
समजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट. गेलाबाजार किमान एखादे गाणे तरी? 'ॲनिमल' मध्ये कशातलेच काहीच मिळत नाही. दृश्ये, संवाद आणि एकूण सगळाच चित्रपट असा अंगावर आल्यासारखा येतो. हाताशी मात्र काहीच लागत नाही. अक्षरशः मध्यांतरानंतर थियेटरमधून पळून जावे असे वाटत होते. संपला तेंव्हा सुस्कारा टाकत बाहेर आलो. मोक्कार पैसे देऊन तिकीट काढावं आणि अक्षरशः अंगावर पडलेली घाण झटकत बाहेर पडावं अशी अवस्था झाली होती. लेने के देने पड गये 
कथा काय आहे?
एक इंडस्ट्रियालिस्ट कुटुंब असते. त्यांची स्टील उत्पादनाची इंडस्ट्री असते. अनिल कपूर आणि त्याचा बाबा हे दोघे कुटुंबप्रमुख. रणबीर कपूर हा अनिलचा मुलगा. कधी पूर्वी त्या बाबा ने कुणालातरी कामावरून कि भागीदारीतून हाकललेले असते म्हणे. त्या व्यक्तीचे वंशज तिकडे कुठल्या तरी फलाण्या देशात राहत असतात. त्या त्यांच्या वंशजाला (बॉबी देओल) बदला घ्यायचा असतो म्हणून तो सतत अनिलचा खून करायच्या प्रयत्नात असतो. त्यात अनिल सोबतच राहणारा त्याचा घरजावई सुद्धा त्याला (बॉबी देओलला) सामील झालेला असतो. अनिल मात्र आपल्या मुलीला व जावयाला गोंजारत असतो. आपल्या पोराला मात्र फार किंमत देत नसतो. पण पोराचे मात्र बापावर खूप प्रेम असते. अखेर पोरगंच कामाला येतं. 'अस्तनीत निखारा' बनून राहिलेल्या मेहुण्याला ठार मारतं. आणि ह्या खानदानी दुश्मनाचा सुद्धा नायनाट करतं.
झालं! इतकीच स्टोरी आहे.लक्षात आले का, ह्यात स्टील उत्पादनाचा पहिल्या उल्लेखानंतर कुठेच संबंध येत नाही. आहे कि नाही पटकथाकराची कमाल?
हुकलेले दिग्दर्शन आणि संपादन:
संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचे आहे याचा बोध होत नाही. तुझ्या सिनेमाचा फोकस नक्की काय आहे बाबा? कौटुंबिक कलह, की बदले कि आग, की पुरुषांचे भावविश्व, की वडील मुलातले नातेसंबंध, की अजून काही? नक्की काय समस्या सोडवणे सुरु आहे तेच कळत नाही. एडिटिंग तर थूत्त्तड आहे. पार बोंब करून ठेवली आहे. रणवीर कपूर आपल्या मेहुण्याला मारताना दाखल्याच्या दृश्यानंतर मेहुणा जिवंत दिसतो आणि चर्चा अनिल कपूरवरच्या हल्ल्याची दाखवली आहे! कळतंच नाही नक्की कुणाला मारले आणि काय सुरु आहे. वाटते कि रणवीरने आपल्या बापालाच मारले कि काय? कि मारणारा रणवीरचा बॉडी डबल होता? कि तो बॉबी देओल होता? (कारण ते दोघेही दाढीवाले दाखवलेत). अरे काय चाललंय काय? बराच वेळ पडद्यावर काय चाललंय कसलाच बोध होत नव्हता.
ऍडल्ट संवादांची विकृती आणि बीभत्स दृश्ये:
एकंदर चित्रपट पाहता हे कुटुंब इंडस्ट्रियालिस्ट पेक्षा अंडरवर्ल्डवाले असावेत असे वाटते, तर "जॉब वरून काढले" म्हणून दुसरे कामधंदे न पाहता तब्बल दोन पिढ्या वैरभाव धरून रात्रंदिवस ह्यांना मारण्याच्याच कामी लागलेले ते दुसरे कुटुंब म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. या सर्वांचीच 'उच्च राहणी आणि टुकार विचारसरणी' दाखवली आहे. एकंदर या सर्वांचे वागणे आणि वृत्ती पाहता यांची इंडस्ट्री कधीचीच बंद पडून हे सगळे कुटुंबीय वास्तविक भिकेला लागायला हवे होते. पण चित्रपटात मात्र ते गडगंज दाखवलेत. इतके गडगंज कि एका प्रसंगात एक नवी कोरी रोल्स रॉयस ते अशीच स्फोट करून जाळून टाकतात!
बरं कौटुंबिक हाणामाऱ्या तरी कसे म्हणावे? त्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि विचारू नका. पूर्वी आर्नोल्डच्या एका चित्रपटात एलियन्सला मारण्यासाठी त्याची टीम तुफान तुफान तुफान गोळीबार करताना दाखवली होती. कित्येक मिनिटे थियेटर मध्ये फक्त धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड गोळीबाराचे आवाज घुमत होते. ते असह्य होऊन त्या काळात एका प्रेक्षकाने अक्षरशः थियेटरमध्येच बोंब ठोकली होती. ते सुद्धा मला चांगले आठवतेय. इतका भयंकर गोळीबार! या चित्रपटात यांच्या कौटुंबिक कलहात अगदी तसाच व तेवढ्या प्रमाणात गोळीबार दाखवला आहे. बॉबी देओल तब्बल तीनशे माणसे पाठवतो यांना ठार मारायला, तेंव्हा हा बेसुमार गोळीबार आहे. तो इतका वेळ आणि इतक्या प्रमाणात आहे, कि यावेळी बोंब ठोकायची वेळ माझी आहे का काय असे वाटू लागले. आणि जेम्स बॉंडला सामुग्री पुरवणारा जसा कोणी एक असतो तसे इथे आपल्या रणवीरबाबाला मशीनगन्सपासून बनवलेली आख्खी गाडीच बनवून देणारा एक मराठी माणूस दाखवला आहे तो म्हणजे उपेंद्र लिमये. अरे इतक्या मोठ्या प्रमाणात weapons of mass destruction दाखवायचे होते तर कारखानदार कशाला दाखवले त्यांना?
भाषेच्या बाबत तर काय बोलण्यासारखे सुद्धा नाही. आजकाल नेहमीच्या चित्रपटांत सुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली ऍडल्ट शब्दप्रयोग करायचे तसेही एक विकृत फॅड आलेले आहे. आणि हा तर A सर्टिफिकेटचा चित्रपट. यांनी संवादातून विकृतीचा कळस गाठण्यात मात्र जागोजागी भरपूर यश मिळवले आहे. ऍडल्ट शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. पण कथेत आणि दिग्दर्शनात जे कसब आणि गुणवत्ता दिसायला हवी ती जर नसेल आणि नुसतेच ऍडल्ट संवाद असतील तर ती कलाकृती न राहता फक्त विकृती बनून राहते.
तात्पर्य:
'ॲनिमल' हा असाच एक ए सर्टिफिकेटचा विकृत सिनेमा आहे.
संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी. जी आजकाल सगळ्याच चित्रपटात आढळतात. आत्ताची हि हाय पीच गाणी म्हणजे मला तर ते अखंड एकच रेकॉर्डिंग वाटते. तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या चित्रपटात टाकत असतील.
अभिनय:
इथे फारसे लिहिण्यासारखे नाही. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान केल्यात. तरी विशेष उल्लेख करावा वगैरे असे फारसे या विभागात काही नाही. रश्मिका मंदन्ना भलतीच गोड दिसते. तिला उगीचच मध्यंतरी वेड लागल्यासारखे हसल्याचे रडल्याचे झटके आलेला एक प्रसंग करायला लावलाय. दिग्दर्शक फारच टुकार वाटला ब्वा (असेलही कदाचित व्यायसायिक दृष्ट्या यशवी पण तो भाग वेगळा)
जाता जाता:
चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याबाबत माझ्याकडून नो कॉमेंट्स. IMDb वर 6.8 रेटिंग आहे.
थोडं चुकतंय का कुठे? कारण
थोडं चुकतंय का कुठे? कारण २००० च्या आसपास जन्माला आलेली पिढी २०१८ साली अठरा वर्षाची (सज्ञान) झाली तेंव्हा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना त्या जनरेशनसाठी ज्या तरतूदी केल्या होत्या त्या सांगताना अर्थमंत्री यांनी मिलेनियल्स हा शब्द पहिल्यांदा वापरला होता असे आठवते. 1981-1996 हे मिलेनियल्स कसे?
जाता येता गाडीतल्या एम एम वर
जाता येता गाडीतल्या एम एम वर आर जे लोक जेन झी सारखे बोलायचे म्हणून गुगल केले तेव्हां कळले.
अस्मिता धन्यवाद, हे माहीत
अस्मिता धन्यवाद, हे माहीत नव्हते.
एवढी माहिती आणि प्रतिसाद आलेले बघून नवीन धागा काढायचा चान्स हुकावला की काय असेही वाटले.
बाकी आजवर स्वताला नाईंटीज किड म्हणवून घेण्यातच धन्यता मानत आलो आहे. आज एक नवीन पेहचान मिळाली
@ ॲनिमल आणि जैन झेड,
आमच्या शाळेच्या ग्रूपवर सुद्धा जे बघून आले त्यातले काहींनी सॉलिड, फाडू वगैरे म्हणत कौतुक केलेले या पिक्चरचे..
आंतरजालावरील ढोबळ माहिती आहे
अर्थमंत्री असं का म्हणाले असतील माहिती नाही पण ह्या व्याख्या एकंदरीत काही फार सखोल वाटत नाहीत.
प्यु रिसर्च असे नाआव येते
प्यु रिसर्च असे नाआव येते समोर. गेल्या वेळी गुगळलेले तेव्हा समजले कि जनरेशन्सला नावे ठेवणारी अधिकृत संस्था अशी नाहीच (पुण्याची असेल असे वाटले होते). हे प्युअर मार्केट रिसर्च वाले आहेत. त्यांनी त्यांच्या सोयीने ही नावे दिलेली आहेत, त्यामुळेच अल्फाबेट्स आहेत. वेगवेगळ्या जनरेशन्सला काय आवडते, त्यांच्या सवयी काय ? इन्कम काय, खर्च कसा करतात हा डेटा यात येतो. या टर्म्स बी टू बी कडून मीडीया आणि मीडीयातून एका वर्तुळात पॉप्युलर झाल्या आहेत.
आपण डोक्याला भुंगा लावून न घेता माझा चौदा वर्षांचा मुलगा असे म्हटले तरी चालू शकते.
सिनेमा पाहताना मला वारंवार
सिनेमा पाहताना मला वारंवार शिरीष कणेकरांची आठवण येत होती. ते हयात असते तर त्यांनी कसे धुतले असते ह्या सिनेमाला याची कल्पना करून प्रचंड हसायला येत होते
म्हणजे ते लिहीत होते तो पॅटर्न कालातीत होता असे नव्हे. प्रत्येक जनरेशनच्या आवडीनिवडी भिन्न असतात वगैरे सगळे मान्यच. तरीही... दिल बहलाने के लिये गालिब, कणेकर का खयाल अच्छा था 
जबरी लिहिलं आहे परीक्षण.
जबरी लिहिलं आहे परीक्षण.
माझी एक रिक्षा - मध्यंतरी
माझी एक रिक्षा - मध्यंतरी अमेरिकेतल्या millennials वगैरे पिढ्यांच्या ऐवजी भारतात कसे अंतर दाखवता येईल त्याचा एक विचार केला होता. हे वाचून पहा.
https://dnimish.medium.com/defining-indian-generations-c702f28049d8
पटलं धनि. चारपाच वर्षांचा
पटलं धनि. चारपाच वर्षांचा टॉलरन्स असायचाच. पण एकंदरीत पटण्यासारखं आहे.
छान वर्गीकरण, धनि
छान वर्गीकरण, धनि
मी पाहिला… दोन वेळा.. थिएटरात
मी पाहिला… दोन वेळा.. थिएटरात… फुल्ल शिट्या माहोल मधे.. कॅफिन शॉट आहे… मस्त वॉच.. फेमिनिस्ट नी दूर रहावे… नॉट फॉर लुझर्स…
संगीत:
संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी
>>> विशाल शर्मा च्या पहले भी मैं तुमसे मिला हूँ
पहली दफ़ा ही मिलके लगा
तूने छुआ ज़ख़्मों को मेरे
मरहम-मरहम दिल पे लगा चा उल्लेख नाही म्हणून निषेध…
आणि काही वयानी ज्येष्ठ असूनही
आणि काही वयानी ज्येष्ठ असूनही अपरिपक्व असू शकतात. <<

छान परीक्षण अतुल. तथ्यहीन
छान परीक्षण अतुल. तथ्यहीन चित्रपट फार वैताग आणतात.
ते जनरेशनचे क्लासिफिकेशन बाळबोध वाटले.
धनि यांनी चांगले लिहिले आहे.
अरजन वेली ने पण भारी आहे. मला
अरजन वेली ने पण भारी आहे. मला आवडत.
ANIMAL - HINDI: https://music.youtube.com/playlist?list=OLAK5uy_kskodBfdeODJ5rbq1CZwkJjD...
मी जेन झी आहे काठोकाठ पण
मी जेन झी आहे काठोकाठ पण बघावा नाय वाटला.
येस - अर्जन वल्ली पण मस्त आहे
येस - अर्जन वल्ली पण मस्त आहे...
अत्यंत विकृत सिनेमा आहे.
अगदी असेच वाटले सिनेमा बघून.
अत्यंत विकृत सिनेमा आहे. थिएटर मध्ये बघून आलो.
दुपारच्या २ च्या शो ला कोण येणार असं वाटलं तर थिएटर बऱ्यापैकी भरलेलं होतं. सगळी तरुण कॉलेजवयीन मुलं मुली होत्या.
खून, रक्त, रक्ताचे पाट, शिव्या यांचं अजिबात वावडं नाही. पण... बायकोच्या ब्रा च्या बेल्टच इलास्टिक ताणून त्याने पाठीवर जखमा होतील असे वळ काढणे, त्यातून आलेल्या रक्ताचे चार थेंब मात्र नाही बघू शकलो... आणि मग त्या जखमांवर मलम लावणे... हा किळसवाणा विकृतपणा आहे. आणि हा वानगी दाखल एक प्रसंग आहे. असे अनेक प्रसंग animal म्हणून न्हवे तर चवीने भलामण करत दाखवले आहेत. मी फेमिनिस्ट आहेच, पण ही असली घृणास्पद दृश्ये न आवडायला फेमिनिस्ट असायची काहीच गरज न्हवती.
रणबीर आणि अनिल कपूर ना अशा प्रोजेक्ट मध्ये काम करताना बघून त्याची आपली सगळीच कीव वाटली.
फारच किळसवाणा प्रकार असावा हा
फारच किळसवाणा प्रकार असावा हा पिक्चर.
कोणी कश्यात काम करून पैसे मिळवावे यावर आपला अर्थात कंट्रोल नाही.पण अश्या डोमेस्टिक हिंसाचाराच्या गोष्टी सिनेमात दाखवू नये असं वाटतं.
दिगदर्शकाचं जावेद अख्तरशी
दिगदर्शकाचं जावेद अख्तरशी वाजलं.
बापरे काय भयानक प्रसंग आहेत.
बापरे काय भयानक प्रसंग आहेत. हा चित्रपट हिट झाला म्हणजे खरच कठीण आहे!
दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा
दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा महायुद्धात अमेरिकेची आर्थिक व औद्योगिक भरभराट झाली. युद्धादरम्यान पुरुष युरोपात असल्याने बायका कामासाठी बाहेर पडल्या. अमेरिकेला फारसे बाह्य शत्रू किंवा कॉम्पिटीटर्स उरले नाहीत (कोल्ड थोडे उशिरा सुरु झाले). जिंकून परतलेल्या सैनिकांनाही समाजात मानाचे स्थान होते. (या उलट व्हिएतनाम युद्धात झाले) या सगळ्याचा परिणाम म्हणजे समृद्धी आणि (समाज म्हणून) निवांतपणा यामुळे लोकसंख्या वाढली. या काळात जन्माला आलेली पिढी म्हणजे बेबी बूमर्स.
असे अनेक प्रसंग animal म्हणून
असे अनेक प्रसंग animal म्हणून न्हवे तर चवीने भलामण करत दाखवले आहेत.
>>>>>
हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे अमितव..
आणि तुम्ही उल्लेख केला तसा प्रसंग जर हिरोईजम म्हणून दाखवत असतील तर माझ्या कल्पनेपेक्षा जास्त वाह्यात पिक्चर आहे.
..
रणबीर आणि अनिल कपूर ना अशा प्रोजेक्ट मध्ये काम करताना बघून त्याची आपली सगळीच कीव वाटली.
>>>>>>
आणि मी Dunki बघायला गेलो तेव्हा शाहरूख नाही भेटला तर रणबीर सोबत सेल्फी काढून आलो.. आधी ही पोस्ट वाचली असती आणि असे त्याचे करेक्टर आहे माहीत असते तर नसता काढला.. आता सर्वप्रथम शाहरूखचया चाहत्यांची माफी मागावी लागणार
अमितव नी वर्णन केलेल्या
अमितव नी वर्णन केलेल्या प्रसंगावरून अग्निसाक्षी (नान पाटेकर) सीन्स ची आठवण झाली. पण त्यात नाना वाईट प्रवृत्तीचा दाखवलाय, अॅनिमल मधे आरके हिरो आहे, हा फरक महत्वाचा आहे.
अजून एक पाय का बूट चाटायचा पण आचरट सीन आहे म्हणे.
आरके हिरो नाहीय.. कबीर सिंग
आरके हिरो नाहीय.. कबीर सिंग मधे शाहिद हिरो होता का?गँग्ज ऑफ वासेपूर मधे मनोज आणि नवाज हिरो होते का? गॉन गर्ल मधे एमी हिरो/हिरॉईन होती का?
आरके मेन लिड आहे…
होणारी वाताहत दाखवली आहे…
एंजॉय इट ऐज ए मुवी…
अमेरिकेला फारसे बाह्य शत्रू
अमेरिकेला फारसे बाह्य शत्रू किंवा कॉम्पिटीटर्स उरले नाहीत (कोल्ड थोडे उशिरा सुरु झाले).>>> युद्धकाळातच शीतयुद्धाची सुरुवात झाली होती.
आफ्रिकेतून दुसरी आघाडी लवकर न उघडणे, जपानवरचा अणुबॉम्बचा गरज नसताना वापर ही त्याची उदाहरणे.
विल्फ्रेड नॅपचे पुस्तक जरूर वाचा
नेटवर एकंदर प्रतिक्रिया पाहता
नेटवर एकंदर प्रतिक्रिया पाहता बऱ्याच जणांनी कथेबाबत आक्षेप नोंदवले आहेत तर अनेकांनी कथाकथना बाबत टीका केली आहे. मी ह्या दुसऱ्या गटात येतो. विषयाची निवड हा ज्या त्या दिग्दर्शकाचा अधिकार. त्यानुसार यांनी फेमिनिजम प्रमाणेच हि सुद्धा बाजू आहे, Alpha Male वगैरे मुद्दे घेऊन स्क्रिप्ट लिहिले आहे. कथानक "तीव्र आम्ल" आहे. Not for weak hearted वगैरे वगैरे सगळे त्या त्या ठिकाणी ठीक.
पण माझ्यासारख्यांच्या रोख हा कथाकथनावर आहे. अनेकांनी त्याबाबत टीका केलेली आहे कि story telling चे बेसिक्स सुद्धा हुकलेले आहेत. (टाईम्स, आयएमडीबी इत्यादी वरचे रिव्ह्यूज). चित्रपट प्रेक्षकाच्या मनाची कुठेच पकड घेत नाही. एका प्रसंगात अनिल कपूर रणबीरवर प्रचंड भडकलेला दाखवला आहे आणि हातसुद्धा उगारतो. ते थेट पुढे बऱ्याच अवधीनंतर एक प्रसंग येतो ज्यात एकदम उसळून रणबीर रश्मिकाला म्हणतो माझ्या वडिलांबाबत काही बोलायचे नाही. इथे प्रेक्षक गोंधळतो. केवळ अंदाज करत राहतो कि नक्की यांचे काय नाते आहे. याला कारण त्या पात्राची though process कुठेच स्पष्ट केलेली नाही दिग्दर्शकाने. वरती एका प्रतिसादात नाना च्या "अग्निसाक्षी"चा उल्लेख आहे. तिथे सुद्धा ते पात्र Alpha Male च दाखवले आहे. पण किती जबर पगडा बसवतो प्रेक्षकांवर दिग्दर्शक. तीन दशकांनी सुद्धा ते लक्षात आहे
ते इथे घडत नाही.
हे केवळ एक उदाहरण. असे अनेक ठिकाणी लूज एन्ड्स भरपूर आहेत. कथा strong आहे पण कथाकथन पार ढिसाळ आहे.
असो. सर्व प्रतिसादकर्त्यांना मनापासून धन्यवाद
सिनेमॅटिक फ्रीडम भारतासारख्या
सिनेमॅटिक फ्रीडम भारतासारख्या संवेदनशील ठिकाणी किती असावे असा धागा निघू शकतो. वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या नजरेतून येतील. कलेवर, अभिव्यक्ती वर बंधन नसावे याबाबत दुमत नाही.
पण केरला स्टोरी, कश्मीर फाईल्स सारखे अजेंडा सिनेमे निघतात. त्याचा परिणाम समाजावर काय होतोय? हिंदू मुस्लीम ऐक्य हा ही काल्पनिक अजेंडा होता. पण त्यामागचा हेतू वाईट असेल का?
इथला प्रेक्षक प्रगल्भ आहे का? मुळात हे जज्ज कुणी करायचे? खूप प्रश्न आहेत.
अल्फा मेल इमेजमुळे आधीच असुरक्षित असलेल्या महिला, मुलं, दुर्बल घटकांना त्याचा फटका बसू शकेल का?
धागाकर्त्याची हरकत नसेल तर इथे पण त्या विषयावर चर्चा होऊ शकते.
हो अर्थातच चर्चा तर सर्वच
हो अर्थातच चर्चा तर सर्वच बाजूनी व्हायला हवी आचार्य. जावेद अख्तरांच्या टिकेमुळे ती बाजू जास्तच चर्चिली जात आहे सध्या.
माझ्या पर्यंत आली नाही.
माझ्या पर्यंत आली नाही.
( अख्तर साहेब हे इतके किरकोळ आहेत कि माझ्या सारख्या अति महत्त्वाच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचत नाहीत असा याचा अर्थ नाही. मायबोलीवर स्पष्ट केलेले बरे असते).
Pages