'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) ए सर्टिफिकेटचा बी ग्रेड चित्रपट

Submitted by अतुल. on 5 January, 2024 - 13:11

मजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट. गेलाबाजार किमान एखादे गाणे तरी? 'ॲनिमल' मध्ये कशातलेच काहीच मिळत नाही. दृश्ये, संवाद आणि एकूण सगळाच चित्रपट असा अंगावर आल्यासारखा येतो. हाताशी मात्र काहीच लागत नाही. अक्षरशः मध्यांतरानंतर थियेटरमधून पळून जावे असे वाटत होते. संपला तेंव्हा सुस्कारा टाकत बाहेर आलो. मोक्कार पैसे देऊन तिकीट काढावं आणि अक्षरशः अंगावर पडलेली घाण झटकत बाहेर पडावं अशी अवस्था झाली होती. लेने के देने पड गये Lol

कथा काय आहे?
एक इंडस्ट्रियालिस्ट कुटुंब असते. त्यांची स्टील उत्पादनाची इंडस्ट्री असते. अनिल कपूर आणि त्याचा बाबा हे दोघे कुटुंबप्रमुख. रणबीर कपूर हा अनिलचा मुलगा. कधी पूर्वी त्या बाबा ने कुणालातरी कामावरून कि भागीदारीतून हाकललेले असते म्हणे. त्या व्यक्तीचे वंशज तिकडे कुठल्या तरी फलाण्या देशात राहत असतात. त्या त्यांच्या वंशजाला (बॉबी देओल) बदला घ्यायचा असतो म्हणून तो सतत अनिलचा खून करायच्या प्रयत्नात असतो. त्यात अनिल सोबतच राहणारा त्याचा घरजावई सुद्धा त्याला (बॉबी देओलला) सामील झालेला असतो. अनिल मात्र आपल्या मुलीला व जावयाला गोंजारत असतो. आपल्या पोराला मात्र फार किंमत देत नसतो. पण पोराचे मात्र बापावर खूप प्रेम असते. अखेर पोरगंच कामाला येतं. 'अस्तनीत निखारा' बनून राहिलेल्या मेहुण्याला ठार मारतं. आणि ह्या खानदानी दुश्मनाचा सुद्धा नायनाट करतं.

झालं! इतकीच स्टोरी आहे.लक्षात आले का, ह्यात स्टील उत्पादनाचा पहिल्या उल्लेखानंतर कुठेच संबंध येत नाही. आहे कि नाही पटकथाकराची कमाल?

हुकलेले दिग्दर्शन आणि संपादन:
संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचे आहे याचा बोध होत नाही. तुझ्या सिनेमाचा फोकस नक्की काय आहे बाबा? कौटुंबिक कलह, की बदले कि आग, की पुरुषांचे भावविश्व, की वडील मुलातले नातेसंबंध, की अजून काही? नक्की काय समस्या सोडवणे सुरु आहे तेच कळत नाही. एडिटिंग तर थूत्त्तड आहे. पार बोंब करून ठेवली आहे. रणवीर कपूर आपल्या मेहुण्याला मारताना दाखल्याच्या दृश्यानंतर मेहुणा जिवंत दिसतो आणि चर्चा अनिल कपूरवरच्या हल्ल्याची दाखवली आहे! कळतंच नाही नक्की कुणाला मारले आणि काय सुरु आहे. वाटते कि रणवीरने आपल्या बापालाच मारले कि काय? कि मारणारा रणवीरचा बॉडी डबल होता? कि तो बॉबी देओल होता? (कारण ते दोघेही दाढीवाले दाखवलेत). अरे काय चाललंय काय? बराच वेळ पडद्यावर काय चाललंय कसलाच बोध होत नव्हता.

ऍडल्ट संवादांची विकृती आणि बीभत्स दृश्ये:
एकंदर चित्रपट पाहता हे कुटुंब इंडस्ट्रियालिस्ट पेक्षा अंडरवर्ल्डवाले असावेत असे वाटते, तर "जॉब वरून काढले" म्हणून दुसरे कामधंदे न पाहता तब्बल दोन पिढ्या वैरभाव धरून रात्रंदिवस ह्यांना मारण्याच्याच कामी लागलेले ते दुसरे कुटुंब म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. या सर्वांचीच 'उच्च राहणी आणि टुकार विचारसरणी' दाखवली आहे. एकंदर या सर्वांचे वागणे आणि वृत्ती पाहता यांची इंडस्ट्री कधीचीच बंद पडून हे सगळे कुटुंबीय वास्तविक भिकेला लागायला हवे होते. पण चित्रपटात मात्र ते गडगंज दाखवलेत. इतके गडगंज कि एका प्रसंगात एक नवी कोरी रोल्स रॉयस ते अशीच स्फोट करून जाळून टाकतात!

बरं कौटुंबिक हाणामाऱ्या तरी कसे म्हणावे? त्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि विचारू नका. पूर्वी आर्नोल्डच्या एका चित्रपटात एलियन्सला मारण्यासाठी त्याची टीम तुफान तुफान तुफान गोळीबार करताना दाखवली होती. कित्येक मिनिटे थियेटर मध्ये फक्त धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड गोळीबाराचे आवाज घुमत होते. ते असह्य होऊन त्या काळात एका प्रेक्षकाने अक्षरशः थियेटरमध्येच बोंब ठोकली होती. ते सुद्धा मला चांगले आठवतेय. इतका भयंकर गोळीबार! या चित्रपटात यांच्या कौटुंबिक कलहात अगदी तसाच व तेवढ्या प्रमाणात गोळीबार दाखवला आहे. बॉबी देओल तब्बल तीनशे माणसे पाठवतो यांना ठार मारायला, तेंव्हा हा बेसुमार गोळीबार आहे. तो इतका वेळ आणि इतक्या प्रमाणात आहे, कि यावेळी बोंब ठोकायची वेळ माझी आहे का काय असे वाटू लागले. आणि जेम्स बॉंडला सामुग्री पुरवणारा जसा कोणी एक असतो तसे इथे आपल्या रणवीरबाबाला मशीनगन्सपासून बनवलेली आख्खी गाडीच बनवून देणारा एक मराठी माणूस दाखवला आहे तो म्हणजे उपेंद्र लिमये. अरे इतक्या मोठ्या प्रमाणात weapons of mass destruction दाखवायचे होते तर कारखानदार कशाला दाखवले त्यांना?

भाषेच्या बाबत तर काय बोलण्यासारखे सुद्धा नाही. आजकाल नेहमीच्या चित्रपटांत सुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली ऍडल्ट शब्दप्रयोग करायचे तसेही एक विकृत फॅड आलेले आहे. आणि हा तर A सर्टिफिकेटचा चित्रपट. यांनी संवादातून विकृतीचा कळस गाठण्यात मात्र जागोजागी भरपूर यश मिळवले आहे. ऍडल्ट शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. पण कथेत आणि दिग्दर्शनात जे कसब आणि गुणवत्ता दिसायला हवी ती जर नसेल आणि नुसतेच ऍडल्ट संवाद असतील तर ती कलाकृती न राहता फक्त विकृती बनून राहते.

तात्पर्य:
'ॲनिमल' हा असाच एक ए सर्टिफिकेटचा विकृत सिनेमा आहे.

संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी. जी आजकाल सगळ्याच चित्रपटात आढळतात. आत्ताची हि हाय पीच गाणी म्हणजे मला तर ते अखंड एकच रेकॉर्डिंग वाटते. तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या चित्रपटात टाकत असतील.

अभिनय:
इथे फारसे लिहिण्यासारखे नाही. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान केल्यात. तरी विशेष उल्लेख करावा वगैरे असे फारसे या विभागात काही नाही. रश्मिका मंदन्ना भलतीच गोड दिसते. तिला उगीचच मध्यंतरी वेड लागल्यासारखे हसल्याचे रडल्याचे झटके आलेला एक प्रसंग करायला लावलाय. दिग्दर्शक फारच टुकार वाटला ब्वा (असेलही कदाचित व्यायसायिक दृष्ट्या यशवी पण तो भाग वेगळा)

जाता जाता:
चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याबाबत माझ्याकडून नो कॉमेंट्स. ‎IMDb वर 6.8 रेटिंग आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो! जावेद अख्तरांची काही लिंक असेल तर वाचायला आवडेल.
टु बी क्लिअर, फ्रीडम ऑफ स्पीच हेच अशी रिग्रेसिव्ह कथा सांगण्यामागे फक्त कारण असेल विषयच संपला. अभिव्यक्तीवर अजिबात बंधन नको.
पण लेखक दिग्दर्शन फक्त फ्रीडमच्या पडद्याआड जात आहेत का त्यांना अ‍ॅनिमल दाखवायचा होता अशी मखलाशी आहे हे जाणून घेण्यात उत्सुक्ता आहे. कारण या चित्रपटाचं नाव अ‍ॅनिमल असलं तरी स्त्रीचं समाजातील स्थान हे कस्पटासमान आहे आणि असलंच पाहिजे याची भलामण जागोजाग आहे. हो आम्हाला तसंच दाखवायचं होतं, स्त्री अशीच पायाची दासी आहे यात काहीच चूक नाही. आणि आम्ही काहीही दाखवू कारण.. कारण फ्रीडम असेल तर मला वाचायला फार आवडेल.

Animal सारखे चित्रपट हिट होणं ही बाब चिंताजनक, कारण..

https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/movies-like-animal-become-...

हे औरंगाबादेत अजंठा वेरूळ इथे झालेलं अख्तर यांचं भाषण आहे. तीन चार मिनिटांचेच आहे. जरूर ऐका:

https://www.youtube.com/watch?v=0X50PPdssz8

जावेद यांचा दीवार मधला नायक निगेटिव्हच होता. त्या काळात नायकाने स्मगलिंग करणे जडच होते. पुढे ते रूळले. गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत गेलं.
कुठे तरी मुंबईच्या गुन्हेगारीचा आणि चित्रपटातल्या उदात्तीकरणाचा आलेख आलेला होता. कि दूरदर्शनवर चर्चा होती लक्षात नाही.

त्या वेळी या गोष्टींनी खूप काही बिघडत नव्हते.
आता दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. जावेद यांची मतं देखील बदलली आहेत. त्या वेळी त्यांची मतं विशिष्ट चौकटीत असतील. दर वेळी कुणी बोलताना माझे मत अ, ब, क. ड अटीवर लागू आहे असे बोलण्याची पद्धत नसते. त्यामुळे विरोधाभासी मते आहेत कि काय असे वाटत राहते. कंडीशन्स बदलतात.

Enima नाव ठेवता ठेवता चुकून Animal झालं की काय इतकी मानसिक सामाजिक बहुमूल वृत्तीचं निस्सारण दाखवून आता कसं हलकं हलकं छान वाटते टाइप फिल आला असेल मुव्हि बनवून झाल्यावर.

निगेटिव्ह नायकाचं, गुन्हेगार अन गुंड नायकाचं उदात्तीकरण ठीक आहे, पण त्याने सेक्श्युअल गोष्टी पडद्यावर मोठ्या करून दाखवू नयेत- हे जुनंच आहे, यात नवीन काही नाही. जावेद अख्तर हेच म्हणत आहेत आणि ते वरवर सगळ्यांना बरोबरही वाटतं.

आता या सेक्श्युअलसोबत डॉमिनेटिंग मेल मॅनरिझम आणि मग नंतर अल्फा मेल वगैरे गोष्टी आल्या. तर हे कोण कसं कंट्रोल नि ट्रॅक करणार? कुठची गोष्ट तुम्हाला नेमकी किती इंटेंस किंवा संस्कृतीभक्षक आणि डेंजरस वाटते हे कोण कसं ठरवणार?

जावेद अख्तर एकदा एका मुलाखतीत म्हणालेले- गुन्हेगार आणि गुंड नायक पडद्यावर पहिल्यांदा दाखवण्याचं श्रेय आमचं आहे (सलीम खान सोबत), त्यापुर्वी सारं काही कसं गोड गोड पुरण्पोळीचं जेवण होतं. आता हे श्रेय फॉर्वर्ड इंटेग्रेट करून वेगळ्याच रूपात दुसरे कुणी घेत असतील, तर त्यांना चूक बरोबर कोण कसं ठरवणार?

-----
** सिनेमा बघितलेला नाही. पण कुणी बघू नये असा कट केल्यागत सगळ्यांनी सगळं सगळीकडे लिहून ठेवलंय. अशा कटाची आम्ही आमटीच करत असतो ते सोडा. Proud सॉरी. असो.

साजिरा, हाच मुद्दा वर लिहीला होता. बहुतेक नीट मांडता नाही आला.
आपण सिनेमा न पाहता जज्ज करतोय हे ही म्हणणं बरोबर. त्याच बरोबर प्रत्येक गोष्ट अनुभवल्याशिवाय मत बनवू नये हे ही व्यवहार्य नाही.

>>पण कुणी बघू नये असा कट केल्यागत सगळ्यांनी सगळं सगळीकडे लिहून ठेवलंय. >> सुपर हिट पिक्चर आहे! सगळ्यांनी सगळीकडे बघू नका लिहिलेलं दिसत असेल तर तुम्ही सायलो मध्ये आहात. किंवा सोमीने कन्फर्मेशन बायस मध्ये तुमचा गेम केलेला आहे.

कटाची आम्ही आमटीच करत असतो >> हे लिहिलंय की. सोमीला आमच्यासाठी अजून खूप वर्षे लागतील हो.

तुम्ही सगळीकडेच्या ऐवजी काहीठिकाणी वाचा Proud

https://youtu.be/LKiOak46ywo?si=245ByKp3zCmVlUL7
Why women are used as sex objects in Bollywood.

ही लिंक बघा सर्वांनी. सुरवातीला संथ वाटेल पण जबरदस्त आहे. ह्या डिरेक्टरचाच होता कबीर सिंग , त्याचे 'मौलिक' विचारही सांगितले आहेत. गर्लफ्रेंडला मारता येत नसेल हवं तेव्हा हवं ते करवून घेता येत नसेल तर काय उपयोग गर्लफ्रेंड असण्याचा इति. आपल्याकडे आधीच 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' म्हटलं की रान मोकळे होते. स्त्रियांविषयी आदर नाहीये समाजात. हे फक्त त्याला अजून 'न्याय्य' ठरवत आहे. सिनेमा तर हिटच झाला आहे.

आधी चिकवा वर दिली होती, तेव्हा तिथं बघितली असेल तर दुर्लक्ष करा. Happy

व्हिडिओ बघितला अस्मिता. Overall सगळं अर्थात पटलं. मी त्यात उल्लेख केलेले सगळे सिनेमे बघितलेले नाहीत.
एका गोष्टीचा मात्र तिने उल्लेख केला नाही. कबीर सिंग हिट झाला, तसा दंगल सुपरहिट होता, चक दे इंडिया हिट होता, पेज थ्री, कॉर्पोरेट, फॅशन, इंग्लिश विंग्लिश हेही लोकांना आवडलेले होते. ( हिट होते की नाही याची खात्री नाही. ) दंगल आणि चक दे मधे अनुक्रमे आमिर खान आणि शाहरुख खान
नायक असले तरी त्यात स्त्रिया स्टिरिओटाईप तोडून बाहेर पडून यशस्वी होताना दाखवल्या होत्या. वर मी उल्लेख केलेल्या इतर चित्रपटांमध्ये स्त्रिया मुख्य पात्र (
protagonist) होत्या. माझा मुद्दा असा आहे की प्रेक्षकांना असे चित्रपटही आवडतात. त्यामुळे 'लोकांना अमुक आवडतं' ही सोयीस्कर पळवाट असू शकेल, पण लोकांना चांगले चित्रपट आवडतात, हेही खरं आहे. बॉक्स ऑफिसवर चांगला धंदा करण्याचं गणित वेगळं असेल. पण तिथेही 'दंगल' यशस्वी झालाच.
'स्वदेस' हिट नसावा. पण त्यात गायत्री जोशीचं पात्र चांगलं आहे. (तिला अभिनय फारसा जमलेला नाही ते सोडा. तिथे सोनाली कुलकर्णी वगैरे असती तर तिने कदाचित छान केलं असतं काम. ) ती आपलं कामबिम सोडून शाहरुख खानबरोबर अमेरिकेत जात नाही. आधीही ती एका स्थळाला नकार देते तेही impressive आहे.
बाकी नव्वदच्या दशकात स्टॉकिंग इतकं असायचं की आता ते सिनेमे बघताना प्रचंड खटकतात.
(वर अमितने लिहिलेला सीन संतापजनक, किळसवाणा वगैरेच्या पलीकडचा आहे. औरंगजेब सिनेमात अशा प्रकारचं काही होतं, पण त्यात उदात्तीकरण नव्हतं बहुतेक)

व्हिडिओ पहिला.सगळंच पटलं.अर्थात तिने पुष्पा चं उदाहरण दिलं ते काही विशेष झेपलं नाही.पुष्पा मध्ये उ अंटा वा, सामी सामी अशी स्टीरिओटाईप चे मुख्य उदाहरण बनणारी गाणी आहेत.
आर्थिकदृष्ट्या: स्त्री पात्र मुख्य असेल अश्या कथेच्या चित्रपटात
प्रसिद्ध हिरो काम करायला तयार होत नाहीत.तापसी, विद्या बालन, आणि जितक्या चांगल्या स्त्री भूमिका वाले पिक्चर आहेत त्यात हिरो चांगले अभिनेते पण कमी प्रसिद्ध आहेत.
या सगळ्याला अवांतर: अनेक आयटम सॉंग रंगीत व्हिज्युअल, चांगलं संगीत,कॅची गाणी यामुळे बघायला आवडतात.हाय गर्मी आणि नोरा रोबोट आहे ते नाच मेरी रानी नाच ही गाणी अगदी खाजगी फॅमिली पार्टीत नाचायला मजेशीर आहेत.
जोवर बायका पुढे होऊन 'मी आयटम सॉंग करणार नाही, नुसते नाच वाले गाणे असले तरी त्यात सूचक हावभाव,भोवती भुकेले पुरुष वगैरे व्हिज्युअल असतील तर काम करणार नाही' म्हणत नाहीत तोवर हे चालू राहणार.(अगदी काहींनी नाही म्हटलं तरी नव्या, फार प्रसिद्ध नसलेल्या महत्वाकांक्षी बायका हो म्हणत राहणार.)

जोवर बायका पुढे होऊन>>> पावली ला ५ बायका तयार असतात ना नाचायला Sad तोच तर यक्षप्रश्न आहे. भारतातल्या बायकांनी नाही म्हटाले तर नोरा, जॅकलीन सारख्या हाफ विदेशी बायका पण तयार
अजून सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना ने पण फेविकॉल लावलाय.. मग मलाईके ला काय दोष द्या, तिची रोजीरोटी आहे, ती उपोषण करेल आयटम साँग्स बंद केलेत चित्रपटांत तर Wink

'मी आयटम सॉंग करणार नाही, नुसते नाच वाले गाणे असले तरी त्यात सूचक हावभाव,भोवती भुकेले पुरुष वगैरे व्हिज्युअल असतील तर काम करणार नाही'
>>> lol…एक्टिंग असते हो सगळे…. ते भुकेले पुरुष .. हावभाव वगैरे.. त्याने काही सोसायटी बिघडत नाही.. जस्त अ मुवी…
हे म्हणजे चित्रपटात मी गन वापरणार नाही.. गोळ्या झाडणार नाही.. दारू पिणार नाही… स्मगलिंग करणार नाही टाइप झाले…

वरच्या सर्वच पोस्टींना अनुमोदन. तो व्हिडीओ पाहिला आहे. पुन्हा एकदा पहायचा आहे.
या गोष्टी एकदा सांगून चालत नाही.

अवांतर : या निमित्ताने एका वाक्यावर कटाक्ष. " तमाशाने समाज बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही" हे वाक्य नेहमी सिनेमाच्या संदर्भात वापरतात. खरं तर अशी चमकदार वाक्यं प्रत्येक विषयासाठी असतात ज्याचा इम्पॅक्ट असा असतो कि विरोधी खेमाच उद्धस्त होतो. कुणी अशा वाक्यांची चिरफाड करत नाही.
तमाशाचा आणि समाज बिघडायचा काय संबंध ? कधी काळी बाईने बोर्डावर नाचणे हे समाज बिघडण्याचे लक्षण असेल. आता ? मग त्या काळच्या बिघडायच्या व्याख्येपेक्षा शंभर पट बिघडलेल्या समाजाला एक तमाशातली बाई काय बिघडवणार ? आणि तेच कीर्तनाचं पण. सगळ्याच कीर्तनात समाज सुधारणेचा उपदेश असेल काय ? असेलच तर त्याचा परिणाम झाला नाही असं म्हणण्यासाठी कुणी सर्व्हे केलाय का ?
सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही माध्यमांचे दाखले देऊन सिनेमाशी तुलना कशी काय करता येईल ?

बॉबी आला आणि घरातून पळून जायच्या प्रकरणात ल़क्षणीय वाढ झाली. एक दुजे के लिये नंतर प्रेमात अपयश आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्यांत वाढ झाली होती. सिगारेटला सिनेमाने प्रतिष्ठा दिल्याने लहान मुलांच्यात सुद्धा सिगारेटचं व्यसन दिसतं हे मत अनेक डॉक्टरांनी त्या काळात मांडलेले होते. तरीही सिनेमाने समाजावर बरा किंवा वाईट परिणाम होतो किंवा होतच नाही अशी निश्चित थिअरी मांडता येत नाही.

जावेद अख्तर यांचं वक्तव्य वाचल्यावर वाटलं होतं की अँग्री यंग मॅन नावाखाली यांनीही गुन्हेगारीचं उदात्तीकरणच केलं होतं. पण वय वाढतं तसं मॅचुरीटी वाढते, आपलीही मतं बदलतातच की. मग लेखक/कवी अशा संवेदनशील माणसांचीही मतं बदलली तर नवल का वाटावे?

परवा एका युट्युबरचा रिव्ह्यू ऐकला. तो म्हणाला की लोकांना ऍनिमलमधली हिंसा किंवा दमन समजत नाहीये (आवडत नाहीये नव्हे) त्याचं एक कारण की हे त्यांच्या परीघाबाहेरचं असेल. आम्ही असं पॅट्रीआर्किकल, सो कॉल्ड मॅचो व हिंसक वातावरण आमच्या आजूबाजूला अनुभवलं आहे. (स्टायलाईज्ड चित्रीकरण वगळल्यास) ‘ऐसा होता है/ हो सकता है’ हे आम्हाला माहितेय. त्याने सिंपल उदाहरण दिलं, आम्ही चंपक वाचत मोठे झालो, आर्चि कॉमिक्स नाही त्यामुळे आम्ही आर्चि मुवीशी रिलेट नाही करू शकत, पण इतर करतात, तसंच काहीसं हे आहे.
(वि. सु. तो मुवीला प्रमोट करत नव्हता.)

(माझे मन, प्रतिसाद तुला किंवा इतर कोणाला थेट उद्देशून नाहीये.तुझ्या प्रतिसादाखाली आहे म्हणून सांगितले)
'जग हे साने गुरुजींचं पुस्तक नाही, आदर्शवादी बनू नका, यु आर सो नाईव्ह,अश्याने के फक्त ससा कासव गोष्टी किंवा लग्नाच्या कॅसेट दाखवायच्या का पिक्चर मध्ये' इत्यादी इत्यादी मलाही माहीत आहे.

वाईट पात्रं असतात.मिडियात दाखवली जातात.दाखवायला हवीत.पण at least in story do not project them as people who win, who rule the world in the end. Show that they do bad things and as a payback lot of bad things happen to them in end.Heroine leaves them for a normal non abusive person.They are rotting in jail for many years and stay unemployed after coming out.They face abuse in jail while standing in meal queues and die by lynching.If you like violence in movies, this is just another flavor of it.

We want to promote a world where hope exists.
तसं तर 'वाईट गोष्टी जगात असतात याची ओळख' म्हणून क्राईम पेट्रोल मधला सगळाच कचरा सिनेमात ओतता येईल.What mind of person you(director/writer) are, what kind of worth and IQ and EQ you have in world is every thing.If you are animal, you will like and promote this animal brain crap.If you are human, you will still want to produce a good positive content in world.

(इतकं इंग्लिश पहिल्यांदा लिहिलं असेल इथे Happy त्रिवार माफी)

हॉलिवूडच्या मूव्हीज च्या आधी १२, १५, १८ असा कुठल्या वयोगटासाठी सिनेमा आहे हा अंक ठळकपणे दाखवलेला असतो, त्याच प्रमाणे भारतात सिनेमाला भावनिक प्रगल्भता सामाजिक इंडेक्स पण दर्शवावे लागेल.
सिर्फ मॅच्युअर्ड ऑडियन्स के लिये / विथ मॅच्युअर्ड ऑडीयन्स ओन्ली / सभी के लिये

अनु, गूगलने तुमच्या २ इंग्रजी परिच्छेदांचं हे भाषांतर केलं आहे:

<<किमान कथेत त्यांना जिंकणारे लोक म्हणून दाखवू नका, जे शेवटी जगावर राज्य करतात. ते वाईट गोष्टी करतात हे दाखवा आणि शेवटी त्यांच्यासोबत अनेक वाईट गोष्टी घडतात जेवणाच्या रांगेत उभे असताना आणि लिंचिंगने मरतात. जर तुम्हाला चित्रपटांमधील हिंसा आवडत असेल, तर ही त्याची आणखी एक चव आहे.>>


<<तुम्ही (दिग्दर्शक/लेखक) व्यक्तीचे मन कसे आहात, जगात तुमची किंमत किती आहे आणि तुमचा IQ आणि EQ ही प्रत्येक गोष्ट आहे. जर तुम्ही प्राणी असाल, तर तुम्हाला या प्राण्यांच्या मेंदूतील बकवास आवडेल आणि प्रोत्साहन द्याल. जर तुम्ही माणूस असाल तर तुम्हाला आवडेल. अजूनही जगात चांगली सकारात्मक सामग्री निर्माण करायची आहे.>>

गूगलचं मराठी बरंच सुधारलेलं दिसतं आहे! Sad
फक्त शेवटच्या वाक्यात गूगलचा अडकून सीताराम झाला आहे

बरंच चांगलं भाषांतर केलंय.गुगल सुधारतंय हपा, आपण त्याला सुधारू देणार नव्हतो ना आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये म्हणून ? Happy

हे म्हणजे चित्रपटात मी गन वापरणार नाही.. गोळ्या झाडणार नाही.. दारू पिणार नाही… स्मगलिंग करणार नाही टाइप झाले…
Submitted by च्रप्स on 10 January, 2024 - 09:52

कशाला हवं चित्रपटात हे सगळं. भारतात बनलेला आजवरचा सगळ्यात जास्त पैसे कमावणारा चित्रपट म्हणजे "दंगल". ह्यात ना कुठे दारू दाखवली ना कुठे बंदूक आणि गोळ्या, ना कुठला हिंसाचार, तरी चालला ना हा चित्रपट

अ‍ॅनिमल, हिंसा, पॅट्रिआर्की, स्त्रीयांना कस्पटासमान इ. इ. दाखवा, ते दाखवून समाज चालतो ते ही दाखवा. पण...
अनुच्याच शब्दांत सांगायचं तर माणूस == सकारात्मकता आणि अ‍ॅनिमल == बकवास मेंदू हे थोडं नाईव्हच झालं. हे वरचं सगळं माणसाच्या मेंदूतूनच निघालेलं आहे, आणि सदासर्वकाळ वास करतं. त्यामुळे हा बकवास दाखवलाच पाहिजे.. पण..
त्यात असं काही दाखवा, त्या स्क्रीनच्या मॅजिकचा असा उपयोग करा की समाज म्हणून शेवटी आपण चार पावलं पुढे नाही गेलो तरी एक पाऊल मागे तरी येणार नाही.
अर्थात लेखक/ दिग्दर्शकाच्या गफ्रे/ फीमेल डेफिनिशन मध्ये 'मार खाणारी', 'बूट चाटणारी' हे व्यवच्छेदक लक्षण असेल तर त्याचे मूव्ही न बघणे याउप्पर काही करू शकत नाही.
वावे +१. इतर मूव्ही सुद्धा आपल्याला आत्ताआत्ता पर्यंत आवडत होते. नव्या पिढीला आपल्यापेक्षा जनरली जास्त अक्कल असते. भारतात ही तसंच राहू दे म्हणजे झालं.

>>>>नव्या पिढीला आपल्यापेक्षा जनरली जास्त अक्कल असते.
१००% नवी पिढी हुषार, उदारमतवादी (खरं तर ब्रॉड माईंडेड म्हणायचे आहे कारण उदार हा शब्दही उपकॄत केल्याची भावना देतो. ) आहे.

इथे सगळेजण फार मस्त मस्त उलटसुलट मते मांडत आहेत. हा धागा वाचायला आवडतो आहे.

वावे, अमित, रमड, आचार्य, अनु
पोस्टी वाचल्या.

मला अशा सिनेमांवरून कोणी प्रेरित होतही नसेल असं खात्रीने म्हणता येत नाही, कारण इथे एकही स्त्री नसेल जिने ओंगळवाणे स्पर्श व नजरा अनुभवल्या नाहीत. तरीही तिच्या मनात माझीच काही चूक तर नसेल असंही आलेलं असतं त्या क्षणी, हाही कंडिशनिंग मधून येणारा विचार. तीव्रता कमी- अधिक असेलही पण हे कंडिशनिंग सुद्धा (स्त्री-पुरुष) म्युच्युअल आहे.

आपल्या लहान लेकीला कुणी चारित्र्याचा 'बेनेफिट ऑफ डाऊट' देत अनोळखी पुरुषासोबत काही तास ठेवेल का? ती इंद्रधनुष्य, युनिकॉर्न, धबधबे, फुलपाखरू काढत 'नव्या' काकांपाशी बसू देत का ?

याचं उत्तर 'नाही' हेच असेल कारण कुठेतरी माहितीये आपल्याला की एकंदर समाजाची मानसिकता बघता हे धोका पत्करणेच आहे. या कारणाने मला या सिनेमातील 'स्त्री कस्पटासमान' ह्याच्या उद्दातीकरणाला फक्त कुणाची तरी कल्पना किंवा फ्रिडम ऑफ स्पीच म्हणून सोडून देता येत नाही. ज्यांची मतं अजून बनलेली नसतात त्यांना ह्या कल्पना 'मत' देतात, ज्यांचं मत आधीपासून असंच आहे- त्यांना हे तुमचंच बरोबर आहे असं सांगतात, ज्यांना हे करायची इच्छा आहे- त्यांना तुम्ही करू शकता तुमचं कुणी काही बिघडवू शकत नाही सांगतात, कारण नायकाला शिक्षा होतच नाही. शेवटी सबकॉन्शस माईन्ड मध्ये हळूहळू का होईना हे जात असतेच, कारण ते तसे जायलाही हवेच असते. एकदा स्त्री कस्पटासमान वाटली की मग तिचं वय 6/16/36/60 काहीही असलं तरी ती कस्पटच..!

आपल्याकडे law and enforcement पैकी फक्त 'लॉ' आहे. Enforce केल्या जाईलच असे नाही. हेही अधोरेखित होते.

अभिव्यक्तीवरती विशेषतः कलेवरती बंधने असू नयेत. हां मात्र प्रेक्षकांनी जागा दाखवुन देणे महत्वाचे आहे. प्रेक्षकांची रुचि तितकी प्रगल्भ नसेल तर .... कठीण आहे.
पण - अभिव्यक्तीवरती विशेषतः कलेवरती बंधने असू नयेत.

@किल्ली
>>>>>>Millenials ना y असे का म्हणत नाहीत?
Lol
काय माहीत कोण ठरवतात या संज्ञा. पण प्रश्न मस्त आहे.

-- सॉरी आधीच्या पानावरचा विषय इथे चुकून उगाळला गेला. मुख्य मुद्द्यावर येऊ यात.

>>>>>मला अशा सिनेमांवरून कोणी प्रेरित होतही नसेल असं खात्रीने म्हणता येत नाही,
यामध्ये प्रेरित होणार्‍या व्यक्तीचा १००% दोष आहे. कलेचा नाही. जरी कलाकृती नसती तरी विकृत व्यक्ती तश्शीच वागली असती. सिनेमावरुन प्रेरित झालो - ही निव्वळ लंगडी सबब आहे.

अर्थात लेखक/ दिग्दर्शकाच्या गफ्रे/ फीमेल डेफिनिशन मध्ये 'मार खाणारी', 'बूट चाटणारी' हे व्यवच्छेदक लक्षण असेल तर त्याचे मूव्ही न बघणे याउप्पर काही करू शकत नाही. >> अ‍ॅनिमल च्या ऑफिशियल एक्स हँडलवरून जावेद यांना झोडपताना समर्थन केले आहे.

अस्मिता, चांगला मुद्दा.

Pages