शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनैः शनैः = धिम्या गतीचा शनी. बरोबर, लिंक लागली “स्थिरवासर” आणि “मंदवार” ची.

सौम्य = बुध ग्रह हे नवीन. सौम्य चा एक अर्थ “उत्तर दिशा” असा दिला आहे, तेही एक नवीन.

रविवार= भानुवार हे योग्यच.

BTW, आठवड्यासाठी “अष्टवासर” वाचलेय मी.

नवग्रह स्तोत्रातील बुधाचा मंत्र:
प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम्।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्।।

हे दोन शब्दही हल्ली ऐकायला /वाचायला मिळत नाहीत.
गुदस्ता आणि तिगस्ता .
फारसीतून आले आहेत. (मराठी बृहदकोश.)

माझी आजी काका वगैरे नंडळींच्या नेहमीच्या वापरात गुदस्ता हा शब्द होता… आताची पिढी गेल्या वर्षी म्हणते.

हा शब्द प्रमाण भाषेत आहे? मला वाटले फक्त मालवणीत आहे.

साधना
"देठी" हा शब्द ऐकला आहे का? म्हणजे अळूच्या देठांची भाजी.
"दगडी" आमच्या घरी "स्लेट" दगडातून कोरून काढलेले पातेले होते. कढी करण्यासाठी.

गुदस्त, गुदस्ता
वि. १. मागचे; गत (वेळ, महिना, वर्ष). २. झाली गेलेली; होऊन गेलेली (गोष्ट). [फा. गुजस्ता]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आमच्या गावी एक बंगलेवाडी होती. होती यासाठी की आजही आहे पण एकच बंगला होता तो आता पडुन गेला. मालवणीत बंगल्याला बंगलो म्हणतात.. माझ्या काकाला हा शब्द काय ह्याचे काय आकर्षण होते देव जाणे. एकदा त्याने मला विचारले, बंगलो ह्याचो मुळ मराठीत शब्द काय आसा?? मी म्हटले ह्याचे मुळ मराठी नसावे कारण इन्ग्रजीत बंगलो हा शब्द आहे त्यावरुन बंगला हा मराठीत आला असावा व मालवणीत बंगलो. त्याला हा शब्द जशाच्या तसा इन्ग्रजीत आहे याचे फार आश्चर्य वाटले होते.

बंगलाचे मुळ काय आहे?

Bungalow Definition & Meaning - Merriam-Webster
Etymology
Hindi baṅglā & Urdu banglā, literally, (house) in the Bengal style

Bungalow ह्यावर चक्क एक विकी पान आहे. जगातल्या विविध देशातील बंगल्यांची चर्चा आहे. Bungalow google सर्च केला तर मिळेल.

बंगला चर्चा उद्बोधक !

BTW, मराठी वृत्तपत्रीय लेखनात जसे संगीत कार्यक्रम “बहारदार”, खुनासाठी वापरलेले शस्त्र “धारदार” तसेच कोणताही बंगला “टुमदार” असणे कंपलसरी असते Lol

मी तरी “टुमदार” या विशेषणाशिवाय सुटा “बंगला” हा शब्द अनेक वर्षांत वाचला नाहीय.

+१
* टुमदार व बंगला हे जुळे आहे खरे !

रच्याकने ...
टुमदारचा अन्य अर्थ,
"युक्तीप्रयुक्तीने युक्त" हा देखील आहे
(मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ).

टुमदार बंगला. तसेच लहान सुबक घरासाठी “बंगली” असेही वाचले आहे.

कथा-कादंबरीत हमखास कवी/ लेखक किमानप़क्षी मनस्वी वगैरे पात्रांची रहायची जागा Happy

टूम
स्त्री. १ चकपक; लखपक; डामडौल; मोठेपणाची ढब; ऐट; शोभा; दिखाऊपणा. २ मनांत भरण्यासारखा गुण, चिन्ह; नवी व सुबक वस्तु; चमत्कारिक वस्तु; नवीन व आश्चर्यकारक कल्पना, शोध; फॅशन; तर्‍हा; पद्धत; चाल; विचार. ३ शक्कल; युक्ति; खुबी. (क्रि॰ काढणें). ॰दार-वि. १ मोठा व सुंदर; सुरेख व भरपूर; तेजःपुंज; तेजस्वी. टुमदार पहा. २ युक्तिप्रयुक्तीनें युक्त.
दाते शब्दकोश
"टूम" पूर्वी वापरात होता. आता दिसत नाही.

टूम या अर्थी कधी 'बूट' (काढणे) असे वाचले आहे.

बूट = नवीन व चमत्कारिक कल्पना; युक्ती; खुबी; टूम; विचार, इ.
दाते शब्दकोश

बरोबर
.....
1980 च्या दशकातली "हत्ती बेलबॉटम" घालण्याची टूम आठवली Happy

केशवकूल, 'देटी' म्हणतात आमच्याकडे अळूच्या पानांच्या देठांच्या भाजीला. भाजी अशी नाही खरं तर म्हणता येणार. कोशिंबीर/रायतं प्रकारात मोडते.

हा. तेच ते. भाजीचा अगदी शेवटचा भागही वाया घालवायचा नाही, इथे मूळ्याचा पाला फेकून देतात . आम्ही त्याचीही भाजी करतो.

अळूच्या पानांच्या देठांना देठी म्हणतात ना? 'देठी'चं भरीत व्हायचं आमच्याकडे. भोपळ्याच्या भरतासारखे त्यात पण दही असायचे.

केकू, पण देठी तशीही फेकत नाहीतच. फतफत्यात / फदफद्यात पानं आणि देठ दोन्ही वापरतात.

भरघोस पाने आणि करंगळीएवढे मुळे असलेल्या मुळ्याच्या पानांची पचडी भारी लागते.

आता बाफ काय, बोलताय काय म्हणून डॉक्टरांचा ओरडा पडू नये म्हणून - पळवा ! पळवा म्हणजे मुळ्याच्या पानांची भाजणी घालून केलेली भाजी. भाजणीच्या मोकळीच्या आसपास चव असते त्याची आणि त्यामुळे भाजी म्हणून खूप कोरडी होते - पण चव मात्र झकास असते.

Pages