लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> अंत हा शब्द नुकताच मराठीच्या गर्भाशयातनं बाहेर आला
आता बोलले असते, पण जाऊ दे. Lol

<< गाडी चालवताना मला सगळीकडे डेड एंड ऐवजी the road is going to end further ahead अशी लांबलचक पाटी वाचावी लागली असती. >>
No outlet अशी पाटी पण वाचली आहे.

विकांत, रच्याकने हे शब्द बातम्यांमध्ये वापरले तरी मला तेवढंच आश्चर्य वाटेल. बातम्या देताना कमीत कमी संदिग्धता असणं आवश्यक आहे. तिथे लोकांना गोंधळात टाकणारे शब्द नकोत.

नवीन शब्द तयार करणं उत्तमच आहे. परंतु ते करताना नीट विचार केला गेला पाहिजे. आइस्क्रीमला दुग्धशर्करायुक्त थंड घनगोल गट्टू म्हणणं जसं हास्यास्पद आहे तसंच हे मृत अंत हास्यास्पद आहे. नवीन शब्द हा चपखल वाटला तर पाहिजे ना!

काही शब्द हे शब्दशः अर्थ घेऊन येतात तर काही हे त्या पलीकडचे अर्थ घेऊन येतात. लाक्षणिक अर्थ किंवा व्यंग्यार्थ असलेले शब्द किंवा वाक्प्रचार हे त्या त्या भाषेचं वैशिष्ट्य असतात. त्यांचा शब्दश: अर्थ घेऊ नये हे त्या त्या भाषेतल्या लोकांना माहीत असतं. पण त्यामुळेच त्याचं शब्दशः भाषांतरही कधी करत नाहीत. वड्याचं तेल वांग्यावर हे कुणी इंग्रजीत पोरींग दी ऑईल ऑफ ए पॅटी ऑन ओबजीन असं केलं तर ते चुकीचं आहे. किंवा कोकणकड्यावरून खाली पाहताना माझी फाटली - ह्याचं माईन गॉट टॉर्न असं होणार नाही. तुम्ही मूळ शब्दाचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घ्या आणि मग त्याचं भाषांतर करा. तेच डेड एंडला लागू आहे. त्याचा शब्दशः अर्थ मृत अंत असा होत नाही. भावार्थ लक्षात घेऊन मग भाषांतर करा किंवा भावार्थाला जुळेल असा नवीन शब्द तयार करा.

आइस्क्रीमला दुग्धशर्करायुक्त थंड घनगोल गट्टू म्हणणं जसं हास्यास्पद आहे तसंच हे मृत अंत हास्यास्पद आहे. >> +१

भाषेचा मूळ उद्देश म्हणजे तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीला साध्या सोप्या शब्दात कळले पाहिजे. पण काही भाषापंडितांना, जास्तीत जास्त शब्द गोळा करून, भाषा "श्रीमंत" आणि "समृद्ध" करायची असते. हा प्रकार पण त्यातलाच.

भाषा समृद्ध करायला माझा विरोध नाही. फक्त ते करताना शब्दांचा नीट विचार व्हावा. अजून थोडं सविस्तर लिहितो.

भाषेतील शब्द हे तीन (की चार) प्रकारचे अर्थ घेऊन येतात.
१. वाच्यार्थ - इथे शब्दशः अर्थ घ्यायचा असतो. बहुतांश शब्द हे असतात.
२. लक्ष्यार्थ - इथे शब्दश: अर्थ न घेता त्या वाक्याशी सुसंगत अर्थ घ्यायचा असतो. घरावरून हत्ती गेला - हे उदाहरण बऱ्याचदा देतात यासाठी. इथे घरावरून म्हणजे घरासमोरून असा अर्थ घ्यायचा असतो.
३. व्यंग्यार्थ - इथे सूचक अर्थ घ्यायचा असतो. दिवस मावळला म्हणजे सूर्य मावळला असा अर्थ जरी असला, तरी तिथे 'घरी परतायची वेळ झाली' असा एक सूचक अर्थ होतो. माझी फाटली म्हणताना चड्डी फाटली असा जरी अर्थ असला, तरी तिथे मी घाबरलो असा अर्थ घ्यायचा असतो.
४. प्रतिपाद्यार्थ (हा मराठीत आहे का माहीत नाही) - इथे शब्दावरून बरीच मोठी संकल्पना मांडली जाते. वेद आणि उपनिषदात घटाकाश असा शब्द आहे. शब्दशः घड्याच्या आतली मोकळी जागा. पण त्यामागे आधी बरंच विवरण झालं आहे. घडा असताना आतलं अवकाश आणि बाहेरचं अवकाश (स्पेस या अर्थी) आपण वेगळं पकडतो. तो फुटतो तेव्हा दोन्ही अवकाश एक होतात. खरं म्हणजे अवकाश एकच आहे, पण घड्यामुळे आपण त्यांना वेगवेगळं बघतो. तद्वत जीव-जगत/ आत्मा-परमात्मा वगैरे प्रवचन चालू होतं. त्यामुळे जेव्हा घटाकाश म्हणतो तेव्हा एवढं सगळं अपेक्षित असतं.

वरीलपैकी कशाची शब्दश: भाषांतरं होतात आणि कशाची नाही हे लक्षात येईल. शिवाय इंग्रजीत डेड एंड वरीलपैकी कुठल्या अर्थात येतं ते ही लक्षात येईल.

शब्दशः भाषांतर करायचे झाल्यास आईस्क्रीमला हिम्मलई म्हणावे लागेल, दूध,साखर, थंड इत्यादि शब्द कशाला?

----
Submitted by हरचंद पालव on 15 July, 2023 - 04:28
उत्तम विश्लेषण.

ह पा, सर्वप्रथम माहितीपूर्ण पोस्टसाठी धन्यवाद. मला वाटतं तुमच्या प्रतिसादाचं gist हे आहे.
तुम्ही मूळ शब्दाचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घ्या आणि मग त्याचं भाषांतर करा. तेच डेड एंडला लागू आहे. त्याचा शब्दशः अर्थ मृत अंत असा होत नाही.>>>
वरीलपैकी कशाची शब्दश: भाषांतरं होतात आणि कशाची नाही हे लक्षात येईल. शिवाय इंग्रजीत डेड एंड वरीलपैकी कुठल्या अर्थात येतं ते ही लक्षात येईल.>>>

लक्ष्यार्थाचं शब्दशः भाषांतर होण्याची आधीही मराठीत उदाहरणं आहेत. उदा.
White elephant - पांढरा हत्ती
Glass houses - काचेची घरे
White flag - पांढरा बावटा फडकावणे
वगैरे वगैरे.
यातले कुठलेच प्रयोग शब्दशः घेतले जात नाहीत. तरीही आपण ते शब्दप्रयोग मराठीत कॉपी केले आणि ज्या लाक्षणिक अर्थाने ते इंग्रजीत वापरले जातात त्याच अर्थाने वापरत आहोत. मग मृत अंत ने तरी काय गुन्हा केलाय?

इंग्लिश मध्ये डेड शब्दाचा मराठीपेक्षा व्यापक अर्थ आहे आणि तो मराठीतल्या मृत सारखा फक्त सजिवाचा मृत्यू एवढ्याच मर्यादित अर्थाने लागू होत नाही. उदा. डेड प्लॅनेट, डेड वायर वगैरे. आता प्रश्न इतकाच की मराठीत या सर्वांसाठी चपखल शब्द नाही. मी मराठीचं वैगुण्य म्हणालो ते हेच. मग मृत शब्दाची व्याप्ती वाढवली तर काय हरकत आहे. Dead sea च मृत सागर हे भाषांतर तर हिंदी आणि मराठीत already प्रचलित आहे.

मराठी भाषा कुणी ठरवून समृद्ध करायला निघालेला नाही. भाषा प्रवाही असते. तिला जायचं तिथे ती जाणारच. तिला समृद्ध करणे काय किंवा तिच्यावर बांध घालायला पाहणे दोन्ही सारखंच निरर्थक आहे. डेड एंड ला चपखल शब्द उपलब्ध झाला तर लोक वापरतीलच. अन्यथा विकांत सारखाच मृत अंत शब्दही रूढ झाला तर मला काही प्रॉब्लेम नाही. भाषा ही काही पवित्र गाय नाही. (घ्या, आणखी एक लक्ष्यार्थं जो इंग्रजीतून मराठीत भाषांतरित झालाय...की मराठीतून इंग्रजीत झालाय?)

डेड एंड साठी एक शब्द शोधण्याचा मी प्रयत्न करतोय
वंध्यामैथुन
हा कसा वाटतो ?
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%...)

तंतोतंत नाही हे मलाही मान्य आहे.
(unproductive अशा अर्थाने

" पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".

ही वाक्यरचना आणि त्यातला 'तो' चर्चाग्रस्त शब्द मला पटला नाही म्हणून मी वाक्यरचनेचे काही वेगळे नमुने चर्चेसाठी ठेवतो. कोणाला ते पटावेत असा बिलकुल आग्रह नाही. एका सामान्य वाचकाचे हे प्रयत्न आहेत.

१. पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. ते जणू चर्चाबंद झालेत.

२. पाश्चिमात्य देशांशी चर्चा म्हणजे एक प्रकारे वंध्यामैथुनच.

३. पाश्चिमात्य देशांनी इतरांशी चर्चेची दारे केव्हाच बंद करून टाकली आहेत.

अजिबातच पटला नाही कुमार सर! Happy
डेड एंड म्हणजे काहीच मार्ग नसणे. पुढे कुठेच जायला रस्ता नसणे.
वंध्यामैथुनाचा अर्थ पूर्णपणे वेगळा दिसतोय. वायफळ प्रयत्न अशा प्रकारचा. डेड एंडचा याच्याशी काय संबंध आहे ते समजलं नाही.

आपल्या शालेय अभ्यासक्रमात इंग्लिशच्या पेपरात
Translate into good Marathi
असा प्रश्न असायचा.

वरील उदाहरणात शब्दशः भाषांतर मला पटत नाही. म्हणून मी एका लाक्षणिक अर्थाच्या जागी दुसरा लाक्षणिक अर्थ योजत आहे.

अर्थामध्ये फरक पडणार हे मान्य. पण कुठेतरी मूळ अर्थाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न.

वंध्यामैथुन हा शब्द स्त्रियांच्या दृष्टीने अपमानास्पदही वाटतो. जुन्या काळात तो वापरात असेलही. पण त्याचं उगाचच पुनरुज्जीवन करणं हे बरोबर वाटत नाही.

शब्द अजिबात योग्य वाटत नाही.त्या शब्दाचा त्या काळातला अर्थ 'निरर्थक ठरणे' होता.इथे चर्चा अर्थपूर्ण असूनही शेवटी निकाल अनिर्णित असू शकतो.
डेड एन्ड ला 'चर्चा अनिर्णित राहिली' किंवा 'मार्ग खुंटला' हे त्या त्या कंटेक्स्ट मध्ये बरोबर वाटेल.

शब्द अजिबात योग्य वाटत नाही >>> मुद्दा पटला. शब्द एकदम बाद.

मार्ग खुंटणे. >> >>> +१ ; मी मागच्या पानावर सुचवला होता.

सुयोग्य भाषांतर या संदर्भात २ भाषापारंगत व्यक्तींचे लेख मार्गदर्शक वाटले.

१. अरुण फडके : यांत्रिक भाषांतराची (अ)शक्यता! https://ekmarathimanoos.blogspot.com/2013/08/blog-post.html

२. सत्वशीला सामंत : भाषांतराचा अडसर नको, पूल हवा! https://vishrantideepank.com/bhashantaracha-adsar-nako/

डेड एंड साठी एक शब्द शोधण्याचा मी प्रयत्न करतोय
वंध्यामैथुन
हा कसा वाटतो ? >>

भाषा ओघवती पाहिजे, हे बरोबर आहे. पण म्हणून ती उगीच क्लिष्ट न करता, उलट ती सुटसुटीत, सोपी पाहिजे असे व्यक्तिशः माझे मत आहे.

" पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".
ऐवजी पुढील विचार करावा.
" पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. चर्चेसाठी हा रस्ता बंद (किंवा रस्ताबंद) आहे".

ब्रिटाटा (अर्थात अंडे घातलेल्या बटाट्याच्या काचर्‍या), एका रेसीपीचे शीर्षक.
हे अंडी घालणारे बटाटे कुठे मिळतात?

cul-de-sac चर्चा आवडली.
त्याला मार्गांत किंवा पथांत म्हणता येईल का?

अगदीच सोपे हवे असेल तर -
मार्ग-समाप्ती

CUL-DE-SAC>>
वा ! या छान फ्रेंच शब्दाची आठवण करून दिलीत.
या शब्दाचा उगम शरीररचनाशास्त्रातून झालेला आहे.
स्त्रीच्या शरीरातील एका ठराविक पाऊचला असे म्हणतात.
..
सामान्य व्यवहारातील संदर्भात त्याचे एक छान प्रतीकात्मक चित्र इथे आहे :
https://www.dmu.edu/blog/2014/03/anatomy-word-month-cul-de-sac/#:~:text=....

Pages