काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व भारतीय त्यांच्या मोबाईलवरून Amazon काढून टाकून अमेरिकेला टॅरिफ वॉरसाठी धक्का देऊ शकतात, घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या शक्तीचा वापर करून अमेरिकेला नतमस्तक करू शकता, त्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत.*
*संकटाच्या काळात देशापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, Amazon ला दररोज ६० लाख ऑर्डर मिळतात, जर ते प्रत्येक ऑर्डरवर १०० रुपयेही कमावते, तर एका दिवसाची कमाई ६० कोटी, एका वर्षाची कमाई २,१९,०००,००००००,*

*फक्त Amazon काढून टाकून, आपल्याला अमेरिकेला योग्य उत्तर द्यायचे आहे, त्यांना भारताच्या लोकसंख्येची जाणीव करून द्यायची आहे, ही लोकसंख्या केवळ भारताच्या विनाशासाठी नाही, ही लोकसंख्या ही अशी लोकसंख्या आहे जी भारताला जगात पहिल्या क्रमांकावर घेऊन जाईल, जय हिंद*
**भारतमातेसाठी यापेक्षा चांगली स्वातंत्र्यदिनाची भेट नाही.*
*सरकारने एकट्याने अमेरिकेशी का लढावे, आपल्याकडेही एक देश आहे.*

*जय हिंद, वंदे मातरम*

जरी अमेझॉन भारतात पैसे कमावत असली तरी भारतीयांना ती दर्जेदार सेवा सुद्धा पुरवते. आणि त्याचेच पैसे ते घेतात. त्याचबरोबर अनेक भारतीयांना रोजगार सुद्धा पुरवतात.
अमेझॉन वर बहिष्कार टाकला तर या दोन्ही गोष्टींना आपल्याला मुकावे लागेल, नवीन पर्याय निर्माण होईपर्यंत, जो एका रात्रीत होत नाही.

मुक्तपणे आणि योग्य प्रकारे केलेला व्यवसाय दोन्ही बाजूंना कायमच फायदेशीर असतो.

In August 2018, American retail chain Walmart acquired a 77% controlling stake in Flipkart for US$16 billion, valuing Flipkart at around US$20 billion

मिंत्रा , ब्लिंक ईट सारखे खूप प्लॅटफॉर्म्स आहेत. फ्लिपकार्ट फक्त उदाहरण म्हणून दिलं.
अ‍ॅमेझॉन वाचून काही अडेल असं वाटत नाही.

अग्रेषित ....

सुदर्शन चक्र शिशुपालाचे शर संधान केल्यावर कृष्णकडे परतत असताना कृष्णाच्या बोटाला छोटीशी जखम करून गेलं. जखम ही इतकी खोल की रक्ताची धार थांबेचना, शेवटी सुदर्शन चक्राचा वार तो, साक्षात प्रभूंवर झाला म्हणून काय त्याची तीव्रता कमी थोडीच होणार! राजवैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप धावपळ केली, लेप उगाळले, काढे पाजले पण तरीही काहीही उपयोग होईना, शेवटी नारद मुनी तिथं आले, म्हणाले प्रभू ही कुठली लीला तुमची. सारे उपाय थकले आता आपणच उपाय सांगावा. कृष्ण म्हणाला अरे नारदा लीला कसली त्यात, एक साधी जखम तर आहे होईल बरी आपोआप, त्याच एवढं काय घेऊन बसलात. नारद म्हणतात प्रभू जो विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून अहोरात्र झटतो आहे त्याच्या जखमेतून रक्ताची संतत धार वाहते आहे, त्या प्रभूला वेदना होत आहेत व आम्ही काहीच करायचे नाही म्हणता हे कसं शक्य होईल, कृपया उपाय सांगावा, केवळ आपणच यावर उपाय जाणता व यामागे आपली काहीतरी लीला असावी हे मी जाणून आहे.
नारदमुनी ऐकेचना तेव्हा शेवटी कृष्ण म्हणाला ठीक आहे नारदा ऐक तर उपाय, सुभद्रेच्या घरी जा व तिला म्हणावं तुळशीचा लेप दे, व तो लेप बोटाला बांधायला एक चिंधी दे, तिथं जर काम झालं नाही तर मग द्रौपदी कडे जा.
नारदमुनी सुभद्रेकडे गेले, लेप व चिंधी मागितली, सुभद्रेने दासींना आज्ञा केली की तुळशीचा रस काढा. तुळशीच्या रसाचा लेप तर तयार झाला, त्याला रत्नजडित सोन्याच्या भांड्यात ठेवण्यात आलं व नारदामुनींकडे सुपूर्त करण्यात आलं, नारद मुनी म्हणाले सुभद्रे अग लेप तर छान दिलास पण चिंधी कुठाय? सुभद्रा म्हणते अहो मुनिवर दासींनी खूप शोधलं पण माझ्या एवढ्या भरजरी वस्त्रालयात चिंधी कुठून मिळावी? नारदमुनी मनातल्या मनात हसले, प्रभूंची लीला त्यांना आता उमगली होती, सुभद्रेचा निरोप घेऊन तिचा लेप न घेताच लगबगीने ते द्रौपदी कडे रवाना झाले, नारद मुनींनी मागणी करायचा अवकाश द्रौपदी ने त्वरित स्वतः तुळशीच्या पानांचा रस काढून लेप तयार केला, व पांडवांनी तिला भेट दिलेला त्रिभुवनातील सर्वाधीक किमतीचा असलेल्या शालुचा पदर फाडून त्याची चिंधी बनवताना शालू फुकट जाइल हा विचार देखील तिच्या मनाला शिवला नाही, मनात विचार होता केवळ आणि केवळ कृष्णाला लवकरात लवकर बरं कस वाटेल हा, असा लेप व चिंधी कृष्णाच्या बोटाला लावून त्याची रक्ताची धार तर लगेच थांबलीच, व जखम देखील भरून आली. या चिंधी चे मोल मी एक दिवस नक्की चुकवीन असे कृष्ण म्हणता झाला, व वस्त्रहरण होताना त्याच करंगळी तुन द्रौपदी ला वस्त्र पुरवीत राहिला.
रक्ताच्या नात्या पेक्षा ही कधी कधी मानलेली नाती अधिक जवळची ठरतात, जेव्हा नात्यात व्यवहार डोकावत नाही, फायदा तोटा यांचे गणित आड येत नाही, बेधडक जे काही करायचं ते केलं जातं, ती नाती खरी, बाकीचे फक्त व्यवहार. अशा नात्यांनी शरीराच्या जखमा भरल्या जातातच पण मनावर झालेले असंख्य वार ही या नात्याच्या एका फुंकरीने बरे होतात.

*चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.*
*रक्षाबंधनाच्या निमित्ताने आलेली सुंदर कथा.*

नारद म्हणतात प्रभू जो विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून अहोरात्र झटतो आहे >>> कृष्ण असो वा राम, विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून नेमकं काय केलं किंवा अहोरात्र कसे झटले, कोणी सांगेल का?

मला नेहमी वाटतं, की त्या सिंथेटिक शालूच्या पट्टीने, श्रीहरीच्या बोटाचे रक्त कसे काय थांबले असेल?
मुळात ती नीट बांधता तरी आली असेल का?
पदराची फाडून दिली म्हणजे तर त्यावर जर - बुट्टी असणार !

ॲमेझॉन बहिष्कार उत्तम मार्ग आहे. जरूर पर्याय वापरावे. जथ्याने लोक दूर जाऊ लागले की सशक्त पर्याय निर्माण होतीलच.

पदराची फाडून दिली म्हणजे तर त्यावर जर - बुट्टी असणार
>>>> तेच की!! एक तर रेशीम आणि जरीचा शालू फाटता फाटणार नाही. पुन्हा पदरावरची जर टोचणार. शिवाय नेसत्या वस्त्राचा तुकडा फाडून दिला तर मग हायजिनचं काय? त्या कुठल्याश्या फॉरवर्ड मध्ये मुलांचं तोंड पुसण्यापासून आंचेवरून भांडी उतरण्यासाठी वापरलेला पदर जखम बांधायला वापरायचा? का मग राण्या त्यांच्या मुलांची तोंडं पदराने पुसायच्या नाहीत? क्या रे ये गोडा चतुर गोडा चतुर? एक पे रहना, या गोडा या चतुर...

आणि वाती बिती वळायला कापूस नसायचा का त्यांच्याकडे? मग दिवे कसे लावायचे? आणि युद्धातल्या जखमा कशाने बांधायचे मग?

माझे मन, Lol
पदराचे फॉरवर्ड छान वापरले आहे.
उष्णतेने उष्णतेला मारतात म्हणतात ना..तसे एका ( कैच्याकै!) फॉरवर्ड च्या संदर्भात दुसऱ्याचा विचार करणे मस्त आहे!!

एक तर रेशीम आणि जरीचा शालू फाटता फाटणार नाही>>>

गाणे अनेको वर्षांपुर्वी ऐकले तेव्हापासुन हीच शंका डोक्यात आहे. पण शंकानिरसन करायला फाडण्याजोगा शालुच नाही.

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ' मी ' येतो. याच ' मीपणाच्या ' अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, म्हणजे समस्त गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, "आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर ?"

बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं... बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ...ना एखादं वळण... मी पोकळ आहे. त्या पोकळीतूनच माझ्यातला अहंकार गळून पडलाय.'

माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते. यावर गोपी निरुत्तर झाल्या.

अहंकार रहित शरीर( जीवन )...
हीच श्रीकृष्णाची बासरी होय !! !!

पंचमी वगैरे संस्कृत असावेत. मी मराठी आहे. बासरी कृष्णाच्या काळापासुन धरली तर तेव्हा मराठीचा जन्मही झाला नव्हता. मराठी ८००-९०० वर्षे जुनी असे म्हणतात. मग त्याआधीच जन्माला आलेल्या बासरीला मीपण कसे कळले??

माझी अपेक्षा जरा जास्तच आहे पण तरी…

काकाफॉकर्त्यावर बासरीचा क्रूर दुरुपयोग करण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली आहे.

षडरिपु मला साधलेले नाहीत हेच खरे

बसरीचे काकाफॉ अस्मिताजींनीच लिहिले असावे असा मला संशय आहे.
बाकी आपल्याकडे कोणत्याही संख्येला काकाफॉ मध्ये पिळता येते.
बासरीला चारच भोके असती तर ती चार दिशांची प्रतिके,
पाच असती तर पंचमहाभूते
सात असती सात वार, सप्तचिरंजीव
आठ दिशा
नऊ ग्रह
दहा विष्णूचे अवतार
ई ई

बसरीचे काकाफॉ अस्मिताजींनीच लिहिले असावे असा मला संशय आहे.
>>>> Lol कबूल आहे. काकाफॉकरांना नादाला लावायला लिहावं लागतं, मग येथे येऊन तुम्हाला ओळखू येऊ नये म्हणून पुन्हा उलट मतं द्यावी लागतात. सगळी कामं मलाच करावी लागतात. Proud

त्याआधीच जन्माला आलेल्या बासरीला मीपण कसे कळले >> तस्मात् काकाफॉ सार्थवान् बभूव Happy

माझ्या आवडीची दशमी आणि हलुमी मी नेहमी खातो - असं म्हणल्याने अहंकार बळावतो हे मात्र खरं आहे.

अस्मिता, कुठून शोधून काढले हे गाणे?
मला वाटले खरेच मराठी गाणे आहे..म्हणून उघडले.
Lol
अगदी नामी काच्याका फॉरवर्ड आहे!

पण शंकानिरसन करायला फाडण्याजोगा शालुच नाही.
>>>>
छया!!! जन्माष्टमीच्या निमित्ताने वहिनींच्या लाडक्या भावोजींना '(फाड़ने की बजाय) तुम मुझे शालू दो, में तुम्हे चिन्धि दूंगी' खेळ घ्यायला सांगितला पाहिजे होता.

माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
>>>>
एका बासरीवादनाच्या प्रोग्राममध्ये निवेदकाने हा डायलॉग मारला होता. आम्ही मनातल्या मनात 'आस्था चॅनेल बंद करा व बासरी ऐकवा' म्हणत होतो.

या तिथींमध्ये शेवटी ' मी ' येतो. याच ' मीपणाच्या ' अहंकारातून कार्यनाश होतो
>>>
पण एकादशी, द्वादशी वगैरे 'शी'कारांत तिथींचं काय? त्याने नुकसान नाही होत?

Pages