'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) ए सर्टिफिकेटचा बी ग्रेड चित्रपट

Submitted by अतुल. on 5 January, 2024 - 13:11

मजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट. गेलाबाजार किमान एखादे गाणे तरी? 'ॲनिमल' मध्ये कशातलेच काहीच मिळत नाही. दृश्ये, संवाद आणि एकूण सगळाच चित्रपट असा अंगावर आल्यासारखा येतो. हाताशी मात्र काहीच लागत नाही. अक्षरशः मध्यांतरानंतर थियेटरमधून पळून जावे असे वाटत होते. संपला तेंव्हा सुस्कारा टाकत बाहेर आलो. मोक्कार पैसे देऊन तिकीट काढावं आणि अक्षरशः अंगावर पडलेली घाण झटकत बाहेर पडावं अशी अवस्था झाली होती. लेने के देने पड गये Lol

कथा काय आहे?
एक इंडस्ट्रियालिस्ट कुटुंब असते. त्यांची स्टील उत्पादनाची इंडस्ट्री असते. अनिल कपूर आणि त्याचा बाबा हे दोघे कुटुंबप्रमुख. रणबीर कपूर हा अनिलचा मुलगा. कधी पूर्वी त्या बाबा ने कुणालातरी कामावरून कि भागीदारीतून हाकललेले असते म्हणे. त्या व्यक्तीचे वंशज तिकडे कुठल्या तरी फलाण्या देशात राहत असतात. त्या त्यांच्या वंशजाला (बॉबी देओल) बदला घ्यायचा असतो म्हणून तो सतत अनिलचा खून करायच्या प्रयत्नात असतो. त्यात अनिल सोबतच राहणारा त्याचा घरजावई सुद्धा त्याला (बॉबी देओलला) सामील झालेला असतो. अनिल मात्र आपल्या मुलीला व जावयाला गोंजारत असतो. आपल्या पोराला मात्र फार किंमत देत नसतो. पण पोराचे मात्र बापावर खूप प्रेम असते. अखेर पोरगंच कामाला येतं. 'अस्तनीत निखारा' बनून राहिलेल्या मेहुण्याला ठार मारतं. आणि ह्या खानदानी दुश्मनाचा सुद्धा नायनाट करतं.

झालं! इतकीच स्टोरी आहे.लक्षात आले का, ह्यात स्टील उत्पादनाचा पहिल्या उल्लेखानंतर कुठेच संबंध येत नाही. आहे कि नाही पटकथाकराची कमाल?

हुकलेले दिग्दर्शन आणि संपादन:
संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचे आहे याचा बोध होत नाही. तुझ्या सिनेमाचा फोकस नक्की काय आहे बाबा? कौटुंबिक कलह, की बदले कि आग, की पुरुषांचे भावविश्व, की वडील मुलातले नातेसंबंध, की अजून काही? नक्की काय समस्या सोडवणे सुरु आहे तेच कळत नाही. एडिटिंग तर थूत्त्तड आहे. पार बोंब करून ठेवली आहे. रणवीर कपूर आपल्या मेहुण्याला मारताना दाखल्याच्या दृश्यानंतर मेहुणा जिवंत दिसतो आणि चर्चा अनिल कपूरवरच्या हल्ल्याची दाखवली आहे! कळतंच नाही नक्की कुणाला मारले आणि काय सुरु आहे. वाटते कि रणवीरने आपल्या बापालाच मारले कि काय? कि मारणारा रणवीरचा बॉडी डबल होता? कि तो बॉबी देओल होता? (कारण ते दोघेही दाढीवाले दाखवलेत). अरे काय चाललंय काय? बराच वेळ पडद्यावर काय चाललंय कसलाच बोध होत नव्हता.

ऍडल्ट संवादांची विकृती आणि बीभत्स दृश्ये:
एकंदर चित्रपट पाहता हे कुटुंब इंडस्ट्रियालिस्ट पेक्षा अंडरवर्ल्डवाले असावेत असे वाटते, तर "जॉब वरून काढले" म्हणून दुसरे कामधंदे न पाहता तब्बल दोन पिढ्या वैरभाव धरून रात्रंदिवस ह्यांना मारण्याच्याच कामी लागलेले ते दुसरे कुटुंब म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. या सर्वांचीच 'उच्च राहणी आणि टुकार विचारसरणी' दाखवली आहे. एकंदर या सर्वांचे वागणे आणि वृत्ती पाहता यांची इंडस्ट्री कधीचीच बंद पडून हे सगळे कुटुंबीय वास्तविक भिकेला लागायला हवे होते. पण चित्रपटात मात्र ते गडगंज दाखवलेत. इतके गडगंज कि एका प्रसंगात एक नवी कोरी रोल्स रॉयस ते अशीच स्फोट करून जाळून टाकतात!

बरं कौटुंबिक हाणामाऱ्या तरी कसे म्हणावे? त्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि विचारू नका. पूर्वी आर्नोल्डच्या एका चित्रपटात एलियन्सला मारण्यासाठी त्याची टीम तुफान तुफान तुफान गोळीबार करताना दाखवली होती. कित्येक मिनिटे थियेटर मध्ये फक्त धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड गोळीबाराचे आवाज घुमत होते. ते असह्य होऊन त्या काळात एका प्रेक्षकाने अक्षरशः थियेटरमध्येच बोंब ठोकली होती. ते सुद्धा मला चांगले आठवतेय. इतका भयंकर गोळीबार! या चित्रपटात यांच्या कौटुंबिक कलहात अगदी तसाच व तेवढ्या प्रमाणात गोळीबार दाखवला आहे. बॉबी देओल तब्बल तीनशे माणसे पाठवतो यांना ठार मारायला, तेंव्हा हा बेसुमार गोळीबार आहे. तो इतका वेळ आणि इतक्या प्रमाणात आहे, कि यावेळी बोंब ठोकायची वेळ माझी आहे का काय असे वाटू लागले. आणि जेम्स बॉंडला सामुग्री पुरवणारा जसा कोणी एक असतो तसे इथे आपल्या रणवीरबाबाला मशीनगन्सपासून बनवलेली आख्खी गाडीच बनवून देणारा एक मराठी माणूस दाखवला आहे तो म्हणजे उपेंद्र लिमये. अरे इतक्या मोठ्या प्रमाणात weapons of mass destruction दाखवायचे होते तर कारखानदार कशाला दाखवले त्यांना?

भाषेच्या बाबत तर काय बोलण्यासारखे सुद्धा नाही. आजकाल नेहमीच्या चित्रपटांत सुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली ऍडल्ट शब्दप्रयोग करायचे तसेही एक विकृत फॅड आलेले आहे. आणि हा तर A सर्टिफिकेटचा चित्रपट. यांनी संवादातून विकृतीचा कळस गाठण्यात मात्र जागोजागी भरपूर यश मिळवले आहे. ऍडल्ट शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. पण कथेत आणि दिग्दर्शनात जे कसब आणि गुणवत्ता दिसायला हवी ती जर नसेल आणि नुसतेच ऍडल्ट संवाद असतील तर ती कलाकृती न राहता फक्त विकृती बनून राहते.

तात्पर्य:
'ॲनिमल' हा असाच एक ए सर्टिफिकेटचा विकृत सिनेमा आहे.

संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी. जी आजकाल सगळ्याच चित्रपटात आढळतात. आत्ताची हि हाय पीच गाणी म्हणजे मला तर ते अखंड एकच रेकॉर्डिंग वाटते. तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या चित्रपटात टाकत असतील.

अभिनय:
इथे फारसे लिहिण्यासारखे नाही. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान केल्यात. तरी विशेष उल्लेख करावा वगैरे असे फारसे या विभागात काही नाही. रश्मिका मंदन्ना भलतीच गोड दिसते. तिला उगीचच मध्यंतरी वेड लागल्यासारखे हसल्याचे रडल्याचे झटके आलेला एक प्रसंग करायला लावलाय. दिग्दर्शक फारच टुकार वाटला ब्वा (असेलही कदाचित व्यायसायिक दृष्ट्या यशवी पण तो भाग वेगळा)

जाता जाता:
चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याबाबत माझ्याकडून नो कॉमेंट्स. ‎IMDb वर 6.8 रेटिंग आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्प्रेरक: रिएजंट. रासायनिक प्रक्रिया याच्याशिवाय शक्य पण उत्प्रेरक असला तर प्रक्रियेचा वेग वाढेल, प्रक्रिया पूर्ण होणे सोपे बनेल.एक ऍनिमल किंवा एक कबीर सिंग हिट झाला म्हणून जग बुडणार नाही.पण मीडियावरून काही गोष्टी समाजात नक्की येतात.

ऍनिमल पाहून लग्गेच बायकोला मारहाण करणे किंवा नव्या नवरीवर लग्नातच रेप करणे हे आपला शेजारी करणार नाही पण, तो हे सिनेमा म्हणून सोडून देईल.पण गरीब, अशिक्षित समाजातला तरुण कदाचित हे सोडून देणारही नाही.पिक्चर बनला नाही तर गुन्हे थांबणार नाहीत.पण पिक्चर बनवून,मोठ्या प्रमाणात ग्लॅमर देऊन मोठ्या स्क्रीनवरून किमान वाईट लोकांना वाईट गोष्टी करण्याच्या अजून वाईट आयडिया ताटात वाढून दिल्यासारख्या समोर मिळू नयेत.ही मीडिया बनवणाऱ्याची नैतिक जबाबदारी. त्याने तसं केलं नाही तर घंटा फरक पडणार नाही,त्याला काहीही त्रास होणार नाही.पण केलं तर तो आपल्या कलाकृतीने समाजात थोडा चांगला बदल घडवू शकेल.

ऑटीझम बद्दल पिक्चर, गुड डॉक्टर,अटरनी वू सारखी मालिका आली, समाजाच्या वागण्या बघण्यात थोडा फरक पडलाच असेल.तारे जमीन पर आला, आपला मुलगा मठ्ठ, अक्षरं उलटी लिहितो म्हणून बडवून काढणाऱ्या एखाद्या बापाने क्षणभर थबकून विचार केलाच असेल.'लोकांना हे असंच आवडतं' म्हणून वाईट कंटेंट ची नैतिक जबाबदारी झटकता येणार नाही कलाकारांना.

(हे सगळं बोलून वांगा रेड्डी ला काहीही फरक पडणार नाहीये.त्यामुळे ओटीटी व्ह्यूज मध्ये माझ्या घरातले 6 वाढू नये इतकी काळजी घेईन, हातात तितकंच आहे.अवांतर: बॉबी देओल हिट झाला, उपेंद्र लिमये अनिमल मुळे हिट झाले याचा आनंद आहे.त्यातल्यात्यात वरणभात.)

सिनेमा हे प्रभावी माध्यम नसते तर प्रभात फिल्म कंपनीने सुरूवातीला काढलेले सिनेमे हा खुळचटपणा म्हणायचा का ?

हम आपके है कौन नंतर शाही लग्नांची साथ आली. बूट लपवण्याची पद्धत जिथे नव्हती तिथेही सुरू झाली.
जय संतोषी मा नंतर सोळा जणांना पत्र लिहायची साथ आली.

त्यामुळे ओटीटी व्ह्यूज मध्ये माझ्या घरातले 6 वाढू नये इतकी काळजी घेईन, हातात तितकंच आहे >>> आपण फिल्म अ‍ॅप्रिसिएशन म्हणून चित्रपट बघत असू तर असे सिनेमे बघू द्यायला हरकत नाही. अशीही फिल्म असते, असाही विचार असतो. पण या पद्धतीने सिनेमा पाहणारे मूठभरच असणार.

>>>>>>पण केलं तर तो आपल्या कलाकृतीने समाजात थोडा चांगला बदल घडवू शकेल.
म्हणुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणे म्हणजे 'रोगापेक्षा औषध भयंकर' ठरेल. अशा बंदी आणत राहीलं तर रिग्रेस होउ आपण. अर्थात असे झालेलेच नाही असे नाही. उदा - एम एफ हुसेन यांनी काढलेले सरस्वतीचे चित्र वगैरे. अन्य संस्थळाची लिंक देते आहे कारण तिथे ही चर्चा झालेली आहे - अभिव्यक्ती

सामो, मी 'नैतिक जबाबदारी' म्हटलं आहे, कायदेशीर बंदी आणण्याबद्दल बोलत नाहीये.
अश्या कंटेंट ला प्रसिद्धी न देणं ही प्रेक्षक म्हणून समाजाची जबाबदारी.

एखाद्या दिग्दर्शकाने अभिव्यक्ती म्हणून एक असा चित्रपट बनवला ज्यात एखाद्या समूहावर अन्याय होतोय अशा घटनांची जंत्री असेल, त्या समूहाच्या भावना खवळतील, भावनांना हात घालेल असे चित्रीकरण असेल आणि शेवटी अन्य एका समूहावर हल्ले केल्याशिवाय अन्यायाचे परिमार्जन नाही, त्यांच्या स्त्रियांवर हल्ले करून बदला घ्यावा असा प्रभावी क्लायमॅक्स असेल...

तर अशा सिनेमाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून प्रदर्शित होऊ द्यावे कि सेन्सॉर बोर्डाने त्याचे प्रदर्शन रोखावे ?

प्रक्षोभक विषय हाताळले गेलेले आहेत जसे की 'वॉटर' सिनेमावरती बंदी आणणे. 'फायर' सिनेमात लेस्बिअन पात्रांची नावे राधा का सीता अशी दाखविल्याने बंदी आणणे. पण हे प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे का? कुक्कुलं बाळ आहे का समाज? लेट इट मॅच्योर विथ ओन स्पीड. पेस.
>>>>>त्यांच्या स्त्रियांवर हल्ले करून बदला घ्यावा असा प्रभावी क्लायमॅक्स असेल...
हे प्रक्षोभकच आहे आणि त्याबद्दल दिग्दर्शक, निर्मात्यांना धारेवर धरले जायलाच पाहीजे. पण बंदी? नॅह!!! नको.

सेन्सॉर बोर्डाची गरज - कायदेतज्ञांचे मत, सर्वोच्च न्यायालय आणि के अब्बास खटला
https://www.legalservicesindia.com/article/2490/The-Role-of-Central-Boar...

ज्यांनी भारत आयुष्यात कधीही अनुभवलेला नाही, इथली माहितीच नाही त्यांच्यासाठी परदेशातल्या प्रमाणे बंदी नसावी हे मत योग्य आहे. पण ज्यांना थोडीफार भारतीय समाजाची ओळख आहे त्यांचे मत परदेशाप्रमाणे सिनेमा मुक्त असावा असे असेल का ? परदेशात तरी सिनेमा १००% मुक्त आहे का ?

लिंक अगदी उचित आहे. या धाग्यावरती ही लिंक प्रचंड रिलेव्हंट आहे खरी.
>>>>When the media exercises the right allotted to them under Article 19(1)(a), it becomes extremely crucial to scrutinize and review the product before it reaches the public. The masses greatly seem to get influenced and carried away by the combination of both the effects including audio and visual in comparison to the printed word.
पण हा संस्कॄतीरक्षकांनी घेतलेला ठेका वाटतो. त्यापेक्षा समाजमन सेल्फ-ऑर्गनाईझ झालेले, ऑर्गॅनिकली काही घॄणास्पद बाजू रद्द होताना आवडतील.

अजुन एक मुद्दा असा मांडते की - जे लोक हा सिनेमा पाहतात तेच अश्या चर्चाही वाचतातच की. तेव्हा काय घ्यायचे काय त्यजायचे हा ज्याचा त्याचा दॄष्टीकोन आहे. अशा सिनेमाम्चा एक फायदा नक्कीच आहे की अशा सांगोपांग चर्चा 'एनेबल' होतात. चर्चा झडतात. त्यातून अनेक कुंपणावरच्या व्यक्तींचे प्रबोधन आपसूक होते.

धन्यवाद फिल्मसुख बांगडू, आयडी आवडलेला आहे. धमाल आहे. Happy

सामो, माझी पोस्ट स्पष्ट आहे.

ज्या समाजाची पाळंमुळं पेट्रिआर्कल आहेत, स्त्रियांविषयी फारसा आदर नाही, जिथे लहान मुलींसोबत सुद्धा निर्घृण- विकृत घटना वारंवार होत असतात. त्या 'माकडांना' कोलीत तर काय कोलीताचा फोटोही देऊ नये. ज्या खोलीत दारूगोळा ठासून भरलेला आहे, तिथे तलफ आली म्हणून विडी ओढल्यासारखं आहे, कदाचित होईल स्फोट - कदाचित होणारही नाही.

माझ्यापुरतं तरी मी याला 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून ग्रीन सिग्नल देणार नाही.

अजून बऱ्याच पोस्टी वाचायच्या आहेत.

धन्यवाद ही लिंकही वाचते. कळेल की परदेशात का सेन्सॉरची आवश्यकता आहे.
सेन्सॉरनेही, कुठे रेघ आखायची हा मुद्दा आहे. चुझ युअर बॅटल्स - असेच म्हणेन.

भारतातल्या समस्या वेगळ्या आहेत. एकदा नव्या वातावरणात गेलो कि आपण तिकडे एकरूप होतो. पण तिथल्या वातावरणाचा विचार करून इथल्या वातावरणात काय योग्य अयोग्य असा विचार योग्य होईल का ही शंका अयोग्य असेल तर योग्य काय ते कळवा.

अमेरिकेत सध्या शाळेत मुलांनी हत्यारे नेणे ही समस्या आहे. तसेच मुलांवरचे अ त्याचार ही समस्या तिथे जास्त चर्चिली जाते.
उद्या मुलांवरच्या अ त्याचाराला प्रोव्होक करेल असा चित्रपट एखाद्याला बनवावासा वाटला किंवा मुलांनी शाळेत हत्यारे नेऊन बेधुंद गोळीबार करावा अशी प्रेरणा देणारा सिनेमा बनवला, अगदी चाईल्ड पॉर्न मेन चित्रपटात आणले तर तिथे काय प्रतिक्रिया असेल ?

>>>>अगदी चाईल्ड पॉर्न मेन चित्रपटात आणले तर तिथे काय प्रतिक्रिया असेल ?
नाही नाही आचार्य प्रश्न सेन्सॉर हवा का पेक्षा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची रेघ कुठे आखायची आहे असा आहे. म्हणुन म्हटले चुझ युअर बॅटल्स. प्रत्येक गोष्टीवरती बंधने आणू नका. समाजमन सेल्फ- ऑर्गनाईझ होउ द्यात. प्रगल्भता हळूहळू येउ द्यात.

माझा प्रश्न एका प्रगल्भ समाजात राहून अर्धमागास समाजात काय हवे काय नको याबद्दल जज्जमेंट देण्यावर आहे.
उद्या अमेरिकेत एखाद्या विकृताने मी अमूक एक सिनेमा पाहून मुलांबद्दल असे घृणास्पद कृत्य केले असा कबुलीजबाब दिला तर तिथेही चर्चा सुरू होईल. अमेरिकेत अ‍ॅब्सोल्युट फ्रीडम आहे तरीही ते फोरबिडन आहे. फिल्म मेकर्सचं सेल्फ रेग्युलेशन असल्यानेच १२, १५, १६, १८ अशी सर्टिफिकेट्स तिथे देतात. नाहीतर त्याचीही गरज नव्हती.

अमितव धन्यवाद.

>>> प्रगल्भ समाजात राहून अर्धमागास समाजात
प्रगल्भ नाही, फारतर निराळे प्रश्न ऐरणीवर असलेला समाज म्हणू. बाकी चर्चा वाचते आहे.

'अमुक सिनेमा बघून आत्महत्यांचं प्रमाण वाढलं' वगैरे विधानंही काहीशी फसवी असतात - ते आत्महत्या 'नोंदवल्या गेल्याचं' प्रमाण वाढलं असंही असू शकतं.

छान चर्चा सुरु आहे. पण स्नॉर्केलींग करत वाचली, नंतर निवांत स्कुबा करत वाचेन,
याच विषयावर आधी वाचलेला हा एक छोटे़खानी लेख.

हो की - पण आधी सगळ्या/इतक्या आत्महत्यांची बातमी होत नव्हती आणि आता होते अशी शक्यता आहे ना?

लोल! आता मी पुन्हा तेच निराळ्या शब्दांत लिहीत नाही, 'काही अंशी वाढ होते आणि/किंवा काही अंशी जास्त नोंद घेतली जाते' असं म्हणून हा मुद्दा पार्क करू. Happy

यामध्ये प्रेरित होणार्‍या व्यक्तीचा १००% दोष आहे. कलेचा नाही. जरी कलाकृती नसती तरी विकृत व्यक्ती तश्शीच वागली असती. सिनेमावरुन प्रेरित झालो - ही निव्वळ लंगडी सबब आहे.
>> सामो +१

आयटम साँग्स चे कौतुक कोणाला नाही आता.. त्यामुळे लोक बिघडतील म्हणणाऱ्यांनी आपापले फोन चेक करावे… हॉट व्हिडीओ तुम्ही बघताच ना…
मोबाईल वर सगळा अक्सेस आहेच लोकाना.. आइटम नंबर मधे काहीच नसते…

आणि स्वाती + ९९९ : परफेक्ट लिहिले आहे…

चर्चा विनोदी वाटली. एकूण आपल्याला सोयीचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्याला काही खटकलं तर लगेच ban it ban it. थोडक्यात मला सगळं कळतं, मी ठरवणार ते अप्रुव्ह करा, आणि मी सांगेन ते रिजेक्ट करा.
सामो च्या पोस्ट आवडल्या. रोगापेक्षा इलाज भयंकर अगदीच पटलं.
Animal चित्रपट वाईट असेलच पण इतरही असेच वाईट अनेक चित्रपट येऊन गेले. तेव्हा ते इतरांना खटकत होते म्हणून इथले मानाचे गणपती अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या उच्चासनावर बसले होते.

Pages