कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिंद्य,
कालिदास सुद्धा तेच म्हणतोय.
वसंत ऋतूच्या पहिल्या सर्गात .....

प्रफुल्ल आम्रांकुर तीक्ष्ण बाण ते
द्विरेफमाला गुण कामुकांप्रती
जनांस कामोत्सुक वेधण्यास ये
वसंतयोद्धा अवतीर्ण हो प्रिये ll

ऋतुसंहार - वि वा भिडे

फारच अवांतर होईल पण …तरुण वयात वाचले तर बेस्टच. “पन्नाशीत तरी” यासाठी की कामसूत्राच्या तरुण नायकाला (नागरक) कामकेलिच्या युक्त्या-प्रयुक्त्या सांगतांना लेखक वात्स्यायन मल्लनाग स्वत: पन्नाशीच्या वयाचा आहे. >>>>>>> वाट कसली बघताय. काढा नवीन धागा

आंब प्रेमाबरोबरच त्यात किमान थोडे अनिंद्य-धागा-प्रेमही आहे Happy

ग्रंथातली भाषा-काव्य- imagery सर्व बावनकशी सोनं. संस्कृत समजत असल्यास बेस्टच पण माझ्यासारखे ५० मार्कांसाठी संस्कृत शिकलेले सुद्धा शब्दकोशांच्या साथीने वाचनसुख घेऊ शकतात, नव्हे घ्यावेच. >>> मस्त! मग वाचायला हवेच.

काढा नवीन धागा…

ते नंतर बघू, सध्या “आंबा / कैरी“ चे संदर्भ असलेला भाग धाग्यावर ओतण्याचा विचार आहे 😀

जो पढे उसका भला, ना पढे उसका भी भला.

IMG_20260310_154729_2.jpg

भावाने online काही फळं मागवली, त्यातली दोन प्रकारची मला पाठवली. एक खरबूज, एक हे रायवळ बिटकी आंबे. त्यामुळे मोसमतला पहिला आंबा आज खाल्ला. माहेरी आमच्या गावी पूर्वी ह्यापेक्षा लहान बिटकी असायचे. गेले ते दिन गेले.

मला पाहिजे बिटकी.

मी शाळेत असताना बाबांना शनवारी सुट्टी जाहिर झाली. आईचं मात्र ऑफिस असायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी सगळे तयार होऊन आधी आईला ऑफिसला सोडायचो आणि मग बाजारात ओले काजू, बिटक्या, करवंद, जांभळं असा खास कोकणी मेवा खरेदी करत फिरायचो. बिटक्या विकणारी मामी एखाद्या बिटकीचा रस तळहातावर पिळून चव घ्यायला लावून भाव निगोशिएट करायची. वाऱ्याने पडलेली नाय भाऊ, माज्या दारात झाड हाय, कलमं केलीत वगैरे क्लेम सोबत असायचे. मग डझन दोन डझन बिटक्या आणायच्या, घरी येऊन जेवायचं ( त्यावेळी भाजी काय प्रश्नच पडायचा नाही) आणि दूपारी निवांत पुस्तक वाचत बसायचं.
आता फारश्या बिटक्या मिळतच नाहीत. (लोकांनी गावठी आंब्याची झाडं तोडून कलमं लावली.) मिळाली तरी वडीलांसोबत निवांत फिरत खरेदी केलेल्या बिटकीची चव कशी येणार?

सुरेख आठवण. बाबांसोबत खरेदी केलेल्या बिटकीची चव नाहीच येणार, अगदी बरोबर.

ही बिटकीही गोड, रसाळ आहे.

माझेमान , किती सुरेख आठवण! Happy
माझीही आई ऑफिसला जायची, बाबांची वेगळी शिफ्ट असायची. ते आणि मी मिळून, आईने केलेली भाजी बाजूला ठेवून वेगळेच काहीतरी बनवायचो.
खूप छान, आनंदी दिवस होते ते!

अरे वा, आंबे पिकायला सुरुवात झाली. यावर्षी आंबे लवकर येणार हे भाकित खरं ठरलं 👍

@ अन्जू, या सीझनच्या पहिल्यावहिल्या आंब्यांची सचित्र पोस्ट = 👌

@ माझेमन,
@ स्वानंदी

आठवणी = ❤

वसंतोत्सव कसा साजरा करावा ह्याबद्दल प्राचीन साहित्यातले संदर्भ वर प्रतिसादांत आले आहेत.

वसंत ऋतुला जसजसे यौवन प्राप्त होते - म्हणजे नववर्षाचा चैत्रपाडवा जवळ येऊ लागला की जमेल तितक्यांदा उद्यानविहार, जलविहार आणि आंचलिक क्रीड़ा करण्यासाठी सुंदर वस्त्रालंकारांनी नटून हत्ती-घोड्यांवर बसून किंवा पायीच चालत, वाद्ये वाजवत, गाणी म्हणत जाण्याचे वात्स्यायन सुचवतो.

त्याच्यामते उद्यानात पोहोचल्यावर करण्याचे प्रथम काम म्हणजे

सहकारभंजिका” नामक विधी. (सहकार हे आंब्याचे एक नाव)

सोप्या शब्दात “झाडावरचे कैरी-आंबे तोडून आणणे”
आणि मग

अभ्यूषखादिका

म्हणजे अग्नी पेटवून निखाऱ्यांवर ही आंब्याची आणि इतर फळे भाजून खाण्याचा कार्यक्रम ! barbecued mangoes in a garden party setting. 😍

हे करतांना मूड-माहौल बनवण्यासाठी “पांचालानुयान” म्हणजेच कठपुतळ्यांचे (not necessarily erotic) नृत्य बघायचे. नंतर गीतगोष्ठी, सुरापान, द्यूत क्रीडा, कोंबड्यांच्या झुंजी वगैरे.

And this was a few thousand years back ! How cool is that ?

आंब्याचे साहित्यातले, गाण्यातले संदर्भ वाचताना मजा आली.
अंजू , माझे मन, स्वानंदी बाबांच्या आठवणी किती गोड वाटल्या वाचताना.
ह्यावर्षी हापूस खूप कमी आहे, जिथे आत्ता काढणी, पॅकिंग ची गडबड असायची तिथे नुकसान भरपाई साठी सरकार दरबारी खेपा घातल्या जातायत. बघू काय होतं... हापूस आंबा दिवसेंदिवस फारच बेभरवशाचा होऊ लागला आहे.

>>> सहकार हे आंब्याचे एक नाव
अरारारा! नावं ठेवण्याच्या बाबतीत (pun unintended, but welcome Proud ) इतक्या सृजनशील संस्कृतीत असं व्हावं?!

>>> How cool is that ?
Indeed! Happy

अंजूताई, आंबे यायला सुरुवात झालीसुद्धा?! बाळसेदार बिटक्या गोड दिसतायत. Happy

स्वाती, आंबे भावाने बहुतेक बिग बास्केट वरून मागवले, तो फळं वगैरे मागवतो तिथून.

यावेळी धुक्यामुळे कोकणात मोहर करपतोय.

हेमाताई अक्षरशः दरवर्षी हापूस काहींना काही कारणांमुळे कमीच येतोय. कधी फळमाशी प्रकरण, कधी अवकाळी पाऊस, यंदा धुक्यामुळे.

@ unintended pun

was fun 😁

@ यंदा हापुस मोहोर कमी / करपतोय ?

या सहकाराचा असहकार होणार की काय? Too bad if that happens. 👎

हो यंदा आंबा कमी आहे असं मलाही समजलंय.
पण मला नेहमी प्रश्न पडतो, दरवर्षी काही ना काही अडचण खरंच असते (गेली काही वर्षं, एखादा अपवाद सोडता) तरी की पुण्यात दरवर्षी "अस्सल रत्नागिरी/ देवगड, आमच्या बागेतला, सेंद्रीय पद्धतीने नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा" मुबलक प्रमाणात कसा काय मिळतो? म्हणजे तिकडे रत्नागिरीतून माझी आई आंबे नाहीत फार म्हणते, मित्रांना फोन केले की यंदा आंबा कमीच आहे गं... म्हणतात नि पुण्यात आपले महोत्सव भरतायत! हे कसं?

आमच्या सोसायटीतल्या आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे लागले आहेत. आधी हिरवे लोलक नंतर पिवळसर छटा मिरवणारे आंबे पाहून खूप छान वाटते.

सकाळी फिरून येताना आंब्याकडे फेरी मारली. 2 कैऱ्या मिळाल्या.आज आमटीत घातली.दुसरीचा टक्कू केला.विकत आणलेल्या कैऱ्या फ्रीजमध्ये शोधाव्या लागतील.

आंब्याच्या गप्पा खूप झाल्या पण फोटो नाही आलेत अजून फार.

गच्चीमधून हाताने काढता येतील अश्या दोनच छोट्या कैऱ्या किंवा तोरंच म्हणा ना, रोज खुणावत होत्या. शेवट आज तोडल्या. त्या चिकाच्या वासाने एकदम तरतरी आली.
त्याच्या पात्तळ कापट्या काढल्या, त्यात तेल , तिखट, मीठ, हळद ,मसाला घालून थोडा वेळ ठेवून दिलं. एक मस्त चटपटीत इन्स्टंट लोणचं तयार.
20260313_130148.jpg

वा वा, देवकी आणि मनीमोहोर. कैरी उत्सव सुरु केलात.

लोणच्याचा फोटो झकास 👌

माझे फोटो डकवायला माबो “खाजगी जागा“ लिमिट संपली आहे.

बिटकीचे फोटो मस्त.
कैरीच्या लोणच्याचा फोटो पाहून अगदी तोंडाला पाणी सुटलं.

“सहकारभंजिका”
“अभ्यूषखादिका”
म्हणजे अग्नी पेटवून निखाऱ्यांवर ही आंब्याची आणि इतर फळे भाजून खाण्याचा कार्यक्रम ! barbecued mangoes in a garden party setting. >>>>
छान.
खरं तर कैऱ्या चुलीत निखाऱ्यावर खरपूस भाजून मग आतल्या गराचे पन्हे केले की एक वेगळी चव लागते.
Try it.
पन्हं केलं नाही अजून.....आता करायला हवं.

खरं तर कैऱ्या चुलीत निखाऱ्यावर खरपूस भाजून मग आतल्या गराचे पन्हे केले की एक वेगळी चव लागते.... हे वाचले आहे. आता करून पाहायला हवे.

… कैऱ्या चुलीत निखाऱ्यावर खरपूस भाजून मग आतल्या गराचे पन्हे….

+ १ 👍

चुलीवरचे अमुक-तमुक याला भाव न देणारा मी याला मात्र अनुमोदन देत आहे. चूल access असला की हे करायलाच पाहिजेल. Gas flame वर तो इफेक्ट साधत नाही.

तसेच थोड्या firm texture च्या करकरीत कैऱ्यांचे सालीसकट मोठे तुकडे करून असे निखाऱ्यावर भाजून त्यावर मीठ + chilly flakes किंवा Mexican herbs शिंपडून एक स्वर्गीय चव गाठता येते. Smoked raw mango bites म्हटले की झाले गावरान चवीला glamer

वाॅव ममो
लोणचं अप्रतिम दिसतंय
यात साखर नाही का घातली
आंबट तिखट आणि थोडंसं गोड
बघूनच तोंडाला पाणी सुटलं
उद्या बाजारात जाऊन कैरी आणणं मस्ट

ममो चा फोटू आणि अनिंद्य चे डिस्क्रिप्शन वाचून खरच पाणी सुटले. बार्बेक्यू वर ग्रिल तरी करेनच कैऱ्या मिळाल्या की.

कैऱ्या चुलीत भाजल्या तर वेगळ्याच लागतात ह्याला अनुमोदन ऋतुराज.
तसेच थोड्या firm texture च्या करकरीत कैऱ्यांचे सालीसकट मोठे तुकडे करून असे निखाऱ्यावर भाजून त्यावर मीठ + chilly flakes किंवा Mexican herbs शिंपडून एक स्वर्गीय चव गाठता येते ह्यावर्षी कोकणात गेले की हे करून बघते.
लोणच्या साठी धन्यवाद सर्वांना. त्या दिवशीचा मेन्यू पण भारी होत्या. हे ताजं लोणचं, बटाट्याच्या काचऱ्या, सांज्याची पोळी, त्यावर घरचं तूप, तळलेल्या पापड्या मिरगुंड आणि शेवटी दही भात.
सावित्रीच्या लेकी , धन्यवाद, पुढच्या वेळेस थोडा गुळ नक्की घालीन. छान चव बॅलन्स होईल.

जरूर करा अमितव, मनीमोहोर. सचित्र अहवाल इथे धाग्यावर डकवा.

Barbecued फळे वीक पॉइंट आहे, भौत पसंद मेरे कू. 🤤 या सीझनचे Barbecued raw mangoes झाले माझे.

आता पुढचा आंबटशौक म्हणजे सिंधी स्टाइल टका आमडी - कोवळ्या कैरीचे स्पायसी तवा फ्राय करायचे आहे. ते पीसेस फ्राय मासोळी सारखे दिसतात असे आमच्या सीफूड प्रेमी भाच्याचे मत

त्याच्या पुढच्या फेरीत कैरीची मद्रास स्टाइल लाल चटणी आणि कैरीचे रसम. लोभ येथे संपत नाही 😀

इथले जुने फोटो उडवून थोडी जागा झाली की फोटो डकवीन. तुमचेही फोटो- रेसप्या येऊद्या मंडळी, त्यानी नव्या आयडिया सुचतात आणि रसनातृप्तीचे नवनवे मार्ग सापडतात.

…. अडचणी असून रत्नागिरी/ देवगड आंबा" मुबलक प्रमाणात कसा काय मिळतो? हे कसं?…..

प्रज्ञा९ ,

ह्याचा अर्थ कुणीतरी खोटेपणा करत असले पाहिजे. आंबा देवगड नसून दुसरीकडचा असेल, बरोबर ?

अनिंद्य फोटो उडवू नका. उद्या जरा वेळ झाला की गुगल फोटोज वरून एम्बेड कसे करायचे ते लिहितो. माबोवरची जागा न वापरता, इथे फोटो शेअर करायचा सोपा उपाय आहे.

Pages