मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पात्रांमधल्या अकृत्रिम निरागसतेला तोड नाही, त्यापुढे मला घरं, माती, कपडे अशा भौतिक गोष्टींतले काहीही खटकले नाही. रादर लक्षच गेले नाही म्हटलं तरी चालेल
हो शक्य आहे. माझं लक्ष जनरली अशा गोष्टींकडे जातं. बाकी सगळं/ बरंचसं आवडलं तर मी याकडे दुर्लक्ष करते. पण सायकल इतरही काही कारणाने फारसा आवडला नव्हता. काय ते लक्षात नाही आता.
मागे ती लंपनवरची वेबसीरीज (?) आली होती त्यातही असंच सगळं कृत्रिम वाटलं, शिवाय बाकीही काय काय आवडलं नाही.

>>> मागे ती लंपनवरची वेबसीरीज (?) आली होती त्यातही असंच सगळं कृत्रिम वाटलं, शिवाय बाकीही काय काय आवडलं नाही
मलाही!!

सायकल काहीना आवडला आहे काहीना नाही, मी आजच पाहिला आणि मी न आवडणाऱ्यांच्या गटात. असो.
वेलकम होम ही सगळा बघू शकले नव्हते. अश्या तऱ्हेच्या सिनेमांचा ही एक बाज असतो तोच वाटला मला ह्यात ही. वेगळं काही नाही. मृणाल देव ही आवडत नाहीच. अभिनय एक सुरी वाटतो.
हल्ली बघितले त्यात चंद्रमुखी च आवडला होता त्यातल्या त्यात. जास्त अपेक्षा नव्हत्या ठेवल्या पण तरी आवडला .

वेलकम होम मला अजिबात आवडला नव्हता.
मृ कु चं साचेबद्ध अ‍ॅक्टिंग कंटाळवाणं वाटतं. घरचे, कुटुंबातले डायलॉग सुद्धा खूप साचेबद्ध वाटले. (ते बरेचदा मराठी सिनेमात वाटतातच. 'एकदा काय झालं' सुद्धा मला जरा वेळाने कंटाळवाणा झाला.)

अरेच्चा, हा सुमित्रा भाव्यांचा आहे ना वेलकम होम? मी बघणार होते. म्हणजे बघणार आहेच.

वेलकम होम -

थोड्या वेळाने चिडचिड होऊन बंद केलेला. >>> Lol मीच 'पाहा पाहा' म्हटले होते. Proud

हो, सुमित्रा भावेंचाच आहे. मला त्यांचा पाहिलेला प्रत्येक चित्रपट आवडलेला आहे. मला त्यांची वैचारिक बैठक आवडते. प्रोफाऊंड वाटते.

'वेलकम होम' वर जरा कालबाह्य वाटतो असे लिहिले तेव्हा चिनूक्स यांनी सांगितले होते , वीस वर्षांपूर्वीचेच कथानक होते आणि तेव्हा तो होऊ शकला नाही मग सुमित्रा भावे गेल्या, पण मृणाल कुलकर्णीला पाच वर्षांपूर्वी पुन्हा पूर्ण करावासा वाटला. तरीही मला रिग्रेसिव्ह वाटला नाही ॲनॅलिटकल वाटला.

मलाही अति- पुणेरी मराठी पिक्चर कंटाळवाणे, साचेबद्ध वाटतात पण हा नाही वाटला. हा दुसरेही बरेच ऑफर करतो जे रिलेटेबल आहे. एरवी फक्त पुणेरी -रिलेटेबल असतील असे सिनेमे आवडलेले नाहीत. यातला काही भाग जसे मृणाल कुलकर्णी आपल्या घरी परत येऊन धुणीभांडी करते ते अजिबात आवडले नाही. नवऱ्याने कुलूप बदललेले असते ते बदलून सगळी कामं करते. जेथे नवरा बायकोचे एकमेकांवर प्रेम नाही, नवऱ्याला बायकोचा आदर वाटत नाही. तेथे कपडे- भांडी हाकानाका वाटायला हवे. पण बायकांचा संसारावर किती जीव हे स्टिरिओटाईप असेल. असो. पण मला फार खटकले. कुठेतरी ती तिच्या परीने क्लोजर मिळवतेय कदाचित असे सुद्धा वाटले. कॅरेक्टरची विचारप्रक्रिया असावी.

बहुतांश (शहरी) मराठी चित्रपटांत पुणे, मुंबई आणि कोकणचीच पार्श्वभूमी असते नाही तर एकदम ग्रामीण भागातील असतात. कुठलेही का असेना त्यांनी सर्व प्रेक्षकांना कथानकात काही तरी ऑफर करायला हवं, ज्याने सिनेमा भिडावा. आपापल्यातच रमले की ते फार कंटाळवाणे वाटते, खासकरून तिथल्या नसलेल्या प्रेक्षकांना.

मला आधी ती काही नोकरी व्यवसाय का करत नाही असच वाटलं. आजच्या काळात चालेल का हे ? कायम नवऱ्यावर किंवा आई वडिलांवर अवलंबून आणि वर म्हणे मला घर नाही.

सगळी चर्चा मराठी चित्रपटांवर असल्याने मुलाखत धाग्यावरची पोस्ट लिंकसहित येथेही आणतेय.

सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांवर व संहितांवर- त्यांची त्या मागची विचारप्रक्रिया यावर चर्चा असलेला भाडिपाचा पॉडकास्ट पाहिला. सारंग साठ्ये, आलोक राजवाडे, मोहन आगाशे, अमृता सुभाष, सुनील सुकथनकर यांचा सहभाग होता. 'खोल गप्पा' नावाचा सखोल विषयांवर चर्चेसाठी नवा कार्यक्रम भाडिपावर सुरू झाला आहे, त्याचा हा पहिला भाग -

तुम्ही भावना कशा प्रोसेस करता त्यात grief (आप्तशोक) आणि depression (नैराश्य ) वेगवेगळ्या माणसात कसं उमटू शकतं. त्याला वाट करून देणारे 'टूल' प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत का, शिवाय अल्झायमर(अस्तु) किंवा व्हिटिलिगो (नितळ) हा कलंक नसून फक्त कंडिशन किंवा आजार आहे. ह्या सगळ्याकडे त्यांच्या घरातील लोक किंवा प्रेक्षक कसं बघतात, कसं समजून घेतात. मी हे सगळे सिनेमे पाहिलेले नाहीत पण संदर्भ समजले.

हे सगळं सुमित्रा भावेंनी त्यांच्या बाधा, देवराई, कासव, अस्तु, दिठी चित्रपटांतून कसं पुढे आणले. एखाद्या आजाराची अधिकृत माहिती त्यांच्या सिनेमात असायची. ती सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोचायची.

एकाच वेळी एखादी प्रोफाऊंड वागणारी व्यक्ती अचानक व्हल्नरेबल होऊन शकते. आयुष्यात अतिशय पॅशनेट व बहिर्मुख वाटणाऱ्या व्यक्तीलाही नैराश्य येऊ शकते. हे सगळे प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न त्या व्यक्तिरेखेच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पडावीत व त्यातून संवादाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी प्रश्न पडावेत. अतिशय गंभीर गोष्टीसुद्धा आपण अचानक कॅज्युअली बोलून जातो, ते संवादातून अकृत्रिम कसं मांडलं यावर चर्चा आहे.

माणसाचे दोन मेंदू असतात, एक भावनिक आणि एक बौद्धिक. आपलं सगळं शिक्षण फक्त बौद्धिक मेंदूला चालना देणारे असून चित्रपट मात्र भावनिक मेंदू वापरायला शिकवणारा आहे. त्यातून प्रश्न पडायला हवेत, उत्तर नाही मिळाले तरी चालेल.

सुमित्रा भावेंनी निसर्गाचा उत्तम वापर करून मुख्य व्यक्तिरेखेची मानसिक स्थिती सांगितली आहे. कासव मधे लाटा, अस्तु मधे हत्ती, दिठी मधे पाऊस, बाधा मधे रखरखीत जमीन आणि देवराईत गर्द जंगल. सिनेमा नुसताच अस्वस्थ करून सोडणारा नसून त्या व्यक्तिरेखेच्या प्रवासात प्रेक्षकाला पुढे नेणारा असावा असे त्यांना वाटायचे. And even existential crisis - meaning of life. एखादा प्रसंग किंवा परिस्थिती तुमच्या आतून जो अर्थ बाहेर काढते तोच तुमच्या आयुष्याचा अर्थ - त्यामुळे प्रत्येकाचा वेगळा. नाहीतर सगळे तसे निरर्थकच आहे. एखाद्याला गवसेल, एखाद्याला गवसणारही नाही.

शिवाय सुमित्रा भावे यांच्या जाण्याने या सगळ्यांना नेमकं काय वाटलं तो grief आणि दिठी मधला grief याची तुलना किंवा पर्स्पेक्टिव्ह म्हणेन - तो यांना कसा मिळाला यावर चर्चा आहे.

चांगली चर्चा आहे. अगदीच गंभीर नाही, साधीसहज चर्चा - गप्पाही आहेत.

Screenshot_20250909_180409_WhatsApp.jpg

नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244

सायकल पाहिला होता. रेको साठी अस्मिताला धन्यवाद.

याची गोष्ट प्रसन्न आहे.
सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. वातावरणनिर्मिती उत्तम आहे. सायकल खूप देखणी आहे. Happy
सायकलवर जीव कसा जडतो हे ज्याचं त्यालाच समजणार. ती चोरीला गेल्यानंतर येणारी अस्वस्थता, आजोबांनी दिलेली असल्याने अपराधी वाटणं हे खूप आवडलं. तुकड्यातुकड्यात अनेक गोष्टी आवडल्या.

काळ पाठीमागे नेला आहे आणि भाबड्या जगाचं अपील केलं आहे , त्यामुळे जे खटकलं ते फाऊल धरता येत नाही. एक निष्पाप जग दाखवलं आहे. पण त्या काळात सुद्धा बदमाष हे तेव्हढेच बदमाष होते. आधी ते भाबडे होते आणि आता भाबडेपणा कमी झाला असं वाटत नाही. कथेचा जीव तोळामासा आहे. त्यावर दोन तासाचा चित्रपट बनवणे हे धाड्स आहे. ते पेललं आहे पण लीलया नाही म्हणवत.

शेवटी सायकल घेऊन येतो असं दाखवलं असतं तर जास्त प्रॅक्टीकल झालं असतं आणि जास्त आवडलं असतं.

बरी आठवण केली. हा बघायचा राहून गेला होता. Happy
जितेंद्र जोशीचा एक मराठी चित्रपट होता ना साँग् ऑफ स्पॅरोज + चिल्ड्रन ऑफ हेवन चं मिश्रण असलेला ?

राभु, शेवटी सायकल परत आणली नाही हाच शेवट मला आवडला.
कारण तोवरचे सगळे प्रसंग एकेक थरावर थर चढवत तेच तर ध्वनित करत होते. केशव वेलणकरला भेटतो तो, मुलांच्या शाळेत ठग जातात तो, केशवा डबलसीट बसतो तो, चालत जाताना इतर सायकलीवरुन जातात तो.. आणि शेवटी ते ठग, जे आसक्तीचा महामेरू होते ते सुद्धा सगळी आसक्ती सोडून सायकल ठेवून जातात. तर लहान पोराला सायकल आवडल्यावर केशवासारखा माणूस आता विरघळणार नाही हे शक्यच न्हवतं.

सगळे प्रसंग सायकलीशी नातं, आसक्ती, पंचक्रोशीचं सायकलवर प्रेम आहे का त्याच्या मालकाच्या लाघवी स्वभावावर आहे यावरच भाष्य करत होते.

त्यानंतर घरी आल्यावर मनात जन्माची अढी असलेला बाप, गावकरी मिळून लुक अलाईक सायकल करतात. केशवाने तर मूळ बघितलेली असते. पण केशवा साठी मैलभर चाललेला बाप बघुन त्याचे आणि आपले डोळे अगदी पाणावले नाहीत तरी चेहर्‍यावर निरागस असं हसू आलंच माझ्या. जे तो सायकल घेऊन आला असता तर हा जो मॅजिकल इफेक्ट होता तो आला नसता. साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संप्रुण झाली असती फक्त. Happy

शेवटी सायकल परत आणली नाही हाच शेवट मला आवडला.>>> मलाही. त्यामुळेच कथा एका उंचीवर जाते. चेकाव्हच्या कथा सुरवातीला नॉर्मल वाटायच्या, क्वचित तर उथळही वाटायच्या पण शेवट एकदम शिखरावर जायचा. ती स्टाईल पर्सनली मला फार आवडते म्हणूनही कदाचित आवडला असेल. निर्दोष, निरासक्त दाखवायची धडपड नाही आपोआपच आयुष्यात येत जाणाऱ्या प्रसंगांनी, आपण दुसऱ्याला जे बळ ग्रह ताऱ्यांबद्दल सांगून देत होतो ते स्वतःतच नाही असे त्याला कळतं तेव्हा तो साफ बदलतो. तेव्हा त्याची आसक्ती खरोखरच जाते व दुःख बोथट होऊन जातं आणि जे आहे त्यातच त्याला आनंद घेता यायला लागतो. आणि असाही तो सहृदयी असल्याने हे बदल घडू शकण्याला वाव असतो. त्यात त्याचे व त्याच्या ज्योतिष गुरूचे संवाद व घर पडलेले पाहूनही जिद्द न सोडलेला त्याचाच स्नेही - ह्या दोघांचा हात होता. शेवटी तर किती गोड आहे, हाताला पेंट लागलेला व चेहऱ्यावर प्रसन्न हसू व बाजूला आनंदी चिमुरडी.

अमित -
सगळे प्रसंग सायकलीशी नातं, आसक्ती, पंचक्रोशीचं सायकलवर प्रेम आहे का त्याच्या मालकाच्या लाघवी स्वभावावर आहे यावरच भाष्य करत होते.
आणि
पण केशवा साठी मैलभर चाललेला बाप बघुन त्याचे आणि आपले डोळे अगदी पाणावले नाहीत तरी चेहर्‍यावर निरागस असं हसू आलंच माझ्या.
>>>>यासाठी अगदीच अनुमोदन. Happy तुझे 'इंदिनो'ची पापं धुतली गेली नाहीयेत पण विसळल्यासारखी झाली आहेत. Wink

यु आर वेलकम, राभु ! Happy
बरी आठवण केली. हा बघायचा राहून गेला होता
>>> +१ चिल्ड्रन ऑफ हेवन साठी.

चिल्डन ऑफ हेवन म्हणजे सल्मान रश्दींच्या पुस्तकावर आहे की काय?
ओह्ह नाही, ते मिडनाईट चिल्डन. Lol मी काही वाचू शकलो न्हवतो ते पूर्ण.

तोवरचे सगळे प्रसंग एकेक थरावर थर चढवत तेच तर ध्वनित करत होते. केशव वेलणकरला भेटतो तो, मुलांच्या शाळेत ठग जातात तो, केशवा डबलसीट बसतो तो, चालत जाताना इतर सायकलीवरुन जातात तो.. >> हो. हे आवडलंच होतं.

आणि शेवटी ते ठग, जे आसक्तीचा महामेरू होते ते सुद्धा सगळी आसक्ती सोडून सायकल ठेवून जातात. >>> त्यांचं सायकलवर प्रेम नव्हतंच. सायकल त्यांनी पळून जाण्यासाठी वापरली होती. आणि प्रत्येक ठिकाणी सायकल बघूनच कुणाची हे ओळखलं जात असल्याने ती आता सोडून जाऊ असंही वाटत असतं. पण त्यांना जो मान मिळत असतो, तो कधीच मिळालेला नसतो. आयुष्यात कधीच कुणी त्यांना एव्हढं प्रेमाने खाऊ पिऊ घातलेलं नसतं. त्यांची आसक्ती चोरून आणलेल्या दागिन्यात असते, जे सावकाराच्या वाड्यावर विसरल्याने त्यांचा विरस होतो. सायकलच्या मालकाबद्दलचं कुतूहल आता एम्पथीत रूपांतरित होतं. आपला चोरीचा ऐवज तर गेला पण ज्याच्या कृपेने आपल्याला चार दिवस मान मिळाला, प्रेम मिळालं त्याला दु:खात नको सोडायला म्हणून ते सायकल तिथे ठेवून जातात. मिळाली तर मिळाली. सायकल मुद्दाम घरी नेऊन देण्याची चूक ते करत नाहीत..

जर हृषीकेश जोशीची सायकलवरची आसक्ती विरघळून गेली असेल तर ते ठसलेलं नाही. त्या मुलाला एक फेरी मारायला दिली असती तरी त्याच्यातला बदल दिसला असता.

शेवटी कथा लेखकाची आहे म्हटल्यावर त्याचा शेवट त्याचा हक्कच आहे. पण. असा विचार मनात आला.

ठग सायकल द्यायला परत जात नाहीत. कारण तो भाबडा मूर्खपणा ठरला असता. पण स्वतःला लिहिता येत नसताना एक पोरगा पकडून रामकथा लिहुन जातात. हे फक्त केशवला सगळं कसं कळलं हे दाखवायला कथेच्या सोयीसाठी नाही. केशवला सगळं उलगडायला पंचक्रोशीत अनेक गावांत धागेदोर मिळाले असं दाखवणं सहज शक्य होतं. ठगांचे मत परिवर्तन झाले नाही, पण चांगुलपणाच्या आगेवात ते एक आहुती देते झाले. ते पूर्ण बदलले वगैरे दाखवायचं आहे असं मला वाटलं नाही. तसं ठसवायला ते कफनी घालून बोटीत चढते झाले दाखवलं असतं तर व्हिज्युअल मजा आली असती असा विचार आत्ता आला. पण त्याने उलट ही वाटू शकलंच असतं.

पोराला फक्त फेरी कशाला? इथे तर देऊनच टाकली ना!
मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया!
अवघा रंग एक झाला.

पोराला फक्त फेरी कशाला? इथे तर देऊनच टाकली ना!
मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया!
अवघा रंग एक झाला. >>> वा !

हीच गंमत असते ना, एक कथा, सिनेमा, कविता एकाला जसं दिसेल तसं दुसर्‍याला दिसत नाही. दोन्ही दृष्टीकोण बघायला आवडतं.
थोडंसं आपण वाचताना, बघताना कोणत्या मनःस्थितीत आहोत यावर पण अवलंबून असतं असं वाटतं.
कदाचित शेवट मुद्दामून असा वर नेण्यातलं नावीन्य आता राहीलेलं नसल्याने मला तसं वाटलं.

कारण तो भाबडा मूर्खपणा ठरला असता. >>> यू सेड इट ! Happy

थोडंसं आपण वाचताना, बघताना कोणत्या मनःस्थितीत आहोत यावर पण अवलंबून असतं असं वाटतं. >> + १
एकच पुस्तक किंवा एकच सिनेमा सुद्धा पुन्हा तसाच 'भेटेल' का नाही सांगता येत नाही. सगळी 'त्या त्या' वेळीची इंटेसिटी असू शकते म्हणून मला तावातावाने वाद घालता येत नाही. सगळ्या भावना तात्पुरत्याच निघतात. तेव्हा "त्या त्या" क्षणी समरसून अनुभवाच्या झाले. Happy

तरी तुम्ही इंदिनो आवडणार्‍यांना नावे ठेवा! Proud Lol
पुन्हा तसं नाहीच भेटत. आपण, परिस्थिती, जग, अनुभव सगळंच बदललेले असतं ना. ज्यांची मतं बदलत नाहीत, कायम ठामच असतात ते काहीच शिकत नाहीत कशी करोलरी वाटते . Happy
रच्याकने: तुम्ही इंदिनोला इतकी नावं ठेवली आहेत की मी परत बघणार नाहीये. काय करा नाही आवडला तर! आय डोंट वाँट नॉट टू लाईक इट! Happy

हो अस्मिता, सहमत न होताही समोरच्याचे म्हणणे "बघायला" मजा येते.
जैत रे जैत क्लासिक उदाहरण आहे. केव्हढ्या प्रतिमा आहेत.
प्रतिमा न उलगडता येणार्‍याला तो वेगळा दिसतो.

तरी तुम्ही इंदिनो आवडणार्‍यांना नावे ठेवा!
>>> आम्ही नावेही समरसून ठेवतो, क्या पता जिंदगी ना मिलेगी दोबारा ! Lol तुमचं नशीब थोर आम्ही तुमच्याशी टिपी करतो, हे एक Proud

रच्याकने Lol माझं उलट होऊ लागले काल !

सायकलमधला संदेश कुलकर्णी अक्षरशः मोडलेल्या घरात कारभारणी संगे संसार करताना पाहून कुसुमाग्रजांची कणा आठवली.

Pages