मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जारणचा ट्रेलर मस्त आहे. इथेही थिएटरमध्ये येईल की नाही माहिती नाही, आला तरी मुलांना घेऊन बहुतेक बघता येणार नाही. ओटीटीवर यायची वाट बघायला पाहिजे.

https://youtu.be/z4LARaajglM
हसून घ्यायचं असेल तर बघा. दहाव्या मिनिटापर्यंत नवीन दिसतात, कमेण्ट करून हातभार लावू म्हणून पाहिला.
तर अकराव्या मिनिटापासून खूप हसवायला सुरूवात केली. Proud
पहाल तर हसाल, न पहाल तर फसाल Lol

ते आवली लवली प्रकरण तर मी अजिबात बघू शकत नाही.>>>>>>> सेम पिंच.
बोटावर मोजता येईल एवढेच स्किट आवडलेत. हल्ली तर सगळेच इतके कर्कश्श, सईचं ते भिषण आणि खोटं हास्य, कलकलाट होतो डोक्याला.

आज पाहिला जारण.
आवडला. का आणि काय ते नंतर सविस्तर लिहेन.
वातावरणनिर्मिती पहिल्या सीन पासून भारी आहे.
पण इंटरवल उलटून गेल्यावर असे जाणवू लागले की स्टोरी बराच काळ पुढे सरकली नाहीये. ठोस कथा आहे की नाही समजेनासे झाले.
पण शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपट डोक्यावर फिरवला. पेशंस राखून बघितल्याचे सार्थक झाले. सविस्तर वीकेंडला लिहेन कदाचित..

बरोबर २८ दिवसात चार मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहिले. चारही वेगळ्या पठडीतले आणि चारही मला आवडले. मराठी चित्रपटांसाठी गेल्या कैक वर्षातील हा सर्वात चांगला महिना असेल
एक स्वतंत्र लेख यावर सुद्धा लिहेन जमल्यास Happy

Lol प्रोमोमध्ये तरी बरी वाटतेय अमृता, चांगलं काम केलं असावं. भयानक आहे प्रोमो, अनिता दातेची भूमिका अंगावर येते. एकदम भारी केलंय तिने.

अनिता दाते मोठी भूमिका नाहीये. अंगावर आलेली भूमिका झेलता यावी इतपतच ठेवले आहे. संघर्ष चित्रपटातील आशुतोष राणाच्या त्या सीनची आठवण झाली मला. तशीच भयानक आणि भेसूर

बंगळुरात आलेला दिसतोय जारण. पण लांबच्या मॉलला आहे आणि रात्री दहाचा शो! शक्यच नाही. त्यामुळे ओटीटी जिंदाबाद.

संघर्ष चित्रपटातील आशुतोष राणाच्या त्या सीनची आठवण झाली मला>>+१ सेम हिअर!

अनिता दाते एकदम ट्रान्समध्येच गेल्यासारखी वाटते.. तिचा रोल अजून थोडा हवा होता.. तिचे ते अहिराणी भाषेतले डायलॉग्ज.. विशेषतः एका सीनमध्ये 'मारी टाकss.. मारी टाकss' म्हणतानाचा जो आविर्भाव आहे ना.. त्यावेळी काटा फुलला होता अंगावर!

तिचे ते अहिराणी भाषेतले डायलॉग्ज..
>>>>
अच्छा.. मला हाच प्रश्न कोणाला तरी विचारायचा होता. ती भाषा कुठली होती. त्या भाषेमुळे तिचे संवाद भारी झाले आहेत.

'जारण': सिनेमा-अभिप्राय

हा अलिकडे थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला आहे. ओटीटीवर अजून यायचा आहे. सिनेमाचं पटकथा-लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्तेंचं आहे. यावर 'कोण हे हृषीकेश गुप्ते?' हा प्रश्न पडणे अगदीच स्वाभाविक आहे. तर ते मराठीतले एक ताकदीचे कथा-कादंबरीकार आहेत. वाचनाच्या बाबतीत मराठी भाषिक समाज एकदम खंग्री असल्याचे माहिती असल्यामुळे हा निरर्थक खुलासा.!

तर हा भयपट कम् सायकोलॉजिकल थरारपट आहे. पांचट लव्हस्टोऱ्यांच्या आणि दे मार ऐतिहासिक मेलोड्राम्यांच्या सुगीत रूचिपालट म्हणून हा एक वेगळा सिनेमा आलेला आहे.

कशासाठी बघायचा? तर अमृता सुभाष आणि अनिता दाते या दोघींच्या वर्ल्ड-क्लास अभिनयासाठी. चांगल्या कथानकासाठी. तसेच चांगल्या दिग्दर्शनासाठी.

अमृता सुभाषचं असं आहे की दर सिनेमागणिक/नाटकागणिक ती तिचा स्वतःचाच परफॉर्मन्स बेंचमार्क उंचावत निघालेली आहे. तिला कोणताही रोल द्यावा आणि जादू बघावी. ती तिच्या भूमिकांमध्ये अशी उतरते की ती पात्रं म्हणजे अगदी खरोखरच्या हाडामांसाच्या जिवंत व्यक्ती असल्याचा भास निर्माण व्हावा. (उदाहरणार्थ किल्ला, अस्तु, वळू, मसाला, सॅक्रिड गेम्स, चोक्ड, गली बॉय एटसेट्रा एटसेट्रा). पटकथेत केवळ शब्दरूपात अस्तित्वात असलेल्या पात्रांमध्ये प्राण फुंकून त्यांना जिवंत करणारी ही कुणीतरी किमयागार अभिनेत्री आहे. ती चांगली अभिनेत्री आहे आणि यातही तिनं नेहमीप्रमाणे उत्कृष्टच काम केलं आहे. खरंतर या अशा म्हणण्यातही आता काही विशेष असं राहिलेलं नाही. हे तिच्याकडून अपेक्षितच होतं. तिनं खराब काम केलं असतं तर त्यात काहीतरी 'ऑड' वाटलं असतं. म्हणजे या लेव्हलला जाऊन पोचलेलेलं प्रकरण आहे सगळं.

यात तिचं पात्र एका व्होलाटाईल स्त्रीचं पात्र आहे. वरवर नॉर्मल वागणारं पण आतून मनोरूग्ण. आयटी प्रोफेशनल असते, काय काय भास डोक्यात घेऊन जगत असते. क्षणात नॉर्मल असते, तर क्षणात दुसरंच व्यक्तिमत्त्व तिच्यात चमकून जातं. ही अवस्थांतरं, तिला होणारे भ्रम, वास्तव आणि भ्रम यांची सरमिसळ‌ होणं, मनातल्या मनात एक वेगळंच सर्रीअल विश्व उभं करून त्यातच रमणं, वास्तव आणि भास यातला फरक न ओळखता येणं, त्या मनोरूग्ण अवस्थेतली अगतिकता हे सगळं तिनं लीलया पेललं आहे. (ओके, ओके, आलं लक्षात. आवरतो कौतुक. कारण 'आपल्याला एखादी अभिनेत्री आवडते, पण म्हणून तिचं एवढंही कौतुक करू नये की वाचणाऱ्याला लाजल्यासारखं वाटेल!' अशा स्वरूपाच्या अचानक आलेल्या भानातून मी तिचं कौतुक आवरतं घेतो याठिकाणी.! Happy )

सिनेमाचं म्हणाल तर फर्स्ट हाफ मध्ये थोडासा संथ वाटण्याची शक्यता आहे. पण शेवटी शेवटी सगळी कसर भरून निघते. म्हणजे फर्स्ट हाफमध्ये चुळबुळ/खुसफुस वगैरे करणारं ऑडियन्स सेकंड हाफमध्ये चिडीचूप होऊन, नीट सावरून बघत बसतं.

बाकी यात टिपीकल भुताच्या सिनेमांपेक्षा पात्राचे मनोव्यापार धुंडाळत जाण्यावर फोकस आहे. गुप्तेंच्या कथा-कादंबऱ्या साधारण याच पद्धतीच्या असतात. पार्श्वसंगीत, ध्वनीप्रकाशसंयोजन, छाया-सावल्यांचा खेळ या तांत्रिक अंगांबद्दल काही कळत नाही. पण वातावरणात ताण निर्माण करण्याच्या दृष्टीनं सिनेमा कमी पडत नाही, एवढं कळतंच म्हणजे. अशा प्रकारच्या सिनेमांत दचकवण्यासाठी वापरली जाणारी हुकूमी तंत्रे यातही आहेत. पण त्यातही दिग्दर्शकानं वेगळेपण आणलेलं आहे.

अनिता दातेनी 'गंगुटी' नावाच्या जाखिणीचा रोल केला आहे.
गंगुटी डेंजरस आहे.‌ तिचा टेच, दरारा, भेसूर हसणं, भाषेचा आव्हानात्मक लहेजा यातून एक थंडगार दहशत निर्माण करते.
या गंगुटीचे सीन्स विशेषतः 'मारी टाक तिलेss..मारी टाकss', 'जारण केलंशेन मी तुजं पोरवर', 'मायलेबी खेळाले घेयाचं का तुज्या आपलंमंदी?' हे डायलॉग्ज म्हणतानाचे तिचे जे एक्स्प्रेशन्स, जो आविर्भाव आहे, तो बघून टरकलो होतो, हे कबूल केलं पाहिजे. अनिता दाते यामध्ये एकदम 'ट्रान्स'मध्येच गेल्यासारखी वाटते. तिचा रोल अजून थोडा जास्त लांबीचा असायला हवा होता, असं वाटतं. पण असो.

यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे डायलॉग्ज अहिराणी भाषेत आहेत. यामुळे फार जबरदस्त परिणाम साधला जातो. फक्त अहिराणी भाषेमुळे तिच्या तोंडच्या संवादांना एक विलक्षण वजन प्राप्त झालेलं जाणवतं, ही त्या भाषेची ताकद..! प्रमाण मराठीत हा असा इंपॅक्ट जमला नसता.

असो. एक चांगला मराठी सिनेमा आहे. जमल्यास जरूर बघावा.
PS:
(बाकी यात "खेळाचा तास बाई आला आला, गंमत भारी वाटे मला." हे एक गूढ दिशेनं जाणारं (काहीसं हॉन्टेड) गाणं वापरलेलं आहे, ते का कुणास ठाऊक पण ईअरवर्म झाल्यासारखं कानात गुंजत बसलं आहे कालपासून. त्याचं काय करायचं कळत नाही. यातल्या सायकियाट्रिस्ट किशोर कदमांकडेच थेरपीसाठी जावं लागेल बहुदा. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, असं दिसतं. Wink )

Happy धन्यवाद संप्रति. परिचय अगदी नेमका लिहिला आहे. उत्सुकता वाटते आहेच. मनोव्यापार धुंडाळत जाण्याचा प्रवास - हा प्रकार संपूर्ण हॉररपटांपेक्षाही जास्त आवडतो. ह्यामुळेच बघेन.

किशोर कदमांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत असे वाटते कधीकधी, नवीन प्रश्न पाडायचे कसबही..! Happy

"खेळाचा तास बाई आला आला, गंमत भारी वाटे मला." >> हे मला चाली सकट ऐकलेलं वाटतंय. मी हा पिक्चर बघितलेला नाही. कुठल्या मुलाखतीत वगैरे होतं का? का प्रसिद्ध गाणं आहे? मला एकदम ओळखीचं वाटतंय.

स्वप्नील जोशीचा जिलेबी पिक्चर पाहिला
जबरदस्त आहे. चेकमेट चित्रपटाची आठवण झाली. अर्थात तो याहून जास्त आवडलेला. पण हा सुद्धा जमलाय.

खरे तर चित्रपट इंटरेस्टिंग वाटत असूनही मी खूप झोप आल्याने अर्धा बघून झोपणार होतो. पण अजून पाच मिनिटे बघूया म्हटले आणि असा डोक्याला झटका बसला की मग पूर्ण संपवावाच लागला.

सोशल मीडिया वर बरेच ठिकाणी चित्रपटाबद्दल निगेटीव्ह पोस्टच वाचल्या होत्या असे आठवते. स्वप्नील जोशीचा जबरदस्त रोल आहे यात. डायलॉग मारायची एक हटके स्टाईल आहे. पण त्याचीही टिंगल टवाळीच वाचली होती. नुसत्या चुकाच काढलेल्या आढळल्या होत्या.

म्हणजे काहींना खरेच नसेल तो आवडत आणि नसेल आवडला पिक्चर. असते प्रत्येकाची वेगवेगळी आवड निवड.
पण सोमीवर काही जण उगाच त्याला टारगेट करतात असे वाटते.

असो.. नशीब मी पाहिला आणि पूर्ण पाहिला. आता छान झोप लागेल Happy

अवांतर - नाव जिलेबी का ते नाही समजले.
बहुधा स्वप्नीलच्या हेअर कटचे नाव असावे.

संप्रति, धन्यवाद.
शक्य असेल तर स्वतंत्र रिव्ह्यू लिहा. स्पॉयलर्स असतील तर तसे लिहा म्हणजे ते सोडून रिव्ह्यू वाचला जाईल.
मराठी सिनेमा आणि गुप्तेंसारख्या ताकदीच्या लेखक - दिग्दर्शकांना शुभेच्छा !

वेलकम होम - आयपीटिव्हीवर पाहिला. आवडला.
साधारण बाईचं घर नेमकं तिच्या हक्काचे कधी असते, कोणते असते. लग्न झालेल्या अगदी शिकल्या सवरलेल्या- आर्थिकदृष्ट्या सक्षम स्त्रियाही संपूर्ण आर्थिक व्यवहार नवऱ्यावर सोडून देतात. यावर आणि नंतर सेपरेट व्हावे लागले तर इमोशनल डॅमेज सोबत तुम्ही चक्क रस्त्यावर येऊ शकता असेही सूचित केले आहे. तगडी स्टारकास्ट आहे. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, सुबोध भावे, स्पृहा जोशी, सिद्धार्थ मेनन. सर्वांची कामं अप्रतिम वाटली. कथेत नावीन्य नाही पण पाहायला फार आवडला. संवाद, मांडणी आणि हाताळणी अत्यंत अकृत्रिम आहे.

तपशीलात तडजोड करावी पण मूल्यांमधे करू नये- हा मला आवडलेला व अगदी रिलेटेबल वाटलेला एक संवाद. कुठे वाद घालायचे व कुठे तडजोड करायची हे कळणं सगळीकडेच फार आवश्यक आहे. मोहन आगाशेची आई तरूण विधवा - घर लहान मुलाच्या नावाने करतात पण तिच्या नाही. कारण त्या काळात तर ते अजून अवघड होते. नंतर तिच्या सुनेला - उत्तरा बावकरना सुद्धा वेगळा संघर्ष आणि मृणाल कुलकर्णीला आता विभक्त झाल्यानंतर एक मुलगी व अल्झायमर असलेली सासू सांभाळावी लागतेय. त्यामुळे ती आर्थिक व्यवहारात मागे पडलीये.

नवरा शेवटपर्यंत दाखवलाच नाही. तो बायकोला मुलीला व आईला सोडून निघून गेला आहे. परंपरेमुळे ती सासूला सांभाळत नाहीये तर माणुसकी पायी सांभाळते आहे. हेही कसं वेगळं आहे ते सांगितले आहे. सुमित राघवनसारखा सपोर्टिव्ह मित्र तर सर्व स्त्रियांना मिळो, सुबोध भावेची छोटीशीच व भावाची भूमिका आहे. मला फार आवडला. मला फार दिवसांनी मृणाल कुलकर्णीचा अभिनय आवडला. अगदी भूमिकेला साजेसा आहे. मोहन आगाशेचे वडिलांचे आणि काकांकडे स्वतः आश्रित म्हणून राहून नंतर कलेक्टर झालेल्या दोन मुलींच्या बाबांचे काम पण अप्रतिम आहे. सिनेमा काळात मागेपुढे जातो व सगळ्यांचे "आपल्या" घराचे दृष्टिकोन व बदलत्या व्याख्या सांगतो. खूप नवीन कथानक बघतेय असं वाटलं नाही पण जे पाहिलं त्याने खूप समाधान वाटले. दर्जेदार काही तरी पाहिल्यासारखे वाटले.

अस्मिता,

धन्यवाद.

चित्रपटाची कथा सुमित्रा भावे यांनी विसेक वर्षांपूर्वी लिहिली होती. त्यावेळी तो चित्रपट होऊ शकला नाही. 2017 साली मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबर गप्पा मारताना या कथेचा विषय निघाला आणि चित्रपट झाला.

निर्मात्यांच्या मागणीमुळे तयार झालेल्या चित्रपटापेक्षा ओटीटीवर आलेला चित्रपट साधारण पंधरावीस मिनिटं कमी आहे.

ओटीटीवर बरेच चित्रपट काटछाट केलेले दिसतात. जुने तर जाऊदे, डिजीटलायझेशनमध्ये काही उडाले असे समजता येईल
पण नव्या चित्रपटातही हे होते. मसान आधी एका वेगळ्या ओटीटी वर पाहिला होता, नंतर इतरत्र पाहिला तेव्हा काही दृष्ये कापली गेली हे कळले Happy . ती दृश्ये खुप लहान होती पण खुप महत्वाची होती. कापल्यामुळे कंटी न्युइटी विस्कळीत झाली. माझे बघायचे राहिले असेल असे समजुन परत मागे जाऊन पाहिले पण कापलेच होते. Sad

ओके.

जारण.. सांप्रति १ यांनी लिहिलेला अगदी बरोबर आहे. खूप चांगला पिक्चर घेतलाय.. direction, अक्टिंग, सगळंच जमून आलंय मस्त. शेवटचे धक्के अफलातून आहेत आणि ज्या नाजूक गोष्टीभोवती हे सगळं जोडलय, ते बघून बऱ्याच बाबतीत relatable वाटतं..
गांगुटी tar कमाल.. फार अप्रतिम अक्टिंग केली आहे तिने. खरी वाटते खूप आणि फक्त आवाज , देहबोलीतून भीतीदायक वाटते..

थिएटर मध्ये जाऊन नक्की बघून या.. हा थ्रिलर थिएटर मध्ये च अनुभवायला पाहिजे..

काल प्राईम वर गुलकंद बघितला, इथे वाचल्यामुळे साशंक होते पण मला आवडला. जरा ही कंटाळा आला नाही. हास्य जत्रा बघत नसल्याने समीर चौगुले आणि ईशा डे हे दोघे ही नवीन होते माझ्यासाठी म्हणून ही आवडला असेलएखाद वेळी. सई ताम्हणकर आवडत नाही पण ह्यात ठीक वाटली.

आयपी टिव्हीवर जारण बघितला. मस्त घेतला आहे. अमृता सुभाषचं कामही छान. अनिता दातेला जेवढा रोल मिळाला आहे तो तिनेही छानच केला आहे. खूप दिवसांनी मराठीत चांगला पिक्चर बघायला मिळाला.

गुलाबी नावाचं एक भयंकर प्रकरण बघायचा प्रयत्न केला.पिसं काढण्यासाठी पण बघवणार नाही. कलाकार सगळे चांगले आहेत पण अभिनय , संवाद , पटकथा सगळं इतक यं दर्जा च आहे की काय सांगावं.
गुलकंद बघितला . हास्यजत्रा आमचा आवडता कार्यक्रम आहे. पण इथे मजा नाही . खूपच विस्कळीत आहे. शेवटी शेवटी कहना क्या चाहते हो झालं. खरतर फक्त सई-प्रसाद ची कथा रंगवली असती तर आवडली असती. विनोदी भाग जमला नाही. शेवटी तर पारच वाट लावली.
सई आणि प्रसाद यांचे सीन्स आवडले , त्यांची पहिली भेट , दोघांची मनस्थिती , तो गप्पा मारायला घरी येतो तो सीन जमून आलेत. ते दोघे दिसलेत पण छान.
त्यांची मुलं मात्र अगदीच बालीश वाटली . कॉलेजच्या शेवटच्या वर्षी लग्न करतायेत तशी. सईचं घर मात्र एकदम आवडलं

Pages