चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टूरिस्ट फॅमिली ४६ मिनिटे पाहून झाला. वेगळा विषय, वेगळी ट्रीटमेंट .
ब्रिलीयंट आहे आतापर्यंत तरी. सूक्ष्म हसू सतत राहतं ओठांवर. अगदी बारीक निरीक्षण आहे.
एखादे कुटुंब नवीन ठिकाणी रहायला आलं कि आजूबाजूच्यांशी कशा ओळखी होतात,
लोकांच्या किती तर्‍हा असतात, आधी इंट्रोवर्ट वाटलेले नंतर बोलू लागतात, ज्यांची भीती वाटावी ते आधार वाटतात.
बाकी दक्षिणेच्या भाषा येत असत्या तर भाषेच्या लहजावरून झालेले विनोद समजले असते.
बॉबस्फोटाचा तडका दिलाय. त्यात हे कुटुंब श्रीलंकेवरून पळून आलंय.

शेवट असाच चांगला करू देत Happy

या काळात काळापांढरा पिक्चर का बनवला असेल ?

>>>>

सरस्वतिचंद्र हा शेवटचा कृष्णधवल चित्रपट असे वाचले होते. दस्तक त्यानंतर आलाय.

नंतरही कृष्धवल चित्रपट निर्माण झाले पण ते मुद्दाम तसे होते. दस्तक बहुतेक बजेट नाही म्हणुन बनला असेल Happy कथा छान आहे, संजिवकुमार व रेहानाने छान काम केलेय. गाणी तर सर्वांगसुंदर. मदनमोहनची गाणी असल्याने लता लाजवाब असणार यात नवल काहीच नाही पण रफीनेही कमाल गायलीत गाणी. तुमसे कहु एक बात परोंसे हल्की… काय गायलेय जबरदस्त.

https://youtu.be/vnWO8IOJZwY?feature=shared

परत पाहायला हवा. लो बजेट आहे हे बघताना कळते. Happy

टूरिस्ट फॅमिली कसला सुंदर सिनेमा आहे. १ तास २२ मिनिटं पाहिला. अजून ३५ मिनिटं शिल्लक आहे.
आय एम डी बी वर ८.२ रेटिंग आहे. शशिकुमार आणि सिमरन यांनी नायक नायिकेच्या रूपात अभिनयाची धुरा लीलया उचलली आहे.
पण इतर सर्वच पात्रांनी तोलामालाचा अभिनय केला आहे. छोट्या भूमिकेतले पोलीस हवालदार, सब इन्स्पेक्टर हे सुद्धा छान छाप पाडतात.

कुटुंबातले ताणतणाव, त्यामुळे नात्यात येणारे ताण इत्यादीपासून अनेक विषयांवर कुठलंही भाष्य न करता निव्वळ नर्मविनोदी शैलीत सिनेमा निरीक्षणं मांडत राहतो. सशक्त पटकथा आहे. श्रीलंकेतल्या आर्थिक संकटामुळे धरमदास आणि वासंतीचं कुटुंब भारतात पळून येतं इथून चित्रपटाची सुरूवात होते. किनार्‍यावरच पोलीस पकडतात. पण धाकट्या मुलाच्या हुषारीने त्या पोलिसाचे मन द्रवते आणि तो सोडून देतो. इथे कुठेच ते मूल आगाऊ होत नाही कि पोलीस चेष्टेचा विषय होत नाहीत. या प्रसंगात किंचित फिल्मीपणा आहे, टाळता आला असता तर बरंच , पण इतक्या सुंदर सिनेमात मुद्दामून भिंग घेऊन नको बघायला असं वाटतं.

शहरात एक बाँबस्फोट होतो आणि ज्या पोलिसांनी या कुटुंबाला दया दाखवून सोडून दिलेलं असतं त्यांच्यात चलबिचल सुरू होते. आपण चौकशी न करता कुटुंबाला सोडून दिलं आणि हा स्फोट झाला. आता सीबीआय चौकशीत जर हे कुटुंब भारतात आल्याचं सापडलं तर आअली खैर नाही या दुविधेत तो दयाळू पोलीसवाला सापडतो. इकडे धरमदासच्या आणि वासंतीच्या स्वभावतः चांगल्या वागणुकीने शेजारीपाजारी त्यांचे चांगले संबंध बनतात. शेवटाचा अंदाज आल्याने आता पुढे बघितला नाही तरी चालेल. या सिनेमाची कथा तोळामासाच आहे. पण पटकथा हीच सिनेमाची नायक आहे. कुठलेच पात्र चित्रपटावर हावी होत नाही हे विशेष आहे.
कॅटेगरी - फिल गुड.

ज्यांना असे सिनेमे आवडतात त्यांनी जरूर बघावा. नाही आवडला तर आपली आवड जुळत नाही असे समजावे. Happy

ताजा कलम : शेवटचा अर्धा तास संपवला. अपेक्षेप्रमाणेच शेवट होता. फील गुड सिनेमात असतं त्याप्रमाणे व्हिक्टीमच्या बाजूने जनता उभी राहते असंच इथेही होतं. किंचित वेगळं करता आलं असतं, पण नाही केलं तरी काहीच बिघडलं नाही. सध्या जे सिनेमे ऑप्शनला आहेत, त्यात असे वेगळे उठून दिसणारे सिनेमे भिंगाखाली बघून हा ट्रेण्ड पाडू नये असं वाटलं. बरेच जण मानतात कि दक्षिणेचे सिनेमे हे वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. पण आपल्यापर्यंत पोहोचतात ते त्यांचे भौतिकशास्त्राशी फारकत घेतलेले अ‍ॅक्शन मूवीज. याच मूवीजने बॉलीवूड सुद्धा प्रभावित झालंय. आता अशा सिनेमांनी पुन्हा डिटॉक्स ट्रीटमेंट व्हायला हवी.

नरेंद्रनाथ मिश्र यांच्या कथांपैकी रस ही कथा घरी आली आहे. योगायोग म्हणजे इथल्या नूतनच्या सिनेमांच्या चर्चेमुळे युट्यूबने सौदागर टाईमलाईनवर आणला. हा मूवी याच कथेवर आहे हे माहिती नव्हतं.
साधी सरळ कथा बघताना हे जाणवलं कि हिंदीतल्या या लेखकांनी साध्या, सरळ कथा लिहिल्या आहेत. पण त्यातून त्या काळची नैतिक मूल्ये, माणसांचे स्वभाव , एकमेकांशी असलेले बंध यावर ते अबोल भाष्य करतात. सौदागरची कथा अशीच आहे.
रस ही कथा न वाचताही सिनेमाने ती व्यवस्थित पोहोचवली. (आताच गुगळताना समजलं).
कथा नंतर वाचल्यावर काय स्वातंत्र्य घेतलं ते समजेलच.

विथ ड्यू रिस्पेक्ट टू नूतनजी, या पिक्चरमधे वय जाणवतं, त्यामुळे अ. ब. चंकॅरेक्टर नकारात्मक असताना राग येण्याऐवजी त्याने तरूण पद्मा खन्नासाठी खोटं बोलणं खटकत नाही. पण नंतर केलेली गद्दारी, आणि नंतर नायिकेला बसलेला धक्का, हे कदाचित त्या काळच्या अभिनेत्रींमधे नूतनशिवाय कोण दाखवू शकलं असतं ?

सौदागर म्हटल्यावर मला अमिताभला चांगला गुळ तयार करून देणारी नूतन आणि वाईट गुळ करून देणारी पद्मा खन्ना इतकंच आठवतं, नूतनला सोडल्यावर तिला म्हाताऱ्याशी लग्न करावं लागतं आणि अमिताभ वाईट वागूनही नंतर ती त्याला चांगला गूळ करून देते का शिकवते असं काहीतरी संदिग्ध आठवतं.

खूपच लहान होते तेव्हा tv वर बघितला होता.

बरोबर अंजू.

यात अमिताभ (मोती) शिंदीच्या झाडाचा रस काढून तो नूतनकडे (मेहजबी) गूळ बनवायला देत असतो. चांगल्या प्रतीचा रस काढल्यावर त्याचा त्याच प्रतीचा गूळ बनवायची कला फक्त मेहजबीकडे असते. ती विधवा असते आणि गुळाच्या सीझनल उत्पन्नावर कसं बसं चाललेलं असतं म्हणून एका किलोमागे ती तीस पैशांऐवजी चाळीस पैसे मागते. त्यामुळं नफा कमी होईल या चिंतेत मोती असतो.
तसंच त्याला चांद (पद्मा खन्ना) शी लग्न करायचं असतं, पण मेहेर पाचशे रूपये द्यायची असते. याच्याकडे तेव्हढे पैसे नसतात म्हणून तो नूतनशी लग्न करतो. म्हणजे तिला द्यावे लागणारे चाळीस पैसे वाचतात. तिच्याकडून खूप मेहनत करून गुळ बनवून घेतो आणि मेहेरचे पैसे बनवतो. मग नूतनला दोष देत काडीमोड घेत पद्मा खन्ना शी लग्न करतो.

पण तिला गूळ बनवायला येत नसतो. तिने थाप मारलेली असते. तिचा गूळ घेऊन विकायला गेल्यावर ग्राहक तुटतं आणि पैसे संपल्यावर तो भानावर येतो आणि पुन्हा नूतनकडे येतो. अशी कथा आहे.

ह्म्म्म…. अमिताभचे पात्र खुप वाईट वागते. नुतन बिचारी तेरा मेरा साथ रहे गात असताना हा गुळाच्या एका मोसमात हवे तितके पैसे कमावल्यावर कसलीही पुर्वसुचना न देता
मौलवीला आणतो आणि सरळ तलाक देतो. मौलवीसुद्धा बिचारा शॉक्ड… नुतन रागाने त्याला शिव्याशाप देऊन निघुन जाते.

हा लगेच पद्मा खन्नाशी लग्न करतो. ती सजना है मुझे सजना के लिये असे स्वतःला सांगत सजत असताना गुळ जळत असतो. ताडाच्या रसापासुन गुळ बनवायची कला हिच्यात नसल्यामुळे हिचा गुळ मार्केटात नेऊन अमिताभ स्वतःची गिर्‍हाईके गमाऊन बसतो.

नुतन तोवर तिकडे तिसरे लग्न करुन मोकळी झालेली असते. हा तिसरा नवरा बर्‍यापैकी पैसेवाला असावा असे वाटते.

पद्मा खन्नाला घरातुन घालवुन अमिताभ परत रस घेऊन नुतनकडे जातो. तिच्याशी बोलायला तोंड उरलेले नसतेच त्यामुळे तिच्या नवर्‍यालाच सांगतो की तिला विनंती कर मला गुळ बनवुन दे, मोसम संपताना तरी दोन किलो चांगला गुळ विकल्याचे समाधान मला मिळुदे, हा मोसम माझा फुकट गेला. आधी त्याला पाहुन आकांड तांडव करणारी नुतन हे ऐकुन विरघळते. तिच्या मनात प्रेम तर असतेच. तोवर नवर्‍याच्या मागुन आलेली पद्मा खन्नाही हे ऐकुन पश्चाताप पावते.

राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट तेव्हा ग्लॅमरस नसायचे पण त्यात इतके डिटेलिंग असायचे की पाहताना चित्रपट पाहात नसुन प्रत्यक्ष प्रसंग समोर घडताहेत असे वाटायचे. ही कथा बंगालात घडतानाची आहे. तिथला पाण्यावरचा प्रवास, छोट्या होड्या, बांबुचा घरबांधणी व कुंपणात वापर, मुस्लिम समाजातील लोकांची घरे, कपडे, रितीरिवाज उत्तम दाखवलेत. हा चित्रपट गावासाठी, घरांसाठी मी परत परत पाहिलाय. गरिब नुतनच्या घराचे कुंपण आणि तिसर्‍या नवर्‍याच्या घराचे कुंपण यातुनही आर्थिक स्थितीतला फरक कळतो.

नुतन व अमिताभने जबरदस्त काम केलेय. नुतन तर गावातली अनपढ स्त्रीच वाटते.

राजश्रीचा नदिया के पार हा चित्रपटही मला डिटेलिंगसाठी खुप आवडतो. हा चित्रपट उत्तर प्रदेशातल्या खेड्यात घडतो. तो तिकडेच चित्रित केलाय. तिकडची पिवळट पांढर्‍या मातीची घरे बघायला इतकी सुंदर वाटतात. एका दृष्यात सरबत बनव म्हणुन मोठी बहिण धाकटीला सांगते तेव्हा ती चटकन पितळीच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात सरबत बनवते. Happy मला हे दृश्य खुप आवडले. अगदी ग्रामिण टच.

साधना +१

सौदागर, नादिया के पार, बालिका वधू हे सगळे पिक्चर खूप साधे सरळ आणि त्या त्या मातीतले वाटतात. ते आवडलेले आहेत. त्यातले गाव सुद्धा एक पात्र असल्यासारखे वाटते.

पण आता जे राजकुमार राव वगैरे चे युपी वाले पिक्चर खोटे बेगडी वाटतात. ते काही फार आवडलेले नाहीत. काय असेल ते असेल.

अमिताभ एक नंबर chapter, वाईट माणूस,नूतनला सोडतो एवढं आठवत होतं पण डिटेल्स काहीच आठवत नव्हते, थँक्स रानभुली आणि साधना.

सौदागर पाहिला आहे पूर्वी. अमिताभ संधीसाधू टोटल वाटतो. इव्हन "तेरा मेरा साथ रहे" गाण्यात एक मिनिट आहे तेव्हाही. ते गाणे मात्र अवीट गोडीचे आहे. कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही. नूतन ते गाता गाता कामे करते ते अगदी सहज वाटते. किशोरचे "हर हसीं चीज का मै तलबगार हूँ" सुद्धा मस्त आहे.

एकूण रवीन्द्र जैनांची तेव्हाची गाणी आता स्पीकर किंवा हेडफोन्स वर ऐकताना फार सुरेल वाटतात.

रानभुली, साधना - मस्त पोस्ट्स आहेत.

राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट तेव्हा ग्लॅमरस नसायचे पण त्यात इतके डिटेलिंग असायचे की पाहताना चित्रपट पाहात नसुन प्रत्यक्ष प्रसंग समोर घडताहेत असे वाटायचे. >>> याला शंभर वेळा अनुमोदन. सुंदर पोस्ट साधना.
साधेपणा हा राजश्रीचा युएसपी होता. रच्याकने नदीया के पार सहीत बरेच पहायचे राहून गेलेत ते आता बघून घेईन, हा मूड कायम असे पर्यंत. Happy

अन्जु, फारएण्ड , प्राजक्ता धन्यवाद Happy

सॉरी ! मित्रा च्या ऐवजी मिश्रा लिहीलेय मी सगळीकडे.
नरेंद्रनाथ मित्र असे वाचावे Happy

सौदागर, नादिया के पार, बालिका वधू हे सगळे पिक्चर खूप साधे सरळ आणि त्या त्या मातीतले वाटतात. ते आवडलेले आहेत. त्यातले गाव सुद्धा एक पात्र असल्यासारखे वाटते.
>>> १००+++

पण आता जे राजकुमार राव वगैरे चे युपी वाले पिक्चर खोटे बेगडी वाटतात.>>>
आता तिथली रिॲलिटी पण बदलली ना? अर्थात हे नवे पिक्चर तिथल्या छोट्या मोठ्या शहरातलेच आहेत जी पूर्वी कधी फारशी दाखवली गेली नाहीत.

सौदागर मधला अमिताभ बच्चन जंजीरच्या नंतरचा वाटतो. गाल खप्पड नाहीत, बाळसेदार आहेत, हेअर स्टाईल दीवारच्या वेळची आहे.
काही सीन्स मधे तो जंजीरच्या पूर्वीचा वाटतो. कदाचित आधीच सुरू केला असेल.

सौदागर हे नाव खूप समर्पक आहे. व्यापार करता करता मानवी संबंधांकडे सुद्धा व्यापारी नजरेने तो बघतो. इतकंच कि त्या वेळच्या समाजमनाप्रमाणे वाईट वागलं कि शिक्षा होते, अद्दल घडते. आता वाईट वागणार्‍याला जग डोक्यावर घेईल. बदललेल्या सामाजिक मूल्यांच्या पार्श्वभूमीवर त्या त्या काळच्या कलाकृतींचा, कथांचा आस्वाद घेणं अवघड असतं. पण जमायला हवं.

धन्यवाद मित्रांनो..

नदिया के पार नक्की बघ रानभुली. साधा सुंदर अकृत्रिम… त्याच्या तुलनेत हम आपके… खुप फिका वाटतो आणि सलमान मुर्ख Happy

गेले सहासात वर्षे अतीपणा करुन ट्रोल झालेल्या सचिनने एक काळ गाजवला. राजश्रीच्या चित्रपटांत तो कसला चमकलाय… शोले अभुतपुर्व गाजत असताना आलेला गीत गाता चल त्याच्यासमोर सुपरहिट झाला. राजश्रीचे ४ चित्रपट त्याला मिळाले, चारही सुपरहिट. आजही कंटाळा येत नाही बघताना.

सतत नव्या चेहर्‍यांना संधी द्यायच्या हे राजश्रीचे धोरण असल्यामुळे त्यांनी सचिनला सतत रिपिट केले नाही. पण त्यांचे जे चित्रपट केले त्यात सचिन त्याच्या अभिनयाने उठुन दिसतो. अखियोंके…. चे शीर्षकगीत जास्त लोकप्रिय झाले पण त्यातले विल यु फर्गेट मी देन…. हे गाणेही तितकेच सुंदर आहे आणि त्यात सचिनचा अभिनय खुप छान आहे.

https://youtu.be/LKormodmTvs?feature=shared

नदिया के पार नक्की बघ रानभुली. >> नक्की.
फारेण्डने संगीत आणि गाण्यांबद्दल छान लिहीलंय वर.

थोडं विषयांतर - एखादं गाजलेलं पुस्तक किंवा कलाकृती याबद्दल अद्याप वाचलेलं , पाहिलेलं नाही असं सांगताना फक्त मलाच अवघड जातं का कि कुणी आहे साथीला ? Happy
( मायबोलीवर कुणाची तरी अशी प्रांजळ कबुली पाहिल्यापासून मनाचा हिय्या करणं जमतंय )

सौदागर मधला अमिताभ बच्चन जंजीरच्या नंतरचा वाटतो. गाल खप्पड नाहीत, बाळसेदार आहेत, हेअर स्टाईल दीवारच्या वेळची आहे.
काही सीन्स मधे तो जंजीरच्या पूर्वीचा वाटतो. कदाचित आधीच सुरू केला असेल.>>>>>>

जंजिर व सौदागर एकाच वर्षातले. त्याला दोन्ही एकत्र मिळाले असावेत. सौदागर नंतर सहा महिन्यांनी रिलिज झाला, तोवर अमिताभची जी इमेज तयार झाली त्याचा फटका बहुतेक सौदागरला बसला. तितकासा चालला नाही. मी त्या काळात दुदवर पाहिलेला आणि आवडला नव्हता कारण अमिताभच्या अँग्री मॅन ईमेजचे एक गारुड मनावर होते त्या मनाला निगेटिव अमिताभ आवडणार नव्हताच. आता वाढत्या वयात चित्रपट कळतोय व आवडला. Happy

जंजिरच्या यशानंतर त्याला सौदागरसारखे चित्रपट करायला वेळ मिळालाच नसता. चित्रपट कसेही असले तरी अमिताभने त्याच्या कामात कधीही चोरी केली नाही. म अँग्री यंग मॅनच्या इमेजच्या बाहेरचे अजुन भरपुर चित्रपट तो करु शकला असता तर एका चांगल्या अभिनेत्याची विविध रुपे आपल्याला पाहायला मिळाली असती.

थोडं विषयांतर - एखादं गाजलेलं पुस्तक किंवा कलाकृती याबद्दल अद्याप वाचलेलं , पाहिलेलं नाही असं सांगताना फक्त मलाच अवघड जातं का कि कुणी आहे साथीला ? >>>

मी आहे. मी अमिताभचा डॉन अद्याप पाहिला नाही. आता पाहिन Happy कित्येक पुस्तके वाचायचीत. टिवीवर गाजलेल्या प्रपंच, लाईफलाईन वगैरे मालिका पाहिल्या नाहीत. टिवीवरचे सागरकृत रामायण पाहिले नाही, दहाबारा एपिसोड्स पाहिले असणार.

साधना अगदी बरोबर, सचिनने छान काम केलंय सगळीकडे. तो पूर्वी आवडायचा. मी हम आपके बघितला नाहीये आणि बघणारही नाही.

मी पण आहे, माबोवर सतत रेफर होणारी फ्रेन्डस मी अजुन पाहिलेली नाही..पाहायची आहेच पण समहाउ जमलच नाहि अजुन.

सचिन स्व प्रेमात इतका अडकलाय की त्याचा गोल्ड्न भुतकाळ, उत्तम अभिनय, फिटनेस सगळ त्याच्यापुढे गौण होवुन गेलय.

विनय माणसाला शोभा देतो या अर्थाचे सुभाषित सचिनला झेलुन वैतागलेल्या माणसाला सुचले असणार.

मीही फ्रेंड्स वगैरे काही पाहिले नाही. इथली मंडळी चर्चा करतात तेव्हा हेवा वाटण्याखेरीज काही दुसरे उरत नाही. आता वय गेले ते पाहण्याचे.

मीही फ्रेंड्स वगैरे काही पाहिले नाही. इथली मंडळी चर्चा करतात तेव्हा हेवा वाटण्याखेरीज काही दुसरे उरत नाही. आता वय गेले ते पाहण्याचे. <<
अजिबात नाही. आता तर जास्त मजा येईल..

सौदागरमधला शेवटचा संवाद खुप छान आहे.नुतनचा विद्यमान नवरा अमिताभला म्हणतो, ये क्या मिया, हुक्का हाथ मे लेके बैठे हो, पिया भी नही. कोयलेमे आग है भी के बुझ गयी? अमिताभ कुंपणम्पलिकडच्या नुतनकडे बघत म्हणतो, नही भाईजान आग अभि बुझी नही!!

या चित्रपटातील नाती खुप साधी आहेत. नुतन अमिताभला जेवायला बोलावते. अंगणातच ती व अमिताभ बसतात तेव्हा तिच्या मृत नवर्‍याला मोठा भाऊ तिच्या घरी येतो. तो अन्नाची भांडी बघुन विचारतो, किसकी दावत है? नुतन म्हणते इनकी. तो लगेच समजतो आणि दोघांचेही अभिनंदन करतो. अमिताभ नुतनला सोडतो तेव्हा तोच परत तिच्यासाठी रिश्ता घेऊन येतो. अमिताभ बाजारात बसलेला असताना नुतनचा नवरा दिसतो तेव्हा तो लगेच जाऊन त्याची मुलांची खुशाली विचारतो. ते दोघेही वेगवेगळ्या गावात राहात असतात. तरी ओळख ठेऊन एकमेकांशी बोलतात. हल्लीच्या मालिकांमध्ये घरातल्या घरातच इतकी भांडणे व रुसवे फुगवे दाखवतात, त्या पारश्वभुमीवर हे नातेसंबंध मला खुप अनोखे वाटले.

साधना , मस्तच.
या कथेतल्या (सौदागर ) आवडलेल्या गोष्टी
- मुलीच्या पित्याला हुंडा द्यावा लागत नाही, तर मुलगाच मेहेर देतो ( या बद्दल एका पुस्तकात वाचलेलं आहे ). खरं तर मेहेर सुद्धा द्यावी लागली नाही पाहीजे पण, हुंडा ही एव्हढी भयंकर समस्या आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे खूपच विरोधाभासी आणि दिलासादायक चित्र वाटलं.
- एखाद्या मुलींचं अगदी सहज पुन्हा लग्न होऊ शकतं (आदिवासींमधे होतात अशी लग्नं). विधवा आहे म्हणून पुन्हा लग्न नाही , किंवा एकदा लग्न झालेली म्हणून तिच्याशी कुणी तरूणाने लग्नच करू नये असं नाही. योनीशुचितेच्या भ्रामक कल्पना नाहीत.
कथा असली तरी ती आजूबाजूच्या समाजाचं वर्णन करते म्हणून या कथा महत्वाच्या असतात. आमच्याकडे एक मुलगी घरकामात मदतनीस म्हणून येते. ती बीडकडची आहे. त्यांच्याकडे नाही पटलं कि काडीमोड होतो. कोर्टात जात नाहीत. हिची पण तीन लग्नं झाली आहेत. बहिणींची सुद्धा किमान दोन दोन लग्नं झालेली आहेत. पहिल्या नवर्‍यापासून मुलं असली तरी पुन्हा लग्न व्हायला काहीच अडचण येत नाही.
( सिनेमाच्या अनुषंगानी लिहीलं आहे. हा डिबेटचा विषय नाही याची पूर्ण कल्पना आहे. कदाचित संबंधित विषय असेल तर तिकडे पुन्हा एकदा लिहीनही)

हो.. मेहेर मुसलमानांमध्ये आहे पण ती तलाक झाला की द्यावी लागते बहुतेक. यात मुलीच्या बाबाला आधीच द्यायची. पद्मा खन्नाचा बाबा ती पोस्टातच ठेवणार असतो.

दुसर्‍या लग्नाच्या बाबतीत माझ्या बंजारा समाजातील बाईच्या जातीत तर मस्तच रुढी आहे. पंच जमा करुन काडी मोडायची. की झाली मोकळीक. तिच्या मोठ्या मुलीचा नवरा खुप त्रास द्यायचा, मारायचा आणि पोरगी येडी निमुट सोसायची. तो शेवटी दुसर्‍या एका गुन्ह्यात तुरुंगात गेला तेव्हा हिने पंच बसवुन पोरीचा घटस्फोट करवला आणि पुण्यात आणुन घरकामाला लावले, म्हणजे स्वतचे व पोरांचे पोट भरेल. त्यातच एक भला माणुस भेटला जो मुलगी व तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला तयार झाला. हिने लग्न लाऊन दिले
आता स्टेटसला फोटो ठेवत असते. मुले मोठी झालीत, ती आहेत आइ व दुसर्‍याबाबाबरोबर.

मीही फ्रेंड्स वगैरे काही पाहिले नाही. इथली मंडळी चर्चा करतात तेव्हा हेवा वाटण्याखेरीज काही दुसरे उरत नाही. आता वय गेले ते पाहण्याचे. <<
अजिबात नाही. आता तर जास्त मजा येईल.. >>> टोटली!

सौदागरबद्दल वरची माहिती वाचून आता पुन्हा पाहावासा वाटत आहे.

Pages