शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतीच युट्यूबवर डॉ. मानसी केळकर यांची मराठी बोलींविषयी ची मुलाखत ऐकली. लिंक - https://youtu.be/w3LHi7PckH0?si=hYqN0rlaCYvhfRW7

त्यांनी एका प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातल्या विविध बोलीभाषांचे सर्वेक्षण केले आहे आणि त्याचे तपशील पुढील संकेतस्थळावर सर्वांना उपलब्ध आहेत - https://sdml.ac.in/mr
अतिशय स्तुत्य प्रकल्प आहे. या धाग्यावर नियमित येणाऱ्या सर्वांना ही मुलाखत आणि वेबसाईट नक्कीच आवडेल.

धन्यवाद !
वाखुसा. सवडीने पाहतो.

दाती तृण धरणे
ह्या म्हणीचा उगम कसा झाला असावा?

जयस्वी

यशस्वी नेहेमी वाचतो पण आज जयस्वी वाचला.

अर्थ सेम. विजयी. जय मिळवलेला.

शब्दाच्या शेवटी “स्वी” असणारे अन्य शब्द मनस्वी, तपस्वी, तेजस्वी वगैरे चटकन आठवले.

शिंदळ <<<<<
देशी प्रा. छिण्णो, छिण्णाल वरुन आलाय.
(दाते)

सूर्याच्या सोळा कळा म्हणजे काय ?

कळा हा कला शब्दाचा अपभ्रंश असू शकतो पण चंद्रासारखा सूर्याचा आकार काही बदलत नाही. एका दिवसात ना सोळा प्रहर असतात ना सोळा तास. म्हणजे प्रत्येक तासाचा / प्रहराचा सूर्य असाही अर्थ नाही होत. मग १६ कळा म्हणजे काय असू शकते?

*सूर्याच्या सोळा कळा>>>
हे कुठे वाचण्यात आले आहे ?

या विषयावर शोध घेत असताना एक वेगळीच माहिती मिळाली.
शब्दरत्नाकरने कळा या शब्दाचा एक अर्थ १६ ही संख्या असाही दिला आहे.

प्रत्येक प्रहराच्या मध्यावर सूर्याची 'अवस्था' बदलते असे काही आहे का ? ?

रोचक. मलाही याचा संदर्भ जाणून घ्यायला आवडेल.

सूर्य = हिरण्यगर्भ
सोन्याचे १६ कस जुन्या साहित्यात आढळतात. (५२ नाही, ते गणित वेगळं). त्याचा काही संबंध आहे का हे बघायला हवं.

"सोळा कळांनी तपे अर्क" - गजाननविजय

'सोळा कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी | तीव्र आदित्य कळारासी तोही दाखवीना ||' - दासबोध

दासबोधात चंद्राच्या सोळा कळा आहेत पण त्या पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या. म्हणजे त्यांचा १६ तिथींशी संबंध नसावा. आणि त्याच ओवीत सूर्याच्या कळा आहेतच (फक्त १६ असा उल्लेख नाहीये)

डॉक्टर, त्या तेरा कळांची नावे समजली पण त्या तेरा कळा म्हणजे तरी काय?

"दसऱ्याच्या", "दिवाळीच्या" शुभेच्छा मी पण "देतो". पण नुकतंच शब्दांचीच रत्ने नावाचं पान वाचलं. त्यात एक मुद्दा मांडला आहे. इच्छा ही व्यक्त करणाऱ्याची असते. म्हणजे मी शुभ इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती माझी आहे, दसऱ्याची किंवा दिवाळीची नव्हे. सण हे निमित्त आहे. त्यामुळे "दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा" असं म्हणणं जास्त बरोबर आहे.

(माझा अंदाज असा आहे की ही षष्ठी विभक्ती सणाच्या संदर्भात हिंदीतून मराठीत आली असावी. जसं उसकी मदद चं त्याची मदत झालं, तसंच दीवाली की शुभकामनाएँ याचं दिवाळीच्या शुभेच्छा असं झालं असावं.)

अर्थात सवयीने आता "सणाच्या शुभेच्छा" सगळेच "देतात" आणि भाषा ही केवळ समोरच्याला कळली म्हणजे झालं एवढाच मुद्दा असेल तर काही पण म्हणा!

काय की...
Lol खूप दिवसांनी ऐकले...!!

काय की...
Lol खूप दिवसांनी ऐकले...!! +१११

तसूभर, रेसभर = थोडे
<<<<<<<
तसू = दोन बोटांची लाम्बी, गजाच्या एकविसांश किंवा एकचोविसांश अंशाइतक्या लांबीचे एक परिमाण
आणि
रेस = पैशाचा सव्वासाहवा भाग; कण.

हात किंवा पायाच्या तळव्यात जो लाकडाचा लहानसा कण (काटा नव्हे) जातो त्याला कोकणात तसू म्हणतात. आंब्याच्या पेटीच्या लाकडासारख्या कमी प्रतीच्या लाकडाचे हमखास तसू जाते

Pages