गपिष्ट म्हणजे वेळ कमी पडला असणार.
गोलकोंडा- दारात टाळी वाजवली की किल्ल्यावर ऐकू येते हे प्रात्यक्षिक करून पाहिले का? माझा हा प्रयोग हुकला होता.

>>" रामोजीचे फोटो आहेत का ?">>
@ अस्मिता: हो भरपुर आहेत. दहा वर्षांपुर्वी बघितलेल्या आणि आताच्या रामोजीमध्ये खुपच चांगले बदल झालेले आढळले त्यामुळे त्यावर वेगळा धागा काढायचा विचार आहे.

>>"सजवलेल्या चित्ररथांची मिरवणूक निघाली आणि त्यात नाचणाऱ्या कलाकारांसोबत मी देखील मनसोक्त नाचून घेतलं .. नवरा आणि माझी पोरंच होती सोबत म्हणून बरं ..तरी माझ्या पोरांनी माझी टिंगल करायची संधी सोडली नाही..">>
@ रूपाली विशे - पाटील: 😀
सजवलेल्या चित्ररथांची मिरवणूक निघाली तेव्हा खुप लोकं त्यांच्या आजुबाजुला नाचत होते ते मी स्वतःच आपले पाय चेपत बघत बसलो होतो. त्यानंतरही इल्युमिनेटेड म्युझिकल गार्डनमध्ये DJ च्या तालावर बरीच मंडळी नाचत होती, पण 'रानु... बोम्बई की रानु' गाणं लागल्यावर चार पर्यटक मुली अचानक अंगात आल्यासारख्या नाचायला लागल्यावर माझ्याही अंगात 'भिकु म्हात्रे' संचारला आणि 'सपने मे मिलती है' गाण्यात तो नाचला होता तशा अविर्भावात मी देखील दुखर्‍या पायांवर अजुन थोडा अत्याचार करत थोडंसं नाचून घेतलं. एकटाच होतो म्हणुन कोणाला टिंगल-टवाळी करायची संधी मात्र मिळाली नाही 😂

>>"पठाणीतून जीन्स टीशर्ट मधे आल्यावर प्रचंड वेगळे दिसतात">>
😀
@ rmd: जीन्स टीशर्ट हाच माझा रोजचा पेहराव आहे. शर्ट्स-ट्राउझर, पठाणी वगैरे ओकेजनली. बाकी झब्बा-लेंगा, सदरा, सलवार-कुर्ता घालायला आवडत नाही आणि जीन्सवर कुर्ता घालण्याचा धेडगुजरी प्रकार स्वतः करणे तर दुररंच, पण कोणी घातलेला बघितला तरी विचित्र वाटते 😂

@ साजीरा: काल्पनिक वृत्तांत नक्की लिहा... हा अभिनव प्रयोग वाचायला आवडेल 👍

ऋतुराजा... अरे कसला सुंदर वृत्तांत लिहिला आहेस मित्रा...
शेवटचा,
"न भूतपूर्व न कदापि वार्ता, निवासी गटग न कदापि श्रुत्वा।
तथापि इच्छा माबोकरस्य, सर्वे गटगंज भवन्ति।।"

हा स्वरचीत श्लोक तर कळस आहे 👍

मानवदा, कुमार१, वामनराव आणि तुझा असे चौघांचे सरस वृत्तांत वाचल्यावर सतीश आणि माझ्यावरचे दडपण वाढले आहे आणि आता आपण काय वेगळे लिहयचे हाच प्रश्न पडला आहे आम्हाला 😀

@ मानवदा:

तुम्ही प्रेमाने देलेला 'पुथुरेकुलु' हा खाऊ माझ्यासहीत घरच्या सगळ्यांना प्रचंड आवडला आहे...👍

चौघांचे सरस वृत्तांत वाचल्यावर सतीश आणि माझ्यावरचे दडपण वाढले आहे ===>
माझ्यावर अजिबात दडपण नाही !!!
नाही म्हणजे नाहीच !!!! Rofl Light 1

मानवदा, कुमार१, वामनराव , ऋतुराज ह्याना पुन्हा धन्यवाद .. //\\

संभा .. तुमचा खुसखुशीत वृत्तांत येउद्या .

पुथुरेकुलु मुंबई एयरपोर्ट वर भेटत आहे.. बहुतेक .

>>"माझ्यावर अजिबात दडपण नाही !!!
नाही म्हणजे नाहीच !!!!">>

वृत्तांत लेखन टाळण्यासाठीचा हा बहाणा अस्वीकार्य आहे, आणि मुख्य गटगच्या 'ब्रँड अँबेसेडरला' तर अगदीच अशोभनीय आहे 😂
तेव्हा समरोपाचा वृत्तांत तुझ्याकडुनच यावा अशी आग्रही मागणी मी ह्याठिकाणी करत आहे....

>>"पुथुरेकुलु मुंबई एयरपोर्ट वर भेटत आहे.. बहुतेक .">>
अरे वाह! 'अलमंड हाऊसचा' मिळत असेल तर जाम भारी काम होईल 👍

हैद्राबाद गटग निवासी व पर्यटन --

जानेवारीमध्ये कुमार सरांच्या मिनी गटगमुळे ऋतुराज, संजय भावे (संभा) यांचा संपर्क झाला होता. मी 20 वर्षे माबो वर मुख्यत्वे “रोम” सदस्य .. Happy (इतके अफाट, अनमोल लेखन माबो वर आहे.. तर आपण काय लिहावे आशा विचाराचा.. मी पामर . )

ऋतुराजनी वर सांगितल्याप्रमाणे आम्ही हैदराबाद गट नियोजन करत होतो, त्याच वेळेस गटग सोबत पर्यटन याही बाबतीत चर्चा झाली..
तारखा ठरल्यानंतर कुमार सरांनी मानवदा बरोबर संपर्क केला, गटगच्या काही दिवस अगोदरच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मानवदा व वामनराव यांचाही संपर्क झाला ..

तारखा व दिवस पक्के असल्यामुळे मानवदा व वामनरावांनी हैद्राबाद मधील हॉटेल व पर्यटनाचे विविध पर्याय तसेच खानपानाचेही पर्याय चर्चेत आणले..
हलीम व बिर्याणी चे वेध .. माबोच्या धाग्यावर ही सुरू झाले होते..

वामा चे नियोजित नियोजन बघून आमचाही उत्साह अगदी द्विगुणीत झाला होता, माबो चा धागा ही जोरात वाहत होता..
आणि हा निवासी गटग काहीतरी वेगळा ठरेल याची चाहूल लागली व प्रचंड उत्साह वाढला होता ..

मी, ऋतुराज सीएसटी वरून तर संबा कल्याण वरून मार्गस्थ झालो (मुंबई लोकलच्या लहरीपणामुळे त्यावेळेस फक्त सहा मिनिटे अगोदर बाकी असताना ट्रेन पकडली.. हा तसा स्टंटच होता Uhoh !!!)

हा माझा तसा पहिलाच गटग, कुमारसरांबरोबर भायखळ येथे एकटाच भेटलो होतो, ऋतुराज बरोबर एकदा, मानवदा बरोबर तीन वर्षांपूर्वी ऑनलाइन चर्चा ..

वामा यांच्या नियोजनामुळे हैदराबादला उतरल्यापासून काय करायचे? किंवा कसे करायचे?? ह्याबाबाबत आम्हाला काहीही करायचे नव्हते। त्यांनी इतके सुनियोजित पर्याय ठेवले होते, की , आम्हाला फक्त "मम" करायचे होते !!!

गटगचे इतके सखोल वर्णन कुमार सर, मानवदा, वामनराव, ऋतुराज, गणेश यांनी लिहिले असताना माझ्यासारख्या पामराला काय गरज.. Wink

हा गटग माबो आणि मिपा या दोघांचा म्हणता येईल, गटगचे आम्ही प्रचंड धमाल, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक वेगळेपणा अनुभवला, आम्हा सात जणांचा घट्ट मैत्रीचा बंध निर्माण झाला :).

निवासी गटगचे हा पर्याय पुढे येईल असे दिसते..

* आम्हा सात जणांचा घट्ट मैत्रीचा बंध निर्माण झाला >>> अगदी अगदी !

सतीश,
तिथल्या एका रात्री पहाटे तीन ते चार दरम्यान आपण मारलेल्या मनसोक्त गप्पांची लज्जत काही न्यारीच होती.
बस्स ! यथावकाश असा योग पुन्हा येवो Happy

>>>>>>घट्ट मैत्रीचा बंध निर्माण झाला
एवढ्या गटगंमधलं, एक सुंदर वाक्य वाचलं.

या गटग विषयी कुमार सरांनी विचारलं होतं. पण मला नंतर भाग घेणे शक्य झाले नाही अन्यथा या सुंदर सुंदर फोटोंत कुठेतरी मीही असतो Happy खूप छान एकदम शाही गटग झालेलं दिसतंय. वृत्तांत सुध्दा खुमासदार. कुमार सर माफ करा उशिरा वाचतोय हे सारे.

Pages