मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिलबी बघण्याच धाडस केलं.
केवळ नावाला जागावं म्हणून जिलब्या पाडण्याचे 10 seconds चे 2 प्रसंग आहेत.
एक चांगला thriller झाला असता पण सगळ्यांनीच पाट्या टाकल्याने बट्टयाबोळ झाला.
ती नेहा किती वैताग आहे. काय अभिनय , काय संवादफेक.
विजय करमरकर , ACP प्रद्युम्नसारखा विवेक , सचिन , फ्रेडीला घेऊन फिरत असतो. (त्यातला एकही दया किंवा अभिजीतच्या तोडीचा नाहीये)
पाटीलकाका सौरव-गौरवपेक्षा बरेच तरुण दिसतात .
त्या मुसलमान गुंडाच नाव पप्पू का असावं.
त्याची आपा त्याच्या पेक्षा लहान दिसते.

कसला योगायोग ! आईने गुलाबजाम लावलाय. (आईने अकबरी च्या चालीवर वाचू नये)
सहज हॉलमधे जाऊन आले तर भोजन चालू होतं .कोथिंबीर वडी केलीये त्यात.
पुढच्या पिक्चरचं नाव सापडलं.
चकली, करंजी, अनारसे, खमण ढोकळा, बाकरवडी हे पिक्चर पण येतीलच.

सर
हिंदी से मराठीमे लाया है. अब फिर हिंदीमे जाना है .
हा म्हणजे नेटफ्लिक्स वरील हिंदी मूवी. अभिनेते फक्त मराठीत बोलतात!

भाडिपा उद्या, म्हणजे 15 ऑगस्ट रोजी, भाडिपा टॉकीज ही नवी ऑनलाईन वाहिनी सुरू करत आहे. निवडक मराठी चित्रपट त्यावर बघता येतील. मोजकं शुल्क त्यासाठी भरावं लागणार आहे.

या वाहिनीचा पहिला चित्रपट ' कासव ' आहे. सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळालं आहे. इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

16 ऑगस्टपासून हा चित्रपट भाडिपा टॉकीजवर बघता येईल.

थॅंक्स. वेबवर सर्च केले तर मार्केटिंग फारसे दिसत नाही. एक इन्स्टा पोस्ट दिसली. ती त्या अ‍ॅपवर शोधतो आता. देशाबाहेरही पाहता येतील का बघतो.

एप्रिल मे ९९ पाहिला. ठीक ठाक. फ्रेम्स छान आहेत संपूर्ण सिनेमात. मुलांची आणि साजिरी जोशी चे काम आवडले. मोठ्यांची कामे मात्र अजिबात आवडली नाहीत. त्या भटीण काकू चे तर अजिबातच नाही, बऱ्यापैकी मोठा रोल आहे त्या पात्राचा. दुसरी एखादी चांगली अभिनेत्री घ्यायला हवी होती त्या रोल साठी. एकदम चकचकीत वाटला सिनेमा. फार कनेक्ट झाला नाही. किल्ला जास्त आवडला होता ह्यापेक्षा.

मला आवडला जारण. जो काही त्याचा जॉनर म्हणताय सायकोथ्रिलर, हॉरर त्यातले आवडतात मला सिनेमे जनरली फार पिसं न काढता.
अमृता सुभाषची अ‍ॅक्टींग आहेच प्रेडीक्टेबल. त्याने मला काही फरक पडला नाही.
गंगुटीचे दात लय डेंजर वाटले Proud अनिता दाते चं थोडंसंच काम पण मस्त आहे. तिचा अजून थोडा रोल हवा होता.
तो राहुल जोरजोरात दार वाजवतो त्या प्रसंगाची भिती वाटली मात्र. हे काय भास की खरा? मी पण गोंधळले २ मिनिट.
त्या सायकॅट्रीस्ट डॉ. ला कुठून मी हिच्याकडे गेले असं झालं असेल.

Happy चिनूक्स, भाडिपा टीमचे अभिनंदन व त्यांना उत्कर्षासाठी शुभेच्छा. येथे उपलब्ध असल्यास बघेन. कासव बघायचा राहिला आहे, त्याचीही नोंद घेतली.
गूगल करून शोधून आले, सापडत नाहीये काहीच. येथे देता येईल का?

मागे "प्लॅनेट मराठी" नावाची सर्व्हिस फक्त मराठी चित्रपटांसाठी घेतली होती. ते सतत ओटीपी मागायचे, जो (मेंबरशिप) ज्याच्या फोनवर येईल त्याला विचारून मगच दुसऱ्याला बघता यायचे व वर्षानुवर्षे नवीन कंटेन्ट यायचं नाही म्हणून काढून टाकले. आता ॲप किंवा स्ट्रिमिंग सर्व्हिसेस स्मार्ट, युजर फ्रेंडली हवेत. त्यांची स्पर्धा नेटफ्लिक्स, एचबीओशी आहे. कंटेट वाईजच नाही तर टेक्निकली सुद्धा म्हणत आहे. हा फीडबॅक (जनरली) मराठी स्ट्रिमिंग सर्व्हिसेस टीम पैकी कुणी वाचत असेल तर पोचवायला म्हणून नोंदवून ठेवते आहे.

जारण मला फारच बोर झाला. अ. सुभाष फारच विचित्र दिसलीये. तुटकतुटक सीन असले तरी कथेची छान संगत लागु शकते पण यात सगळंच विस्कळीत.
गंमत म्हणजे खूप दिवसांनी अशोक सराफांना पहायला मिळाल्याने ‘अशी ही जमवाजमवी‘ पहाताना मज्जा आली. त्यांचा तो जुना टिपिकल चेहराभिनय पहायला बरं वाटलं. वंदना गुप्तेंचा चेहरा विचित्र दिसलाय पण त्यांचाही तो दचकल्याचा, भेदरल्याचा, रागावल्याचा अभिनय पहायला मजा आली.

ता. क., इथे सर्वांना जारण आवडलाय त्यामुळे मला मारु नका.

अस्मिता,

गूगल करून काहीच काय सापडले नाही, ते कळले नाही.

कासवबद्दल बरंच लेखन मायबोलीवर आहे. मायबोली या चित्रपटाची माध्यम प्रायोजक होती.

भाडिपाच्या वाहिनीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास ती इथे एकदोन दिवसात देईन.

चिनूक्स कासव ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
भाडिपाशी मायबोलीचा संबंध आहे का ?

त्यांचं एक खादाडी आणि भटकंतीचं चॅनल मध्यंतरी फॉलो केलेलं. लेह लडाखचे एपिसोडस पाहिले.
नंतर खादाडी करताना प्रत्येक पदार्थ मी कसा खातो आणि त्याची चव सांगताना " उम्म्म , क्या बात " हे बोअर झालं Lol

अमितव हो थेरपिस्ट Proud

प्लॅनेट मराठी बद्दल अस्मिताला +११११
मी पण पैसे भरले होते एके काळी...नंतर काही आलंच नाही त्यावर!

बादवे! इथे आपलीमराठी.कॉम ओळखणारे कोणी आहेत का? Happy ती पण साईट डोनेशन पेड टाईप्स होती.

खूप पूर्वी एका प्रिमियर साठी मोहन आगाशे आले होते तेव्हा ते त्यांच्या भाषणात म्हणाले होते तुम्ही आपलीमराठी वर सगळे सिनेमे पाहत असाल.. Proud गेले ते दिन गेले

'कासव' बघितला आज भाडिपाच्या वाहिनीवर. कधीपासून हा बघायचा राहिला होता.
खरं सांगायचं तर खूप नाही आवडला. अर्थात 'सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर स्टँडर्ड'च्या मानाने (माझ्यासाठी हा स्टँडर्ड दोघी, देवराई, दहावी फ, वास्तुपुरुष आणि अस्तु हे चित्रपट आहेत.) नाही आवडला. मी अपेक्षा जास्त ठेवल्या होत्या बहुतेक. आलोक राजवाडेचं काम मात्र आवडलं.
नेमकं काय आवडलं नाही- हायवेच्या कडेला असलेल्या एका ढाब्यावर पडून राहिलेल्या आजारी मुलाला-ज्याचं नावगावफळफूल माहिती नाही- जानकी कोकणात आडगावी घेऊन जाते, हे पटलं नाही. तिथे त्याचं काही कमीजास्त झालं असतं तर जबाबदारी कुणाची?
त्याची सावत्र आई येते ती जणू काही एखाद्या परिसंवादात भाग घ्यायला यावं तशी वेशभूषा करून येते आणि तशाच प्रकारे बोलते. तडकाफडकी दिल्ली ते पणजी आणि पणजीहून गाडी करून येऊन कुणी इतक्या अलिप्तपणे बोलेल का? ती सांगते त्यावरून त्याचे आजीआजोबा गेल्यावर तो कुठे आहे याचा यांना (सावत्र आई आणि सख्खे वडील) पत्ता नाही आणि ते शोधायचा प्रयत्नही करत नाहीत. हा काय प्रकार आहे?
एकूण अनेक वेळा गोष्टी कृत्रिम वाटल्या.
सुरुवातीचे निःशब्द सीन्स आणि त्यातून उभं केलेलं मानवचं व्यक्तिमत्त्व मात्र अतिशय आवडलं. अतिशय ताकदवान चित्रण.

अर्थात 'सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर स्टँडर्ड'च्या मानाने (माझ्यासाठी हा स्टँडर्ड दोघी, देवराई, दहावी फ, वास्तुपुरुष आणि अस्तु हे चित्रपट आहेत.) नाही आवडला
+१
मी हा सिनेमा अमेरिकेत थियेटर मध्ये पाहिला. पण तरीही हे विधानही भावे-सुखथनकर टीमचे एका प्रकारचे कौतुकच आहे व सिनेमा स्वतंत्र रित्या मस्ट वॉच आहे हेही खरे.

तुमचा अभिषेक ने केलेला नाळ २ चा रीव्तू पिक्चर बघितला. आवडला हटके विषय निवडलेला आहे. म्हणून आही बाह्य चित्रण अतिशय सुरेख आहे. outdoor shooting जिथे केले आहे तो कुठला प्रदेश आहे?

जारण पाहिला. खूप आवडला नाही पण ठीक वाटला. अमृता सुभाषचा अभिनय (कायिक, वाचिक) नेहमीच अतिशय उग्र आणि लाऊड वाटतो. आवडतच नाही. पण इथे मनोरुग्ण म्हणून तेच चपखल वाटते तरी थोडे जास्त वाटते. फारच रेस्टलेस वाटते ही, कुठेही - कधीही. सुरवातीला रेंगाळतोय असे वाटले, शेवटच्या अर्ध्या तासातच सगळं घडतं. सर्वांचा अभिनय चांगला आहे. बहुतेक गोष्टींचा अंदाज आधीच येतो, तरीही काही धक्के चांगले जमलेत. अमृता सुभाष सोडून सगळं नैसर्गिक वाटतं. तीच जरा "जास्त" करते. अनिता दातेचे काम उत्तम आहे, पण थोडे आहे. सिनेमाच थोडा वाढवून तिचे फुटेज वाढवायला हवे होते असे वाटले.

कथा शेवटी हॉरर का सायकॉलॉजीकल थ्रिलर हे आपल्यावर सोडलेय. मल्याळम सिनेमा टाईप क्लिफहॅंगरम्! Happy
फार भारी वाटला नाही, पण ठीक आहे.

@केशवकूल
नाळ २ शूटिंग – पिंपळगाव, जुन्नर

गेल्या आठवड्यात जारण, एप्रिल मे १९९९ आणि आता थांबायचं नाही पाहिले.
जारण आवडला. रानभुली म्हणतात तसा उत्तम सायकोथ्रिलर. सस्पेन्स शेवटपर्यंत मस्त ठेवलं आहे. अनिता दाते अभिनय छान वाटला. सुरुवातीच्या समया मात्र खटकल्या.

एप्रिल मे १९९९
एक नितांतसुंदर अनुभव. कोकण आणि त्यातील निसर्गसौंदर्य, सगळ्या फ्रेम उत्तम दाखवल्या आहेत. चौघांचा अभिनय, देहबोली, कपडेपट अगदी छान. त्या काळातील काही शालेय किंवा पौंगडावस्थेतील स्थित्यंतरे खूप छान टिपली आहेत.
वावे म्हणतात तसे गुढीपाडवा मार्च महिन्यात येतो. पण मी एकदा गावी सुट्टीला असताना गुढीपाडवा आला होता. नक्की आठवत नाही. मुद्दाम पाहिले तर १९९९ ला मार्च मध्ये गुढीपाडवा होता. मुलीने त्या काळात पिरियड असा शब्द वापरणे आणि समवयस्क मुलांशी त्याबाबत चर्चा करणे हे जरा झेपले नाही. परंतु एकदा बघावा असा सिनेमा.

आता थांबायचं नाही आवडला. सत्यघटनेवर आधारित आहे. सगळ्यांची कामे मस्त. आजूबाजूच्या या सफाई कामगाराच्या जीवनाचे दर्शन, त्यांच्या वेदना अगदी मनाला भिडतात.

नेटफ्लिक्सवर 'सायकल' नावाचा एक अप्रतिम चित्रपट आहे. तोही जातोय ८ सप्टेंबरला, जरूर पाहावा असा. साधासुध्या आणि अतिशय गोड माणसांची गोष्ट आहे.

कोकणातील भूगावातला एक साधा, सज्जन लांबून येणाऱ्यांना जेऊ घातल्याशिवाय जाऊ न देणारा ज्योतिषी- ऋषिकेश जोशी आपल्या वडील, बायको आणि पेढ्यासारख्या छोट्या मुलीसोबत राहात असतो. ही छोटी मृण्मयी इतकी गोड ममव आहे की बास ! १९५८ सालची कथा आहे. जुनं वातावरण, कौलारू घर, कोकणातलं वातावरण, मंद आणि शांत अशी प्रकाशयोजना आहे. नाट्यसंगीत सुद्धा आहे. या ज्योतिषाकडे आजोबांनी दिलेली - जी त्यांना इंग्रज अधिकाऱ्याने दिलेली सायकल असते. ते दोन चोर - प्रियदर्शन जाधव व भाऊ कदम चोरी करतात. नंतर बऱ्याच गमती होतात. सायकल मधे खूपच जीव असल्याने याला नैराश्य येते, हे चोरांना कळते व त्यांना वाईट वाटतं. संपूर्ण गावात एवढी एकच सायकल असते, त्यामुळे सगळ्या गावाला माहिती असते. चोरांना जिथे जाऊ तेथे सायकलवाला माणूस मुळात फारच सचोटीचा आहे हे कळतं. पुढे तुम्ही पाहा. Happy

अतिशय उत्तम कामं आहेत. एकदम जुन्या काळातील कोकणी ममव वातावरण आहे. जरूर पाहा.

सायकल बघितलाय मी. बरेच दिवस झाले. मला तरी नव्हता फारसा आवडला. आता डिटेल्स आठवत नाहीत का नाही आवडला त्याचे. पण मला मुळात चकचकीत (घरं) लालचुटुक (माती), पांढरेशुभ्र (कपडे) वगैरे असलेलं कोकण (माती वगळता इतर गोष्टींसाठी कुठलाही ग्रामीण भाग) बघायला आवडत नाही, कारण ते कृत्रिम वाटतं. याबाबतीत घो मला असला हवा, वास्तुपुरुष, नाळ, थ्री ऑफ अस वगैरे भारी आहेत.

अस्मिता
सायकल पाहिला
युट्युबवर आहे वाटतं
फिल गुड चित्रपट आहे
आवडला होता
ते चोर देखील सचोटीचे असतात बघ

सायकल आवडला होता.
जारण तुकड्यातुकड्यात पहाते आहे. वरती उल्लेख आहे पण मला तरी 'अमृता सुभाष' कळकट वगैरे वाटली नाही.
.
तिच्या आयुष्यात खरं तर २ भेसूर प्रसंग घडून गेलेले आहेत एक त्या गंगुटीने लहानपणी केलेला परिणाम आणि नवर्‍याचा मृत्यु. (मुलगी मेलीये का नाही मला अजुन कळलेले नाही) - त्यामुळे तिच्यावर जो खोल परिणाम झालेला आहे, तो तिने फार परिणामकारक रीत्या दर्शविला आहे. तिच्या जबड्याची, तोंडाची, डोळ्यांची मुव्हमेन्ट. आणि ती एकदा रडत रडत वडीलांना विचारते - "मला शांतीने जगू का देत नाही तुम्ही?" म्हणजे ती डिनायलमध्ये आहे पण कुठेतरी तिला माहीत असावे की तिने काल्पनिक जग निर्माण केलेल आहे.

सायकल ८ सप्टें पर्यंत आहे म्हणजे आहे थोडा वेळ. एलिझाबेध एकादशी मधेही सायकल होती हे आठवले.

सचोटी चोर सिरीज मधे "पंचायत" च्या पहिल्या सीझनमधला एक मॉनिटर चोरी होतो तो भाग आठवला Happy

Pages