
यांनी घडवले माझे मराठी...
शिक्षक म्हटले की चटकन आपल्या नजरेसमोर शालेय शिक्षक येतात. पण आपले आद्य शिक्षक हे खरे तर आपले माता-पिता व कुटुंबीय असतात. मला माझ्या आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबांचा सहवास अधिक लाभला. आजी शालेय शिक्षिका होती. ती मराठी व हिंदी शिकवायची. त्यामुळे चांगले मराठी बोलायचे व लिहायचे संस्कार तिच्याकडून झाले. आजी-आजोबांमुळे त्यांच्या पिढीचे काही विशिष्ट शब्द वारंवार माझ्या कानावर पडायचे, जे माझ्या समवयस्क मुलांना माहीत नसायचे. त्यातला एक म्हणजे ‘तिगस साली’(तिगस << तिगस्ता = गेल्याच्या मागील वर्षी ). शेतीतील पिकांसंबंधी बोलताना हा शब्द शेतकऱ्यांच्या तोंडी पुढे मी बऱ्यापैकी ऐकला. आजी मराठी लेखनही करायची. तिच्या लेखनात ‘सांप्रत’ हा शब्द बऱ्यापैकी यायचा. तो माझ्या मनात रुजला. पुढे मी लेखन करू लागल्यावर तो माझ्या लेखनातही बर्यापैकी डोकावे. पुढे मी प्रयत्नांती त्याला काढून ‘सध्या/हल्ली’ असे लिहू लागलो. माझी आजी छोटी मोठी पुस्तके लिहून स्वतः प्रकाशित करायची. त्या काळची छपाई खिळे जुळवून असायची. त्यामुळे छपाईच्या पहिल्या खर्ड्यात प्रचंड चुका असायच्या. मग त्या सगळ्या प्रतीचे मुद्रितशोधन आम्ही कुटुंबीय घरी एकत्र करत असून. त्यातून ह्रस्व /दीर्घ आणि शुद्धलेखनाच्या इतर अनेक गोष्टींवरचे चांगले संस्कार माझ्यावर झाले.
मराठीच्या शालेय शिक्षकांमध्ये कायम लक्षात राहिलेले आहेत ते म्हणजे डॉ. वि. य. कुलकर्णी. आमचे शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांचे स्वतःचेही पीएचडीचे शिक्षण चालू होते. त्या काळी असे शिक्षक शाळांमध्ये दुर्मिळ असायचे. त्यांनी मराठी भाषेसंबंधी बरंच काही शिकवलं होतं. ते सर्व एकदम सांगता येणार नाही. परंतु कायम लक्षात असलेले उदाहरण लिहितो (हे यापूर्वी अन्य धाग्यावर लिहिलेले आहे). आम्ही नववीत असताना एके दिवशी चालू विषय बाजूला ठेवून त्यांनी संपूर्ण वर्गाला सांगितले,
“आता आज मी तुम्हाला जी गोष्ट शिकवणार आहे ती कायम लक्षात ठेवा. ह्या गोष्टीबाबत समाजात ९० टक्के लोक चुकीचे लिहिताना मला दिसतात. ही चूक तुमच्या हातून पुढे आयुष्यभर होऊ नये असे मला वाटते. तेव्हा लक्षपूर्वक ऐका”.
मग त्यांनी आम्हाला ‘द्ध’ हे जोडाक्षर नीट कसे लिहायचे ते शिकवले. आज आपण मराठीतील अनेक ठिकाणचे लेखन पाहिले असता आपल्याला हे जोडाक्षर ‘ध्द’ अशा चुकीच्या पद्धतीने लिहिलेले दिसते. इथे एक मूलभूत गोष्ट अशी आहे. या जोडाक्षरात अगोदर ‘द’ चा उच्चार होतो आणि मग ‘ध’ चा. म्हणून ते योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे. अनेक मराठीचे प्राध्यापक सुद्धा ही घोडचूक करताना दिसतात तेव्हा मला आमच्या वरील शिक्षकांची आठवण सातत्याने येत राहते. खुद्द स्वतःचे नाव ‘उद्धव’ असलेले किती जण आपले नाव शुद्ध लिहीत असतील हाही एक कुतूहलाचा विषय आहे !
माझ्या शालेय जीवनात मी सकाळ, केसरी आणि तरुण भारत ही वृत्तपत्रे वाचत लहानाचा मोठा झालो. त्या काळात या वृत्तपत्रांमधील मराठी लेखन हे आदर्शवत होते. कित्येकदा कुटुंबात चर्चा होत असताना जर आपल्याला मराठी शुद्धलेखन किंवा भाषेसंबंधी अन्य काही शंका आली तर घरातील एखादी व्यक्ती पटकन, “अरे कालच्या दैनिकात असे लिहीले आहे म्हणजे ते बरोबरच असलं पाहिजे”, असे म्हणायची. इतका विश्वास तेव्हा काही वृत्तपत्रांबाबत वाटत असे. (आजची परिस्थिती आपण जाणतोच. इ- वृत्तपत्रांमधील मराठी तर टिंगलीचा विषय व्हावा ही शोकांतिका आहे). तेव्हाच्या सकाळ मधील बातमीलेखन, केसरीचे अग्रलेख आणि तरुण भारतमधली विविध रंजक स्फुटे या सगळ्यांमधून मराठीचे चांगले शिक्षण होई.
अलीकडील वृत्तपत्रीय मराठी भाषा बरीच बिघडलेली असली तरी गेल्या ४-५ वर्षात मला काही चांगले मराठी शब्द वृत्तपत्रांमधून आलेले दिसले. सदनिका, निश्चलनीकरण, उत्परिवर्तन, अंतरभान, नाममुद्रा ही त्यापैकी पटकन आठवणारी काही नावे. आकाशवाणीवरील मराठी बातम्या हा चांगल्या मराठीचा एक स्त्रोत आहे हे मी आवर्जून नमूद करतो. माझ्या लहानपणापासून मी त्या ऐकत आलो आहे आणि आजही (अन्य माध्यमांच्या तुलनेत पाहता) तो एक चांगला स्रोत आहे, हे मला सांगावेसे वाटते.
मी पदवीधर झाल्यानंतर वृत्तपत्रातून मराठी लेखन करत होतो. एके दिवशी सकाळमध्ये संपादकीय पानावर अगदी मधोमध एक भला मोठा लेख आलेला होता. त्याचे शीर्षक ‘इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषेत प्रचंड भेसळ’ या आशयाचे होते आणि लेखक होते आचार्य केळकर. मग त्यांनी नेहमीची अनेक उदाहरणे देऊन आपण मराठी माणसे कसे गरज नसताना अनेक इंग्रजी शब्द वारंवार लेखनात आणि बोलण्यात वापरतो याची उदाहरणे दिली होती ( सॉरी, प्लीज, थँक्यूपासून ते हॅपी दिवाली वगैरे पर्यंत सर्व). पुढे त्यांनी म्हटले होते की, आता निव्वळ हा लेख लिहिण्याचा किंवा मराठी भाषा दिनानिमित्त चर्चा करण्याचा विषय नाही. आपल्याला याविषयी जर खरंच काही भरीव करावेसे वाटत असेल तर आपण एकत्र जमून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानुसार त्यांनी त्यांच्या घरी एक बैठक बोलावली होती. मी मोठ्या उत्साहाने त्या बैठकीला गेलो. बैठकीपूर्वी जे लोक जमले होते त्यात आमचे एक संस्कृतचे शिक्षकही होते. गप्पांच्या नादात त्यांनी असा विचार मांडला की हे इंग्रजीचे आक्रमण वगैरे लेख लिहायला ठीक आहे. परंतु शेवटी भाषा ही नदीसारखी प्रवाही असली पाहिजे. नंतर बैठक सुरू झाली. त्यात आचार्यांनी प्रास्ताविक केले आणि परभाषांमधील शब्द आपल्या भाषेत येणार हे अटळ आहे हे मान्य केले. परंतु त्यांनी लगेच लोकमान्य टिळक यासंदर्भात काय म्हणत असत याचे उदाहरण दिले. टिळक म्हणायचे,
“परभाषेतील शब्द हे आपल्या भाषेत पीठात मीठ इतक्याच अल्प प्रमाणात असावेत. मीठ जर फारच जास्त होऊ लागले तर संपूर्ण भाकरीच खारट होते”.
तेव्हा केळकरांनी आम्हाला या वाक्याला आदर्श मानायला सांगितले आणि विनाकारण आपण जे इंग्रजी/हिंदी शब्द संभाषणात व लेखनात घुसडत राहतो ते टाळावेत असे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी एक सोपा घरगुती उपाय करायला सांगितला. ते म्हणाले, “आपल्या नोकरी-व्यवसायाच्या दिवशी आपल्या शुद्ध मराठी बोलू वगैरे प्रकार करून चालणार नाही. परंतु सप्ताहातील जो आपला सुट्टीचा दिवस असेल त्यादिवशी आपण स्वतःपुरता मराठी शुद्धीकरण दिवस मानायचा”. मग करायचे काय त्या दिवशी ते त्यांनी अगदी रंजकपणे सांगितले. “सकाळी आवरून झाल्यानंतर छानपैकी झब्बा घाला. त्याला दोन्ही बाजूला खिसे असतील. मग एका बाजूच्या खिशामध्ये ३०-४० पंचवीस पैशांची नाणी ठेवा” (होय, तेव्हा २५ पैशांना ‘किंमत’ होती). हे ऐकल्यावर आमचे कुतुहल वाढले.
ते पुढे म्हणाले, “आता करायचं एवढंच. दिवसभर तुम्ही घरच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात याल. जेव्हा तुम्ही मराठी माणसाशीच बोलत आहात तेव्हा तुमचे वाक्य बोलून झाल्यानंतर जर तुमच्या लक्षात आले की, आपण गरज नसताना उगाच इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात घुसडले होते, तर मग त्या प्रत्येक इंग्रजी शब्दामागे स्वतःला २५ पैशांचा दंड करायचा ! मग डाव्या खिशात हात घालून एक नाणे बाहेर काढून ते उजव्या खिशात टाकायचे. असे करत करत शेवटी तो दिवस संपेल. दिवसाखेर स्वतःला केलेल्या दंडाची रक्कम किती जमा झाली ते बघा. ती रक्कम कोणाला तरी दान करून टाका. असे नियमित करत राहा आणि मग हळूहळू दंडाची रक्कम कमी कशी होईल याचे तुम्हालाच भान येईल”.
नंतर हा प्रयोग मी एक दोनदा केला व त्याची मजा घेतली. पण नंतर असे ठरवले की यातला मथितार्थ आपण लक्षात घ्यायचा. मग घरी आणि मित्रांमध्ये बोलताना आणि लिहिताना जाणीपूर्वक मराठी शब्दांचा वापर वाढवू लागलो तांत्रिक शब्द वगळता विनाकारणच आपण फॅशन म्हणून जे इंग्रजी शब्द घुसडत असतो त्यांचा वापर कमी केला. सुरुवातीला असे प्रयत्नपूर्वक बोलताना अडखळायला होते. ते कदाचित समोरच्याच्याही लक्षात येत असते. पण एकदा जिभेला आपण वळण लावू लागलो की मग ते आपसूक घडू लागते.
पुढे काही वर्षांनी मला माझ्यात काय बदल झाला आहे याची पावती चक्क माझ्या मुलाकडूनच मिळाली. तो आठवीत शिकत होता. आम्ही सहज हिंडायला बाहेर पडलो होतो तेव्हा तो एकदम म्हणाला, “बाबा मला एक जाणवलं आहे. तू जेव्हा मराठी बोलत असतोस तेव्हा तुझे बोलणे हे चांगल्यापैकी मराठी शब्दांनीच युक्त असते आणि जेव्हा तू आम्हाला इंग्रजीचे काही सांगतोस तेव्हा तू ते इंग्रजीतच व्यवस्थित सांगतोस”. त्याच्या अनुभवविश्वात त्याने माझी इतरांशी तुलना केली असावी आणि त्यातून त्याचा अभिप्राय त्याने मला दिला. माझ्यात हा जो काही बदल घडला त्याचे श्रेय मी आचार्य केळकर यांनाच देईन .
या निमित्ताने आमच्या त्या बैठकांमध्ये घडलेला अन्य एक उपक्रम सांगतो. जेव्हा आपण म्हणतो की मराठी भाषेचा अभिमानाने वापर होत राहिलाच पाहिजे, तेव्हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपली भाषा ही अर्थकारणाची भाषा झाल्याशिवाय त्याला योग्य ती प्रतिष्ठा मिळत नाही. हा मुद्दा लक्षात घेऊन तत्कालीन मराठी उद्योगपतींना आम्ही काही पत्रे लिहिली होती. त्या काळी किर्लोस्कर, गरवारे हे जोरात होते. पत्रांमध्ये आम्ही असे म्हटले होते,
“महोदय, आपण आपापल्या कार्यालयांमध्ये नोकरीचे अर्ज स्वीकारण्यापासून ते इतर अनेक गोष्टी लिहिताना मराठीच्या वापराला उत्तेजन द्यावे. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेल्या उमेदवारास नोकरी देताना निव्वळ त्या मुद्द्यावरून डावलले जाऊ नये”.
कालांतराने आमचा तो गट काही सक्रिय राहिला नाही. पण माझ्या मनाशी मी एक गोष्ट ठरवून ठेवली की, सभा, आंदोलने, चळवळी, शासनाकडे मागण्या या सगळ्यांपेक्षा सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, आपण स्वतःला सुधारत जाणे. मी जेव्हा मराठी बोलेन किवा लिहीन, तेव्हा जाणीवपूर्वक मराठी शब्द नीट वापरेन; उगाचच होणारा इंग्रजी/हिंदी शब्दांचा मोह टाळेन. हा प्रयत्न मी माझ्यापुरता सातत्याने करत राहतो.
आपण जेव्हा ‘माझे गुरु’ असे म्हणतो तेव्हा सर्वप्रथम प्रत्यक्ष एखादी व्यक्ती ही तर सर्वात महत्त्वाची. पण त्याचबरोबर विविध माध्यमे ही देखील आपली अप्रत्यक्ष गुरूच असतात. थोडे पुढे जाऊन असे म्हणतो की, एखादा प्रसंग सुद्धा आपला गुरु होऊ शकतो. हा प्रसंग घडला साधारण भारतामध्ये संगणक येऊन थोडासा कालावधी लोटला होता तेव्हा. नुकतीच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ही नावे सामान्यांच्या कानांवर वारंवार पडू लागली होती. त्या दरम्यान महाराष्ट्रात एक अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्यामध्ये एका गृहस्थांनी (आता नाव विसरलो) या दोन नव्या तांत्रिक इंग्लिश शब्दांसाठी अनुक्रमे यंत्रणा आणि मंत्रणा हे शब्द सुचविले होते. ते संमेलनामध्ये त्यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. ही वाचलेली बातमी सुद्धा माझ्यासाठी एक शिक्षकच ठरली.
आयुष्याच्या त्या पुढील कालखंडात ‘मराठीचे शिक्षक’ असे बिरूद मी ज्याला लावू शकतो ते म्हणजे एक मासिक आहे आणि ते म्हणजे ‘अंतर्नाद’. मराठीच्या विकासाचे ध्येय ठेवून हे मासिक सुरू झाले होते. अन्य कुठल्याही मासिकामध्ये नसलेली एक विशेष गोष्ट इथे होती. ते म्हणजे मासिकाच्या पहिल्या पानावरील श्रेयनामावलीत “व्याकरण सल्लागार : यास्मीन शेख’ हे नाव ठळकपणे छापलेले असायचे. व्याकरण सल्लागार नेमलेले कदाचित हे मराठीतील एकमेव मासिक असावे. तेवीस वर्ष हे मासिक चालले आणि नंतर बंद पडले. या काळात मी तिथे दीर्घकाळ लेखन केले. मासिकातील अन्य लेखनातून आणि विविध सूचनांमधून मला मराठी लेखन सुधारत राहण्याची चांगली प्रेरणा मिळाली. सामाजिक वापरातील काही रूढ इंग्लीश किंवा तांत्रिक शब्दांना प्रयत्नपूर्वक चांगले मराठी प्रतिशब्द शोधणे हा भागही त्या मासिकात चांगल्या प्रकारे चर्चिला जायचा. नमुन्यादाखल दोन उदाहरणे देतो. फोनच्या दोन प्रकारांसाठी स्थिरभाष आणि चलभाष हे सुंदर शब्द मला तिथे शिकायला मिळाले. ‘शेअर करणे’ असले भ्रष्ट रूप वापरण्याऐवजी “तुम्हा सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी” असे म्हणणे अधिक चांगले. यावरही तिथे छान चर्चा झाली होती. म्हणून हे मासिक माझ्या आयुष्याच्या मध्य टप्प्यावरील माझे मराठीचे शिक्षकच म्हटले पाहिजे.
मराठी भाषेच्या विकास आणि प्रचारासाठी पोटतिडकीने काम करणारे गोरे नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांचे काही लेख नंतर वाचनात आले. त्यांची एक दोन भाषणेही ऐकली त्यातूनही माझे मराठीचे शिक्षण होत राहिले. तसेच अन्य मराठी माणसे वापरत नसलेले काही मराठी शब्द आपण जाणीवपूर्वक वापरताना त्याबद्दल लाज किंवा दडपण वाटेनासे झाले.
२००५ पासून मी आपल्या संस्थळावर वावरत आहे. इथे मराठी भाषाविषयक अनेक धागे आतापर्यंत निघालेले आहेत. गेल्या दोन वर्षातील कोविडमय काळात मी काही शब्दखेळ नावाचे धागे काढले. तिथे नियमित येणाऱ्या सभासदांनी मराठी शब्द, वाक्यरचना इत्यादी संबंधी अनेक चांगल्या आणि मौलिक सूचना केलेल्या आहेत. त्यातून माझ्या मराठीचा चांगला विकास झाला. त्यादृष्टीने माझे हे सर्व सहकारीही या टप्प्यातील माझे मराठीचे शिक्षकच म्हणता येतील.
यंदाच्या मराठी भाषा दिनानिमित्त संयोजकांनी हा विषय लेखनासाठी ठेवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. एरवी या विषयावरील आपले मनोगत सांगायचे तरी कोणाला आणि ऐकणार तरी कोण, अशी एकंदरीत कौटुंबिक-सामाजिक परिस्थिती आहे. त्या रुक्ष पार्श्वभूमीवर हा उपक्रम एक सुखद गारवा आहे. या निमित्ताने गतायुष्यात डोकावता आले आणि स्मरणरंजन झाले.
धन्यवाद !
.................................................................................................................................................
चांगले लिहिले आहे.
चांगले लिहिले आहे.
एरवी या विषयावरील आपले मनोगत सांगायचे तरी कोणाला आणि ऐकणार तरी कोण, अशी एकंदरीत कौटुंबिक-सामाजिक परिस्थिती आहे. >>> हे वाचून एकदम उदास वाटलं.
चांगला लेख.
चांगला लेख.
कुमार सर, खूप सुंदर लेख!
कुमार सर, खूप सुंदर लेख!
>>मग त्यांनी आम्हाला ‘द्ध’ हे जोडाक्षर नीट कसे लिहायचे ते शिकवले.>> हे अक्षर माझ्याकडून 'द्' नंतर ध (शुद् ध) असे लिहीले जाते, ते कितपत बरोबर आहे?
बाकी तिगससाली, स्थिरभाष आणि चलभाष हे शब्द माहीत नव्हते.
तुम्हीच इतरत्र सुचवलेले लोकसत्तेतील ' भाषासूत्र ' हे सदर वाचतोय.
सर्व प्रतिसादकांचे
सर्व प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
..
'द्' नंतर ध (शुद् ध) असे लिहीले जाते, ते कितपत बरोबर आहे?
>>
चांगला मुद्दा. हाही पर्याय बरोबर आहे. हे देखील आम्हाला कुलकर्णी गुरुजींनी शिकवले होते.
आता संगणकावरील लेखनातील मजा सांगतो. विविध प्रकारांनी आपण टंकन करत असतो..
गूगल इनपुट टूल्स वापरुन टंकन केले की आपोआपच ‘द्ध’ असे रूप येते.
अन्य काही प्रकारे 'द्' नंतर ध असे आपण व्यवस्थित फोडूनही लिहू शकतो.
पण आता इथे माबो चौकटीतील एक गंमत पहा. तो पाय मोडका द आणि अख्खा ध जर आपण जवळ आणले तर आपोआप त्याचे शुद्ध एकत्रित रूप द्ध तयार होते
प्रयत्न केला तरी सुटे राहतच नाही.
लोकसत्तेतील ' भाषासूत्र ' हे
लोकसत्तेतील ' भाषासूत्र ' हे सदर
ते खरंच सुंदर आहे.
ज्यांना अजून माहिती झाले नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दुवा :
https://www.loksatta.com/navneet/marathi-language-english-word-use-in-ma...
मराठीबद्दलचे प्रेम व्यक्त
मराठीबद्दलचे प्रेम व्यक्त करणारा चांगला लेख.
>>स्थिरभाष आणि चलभाष>>> छान शब्द आहेत.
मातृभाषा विशुद्ध राहण्यासाठी
मातृभाषा विशुद्ध राहण्यासाठी जाणीवपुर्वक केलेले प्रयत्न आवडले. मलाही अनावश्यक इंग्रजी शब्द आलेला आवडत नाही....
सुंदर अंतर्मुख करणारा लेख ....
धन्यवाद...
चांगले लिहिले आहे .
चांगले लिहिले आहे .
तिगस्ता हा शब्द ऐकला नव्हता. गुदस्ता (गतसाली) बरेचदा वाचला आहे.
अंतर्नाद दिवाळी अंक वाचले आहेत. मासिक अंकही वाचले असावेत. चलभाष, स्थिरभाष हे शब्द मलाही आवडले होते.
पण काही गोष्टींबाबतचा आग्रह पटत नाही किंवा त्यांचे मराठीकरण तितकेसे जमले नाही असे वाटते.
शेअर करणे यासाठी वाटून घेणे हे जमले नाही, असे वाटते. इथे शेअर करणे म्हणजे आपला अनुभव , मत सांगणे असा अर्थ असतो. एखादी वस्तू नव्हे. तर शब्दशः भाषांतराऐवजी अर्थ समजून शब्द योजायला हवेत. हे लिहितानाच मला - माझा अनुभव तुम्हांला सांगावासा वाटतो अशी शब्दयोजना सुचली. लोकसत्तेतील यावर्षीच्या एका सदरात असंच शब्दशः भाषांतर असतं , ते खटकतं.
हॅपी दिवाली बाबत. मुळात सणाला शुभेच्छा देण्याची रीत आपल्याकडे नव्हती. ती मराठीत मारून मुटकून बसवली असं वाटतं.
दिवाळीच्या शुभेच्छा असं लिहिण्यापेक्षा त्या नेमकं काय शुभ ( शुभ अशुभ यात पुन्हा वेगळी अर्थछटा ) इच्छितो तेच लिहावं असं मला वाटतं.
म्हणजे ही दिवाळी तुमच्यासाठी सुखदायी इ.इ. ठरो.
सर्व नवीन प्रतिसादकांचे
सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
...
शेअर करणे....>>>मूळ इंग्लिश शब्द फक्त शेअर इतकाच आहे आणि त्यातून योग्य भावार्थ व्यक्त होतो.
तेच मराठीत लिहिताना पुढे आपण ''करणे" लिहितो. त्याने काहीतरी विचित्र शब्दयोजना तयार होते.
माझा अनुभव तुम्हांला सांगावासा वाटतो >>> हे उत्तमच.
लेख फार आवडला.
लेख फार आवडला.
उद्या येइल बहुतेक 
>>>>>>>>आयुष्याच्या त्या पुढील कालखंडात ‘मराठीचे शिक्षक’ असे बिरूद मी ज्याला लावू शकतो ते म्हणजे एक मासिक आहे
वाह!!! अभिनव कल्पना. असे निर्जीव गोष्टींवर, सजीवतेचे आरोपण करणे सुद्धा कोणतातरी अलंकार आहे. आता विसरले
धन्यवाद.
धन्यवाद.
निर्जीव गोष्टींवर, सजीवतेचे आरोपण करणे सुद्धा कोणतातरी अलंकार आहे.
>>> छान मुद्दा.
बहुतेक तो चेतनगुणोक्ती असावा.
(https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4...)
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
'तिगस्त साली' असं माझी आजी म्हणायची. दोन वर्षांपूर्वी याअर्थी.
सामो, चेतनगुणोक्ती.
हां चेतनागुणोक्ती बरोबर!!!
हां चेतनागुणोक्ती बरोबर!!!
आताच मी पुणे आकाशवाणीवर मराठी
आताच मी पुणे आकाशवाणीवर मराठी भाषा दिनानिमित्त झालेला एक परिसंवाद ऐकला. सूत्रसंचालन केले होते वंदना बोकील-कुलकर्णी यांनी. काही प्राध्यापकांचा यात समावेश होता. सुरेख चर्चा झाली. चांगल्या मराठीचा (बोलणे/लिहिणे) प्रसार होण्यासाठी प्रत्येक मराठी भाषकाने आपापल्या परीने काय करावे यावर त्यात उहापोह झाला.
बोकील यांनी, त्यांनी आयोजित केलेल्या एका चांगल्या उपक्रमाचा उल्लेख केला. त्याचे नाव चांदण्यातील गप्पा असे होते. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसाठी तो उपक्रम होता. त्यात मराठीच्या विविध पैलूंचा मुलांना परिचय करून देण्यात आला. तो उपक्रम मुले व पालक या दोघांनाही खूप आवडला.
अभिनंदन !
असेच उपक्रम विविध स्तरांवर घडत राहोत ही सदिच्छा.
फार सुंदर लिहीले आहे. साधी
फार सुंदर लिहीले आहे. साधी सोपी मराठी हल्ली वृत्तपत्रात दुर्मिळ झाली आहे. आपला लष्कराच्या भाकर्या धागा म्हणूनच फार आवडतो. दोन भाषांची सरमिसळ न करणे हे त्या त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा सुकर मार्ग आहे.
फार सुंदर लेख. मराठीत इंग्रजी
फार सुंदर लेख. मराठीत इंग्रजी शब्द येऊ न देण्याचा खेळ शाळेत आम्हीही खेळत असू. फक्त पैसे देवाड घेवाण ऐवजी पाठीवर एक बुक्का मारायचा असा दंड होता.
:
>>>दोन भाषांची सरमिसळ न करणे
>>>दोन भाषांची सरमिसळ न करणे हे त्या त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा सुकर मार्ग आहे.>>> +९९९
अमराठी लोकांना मराठी शिकवणे हा पण आपली मराठी सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे.
मी पूर्वी याचा अनुभव घेतला आहे
सर्व नवीन प्रतिसादकांचे
सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
लष्कराच्या भाकर्या धागा म्हणूनच फार >>>
आता हा विषय इथे निघालाच आहे तर काही लिहितो.
मी वर उल्लेख केलेल्या कालच्या आकाशवाणीवरील परिसंवादात त्या संचालक बाईंनी त्यांचे मराठी पत्रकारांबद्दलचे हे अनुभव सांगितले:
१. मराठी भाषा दिनानिमित्त एक मराठी पत्रकार त्यांना येऊन म्हणाले, “या दिनानिमित्त आम्हाला काहीतरी ‘बाईट’ द्या ना ! तेव्हा बाईंनी त्या व्यक्तीला तिथल्या तिथे खडसावले की निदान मभादिनाच्या दिवशी तरी संदेश/उपयुक्त माहिती असे म्हणा.
२. अन्य एका पत्रकारांनी, मुलांच्या नावाच्या आधी जे ‘चि.’ लिहितात त्याचा अर्थ काय असे एका सभेत विचारले होते.
३. एका प्रसंगी एक पत्रकार त्यांना म्हणाले, “अमुक-तमुक मृत व्यक्ती बद्दल तुमचा अभिप्राय द्या ना !”
एकंदरीत अशी परिस्थिती आहे...
३. एका प्रसंगी एक पत्रकार
३. एका प्रसंगी एक पत्रकार त्यांना म्हणाले, “अमुक-तमुक मृत व्यक्ती बद्दल तुमचा अभिप्राय द्या ना !” >>
सी,
सी,
हा हा, सुंदर चित्र.
...
अमराठी लोकांना मराठी शिकवणे >>> चांगला उपक्रम.
छान लिहिले आहे . सगळ्या
छान लिहिले आहे . सगळ्या गुरूंचा लेखात यथोचित सन्मान केला आहे .
कुमार१, लेख छान. आदल्या
कुमार१, लेख छान. आदल्या पिढीचे शिक्षक, सुयोग्य मराठी लिहिणारी वृत्तपत्रे इत्यादी योग्य वयात लाभणे हे तुमचे सुदैव !
आकाशवाणीवरील मराठी बातम्या हा चांगल्या मराठीचा एक स्त्रोत आहे याबद्दल सहमती, न ढासळलेले कमीच बुरुज उरलेत.
अन्य कुणी माझ्याकरता फारसे प्रयत्न न करता एकलव्यासारखे मराठी शिकलो. प्रगती वाईट म्हणता येणार नाही. पुढच्या पिढीत कन्येला मराठीची गोडी लागावी म्हणून घरात प्रतिदिन एक तास 'मराठी संभाषणासाठी' राखीव असतो. स्वतःपुरते प्रयत्न निरंतर करत राहणे आपल्या हातात आहे, ते नियमित करतो.
धन्यवाद !
धन्यवाद !
कन्येला मराठीची गोडी लागावी म्हणून घरात प्रतिदिन एक तास 'मराठी संभाषणासाठी' राखीव
>>> सुंदर ! चालू ठेवा.
......
माझ्या माहितीतील एका मराठी-मराठी जोडप्याने असा उपक्रम घरात केला होता :
त्यांच्या दोन्ही मुलांनी आईशी बोलताना मराठीत बोलायचे आणि वडिलांशी बोलताना इंग्लिशमध्ये बोलायचे.
हेतू हा, की दोन्ही भाषा चांगल्या याव्यात.
छान लिहीले आहे. फक्त शिक्षकच
छान लिहीले आहे. फक्त शिक्षकच नव्हे तर आजूबाजूला असणार्या / घडणार्या कितीतरी गोष्टींतून हळूहळू झिरपत जाते भाषेचे प्रेम आणि संस्कार. योग्य आणि उत्तम तेच करायचे याचा आग्रह धरणारे मोठे आपल्याला मिळाले हे भाग्य.
किशोर-चांदोबा, बालनाट्य, वयाला साजेसे नाटक्/नाच शोधून बसवून घेणारी संमेलने
घरात कानावर पडणारी पोथी-स्तोत्रे, बोलीभाषा, धपाट्याबरोबर ऐकू येणार्या म्हणी / खास शब्द
रेडिओची गाणी, निर्दोष बातम्या, जाहिराती, सूत्रसंचालन (आणि चुकल्यावर भापो म्हणून सोडून न देता माफ करा म्हणून सुधारून घेणे)
टीव्हीच्या बातम्या, गजरा, किलबिल, प्रतिभा आणि प्रतिमा, शनिवारचा सिनेमा
शाळेत असताना दिलेल्या बाहेरच्या परीक्षा/निबंध, वक्तृत्व स्पर्धा; शुद्ध लेखनासाठी खास उतारे घालणारे शिक्षक
लाऊडस्पीकरवर ऐकलेली गाणी त्यात लोकगीते, कोळीगीते, दादा कोंडके विशेष, सणांची गाणी, शिंदे-उमप बंधूंच्या खड्या आवाजातील गाणी
कितीतरी बाबी घडत गेल्या ज्याने एक एक ठोका घालून नीटस उठाव आणला विचार आणि उच्चारांना....
लोकसत्तेतील ' भाषासूत्र ' लोकसत्तेच्या कर्मचार्यांनीच वाचायची गरज आहे.
'रतन टाटा यांना डिलीट' म्हणे !! डिलीट आणि डी. लिट् एकच?
आणि हल्ली सर्रास झालेले "घट्ट मैत्रीण"..... खूप जवळची, जिवाभावाची, मनकवडी, खास, विश्वासातली ....नाही... घट्ट
कारवी छान आढावा आणि सहमती.
कारवी छान आढावा आणि सहमती.

.......................
आज अन्यत्र झालेले काही उपक्रम/ लेखन इत्यादींची दखल :
१. मराठी पत्रलेखन स्पर्धा :
एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, पत्रलेखन उपक्रमातली निवडक पत्रं. https://marathi.abplive.com/photo-gallery/news/maharashtra-abp-majha-let...
...
२. वैचारिक लेख
मराठीची सद्य:स्थिती : काही अल्पचर्चित मुद्दे! https://www.loksatta.com/lokrang/marathi-language-day-benefits-of-social...
....
३. मराठी साहित्य विषयक विविध पुरस्कार :
सुरेख आणि समयोचित लेख!
सुरेख आणि समयोचित लेख!
आपण मराठी भाषा गौरव दिन असा योग्य उल्लेख लेखाच्या सुरवातीला दिलेल्या चित्रात केला आहे ते आवडले. आज मराठी भाषा दिन नाही. तो १ मे रोजी असतो.
खूप छान लेख कुमार सर.
खूप छान लेख कुमार सर.
फार सुरेख लेख.
फार सुरेख लेख.
सुरेख लिहिले आहे. तुमच्या
सुरेख लिहिले आहे. तुमच्या आजींचेही कौतुक वाटले !
मायबोलीवर ज्यांचे मराठी मी प्रमाण मानते त्यांपैकीं तुम्ही आहात. (कारवी, स्वाती आंबोळे, हीरा , हरचंद पालव , स्वाती२ ,सीमंतिनी ही अजून काही नावे )
माझी मराठी भाषा मराठवाड्यातली असल्याने मला सुरुवातीला मायबोलीवर लिहीताना फार भीती वाटायची. इथे बहुतेक जणांना जे बाळकडू मिळालंय , त्याबतीत आमच्याकडे काहीच आग्रह, साधनं किंवा प्रोत्साहन नसायचे , सगळीच उदासीनता होती. मीही अनिंद्य यांच्या सारखेच स्वतःच स्वतः ला शिकवले, भरपूर वाचले , आईचेही मराठी भाषेवर प्रेम होते व वडिलांचे पुस्तकांवर त्यामुळे आता थोडंफार व्यक्त होऊ शकते. सुधारणेसाठी मात्र नित्य तत्पर असते.
मराठी फक्त आपली भाषा नाही तर तो एक वारसा व आपल्या जाज्वल्याचा भाग वाटतो म्हणून मीही मुलांना वाचायला व बोलायला शिकवले आहे, त्यांना अगदी अवघड शब्दही येतात , उच्चारही अगदी भारतीय आहेत (क्वचित एखादा चुकतो).
मातृभाषा उत्तम असली की दुसऱ्या भाषाही लवकर आत्मसात करता येतात हे एक निरिक्षण आहे.
चि. , बाईट आणि अभिप्राय...
चि. , बाईट आणि अभिप्राय... >>>>
धन्य आहेत.
रतन टाटा यांना डिलीट' म्हणे !! डिलीट आणि डी. लिट् एकच?>>
फक्त शिक्षकच नव्हे तर आजूबाजूला असणार्या / घडणार्या कितीतरी गोष्टींतून हळूहळू झिरपत जाते भाषेचे प्रेम आणि संस्कार. योग्य आणि उत्तम तेच करायचे याचा आग्रह धरणारे मोठे आपल्याला मिळाले हे भाग्य.>>>>अनुमोदन.
Pages