Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पुस्तक मजेदार म्हणजे
पुस्तक मजेदार म्हणजे गुंतागुंत आणि पुढे काय होणार ही उत्सुकता वाढवत राहाते.
____________________________________
स्मृतीचित्रे - लेखिका लक्ष्मीबाई टिळक
वरदा प्रकाशन कडून जी अनमोल पुस्तके छापली गेली त्यातले हे एक. १९८७ ते २००० पर्यंत बऱ्याच आवृत्त्या काढल्या तरी पहिले मूळ प्रकाशन १९३४ मधले असून त्या आवृत्तीबरहुकुम १९८७ची वरदा'ची आहे असे प्रकाशक भावे म्हणतात. "लक्ष्मीबाईंनी पन्नास वर्षांचा इतिहास उलगडलेला आहे तो वाचताना रडू येते. यावर मोठमोठ्या लेखकांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. मी आणखी काय लिहू?"
'६६-'६७ साली शाळेत सहावी सातवीत या पुस्तकाबद्दल सांगतांना बाईंनी सांगितलं की आता वाचू नका, काही समजणार नाही. हे ना.वा. टिळक ख्रिश्चन झालेले वेगळे टिळक. त्यांच्या बायकोने हे साडेचारशे पानी पुस्तक लिहिलं. मोठेपणी वाचा. ते आता वाचतोय.
१८५०-१९०० काळात बरेच लोक आपणहून ख्रिश्चन झाले होते तर असं काय कारण झालं ही उत्सुकता होती. त्यावर लक्ष्मीबाईंनी अगदी सोप्या भाषेत घटना सांगत उजेड पाडला आहे. ते वाचून उलगडा झाला - १) अती सोवळे ओवळे आणि स्पृष्य अस्पृष्य भेदाभेद. २)समाजात गरीबी फार ,उदरनिर्वाहासाठी साधने कमी. ३)पैसे हातात पडले की उडवण्याकडे कल. ४)गरीबांना वाली नाही ५)वैद्यकीय सेवांची गरज फार भासत होती कारण साथींचे ताप आणि प्लेग,६)दुष्काळ अन्न आणि पाण्याचा.
तर अशा परिस्थितीत ख्रिस्त गरीबांचा कैवारी, मदतीला येतो इत्यादी चर्च अधिक डॉक्टर्स अधिक आसरा,अन्न या धोरणातून ख्रिस्ती धर्म चांगला ही भावना होऊ लागली.
लक्ष्मीबाईंचे सासरे आणि पती ना.वा.टिळक यांच्या विक्षिप्तपणाचे भरपूर किस्से दिलेत. टिळक कवी होते आणि किर्तनेही लिहीत. धर्म बदलायच्या अगोदरही खूप परोपकार करत.यांच्याकडे बरीच जण आसऱ्याला असत. प्रत्येकावर विश्वास ठेवून मदत. एक प्रकरण बालकवी ठोंबरेंचे आहे.
एकूण पुस्तक वाचताना महाराष्ट्रात काय सामाजिक परिस्थिती होती हे कळते.
टिळक ह़्रदयरोगाने जातात. मुलगा दत्तु आणि लक्ष्मीबाई कराचीला जातात हे सांगून पुस्तक संपते.
Srd, अगदी नेमक्या शब्दात
Srd, अगदी नेमक्या शब्दात मांडलाय गोषवारा तुम्ही. मलाही हाच प्रश्न पडलेला की एवढं धर्मांतर का केलं असेल त्यांनी. मागच्याच ३,४ महिन्यात वाचलं आहे पुस्तक . निमित्त झालं ते बातमी वाचल्याचं.
2021 चा साहित्य अकादमी चा अनुवादित विभागातील पुरस्कार शांता गोखले ना मिळालाय स्मृतिचित्रे चा अनुवाद केल्याबद्दल . 'द मेमोरीज ऑफ द स्पिरिटेड वाईफ'.
हे मराठीतील आद्य आत्मचरित्र आहे का?
वर्णिता, ललिता, आणि सगळेच
वर्णिता, ललिता, आणि सगळेच मस्त वाचताय अन लिहिताय
मला जरा चांगली लायब्ररी शोधायचीय. पुण्यातली सुचवा जरा. पण मुळात नवीन पुस्तकं निवडायची मनाची तयारीही करायला हवीय
आद्य आत्मचरित्र आहे का?
आद्य आत्मचरित्र आहे का?
माहिती नाही. इंग्रजीत झालं ते बरं झालं.
------
चांगली लायब्ररी शोधायचीय.
लायब्ररीच बरी. पुस्तके विकत घेऊन करायचं काय?
मला जरा चांगली लायब्ररी
मला जरा चांगली लायब्ररी शोधायचीय. पुण्यातली सुचवा जरा. >>
शासकीय विभागीय ग्रंथालय, विश्रामबागवाडा.
फिनिक्स लायब्ररी, सदाशिव पेठ.
पुणे नगरवाचन मंदिर, लक्ष्मी रोड.
वर्णिता, ललिता, आणि सगळेच
वर्णिता, ललिता, आणि सगळेच मस्त वाचताय अन लिहिताय >>> +१ Srd सुद्धा.
एसआरडी अहो घरात ऑलरेडी मिनि
एसआरडी अहो घरात ऑलरेडी मिनि लायब्ररी आहे

रसिक, पै ठिकठाक. पूर्वी सकाळची फार छान होती. बघू शोधात रहाते
पाचपाटील मस्त. एक काळ शासकीय ग्रंथालयाच्या अंधाऱ्या धुळीत घालवलाय
पण आता घरपोच हवीत असा आळशीपणा आलाय
फिनिक्स चालू आहे?
फिनिक्स चालू आहे?
रावपर्व हे हल्ली हल्लीपर्यंत
रावपर्व हे हल्ली हल्लीपर्यंत वाचलेल्या राजकीय चरित्रांपैकी द बेस्ट म्हणावं इतकं आवडलं. सहसा चरित्र म्हणलं का चरित्रकार हा मुख्य पात्राच्या प्रेमात बुडालेला असतो, त्याने केलेल्या राजकीय लटपटी खटपटी, जुगाड इत्यादींवर मग "काळाची गरज" "राजकीय चातुर्याचा प्रत्यय" वगैरे लेबले लावून मखमली आच्छादन ओढले जाते.
रावपर्व त्याबाबतीत वेगळे आहे, राव स्वतः कसे होते हे सांगायला लेखकांनी कुठेही संकोच केलेला नाही, मग ते त्यांचे बौद्धिक तेज असो वा राजकीय संधीसाधुपणा, कुठलेही विशेषण हातचे राखून किंवा समन्वयवादी प्रकारे वापरलेले नाही, रावांच्या इनसिक्युरिटीज, त्यांचे समज धारणा, त्यांचे तांत्रिक चंद्रस्वामी वगैरेंच्या जवळ असणे इत्यादी निरक्षीर विवेकाने मांडलेले वाचणे चांगले वाटले, आर्थिक उदारीकरण करतानाही केलेले राजकीय खेळ, अपरिहार्यता, डाव प्रतिडाव, ताणलेले कौटुंबिक नाते संबंध सगळे नीट मांडलेले आहेत एकदम.
मी तरी एका बैठकीत फडशा पाडला, जरूर वाचावे असे रेकमेंड करेन.
सही! हे वाचायलाच हवे. धन्यवाद
सही! हे वाचायलाच हवे. धन्यवाद जेम्स वांड.
सहावी सातवीत या पुस्तकाबद्दल
सहावी सातवीत या पुस्तकाबद्दल सांगतांना बाईंनी सांगितलं की आता वाचू नका........ हे वाचून आश्चर्य वाटले.त्याच इयत्तेत
आमच्या सरांनी विचारले होते अमुक तमुक पुस्तके वाचली का?त्यावेळी माझ्याकडे संक्षिप्त स्मृतिचित्रे हे पुस्तक होते.सरांनी सांगितले हे नाही,यापेक्षा मूळ पुस्तक वाच म्हणून.
अर्थात मूळ पुस्तक फार उशिरा वाचले. लक्ष्मीबाईंची धन्य आहे.
त्या वयात पण ते संक्षिप्त स्मृतिचित्रे वाचताना असे वाटत राहिले की मागास जाती जमातीच्या सेवेकरिता धर्म बदलायला हवाच का?विशेष करुन रे.टिळक, पत्नीला याबाबत म्हणतात त्यावेळी जास्त वाटले.पुढे वसुंधरा पेंडसे नाईक यांनीही ही बाब खटकल्याचे त्यांच्या स्फुटात लिहिल्याचे स्मरते.
तरीही त्या काळात असे पाऊल उचलण्याचा निर्णय घेणे किती कठीण झाले असावे हे कळते.
रावपर्वच्या रिव्ह्यूबद्दल
रावपर्वच्या रिव्ह्यूबद्दल थँक्स. वाचायलाच हवं हे. ऑनलाइन ऑफलाईन शोधणं आलं.
मी स्मृतिचित्रे सहावीत वाचले
मी स्मृतिचित्रे सहावीत वाचले होते. अजून थोडे थोडे आठवते पण मी सहमत आहे कि हे पुस्तक पूर्ण समजायला मोठे झाल्यावर वाचायला हवे.
जुन्या अभ्यासक्रमात त्यातला एक भाग होता जेंव्हा टिळक, लक्ष्मीबाईंना वाचायला शिकवतात
बालकविंचा किस्सा सुद्धा मस्त आहे.
फारएन्ड, whitehat
फारएन्ड, whitehat
पुस्तक अमेझॉन वर ई - बुक पद्धतीने उपलब्ध आहे. किंडल रीडर किंवा मोबल्यावर चकटफू कींडल ॲप मध्ये वाचता येईल,
माझा आजकाल पॅटर्न झाला आहे, किंडल आवृत्ती घ्यायची वाचायची, आवडली तर सरळ हार्ड कॉपी विकत घेऊन आपल्या कलेक्शन मध्ये भरून टाकायची, वन टाईम रीड पुस्तकांवर हार्ड कॉपी पैसे खर्च वाचतो मजबूत.
ह्या निमित्ताने नवीन पुस्तक घेतलेले दाखवतो, तूर्तास किंडल एडिशन घेतलं आहे, अरुण शौरी ह्यांचे "the world of Fatwas, Or Shariah in Action"
अरुण शौरी ह्यांना बुद्धिजीवी का म्हणले जात असे ते हे पुस्तक वाचून कळते, कुठेही मुस्लिम धर्माचा सम्यक विरोध किंवा द्वेषमूलक विधाने नाहीत, कुठेही सर्वत्रिकरण नाही तरीही मुस्लिम धर्मांधता अन् त्यातील फतव्यांचे रोल, कार्यकारण भाव, धार्मिक कायद्याचा दृष्टिकोन ह्यावर उत्तम उहापोह केलेली आहे. हे पुस्तक मूर्तरूप आपल्या समोर आणायचा आधी जवळपास ३० खंडात विखुरलेले दारुल उलूम देवबंद, दारूल उलूम नदवातुल उलमा, दारूल उलूम बरेली इत्यादी भारतीय उपखंडातील नावाजलेल्या मुस्लिम संस्थांनी जारी केलेले जवळपास १०,००० फतवे शौरींनी अभ्यासले असावेत ! (प्रस्तावनेत उल्लेख सापडेल बहुतेक)
वांडसर, रावपर्व घेतलेच
वांडसर, रावपर्व घेतलेच पाहिजे आता.
सर नका म्हणू ना, खडूस एच ओ डी
सर नका म्हणू ना, खडूस एच ओ डी असल्याची फिलिंग बळावते, वांड्या म्हणा, वांड म्हणा, वांडो म्हणा, वांडीटल्या म्हणा पण सर नका म्हणू बोवा.
वांडभैय्या म्हणतो. तुम्ही ८४,
वांडभैय्या म्हणतो. तुम्ही ८४, चेअरींग क्रॉस हे अतिशय महान पुस्तक वाचलं आहे का? नसल्यास जरूर वाचा.
पुनर्वाचनात ह्या पुस्तकाचा आनंद द्विगुणीत झाला.
असली पत्रांतून पुढे जाणारं येस मिनिस्टर आणि येस प्राईम मिनिस्टर ही पुस्तके पण माझी फार लाडकी आहेत.
किंडलवर मेलद्वारे पुस्तके
किंडलवर मेलद्वारे पुस्तके पाठविणाऱ्यांकरिता चांगली गोष्ट म्हणजे आता इपब ह्या फॉरमॅटमधली इबुक्स किंडल स्विकारणार असून मोबी चा सपोर्ट ह्यापुढे बंद केला गेला आहे.
पुस्तक अमेझॉन वर ई - बुक
पुस्तक अमेझॉन वर ई - बुक पद्धतीने उपलब्ध आहे. >>> थँक्स बघतो. इथे ऑडिबल मधे मिळेल बहुधा.
पुंबा - सध्या मी "यस मिनिस्टर" ऐकतोय. अनेक सूक्ष्म विनोद पूर्वी पाहताना हुकले होते ते आता लक्षात येतात. काही ठिकाणी ऑडिओबुकला साजेसे बदल केले आहेत. The Compassionate Society मधे त्या खूप स्टाफ असलेल्या पण पेशंट नसलेल्या हॉस्पिटलच्या हॉल मधे हॅकर इतरांना घेऊन जातो, तेव्हा तेथे पेशंट नाहीत वगैरे म्हणताना त्याचा आवाज तेथे मोकळ्या जागेत घुमतो असे ऑडिओ बुक मधे आहे
वांडभैय्या म्हणतो. तुम्ही ८४,
वांडभैय्या म्हणतो. तुम्ही ८४, चेअरींग क्रॉस हे अतिशय महान पुस्तक वाचलं आहे का? नसल्यास जरूर वाचा.
Yes Minister आणि Yes Prime Minister ज्यावर बेतलेलं आहे ते पुस्तक वाचायला हवं आहे, लगेच शोधतो.
सध्या मी "यस मिनिस्टर" ऐकतोय. अनेक सूक्ष्म विनोद पूर्वी पाहताना हुकले होते ते आता लक्षात येतात.
ब्रिटिश ह्युमर म्हणूनच आवडतो मला, पंचेस आणि वक्रोती जब्बर deploy करतात लेकाचे , पी जी वूडहाऊस - बर्ट्रांड "बर्टी" वुस्टर - जीव्ज ही त्रयी अजरामर आहे आमच्या वाचन आवडीत.
इथल्या यादीत तिसरी क्रांती
इथल्या यादीत तिसरी क्रांती येऊन गेलं का? अरुण साधूंचं. तसं जुनं आहे पण मधे नवीन एडिशन काढलेली तर पुन्हा मिळत होतं. फार छान आहे. माबो वर लिहिलं असावं मी पूर्वी यावर. शोधायला हवं
बहुदा नाही टाकला इथे लेख.
बहुदा नाही टाकला इथे लेख. इथेच देते. जरा मोठं आहे फक्त.
तिसरी क्रांती- अरुण साधु
१९९४ च्या महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळालेल्या ग्रंथामध्ये श्री. अरुण साधू यांच्या 'तिसरी क्रांती लेनिन स्टालिन ते गोर्बाचेव' या पुस्तकाचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे वृत्तपत्र संपादनाचे कार्य अरुण साधू करताहेत. राजकीय, सामाजिक समस्या, आंतरराष्ट्रीय राजकारण, वास्तव दर्शन, दलित समस्या, लोकसंख्येचा प्रश्न या आणि अशा विविधांगी विषयावर श्री. अरुण साधू यांनी लेखन केले आहे. पडघम नाटक, फिडेल चे आणि क्रांती, मुंबई दिनांक, शापित, सिंहासन ही त्यांची गाजलेली काही पुस्तक होत.
या पुस्तकामध्ये आधुनिक काळातील मानवाच्या जग बदलण्याच्या स्वप्नांपासून व्यवहारातील कठोर वास्तव पर्यंतचा प्रवास श्री. अरुण साधू यांनी केलेला आपल्याला आढळतो. 1776 च्या अमेरिकन क्रांतीपासून रशियातील 1905 क्रांतीपर्यंत घटनांचा रशियावर काय प्रभाव पडत होता. रशियातील झारशाही म्हणजे राजेशाही, तिचे स्थान, प्रभाव, वृत्ती कशी होती याचे सविस्तर चर्चा लेखकांनी प्रथम केली आहे.1905 च्या पीटसबर्ग सोविएटचे कार्य, त्यातील ट्रॉटस्कीचा सहभाग, सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त सहभाग याचे सविस्तर विवेचन लेखकाने केले आहे.
आज रशियन समाज रशियन माणूस हा अतिशय अबोल, चर्चा करण्यास नकार देणारा, कृती करण्यास तयार नसलेला, असा आपल्यासमोर आहे. परंतु हा समाज असा नाही. उलट हा समाज एकत्र येणार आहे आणि होता. त्यामुळे 1905 मध्ये कोणताही धडाडीचा, प्रभावी नेता नसूनही पिटसबर्ग मधील कामगारांनी एकत्र येऊन क्रांती घडवून आणली होती, हे अरुण साधूंनी स्पष्ट केले आहे.
झारने ही क्रांती दडपून टाकल्यानंतर लेनिन, स्टालिन, ट्रॉटस्की, कामेनेव, झिनोविनेय या नव्या उदयोन्मुख नेत्यांना हद्दपार केले. तेव्हापासून फेब्रुवारी 1917 पर्यंत परिस्थितीचे सविस्तर विवेचन लेखकाने केले आहे. तत्कालीन रशियन समाजाचे चित्रण मराठीमध्ये इतक्या प्रभावीपणे आणि सविस्तरपणे अजून लिहिलेले गेले नव्हते.
फेब्रुवारी 1917 च्या क्रांतीमधील सर्वसामान्यांचा, लष्कराचा, कामगाराचा सहभागही असाच आज पर्यंत मराठी वाचकांना माहिती नव्हता. फेब्रुवारी क्रांतीबाबत तत्कालीन नेते लेनिन, ट्रॉटस्की, कामनेव यांची मते त्यांचे अभिप्राय लेखकाने अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहेत
फेब्रुवारी क्रांती ते ऑक्टोबर क्रांतीपर्यंत लेनिन, ट्रॉटस्की यांचा वैचारिक आणि कृतिशील प्रवास लेखकाने वाचकासमोर जिवंत उभा केला आहे. आपण साम्यवादी क्रांती साठी योग्य परिस्थिती निर्माण करत आहोत; प्रत्यक्ष क्रांती अजून दूर आहे. याची जाणीव तत्कालीन सर्वच नेत्यांना होती हे साधूंनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले आहे. समाजवादाच्या विजयासाठी लेनिनच्या काळात कसे प्रयत्न झाले हे सांगितल्यानंतर स्टालिनने आपल्या विरोधकांना यांना कसे बाजूला केले याचे सविस्तर उदाहरणासहित विवेचन लेखकाने केले आहे. वेळप्रसंगी फोडा आणि झोडा ही नीती स्वीकारून, वेळ प्रसंगी आपले विचार-तत्त्वज्ञान-मते कशी लेनिनचीच होती हे सांगून सामान्यांची भुलावण करून, वेळप्रसंगी लष्करी शक्ती वापरून, वेळप्रसंगी लेनिन चे जे महात्म होते त्याचा गैरवापर करून, स्टालिनने सत्तेच्या सर्व सूत्रांवर ताबा मिळवला आणि विरोधकांचा काटा पूर्णपणे दूर केला. केवळ एवढेच नव्हे तर समाजवादी रचना साम्यवादी समाज रचनेतील प्रमुख संस्था पोलीट ब्युरो हिच्या संरचनेत स्टालिनने हळूहळू बदल घडवून आणून पक्षांतर्गत लोकशाही संपवून टाकली. पॉलीट ब्युरो, मध्यवर्ती कार्यकारणी, मध्यवर्ती समिती आणि पक्षाची शिस्त राखणारा मध्यवर्ती आयोग या सर्व स्वतंत्र संस्थांवर पूर्ण नियंत्रण स्टालिनने जनरल सेक्रेटरी म्हणून निर्माण केले. रशियाचा नवा आर्थिक कार्यक्रम, उद्योगीकरण, प्रशासनात्मक रचना, अन्नधान्याचे उत्पादन, शेतीचे प्रशासन या सर्व बाबत एकच भूमिका न घेता मन मानेल तसे निर्णय घेतले. व त्या त्या वेळेस एका एका विरोधकाला दूर केले. या संपूर्ण काळाचे विवेचन अरुण साधूंनी अतिशय सखोल केले आहे. अभ्यासपूर्ण आणि मार्मिक केले आहे. प्रामुख्याने ट्रॉटस्की चे रशियन क्रांतीतील स्थान; जे आज पर्यंत पूर्ण दुर्लक्ष आणि गुप्त राखले गेले होते, याची स्पष्ट जाणीव लेखकाने करून दिली आहे. ट्रॉटस्कीचे कार्य व सैद्धांतिक भूमिका, लेनिनची सैद्धांतिक मतभेद असूनही लेनिनने ट्रॉटस्कीला दिलेला मान, लेनिन चे ट्रॉटस्की बाबत चे मत, लेनिन चे स्टालिन बद्दलचे मत; या सर्वांचे मराठी वाचकाला स्तंभित करणारे वास्तव चित्र अरुण साधूंनी अतिशय अतिशय समर्थपणे उभे केले आहे. त्यासाठी 'प्रॉफेट रेव्होल्युशन' : लिओ ट्रॉटस्की, 'माय लाईफ' : लिओ ट्रॉटस्की, 'टेन डेज डेज दॅट शुक द वर्ल्ड' : जॉन रिड या आणि अशा दुर्मिळ पुस्तकांचा अभ्यास अरुण साधू यांनी केलेला आहे.
स्टालिनच्या काळात रशियन जनतेवर स्टालिनचा किती प्रवाह होता; कधीकधी लेनिन पेक्षाही स्टालिनची गुणगान कसे होत असे याचे विवेचन लेखकाने 'स्टालिन चे दैवीकरण' या प्रकरणात केले आहे. दुसऱ्या महायुद्धातील स्टालिनची कामगिरी खरी आणि दिखाऊ या दोन्हीची सांगोपांग चर्चा लेखकाने केली आहे. स्टालिनच्या काळात अमेरिका रशिया यांच्यातील शीतयुद्ध परमोच्च बिंदू गाठला होता. या काळातील घडामोडी यावरील स्टालिनची पकड याचेही विवेचन लेखकाने केले आहे. प्रसिद्ध बर्लिनची भींत, तिची उभारणी बर्लिन ची कोंडी या घटनांचाही त्यात समावेश आहे. स्टालिनची कारकिर्द, शेवटी शेवटी त्याच्या अगदी जवळच्यांनाही कशी त्रासदायक धोकादायक वाटत होती, याची तसेच स्टालिनच्या मृत्यूची घटना याची माहिती लेखकाने दिली आहे. नंतरच्या काळात कृश्चेव्ह, मालेन्कोव्ह, बेरिया, मोलोटोव, बुल्गानिन, कामानोविच, ब्रेझनेव, आंद्रोपोव, चेर्नेन्को या सर्वांची माहिती देता देता गोर्बाचेवच्या कारकिर्दीला आवश्यक अशी पार्श्वभूमी कशी तयार होत गेली याची माहिती लेखकाने दिली आहे. साहित्यक्षेत्रातील स्वातंत्र्य, पूर्व युरोप मधील साम्यवादी वर्चस्वाविरुद्ध चळवळी आणि शीतयुद्धातील क्युबाचा प्रश्न आणि नंतरचे सहकार्याचे प्रयत्न याचे विवेचन लेखकाने केले आहे. याच काळात रशियाच्या फसलेल्या अफगाण मोहिमेची माहितीही यात आली आहे. स्टालिनच्या काळात प्रगतीचा उच्च दर्जा गाठला गेला असला तरी नंतरच्या कृश्चेव्ह, ब्रेझनेव, आंद्रापोव, चेर्नेन्को या महासचिवांच्या काळात यात बदल होत गेले. अवजड उद्योग धंदे वाढलेले, लष्करी क्षमता प्रचंड असलेले, परंतु आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात मागासलेले असे सोविएत युनियनचे स्वरूप होते. तशातच वयोवृद्ध नेत्यांच्यातील सत्ता लालसा आणि शारीरिक क्षीणतेतही खुर्ची न सोडण्याची वृत्ती यातून रशियन जनतेत राजकारणाबाबत एक नैराश्य कंटाळा पसरलेला होता. आर्थिक विवंचनांना हे नेते उत्तर शोधत नव्हते. आणि शासकीय नियंत्रणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. अशा परिस्थितीत अरुण साधू म्हणतात की मिखाईल गोर्बाचेव्ह यांना सचिव बनण्याची काहीही संधी नव्हती. पोलिट ब्युरो, मध्यवर्ती समिती, लष्कर कोणाचाच पूर्ण पाठिंबा गोर्बाचेवना नव्हता. पाठिंबा होता तो फक्त परराष्ट्रमंत्री ग्रोमिको यांचा. चेर्नेन्को च्या मृत्युसमयी पॉलिट ब्युरोचे बरेचसे सदस्य अनवधानाने मास्को बाहेर, तर काही परदेशी गेलेले होते. याचा फायदा घेऊन परराष्ट्रमंत्री ग्रोमिको याने पोलिट ब्युरोची तातडीची बैठक भरवून, गोर्बाचेव यांना महासचिव देण्याचा प्रस्ताव मांडला आणि झटक्यात पास करून घेतला. अरुण साधूंनी, गोर्बाचेव यांचे चरित्रकार मेदवेदेव यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन असे सांगितले आहे की; 1986 मध्ये गोर्बाचेव कोणालाच इतके उदारमतवादी आणि धाडसी सुधारणावादी असतील असे वाटले नव्हते. परंतु अवघ्या दोन-तीन वर्षात त्यांनी सोविएत युनियनचा पूर्ण चेहरामोहराच पालटून टाकला. गोर्बाचेव यांचे महत्त्व स्पष्ट करताना लेखक म्हणतात, गोर्बाचेवने गतकाळाचा, क्रांत्योत्तर रशियाचा सांगोपांग विचार केला. कोठे काय चुकले, याचा शोध घेतला. शेती आणि पर्यायाने संपूर्ण अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेली समस्या केवळ नैसर्गिक अडचणींनी झालेली नाही; तर शेतीचे सामाजिकीकरण, सामायिकरण आणि प्रशासकीय केंद्रीकरण यांचा खर्च लक्षात न घेतल्याने आणि उत्पादन खर्चाचा विचार न करता; वस्तूंचे दर प्रमाणाबाहेर पाडून ठेवल्याने रशियन अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीत पोहोचली; हे त्यांनी जाणले. लेखकाने हे स्पष्ट करण्यासाठी शेती, अवजड उद्योग यांची उदाहरणं दिली आहेत. यावर उपाय म्हणून गोर्बाचेव यांनी वस्तूंवरील खर्च व त्यांच्या किंमतीचा मेळ घालण्याचे ठरवले. व्यवस्थापन रचना, अर्थरचना आणि योजनांची केंद्रीय हुकूमातून अंमलबजावणी यातून सर्व मोठ्या स्तरांवर मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालत असे. पिठाच्या गिरणीत कोळशाच्या वॅगन्स जाणे, एेन हिवाळ्यात लष्करच्या तळावर केवळ उजव्या पायाच्या बुटांचा पुरवठा होणे ही त्यातली मासलेवाईक उदाहरणे.
गोर्बाचेव यांची वेगळी वाटचाल त्यांची ध्येयधोरणे, मोकळेपणा (ग्लासनोस्त) आणि पुनर्रचना (पेरेस्त्रोईका), प्रशासकीय अंमलबजावणी यांचे विवेचन लेखकाने केले आहे. आधुनिक सुधारणा हवी असे म्हणणारे बुद्धिवादी, भाववाढीने त्रस्त कामगार, आणि बदलाला विरोध करणारे परंपरावादी अशा सर्वांचा विरोध गोर्बाचेव यांना का सहन करावा लागला याची चर्चा लेखकाने केली आहे. तसेच गोर्बाचेव यांना सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न झाला; तेव्हाची परिस्थिती, येल्त्सिन यांचे स्थान-महत्त्व, गोर्बाचेव यांचा मध्यवर्ती समिती विसर्जित करण्याचा निर्णय आणि नंतर रशियातून कम्युनिस्ट पक्षाची समाप्ती या सर्वांचा ऊहापोह त्यांनी केला आहे. रशियातील संघराज्याच्या भवितव्याचा उल्लेख करून लोकशाही स्वरूपाच्या करारांनी रशियन गणराज्यांना एकत्र आणण्याचे यश गोर्बाचेव यांच्या एकी प्रयत्नांना येईल असा आशावाद पुस्तकाच्या शेवटी लेखकाने केला आहे. गोर्बाचेव यांची दृष्टी सोवियत संघ राज्यापुरती मर्यादित नसून, सर्व मानवी समाजाला स्पर्श करणारी आहे. आणि जगात एक अभूतपूर्व रक्तहीन क्रांती गोर्बाचेव यांनी घडवून आणली आहे असे मत लेखकाने मांडले आहे. 'तिसरी क्रांती : लेनिन स्टालिन ते गोर्बाचेव' या पुस्तकाचा आवाका प्रचंड मोठा आहे. काल, घटना, घटनांचे रशिया अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय महत्व, विविध व्यक्ती, विविध विचार प्रणाली, प्रत्येक नेत्याची सैद्धांतिक भूमिका, आर्थिक संरचना, प्रशासकीय संरचना, या आणि अशा विविध अंगांनी विकसित होत जाणारा हा ग्रंथ. अत्यंत क्लिष्ट आणि जड माहितीचे अतिशय सोप्या मार्मिक आणि आकर्षक अशा भाषेतून विवेचन व विश्लेषण हे या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय! लेखकाने जरी हा ग्रंथ मूलभूत संशोधन करणाऱ्या अभ्यासूंसाठी नसून, जगाविषयी उत्सुकता असलेल्या तरुणांसाठी आहे; असे म्हटले असले तरी, आज मराठी वाड्:मयामध्ये रशियन क्रांती बाबत इतकी सखोल माहिती विवेचन विश्लेषण करणारा दुसरा ग्रंथ उपलब्ध नाही. प्रस्तुत ग्रंथ आणि त्याला जोडलेली संदर्भ ग्रंथ सूची दोन्हीचा संशोधकांना निश्चितच उपयोग होईल. मराठी वाचकांना व त्यांच्या बुद्धीला उद्युक्त करणारे, रशियातील साम्यवादी क्रांती बद्दल सखोल आणि प्रमाणित माहिती देणारे पुस्तक लिहिल्याबद्दल श्री. अरुण साधू यांचे आभार! त्यांना मिळालेल्या राज्य साहित्य पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
(1995 मधे लिहिलेले परीक्षण)
---
अवल, वेगळा धागा काढ की!
अवल, वेगळा धागा काढ की!
आज अचानक या धाग्यावर २०-२२ नव्या पोस्टी पाहून आनंद झाला.
अगं जुना लेख. राहू दे इथेच
अगं जुना लेख. राहू दे इथेच
<<<अवल, वेगळा धागा काढ की!
<<<अवल, वेगळा धागा काढ की!
आज अचानक या धाग्यावर २०-२२ नव्या पोस्टी पाहून आनंद झाला. >>>>
दोन्ही वाक्यांना सहमत
अजून आनंद वाढवते
अजून आनंद वाढवते
वाचते खूप पण लिहून ठेवण्याचा आळस.
मागे छोटसं लिहिलेलं पोस्टते. खरं तर इथे खूपदा बोलणं झालंय तरी.
सागरतीरी - ध्रुव भट्ट
भट्ट यांची ही पहिली कादंबरी गुजराती मध्ये त्यांनी लिहिलेली. त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे
आकारानुसार कथा म्हणावे तर ही मोठी आहे तर कादंबरी म्हणावे तर ही छोटी आहे. पण यात मांडलेले विचार, त्तवज्ञान, अनुभव हे मात्र कादंबरीच्याच योग्यतेचे.
ही कथा आहे एका इंजिनियर तरुणाची. काही वर्ष बेकारीत घालवल्यावर एक सरकारी नोकरी त्याला चालून येते. सौराष्ट्राच्या खडकाळ जमिनी वरती एक रासायनिक कारखाना काढायचा आहे अन त्या दृष्टीने जमिनीची मोजमापन करायचे असे हे काम असते. प्रथमतः: या तरुणाला ही नोकरी पसंत नसते. पण बेकारीची झळ पोहोचलेल्या या तरुणाने ती नोकरी जरा नाराज होऊनच स्वीकारलेली असते.
सौराष्ट्रात आल्यावर तिथला निसर्ग, समुद्र, किनारपट्टी, तिथली माणसं, त्यांच्या रूढी परंपरा, त्यांची तत्व , जीवन जगण्याची जिद्द आणि कष्ट या सर्वांची ओळख हळूहळू कथा नायक आणि आपल्याला होत राहाते. अगदी छोट्या छोट्या व्यक्तिरेखा; आपल्या मूलभूत विचारसरणीला धक्का देणार्या ठरतात . तर कधी एखादे वाक्य आपल्याला ठक्कन जागं करते.
उदा. नूराभाई ही व्यक्ती. जंगल खात्यातला एक अधिकारी. कथानायक गप्पामध्ये विचारतो कि ही सगळी झाडी तुम्ही लावलीत का? तेव्हा नूराभाई म्हणतात " थोडी मी लावली काही मजुरांनी. पण वाढवून मोठी करायचा चार्ज माझ्याकड़े होता. पाहिलं झाड वर आलं ना साहेब, तेव्हा वाट्लन, कि आता खुदाला सांगता येईल असं काहीतरी काम हातून झालं . "
एक झाड लावणं, ते मोठं होणं ही आपल्या दृष्टीने एक साधी नैसर्गिक घटना. पण त्या खडकाळ अन काहीही न उगवणाऱ्या जमिनीत हे घडणं, हे एखाद्याच्या आयुष्याची कमाई होऊ शकते. हे असं खाडकन जागं करणारं वास्तव समोर येतं.
अन हे असं अनेकदा होतं. आपल्या नेहमीच्या आयुष्यात सहजी घडणाऱ्या, मिळणाऱ्या गोष्टी अन त्यामुळे त्याला आपण कसं कमी महत्व देतो याची ठळक जाणीव या कादंबरीत सतत होत राहाते. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष वाचूनच जाणून घ्यायच्या. एकदा नाही तर अनेकदा. प्रत्येक वाचनात काही नवीन कळतं, काही नवीन उमगत. हेच या कादंबरीला मोठं बनवतं.
या पूर्ण कादंबरीमध्ये भाषेचा एक वेगळा लहेजा आहे. म्हटलं तर बोली भाषा पण त्यातही एक अस्सल गावरान खरं तर समुद्रकिनारपट्टीवरची एक खास झाक यावर आहे. सुरुवातीला आपल्याला जरा अडखळल्या सारखं होतं. पण मग त्यातली गोडी कळू लागते. एक प्रकारचा आपलेपणा, एक बांधून ठेवणारी जातकुळी आहे या भाषेची. मूळ गुजराथीत छानच असेल पण अनुवादातही ती फार छान उतरलीय.
कथा जसजशी पुढे जात जाते निसर्ग,मानवी मन यांचे तपशील येत राहातात. निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी ,नायक बरोबरच आपलीही बदलत जाते. हेच आसपासच्या माणसांबद्दलही. हळूहळू व्यक्तिरेखांचे पैलू नायका बरोबरच आपल्यापर्यंत पोहचू लागतात. कादंबरीचे हेही एक वैशिट्य मानावे लागेल. नायकाशी आपण असे काही बांधले जातो कि त्याचा प्रत्येक अनुभव, त्याचा प्रत्येक विचार हा आपला बनत जातो. विचार, कृती तो नव्हे, तर वाचणारे आपणच करत जातो. नायकाशी इतके तादात्म्य मी तरी फार क्वचित अनुभवलंय.
नायकाचे समुद्रावरील चालणे, कबिराबरोबर जाणे, नूराभाईबरोबर विविध पक्षी पाहणे, दुधराज नावाचा पक्षी मलातर आजही भूल घालतो. बाबाजींचे तत्वज्ञान आणि समाज मानसाचं भान अन शेवटी निसर्गाला मान तुकवणं . सगळंच अचंबित करणार. छोटा बिश्नो आणि त्याची आजी- त्या आजीचं "समुद्र बालटीत मावणारा नाही" अशी धारणा अन श्रद्धा.
किस्ना, त्याने समुद्राचे सांगितलेले, शिकवलेले नियम. भेंसाला पीर , बेली अन तिचं दुःख, नायकाचं पदभ्रमण, परदेशी माँ , बिष्णुला साप चावणे, हादा भटचा इतिहास, बाभळीच्या काटक्या रात्रीच्या अंधारात नेणारी मुलं , एक जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी सारं आयुष्य दगड फोडण्यात घालवणारा सबुर आणि या सर्वांत आपले वेगळेपण ठळकपणे उमटवणारी अन सगळ्यांना तारून नेणारी प्रचंड सकारात्मक असणारी अवल !
किती किती व्यक्तिरेखा अन कितीतरी अनुभव! शेवटचा वादळाचा अनुभव तर अगदी भिडतोच आपल्याला.
अन हे सगळं अनुभवताना जाणवत राहतं कि आपण केवळ समुद्राच्या तीरावरच आहोत. समोर अथांग पसरलेला समुद्र अजून आपल्या नजरेच्याही आवाक्यात नाही ! मानवी मनाचा समुद्र! कधीच पूर्णपणे आवाक्यात न येणारा. कथा नायका सारखेच आपणही केवळ समुद्रतीरी !
(आता कळलं असेल मी अवल हे नाव का घेतलं
त्या अवलसारखी सकारात्मकता जपता येणं हे जमायला हवं यार)
सागरतीरी - ध्रुव भट्ट
सागरतीरी - ध्रुव भट्ट
>>> अरे वा! ओळख आवडली.
अरे वा! ओळख आवडली....+1.
अरे वा! ओळख आवडली....+1.
थांकु ललिता, देवकी.
थांकु ललिता, देवकी.
तिसरी क्रांती जरा राजकारणावर आहे सो आवड असेल तशी तरच आवडेल पुस्तक
ओळख आवडलीच !
ओळख आवडलीच !
Pages